कौल लावणे: कौल लावणे म्हणजे शुभाशुभ शकुन पाहणे किंवा भविष्य विचारणे. कौल लावण्याची प्रथा वेद काळापासून दिसून येते.  कारीरी-इष्टिनामक यज्ञ पाऊस पडण्याकरितायजुर्वेदात सांगितला आहे. यज्ञाच्या शेवटी काळ्या घोड्याला वा मेंढीला हाकतात व पळताना त्यांनी मलमूत्र विसर्जन केले तर पाऊस पडेल, असे भविष्य निश्चित होते. ग्रीक लोक डेल्फाय येथील देवळातील देवतेस कौल लावत व मग तेथील पुजारीण विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देत असे. त्या उत्तरावर ग्रीकांचा विश्वास बसत असे. ईजिप्शियन, रोमन, अरब इ. लोकांतही कौल लावण्याची प्रथा होती. भारतातही देवाला कौल लावण्याची प्रथा प्राचीन काळापासून चालत आली आहे. पूजा करून देवतेला उजवी-डावी मागतात. उदा., फुलांच्या पाकळ्या, तांदळाचे दाणे किंवा इतर पदार्थ चिकटवितात. उजवी पडली, तर कार्यसिद्धी डावी पडली, तर नकार वा अपयश सूचित होते. देवापुढे कागदावर मजकूर लिहून, त्या चिठ्ठ्या विखरून टाकतात. प्रथम उचललेल्या चिठ्ठीतील मजकूर खरा मानतात.

जोशी, लक्ष्मणशास्त्री