ब्रह्म गुप्त : (५९८-६६५?). भारतीय गणिती व ज्योतिषशास्त्रज्ञ. दक्षिण मारवाडातील भिनमाळ गावचे ते रहिवासी होते त्यांचा जन्म तेथेच झाला असावा. प्रखर बुद्धिमत्ता व स्वतःच वेध घेऊन ज्योतिषशास्त्रात मिळविलेले प्राविण्य यांमुळे ते उज्जैन येथील वेधशाळेचे प्रमुख झाले. तेथे असतानाच त्यांनी ब्रह्मस्फुटसिद्धान्त (किंवा ब्रह्मसिद्धान्त) हा ग्रंथ वयाच्या तिसाव्या वर्षी लिहिला. तो का लिहिला, याविषयी त्यांनी लिहिले आहे की, ‘ब्रह्मदेवांनी सांगितलेले ग्रहगणित पुष्कळ काळ लोटल्यामुळे दृकप्रत्ययाच्या निकषावर अचूक येत नाही म्हणून जिष्णुगुप्ताचा पुत्र ब्रह्मगुप्त ते स्पष्ट करून सांगत आहे’ यावरून स्वतः वेध घेऊन ब्रह्मगुप्तांनी ज्योतिर्गणितात शुद्धता आणल्याचे दिसून येते. (वेध घेण्याचे तुरीययंत्र ब्रह्मगुप्तांनी कल्पिले होते, असे शं. बा. दीक्षित यांचे मत आहे).

ब्रह्मस्फुटसिद्धान्त हा ग्रंथ कित्येक दिवस ज्योतिर्गणिताचा प्रमाणभूत ग्रंथ म्हणून गणला गेला. त्याचा फार्सी व अरबी भाषांत भाषांतरे झाली होती आणि त्याद्वारे अरबी गणिती व ज्योतिषशास्त्रज्ञ यांच्यावर, तसेच त्यांच्यामार्फत यूरोपियन विद्वानांवर ब्रह्मगुप्तांच्या कार्याचा प्रभाव पडला होता. या ग्रंथातील प्रत्येक श्लोकातील शब्द न शब्द घेऊन त्याचा अर्थ विशद करणाऱ्या अनेक टीका लिहिल्या गेल्या आणि उदाहरणे देऊन यातील श्लोक कसे बरोबर आहेत, ते विशद केले आहे. पैकी पृथूदकस्वामीची टीका प्रसिद्ध असून ती फक्त पहिल्या दहा अध्यायांवरच आहे. ब्रह्मगुप्तानंतर ५००-५५० वर्षांनी भास्कराचार्यांनी हा ग्रंथ प्रमाणभूत मानून आपल्या सिद्धान्तशिरोमणि याग्रंथाची रचना केली आहे. स्वतःच्या शोधाने नवीन गतिस्थिती कल्पिणारा महामतिमान शास्त्रकार असा ब्रह्मगुप्तांचा गौरव करून त्यांना ‘गणकचक्रचूडामणि’ असे भास्कराचार्यांनी संबोधले आहे.

