हर्शेल, सर विल्यम : (१५ नोव्हेंबर १७३८–२५ ऑगस्ट १८२२). जर्मनीत जन्मलेले ब्रिटिश ज्योतिर्विद. प्रजापती (युरेनस) या ग्रहाचा शोध लावणारे, मोठमोठ्या दुर्बिणी स्वतः बनवून वेध घेणारे आणि सूऱ्याची निजगती सिद्ध करणारे ज्योतिर्विद. खगोलाचे पद्धतशीर निरीक्षण करण्यासाठी त्यांनी नाक्षत्र ज्योतिषशास्त्राची स्थापना केली. त्यांनी अभ्रिका ताऱ्यांच्या बनलेल्या असतात ही परिकल्पना सुचविली व तारकीय उत्क्रांतीचा सिद्धांत विकसित केला, तसेच अभ्रिकांच्या संरचनेविषयीचा सिद्धांतही मांडला. [→ अभ्रिका].

हर्शेल यांचा जन्म हॅनोव्हर (जर्मनी) येथे झाला. भाषा, गणित व प्रकाशकी या विषयांच्या अभ्यासाबरोबरच त्यांना ज्योतिषशास्त्राचीआवड निर्माण झाली. प्रयोग म्हणून वेध घेण्यासाठी ते दूरदर्शक भाड्याने घेत असत परंतु समाधान होईना म्हणून ते स्वतः आरसे घासून तयार करून लहान भावंडांच्या मदतीने परावर्ती दूरदर्शक बनवू लागले. १७७३ मध्ये त्यांनी १.२ मी. लांब प्रणमनी दूरदर्शक बनविला. त्यातून ४० पट मोठे चित्र दिसत असे. ९.२ मी. लांबीचा दूरदर्शकही त्यांनी तयार केला, तो बसविण्यास व वापरण्यास गैरसोयीचा झाला म्हणून ते परावर्ती दूरदर्शक तयार करू लागले. त्यांनी २.१ मी. केंद्रांतराचे २०० ३ मी. केंद्रांतराचे १५० व ६.१ मी. केंद्रांतराचे ८० इतके आरसे परिश्रमपूर्वक बनविले. त्यांतील २.१ मी. केंद्रांतराच्या आरशाचा दूरदर्शक त्यांना समाधानकारक वाटला. १७७९ सालापासून वेध घेण्यास त्यांनी सुरुवात केली. चौथ्या प्रतीपर्यंतचे सर्व तारे त्यांनी तपासले [→प्रर्तें. नंतर त्यांनी द्वित्त ताऱ्यांकडे लक्ष केंद्रित केले. या ताऱ्यांचे घटक फुगडीसारखे एक-मेकांभोवती परिभ्रमण करतात, असा सिद्धांत त्यांनी मांडला. अशा २६९ द्वित्त ताऱ्यांची पहिली यादी त्यांनी तयार केली होती. असे १,००० द्वित्त तारे त्यांनी शोधून काढले. १३ मार्च १७८१ रोजी वृषभ व मिथुन या राशी समूहांतील ताऱ्यांचे वेध घेत असता त्यांना एक तारा नव्यानेच आढळला. हा साधा तारा नसून धूमकेतू असावा असे त्यांना वाटले. रॉयलसोसायटीस त्यांनी तसे कळविलेही. कक्षा तपासल्यावर तो ग्रह आहेअसे ठरले. त्यांनी २६ एप्रिल १७८१ ला या शोधावर प्रबंध वाचला. त्यांनी या ग्रहाला त्यावेळचे राजे तिसरे जॉर्ज यांच्यावरून जॉर्जियम सीइड्स हे नाव दिले कालांतराने ज्योतिर्विद योहान एलर्ट बोडे यांनी सुचविलेले युरेनस हे नाव रूढ झाले. याचे भारतीय नाव प्रजापती आहे [→प्रजापति-२]. दूरदर्शकानेच दिसणाऱ्या पहिल्या ग्रहाच्या या शोधामुळे विल्यम यांची कीर्ती पसरली व त्यांना कॉप्ली सुवर्ण पदक मिळाले. राजाने त्यांना आपले खासगी ज्योतिषी म्हणून नेमले.

हर्शेल यांनी सूर्यावरील घडामोडींचे व डागांचे दीर्घकाल निरीक्षण करून सूर्य वायुरूप आहे, हे निश्चित केले. मंगळावरचे पांढरे डाग ध्रुवीय हिमप्रदेश असावेत, असे त्यांनी सांगितले. मंगळाचा परिवलन काल, शुक्राच्या वातावरणाचे अस्तित्व व बुधावर त्याचा अभाव यांचा पडताळा त्यांनी पाहिला. त्यांनी शनीच्या कड्यांचे वेध घेतले. शनीचे मिमास व एन्सिलेडस हे दोन उपग्रह आणि प्रजापतीचे टिटॅनिया व ओबेरॉन हे दोन उपग्रह त्यांना सापडले. सेरीस हा लघुग्रह त्यांनी पाहिला होता. सूऱ्याला निजगती आहे, असे त्यांनी ठरविले. त्यांनी विश्वाच्या संरचनेचा अभ्यास केला. तसेच एकक क्षेत्रातील ताऱ्यांच्या संख्या मोजून ताऱ्यांची दाटी ठरविली. शनी व शुक्र यांचा परिवलन काल त्यांनी पडताळून पाहिला.

हर्शेल यांनी सत्तर शोधनिबंध लिहून प्रसिद्ध केले. त्यांत त्यांनी केलेला सूर्यकुलाचा आकाशातील गतीविषयीचा अभ्यास, अवरक्त किरणांचा शोध (१८००) आणि ग्रह व सूर्यकुलातील इतर घटकांचे तपशीलवार संशोधन आले आहे. १८२१ मध्ये रॉयल ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचे ते पहिले अध्यक्ष झाले. त्यांचे चिरंजीव ⇨ सर जॉन (फ्रेडरिक विल्यम) हर्शेल हेही ज्योतिर्विद होते.

हर्शेल यांचे स्लॉव (बकिंगहॅमशर, इंग्लंड) येथे निधन झाले.

काजरेकर, स. ग.