कर्काटक : (कर्कट, पाश्चात्त्य नाव सर्सिनस). नीकॉला लाकाय यांनी सुचविलेल्या दक्षिण खगोलार्धातील चौदा तारकासमूहांपैकी एक तारकासमूह. तो दक्षिण त्रिकोण व नरतुरंग यांच्या दरम्यान दिसतो. दोन जवळजवळ आयताकार असलेल्या आकृती अरुंदशा पट्ट्याने जोडल्याप्रमाणे याचा आकार आहे. पट्टा अंधुक असला तरी त्याच्या सीमेवरील मित्र नावाच्या तार्‍यामुळे तो चटकन सापडू शकतो. त्याच्यातील आल्फा तारा ३.४ प्रतीचा [→ प्रत] असून एकूण चौदा तारे डोळ्यांनी दिसू शकतात. विषुवांश १४ ते १५ होरा व क्रांती –६४ ते –७० [→ज्योतिषशास्त्रीय सहनिर्देशक पद्धति] या मर्यादेत हा तारकासमूह असल्यामुळे उत्तर गोलार्धातील उत्तरेकडील प्रदेशांत तो दिसत नाही.

  

ठाकूर, अ.ना.