अधिक्रमण : एखाद्या मोठ्या खस्थ ज्योतीच्या बिंबावरून तीपेक्षा लहान खस्थ ज्योती जाताना दिसली तर त्या घटनेस ‘अधिक्रमण’ असे म्हणतात. सूर्याच्या तेजस्वी बिंबावरून बुध व शुक्र हे ग्रह जात असताना तेजस्वी गोलावरून एक काळा ठिपका सरकत गेल्यासारखा दिसतो. पृथ्वीची कक्षा व ग्रहांच्या कक्षा एकाच पातळीत असत्या, तर प्रत्येक अंतर्युतीच्या [→ युति] वेळी अधिक्रमणे झाली असती. बुधाची अधिक्रमणे तर वर्षातून तीन वेळा घडली असती. पण ग्रहांच्या कक्षांच्या पातळ्यांमध्ये कोन असल्याने अधिक्रमणे इतकी वारंवार होत नाहीत. बुधाची अधिक्रमणे त्यातल्या त्यात लवकर म्हणजे सु. तीन ते तेरा वर्षांनी आणि ती मे किंवा नोव्हेंबर महिन्यांत होतात, तर शुक्राची अधिक्रमणे सुमारे ८, १०५, ८, १२२ अशा वर्षांच्या कालक्रमाने जून किंवा डिसेंबर महिन्यांत होतात.

आ. १ बुधाची अधिक्रमणे व त्यांचे मार्ग.अधिक्रमण हे एक प्रकारचे सूर्यग्रहणच होय. अधिक्रमणे दिवसा घडली तरच दिसू शकतील. बुधाचे बिंब लहान असल्यामुळे त्याचे अधिक्रमण दुर्बिणीतूनच दिसू शकते. शुक्राचे अधिक्रमण नुसत्या डोळ्यांनीही काळ्या चष्म्यातून चांगले पाहता येते. अधिक्रमण जास्तीत जास्त सात-आठ तास चालू रहाते. शुक्राच्या अधिक्रमणाचा उपयोग सूर्याची दृक्‌च्युती (निरीक्षकाच्या स्थानात बदल झाल्यामुळे खस्थ ज्योतीच्या स्थानात होणारा भासमान बदल,  → पराशय) काढण्यासाठी करतात.

१८७४ साली न्यूकम यांनी सूर्याची दृक्‌च्युती ८.७९४इतकी निश्चित केली.

१९०७ पासून १९९९ पर्यंतची बुधाची अधिक्रमणे :

१२-११-१९०७

५-५-१९५७

७-११-१९१४

६-११-१९६०

७-५-१९२४

९-५-१९७०

१०-११-१९२७

९-११-१९७३

११-५-१९३७

१२-११-१९८६

१२-११-१९४०

१४-११-१९९९

१४-११-१९५३

 

१७६१ पासून २१२५ पर्यंतची शुक्राची अधिक्रमणे :

६-६-१७६१

८-६-२००४

३-६-१७६९

६-६-२०१२

९-१२-१८७४

११-१२-२११७

६-१२-१८८२

८-१२-२१२५

आ. २. शुक्राची अधिक्रमणे व त्यांचे मार्ग

याच प्रमाणे गुरुच्या बिंबावरून त्याच्या चंद्रांची (उपग्रहांची) अधिक्रमणेही होतात. ग्रहणे दाखविण्याऱ्या तारकायुग्मांतही त्यांपैकी मोठ्या ताऱ्याच्या बिंबावरून छोट्या ताऱ्याचे बिंब सरकते. तेही अधिक्रमण होय.

कोळेकर, वा. मो.