अंतर्गमन : (संक्रांतिकाल-भूच्छायाप्रवेश). ज्यावेळी एखादी लहान खस्थ ज्योती त्याच्यापेक्षा मोठ्या ज्योतीच्या बिंबावरुन सरकण्यास सुरुवात होते तेव्हा त्या लहान ज्योतीची ‘संक्रांती’ किंवा ‘अंतर्गमन’ झाले, असे म्हणतात. बुध व शुक्र यांच्या कक्षा पृथ्वीच्या कक्षेच्या आतील बाजूस असल्याने सूर्यबिंबावरुन शुक्राचे किंवा बुधाचे लहान बिंब सरकते. तसेच गुरूच्या बिंबावरून त्याचे चंद्र किंवा उपग्रह सरकतात. हा अविष्कार म्हणजे ⇨अधिक्रमण होय. या अधिक्रमणाच्या सुरुवातीला ‘अंतर्गमन’ ही संज्ञा आहे. चंद्रग्रहणकालात चंद्र जेव्हा भूच्छायाप्रवेश करतो तो ग्रहणाचा प्रवेशकालही अंतर्गमनच होय.

फडके, ना. ह.