भरणी : भारतीय नक्षत्रमालिकेतील दुसऱ्या क्रमांकाचे नक्षत्र. याचा समावेश मेष राशीत होतो. नक्षत्रचक्राचा आरंभ ज्या वेळी कृत्तिका नक्षत्रापासून होत असे त्या वेळी हे शेवटचे नक्षत्र होते.यात मेषेपैकी ४१,३९ व म्यू हे तीन तारे असून त्यांपैकी ४१ हा योगतारा आहे [विषुवांश २0 ४६’ ५६.७ क्रांती उ. २७0 ‘ ५९”.५ प्रत ३.६ [⟶ ज्योतिषशास्त्रीय सहनिर्देशक पद्धति प्रत]. याची आकृती योनी व देवता यम मानण्यात येते. या नक्षत्राची गणना उग्र आणि अधोमुख गणात केलेली आहे.

विद्या, अर्ध्य व भूमीखनन यांस हे नक्षत्र शुभ मानतात. या नक्षत्रावर मंगल कार्ये करीत नाहीत. भाद्रपदाच्या कृष्ण पक्षात चंद्र-नक्षत्र भरणी असताना नवमृताचे भरणी श्राद्ध करण्याचा प्रघात आहे.

भरणीचे तिन्ही तारे अंधुक असून त्यांचा लहानसा त्रिकोन बनतो. अश्विनी आणि कृत्तिका यांना सांधणारी रेषा काढली, तर या रेषेच्या उत्तरेस हा त्रिकोण आहे. डिसेंबर महिन्यात रात्री ९ च्या सुमारास हे नक्षत्र खस्वस्तिकी किंवा शेखर बिंदूजवळ (डोक्यावर) दिसते.

ठाकूर, अ.ना.