ब्रह्मस्फुटसिद्धान्ताचे एकूम चोवीस अध्याय असल्याचा उल्लेख आढळतो. पहिले दहा अध्याय ज्योतिषशास्त्राविषयीचे असून त्यांमध्ये ग्रहांचे भोग, दैनंदिन गती, सूर्य-चंद्रची ग्रहणे, ग्रहांचे उदयास्त व युत्या, चंद्राच्या कला, ग्रहांची स्थाननिश्चिती वगैरेंबद्दलची माहिती आलेली आहे. अकरावा अध्याय दूषणाध्याय म्हणून ओळखला जातो व त्यात पूर्वीच्या ज्योतिर्गणित्यांचे कोणते सिद्धांत चुकीचे आहेत व आपण स्वतः कोणते सुधारून वापरले आहेत, यांविषयी माहिती आलेली आहे. अकरावा अध्याय दूषणाध्याय म्हणून ओळखला जातो व त्यात पूर्वीच्या ज्योतिर्गणित्यांचे कोणते सिद्धांत चुकीचे आहेत व आपण स्वतः कोणते सुधारून वापरले आहेत, यांविषयी माहिती दिलेली आहे. तेरा ते सतरा अध्यायही ज्योतिषशास्त्रावरच असून ते आधीच्या अध्यायांना पूरक आहेत परंतु ते त्रोटक वाटतात. एकोणिसाव्या अध्यायात छायाशंकूविषयी, विसाव्यात मापकांविषयी, एकविसाव्यात गोलाविषयी, बाविसाव्यात वेधयंत्राविषयी, तेविसाव्यात मापनांविषयी माहिती आणि चोविसाव्या अध्यायात सर्व ग्रंथाचा सारांष आलेला आहे. तथापि काहींच्या मते २२ ते २४ अध्याय मूळ स्वरूपात उपलब्ध नाहीत, तर काहींच्या मते काही हस्तलिखितांत पंचविसावा अध्यायही असून त्यात श्लोकबद्ध तक्ते आहेत.

बारावा व अठराव्या अध्याय गणितासंबंधी असून त्यांत गणितातील मूळक्रियांचे नियम, श्रेढीविचार [  श्रेढी], श्रेढींची बेरीज, त्यांतील पदे कशी काढावयाची, अंकगणितीय क्रमचयाचे [  समचयात्मक विश्लेषण] नियम, एकघाती पदावलींचा वर्ग, एकघाती व द्विघाती अनिर्धार्य व निर्धार्य समीकरणांचे निर्वाह (उत्तरे), त्रिकोण, त्रिकोण व चौकोन यांची क्षेत्रफळे, तसेच पृष्ठफळ व घनफळ इत्यादींसंबंधीची भूमितीय प्रमेये वगैरे माहिती आलेली आहे. अठराव्या ‘कुट्टक’ नावाच्या अध्यायात बीजगणितातील बऱ्याच विषयांची माहिती आली आहे.फेरफार करून ब्रह्मगुप्तांनी आर्यभटांचीच पद्धती या ग्रंथामध्ये वापरली आहे. ध्यानग्रहोपदेश हा ७२ आर्याचा एक अध्यायही ब्रह्मगुप्तांनी लिहिल्याचा उल्लेख आढळतो. तो वरील ग्रंथात समाविष्ट केलेला नाही अथवा तो स्वतंत्रपणेही उपलब्ध नाही.

वेधांद्वारे आलेले वर्षमान त्यांनी ३६५ दिवस, १५ घटिका, ३० पळे, २२ विपळ व ३० प्रतिविपळे (विपळाचा साठावा भाग म्हणजे एक प्रतिविपळ) एवढे घेतले असून हे वर्षमान प्रत्यक्षापेक्षा सु. ५२ विपळांनी कमी आहे. दिनमान व रात्रिमान समान असणाऱ्या विषुवदिवशी सूर्य पूर्व बिंदूत असताना मेषसंक्रमण होते, असे त्यांनी मानल्यामुळे वरील चूक झाली आहे. वास्तविक अशा प्रकारे आलेले वर्षमान हे सायन वर्षमान होय. यावरून अयनबिंदूंना [संपात] वक्री गती असते, हे त्यांना माहीत नसल्याचे दिसून येते. असे असले, तरीही ज्योतिषशास्त्रात त्या वेळेपर्यंत झालेल्या प्रगतीचा त्यांच्या ग्रंथांत समावेश झालेला आढळतोच शिवाय त्यांच्या कार्यामुळे सातव्या शतकातील भारतीय ज्योतिषशास्त्राच्या व गणिताच्या ज्ञानाची पातळीही उंचावली होती. अशा प्रकारे मध्ययुगापूर्वीच्या भारतीय ज्योतिर्गणित्यामधील ब्रह्मगुप्तांचे स्थान अतिशय महत्वाचे आहे.

मराठे, स. चिं