एअरी, सर जॉर्ज बिडेल : (२७ जुलै १८०१–२ जानेवारी १८९२). ब्रिटिश ज्योतिर्विद व ब्रिटनचे सातवे रॉयल ॲस्ट्रॉनॉमर. त्यांचा जन्म ॲनिक येथे झाला. केंब्रिज येथील ट्रिनिटी कॉलेजातून ते १८२३ मध्ये सीनियर रँग्‍लर झाले. तेथेच १८२४ मध्ये फेलो, १८२६ मध्ये गणिताचे प्राध्यापक व १८२८ मध्ये केंब्रिज विद्यापीठाच्या वेधशाळेचे संचालक अशी त्यांची प्रगती होत गेली. १८३५ साली त्यांची रॉयल ॲस्ट्र्नॉमर म्हणून नेमणूक झाली.

ग्रिनिच येथील रॉयल ऑब्झर्व्हेटरीच्या कार्यपद्धतीत त्यांनी अनेक सुधारणा केल्या व स्वतः अभिकल्पित (आराखडे) केलेली अनेक उपकरणे वेधशाळेत बसविली. त्यांतील चंद्राची निरीक्षणे घेणारा ⇨ उन्नतिदिगंशमापक (१८४७). शून्य रेखावृत्ताचे प्रमाणीकरण करणारे ⇨ याम्योत्तर वक्र (१८५१) आणि १२ इंची (सु. ३०·५ सेंमी.) परावर्तक दूरदर्शक (१८५८) ही उपकरणे महत्त्वाची ठरली. चुंबकीय व हवामान निरीक्षणांसाठी त्यांनी ग्रिनिच वेधशाळेचीच एक शाखा म्हणून एक वेगळी वेधशाळा १८४० मध्ये स्थापन केली. शुक्राच्या माध्य (सरासरी) गतीची आठपट आणि पृथ्वीच्या माध्य गतीची तेरापट यांत पृथ्वीच्या माध्य गतीच्या १/२४० पटी इतका फरक पडतो व त्यामुळे त्यांच्या गतीच्या हिशोबात २४० वर्षांचा फरक पडतो असे त्यानी दाखविले. या महत्त्वाच्या संशोधनाबद्दल त्यांना रॉयल ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचे सुवर्ण पदक मिळाले. चंद्रासंबंधीचे ८,००० वेध संकलित करून ते १८४६ मध्ये त्यांनी प्रसिद्ध केले. चंद्रासंबंधी बरेच संशोधन करून चंद्राच्या गतीसंबंधी १८८६ मध्ये त्यांनी एक महत्त्वाचा सिद्धांत मांडला.

त्यांनी १८५४ साली ३७७ मी. खोल असलेल्या एका कोळशाच्या खाणीच्या पृष्ठभागावर व तळाशी लंबकाच्या साहाय्याने गुरुत्वीय प्रवेगाचे मूल्य सूक्ष्मपणे मोजून पृथ्वीच्या विशिष्ट गुरुत्वाचे ६·५६६ हे मूल्य काढले. झुलत्या पुलासंबंधी १८६७ साली लिहिलेल्या प्रबंधाबद्दल त्यांना टेलफर्ड पदक मिळाले. १८७३ मध्ये सूर्यावरील डागांचे नियमित वेध घेण्याची पद्धती त्यांनी सुरू केली. तसेच सूर्याच्या उद्रेकांचे नकाशे तयार करण्याचे कार्य त्यांनी १८७४ मध्ये सुरू केले.

ते रॉयल सोसायटीचे १८३६ मध्ये फेलो व १८७२-७३ मध्ये अध्यक्ष होते. रॉयल सोसायटीच्या कॉप्ली (१८३१) व रॉयल (१८४५) या पदकांचा सन्मान त्यांना मिळाला. रॉयल ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचे ते चार वेळा अध्यक्ष होते. १८७२ मध्ये त्यांना सर हा किताब देण्यात आला. त्यांनी ३७७ प्रबंध, १४१ अहवाल व ११ ग्रंथ इतके विस्तृत लेखन केले. १८८१ साली त्यांनी रॉयल ॲस्ट्रॉनॉमर पदाचा राजीनामा दिला, तथापि मृत्यूपावेतो त्यांचे वास्तव्य ग्रिनिच येथेच होते.

  मोडक, वि. वि.