याम्योत्तर चक्र: (म्यूरल सर्कल). ताऱ्यांच्या स्थानांची अचूक माहिती मिळविण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या या उपकरणाला पूर्वी दक्षिणोत्तर भित्तियंत्र म्हणत. याच्या साहाय्याने ताऱ्यांचे ⇨उन्नतांश(क्षितिजसापेक्ष कोनात्मक उंची) मोजता येतात. क्षितिजाजवळ ताऱ्यांचे वेध घेणे अवघड असल्यामुळे ताऱ्यांचे उन्नतांश जास्तीत जास्त असतानाच वेध घेणे सोयीचे असते. तारा याम्योत्तर वृत्ताचा (दोन्ही ध्रुव व निरीक्षकाचे खस्वस्तिक म्हणजे थेट डोक्यावरचा बिंदू यांमधून जाणाऱ्या मोठ्या वर्तुळाचा) ऊर्ध्वार्ध ओलांडीत असताना त्याचे उन्नतांश मोजून त्याची क्रांती (विषुववृत्तापासूनचे कोनात्मक अंतर) काढता येते. याम्योत्तर वृत्तापाशी उन्नतांश कायम ठेवून तारा काही वेळ क्षितिजसमांतर जाताना दिसतो.

प्राचीन काळी भारतातही अशी याम्योत्तर भित्तियंत्रे होती. यामध्ये याम्योत्तर वृत्ताच्या प्रतलात एक भिंत बांधून तिच्या पृष्ठावर अंशांच्या खुणा असलेले एक चक्र आखलेले असते. या चक्राच्या मध्यात याम्योत्तर वृत्ताला लंब (पूर्व-पश्चिम) दिशेत एक खुंटी बसविलेली असते. याम्योत्तर वृत्तावर आलेला तारा, खुंटी व निरीक्षक एका रेषेत आले की, ताऱ्याचा उन्नतांश काढता येतो. नंतर यामध्ये अनेक सुधारणा झाल्या.

क्षितिजाच्या उत्तर बिंदूपासून ताऱ्याचे उन्नतांश मोजल्यानंतर पुढील सूत्राने त्याची क्रांती काढता येते.

९० + स्थळाचे अक्षांश – उन्नतांश = क्रांती

अशा प्रकारे उत्तर क्रांती धन व दक्षिण क्रांती ऋण येते.

विषुवांश काढण्यासाठी स्थानिक नाक्षत्र वेळ अचूकपणे दर्शविणारे घड्याळ वापरतात. वसंत संपाताचे याम्योत्तर वृत्तावरून संक्रमण होताना या घड्याळत शून्य वाजतात. त्यामुळे कोणत्याही ताऱ्याच्या याम्योत्तर वृत्त संक्रमणाचा क्षण या घड्याळाने टिपला म्हणजे त्याचा विषुवांश कळतो. 

पहा : ज्योतिषशास्त्रीय सहनिर्देशक पद्धति याम्योत्तर संक्रमणमापक.

करमळकर, स. मा.