रॅम्सडेन यांचा उन्नति-दिगंशमापक

उन्नति-दिगंशमापक : आकाशस्थ ज्योतींचे ⇨ उन्नतांश  व ⇨ दिगंश मोजण्याचे एक साधन. यामध्ये एक दूरदर्शक (दुर्बिण) असून काटकोनात असणाऱ्या दोन अक्षांवर त्याचे परिभ्रमण होईल अशी योजना केलेली असते. एक अक्ष उदग्र (उभा) असून त्याभोवतालच्या परिभ्रमणाने खस्थ ज्योतीच्या दिगंशाचे मापन करता येते व दुसरा अक्ष क्षैतिज पातळीत असून त्याभोवतालच्या परिभ्रमणामुळे खस्थ ज्योतीचे उन्नतांश काढता येतात. विशेषतः अमावस्येच्या आसपास जेव्हा चंद्र सूर्याच्या जवळ असतो तेव्हा त्याचे वेध घेणे कठीण पडते. अशा वेळी या यंत्राचा उपयोग सूर्योदयाच्या थोडेसे अगोदर किंवा सूर्यास्ताच्या थोडेसे नंतर विशेषतः चंद्राचा वेध घेण्यासाठी करतात. हे यंत्र आडव्या व उभ्या पातळ्यांतील कोन मोजणाऱ्या थिओडोलाइट नावाच्या उपकरणासारखेच पण त्याहून मोठे असते. तसेच हे उपकरण थिओडोलाइटापेक्षा अधिक अचूक असते.

फडके, ना. ह.