संपातबिंदू दर्शविणारी खगोलाची आकृती : (१) वसंतसंपात, (२) शरत् संपात, (३) क्रांतिवृत्त (आयनिक वृत्त), (४) खगोलीय विषुववृत्त, (५) खगोलीय उत्तर धुव, (६) आयनिक उत्तर धुव, (७) खगोल.संपात : पृथ्वी सूर्याभोवती भ्रमण करते परंतु सूर्यच खगोलावर विशिष्ट मार्गाने भ्रमण करतो असा भास होतो. त्या भ्रमण मार्गाला क्रांतिवृत्त किंवा आयनिक वृत्त म्हणतात. हे क्रांतिवृत्त खगोलीय विषुव-वृत्ताला (पृथ्वीची विषुववृत्त पातळी खगोलास ज्या काल्पनिक वृत्ताला छेदते त्याला) ज्या दोन बिंदूंत छेदते त्या छेदनबिंदूंना संपात किंवा संपातबिंदू किंवा अयनबिंदू म्हणतात. जेथे क्रांतिवृत्त खगोलीय विषुव- वृत्ताला दक्षिणेकडून उत्तरेकडे असे जाताना छेदते तो वसंतसंपात (Υ) व तेथून १८० अंशांवर क्रांतिवृत्त खगोलीय विषुववृत्ताला उत्तरेकडून दक्षिणेकडे असे जाताना छेदते तो शरत् संपात (Ω) असे म्हणतात. या दोन्ही पातळ्यांमध्ये सु. २३° ३०‘ चा कोन असतो. या ठिकाणी सूर्य अनुकमे २१ मार्च व २२ किंवा २३ सप्टेंबर या दिवशी असतो. या दिवशी सूर्य खगोलीय विषुववृत्तावर असल्याने पृथ्वीवरील कोणत्याही ठिकाणी १२ तासांचा दिवस व १२ तासांची रात्र असते. म्हणून या दिवसांना विषुव-दिन असेही म्हणतात. या दिवशी सूर्य बरोबर पूर्वेस उगवतो व पश्र्चिमेस मावळतो. संपातबिंदू दीर्घकाल-पर्यंत खगोलावर ताऱ्यांच्या सापेक्ष एकाच ठिकाणी कायम राहत नाहीत. पृथ्वीचा आस क्रांति-वृत्ताच्या आसाभोवती तिच्या भ्रमणाच्या उलट दिशेने परंतु दोन्ही अक्षांतील कोन २३° ३०’ कायम ठेवून शंक्वाकार गतीने सु. २५,७८० वर्षांत एक फेरी पूर्ण करतो. त्यामुळे विषुववृत्ताची पातळीही सारखी पण सावकाश बदलत असते आणि त्यामुळे संपातबिंदूही पश्र्चिमेकडे किंचित सरकत असतात. ही सरक ५०.२ विकला (सेकंद) इतकी असते. यालाच संपातचलन म्हणतात. २००८ सालात वसंतसंपात उत्तरा भाद्रपदा नक्षत्रात होते. या सरकत्या वसंतसंपातापासून विषुववृत्तावर खस्थ ज्योतींचे विषुवांश आणि क्रांतिवृत्तावर भोग मोजतात.[→ ज्योतिषशास्त्रीय सहनिर्देशक पद्धति].

पहा : संपातचलन.

काजरेकर, स. ग.