एम्डेन, रॉबर्ट: (४ मार्च १८६२-८ ऑक्टोबर १९४०). स्विस भौतिकीविद व खगोल भौतिकीविद. तारकीय संरचनेसंबंधी त्यांनी महत्त्वाचे कार्य केले आहे. त्यांचा जन्म सेंट गालेन येथे झाला. हायड्‍लबर्ग, बर्लिन व स्ट्रॅसबर्ग येथे त्यांनी गणित व भौतिकी या विषयांचे अध्ययन केले. १८९९ साली म्यूनिक येथील तांत्रिक विद्यापीठात त्यांची नेमणूक झाली, तेथेच १९०७ साली ते भौतिकी व वातावरणविज्ञान या विषयांचे प्राध्यापक झाले व १९२८ साली ते खगोल भौतिकी या विषयाचे मानसेवी प्राध्यापक झाले. १९३४ साली ते झुरिकला गेले.

नैसर्गिक आविष्कारांना (मुख्यतः भूभौतिकी व खगोल भौतिकी या विज्ञानांमधील) ऊष्मागतिकीचे (यांत्रिक व इतर ऊर्जांशी उष्णतेच्या असलेल्या संबंधांचे गणितीय विवरण करणाऱ्या शास्त्राचे) नियम लावून त्या आविष्कारांचे स्पष्टीकरण देण्याचा त्यांनी प्रयत्‍न केला, हे त्यांचे मुख्य कार्य होय. ताऱ्यांच्या अंतरंगाच्या अध्ययनासाठी ऊष्मागतिकीचा उपयोग सर्वप्रथम त्यांनीच केला. ऊष्मागतिकीच्या अशा तऱ्हेच्या उपयोगांवर त्यांनी व्याख्यानेही दिली. Gaskugeln हे त्यांचे प्रसिद्ध पुस्तक या व्याख्यानांवरूनच तयार केलेले आहे. वायूंच्या आत्मगुरुत्वाकर्षी (स्वतःच्या कक्षीय परिभ्रमणामुळे गुरुत्त्वाकर्षण निर्माण करणाऱ्या) गोलासंबंधीचा सिद्धांत प्रथम लेन व रिटर यांनी आणि स्वतंत्रपणे लॉर्ड केल्व्हिन यांनी मांडला होता. त्या सिद्धांतात सुधारणा करून एम्डेन यांनी तो अधिक तर्कशुद्ध व पद्धतशीर रीतीने मांडला. त्यांनी सूर्यासंबंधीच्या सैद्धांतिक ज्ञानातही पुष्कळ भर घातली असून सूर्यावरील डाग कसे निर्माण होत असावेत, यासंबंधीचा एक सिद्धांतही मांडला होता. Zeitschrift fiir Astrophysik हे खगोल भौतिकीविषयीचे १९३० साली स्थापन झालेले नियतकालिक सुरू करण्यास त्यांचेच प्रयत्‍न मुख्यत्वे कारणीभूत झाले व १९३६ पर्यंत ते या नियतकालिकाचे संपादकही होते. ते झुरिक येथे मृत्यू पावले.

ठाकूर, अ. ना.