सौरवर्णपटलेखकवदर्शक : वर्णपटाच्या एका पट्टात वा तरंगलांबीत सूर्याचे छायाचित्र काढण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या उपकरणाला सौरवर्णपट लेखक सूर्याच्या छायाचित्राला सौरवर्णपट लेख म्हणतात. या उपकरणाच्या तत्त्वावर आधारलेल्या परंतु छायाचित्रणाऐवजी चाक्षुष (डोळ्यांनी करावयाच्या वा दृश्य) निरीक्षणासाठी वापरण्यात येणाज्या उपकरणाला सौरवर्णपट दर्शक म्हणतात.

सदर उपकरणाच्या कार्याचे तत्त्व ⇨ प्येअर-झ्यूल-सेझार झांसेन यांनी १८६९ मध्ये सुचविले होते. सौर दूरदर्शक व किरीटलेखक ही उपकरणे सूर्याच्या संपूर्ण म्हणजे धवल प्रकाशात कार्य करतात. १८९१-९५ या काळात ⇨ जॉर्ज एकरी हेल यांनी एकवर्णी सौर उपकरण तयार केले. छायाचित्रणाच्या दृष्टीने वापरण्यात येणाऱ्या अशा उपकरणाला त्यांनी स्पेक्ट्रोहेलिओग्राफ (सौरवर्णपट लेखक) व दृश्य निरीक्षणासाठी वापरण्यात येणाऱ्या अशा उपकरणाला स्पेक्ट्रोहेलिओस्कोप (सौरवर्णपट दर्शक) ही नावे दिली. याच सुमारास ⇨ आंरी आलेक्सांद्र देलांद्र यांनी त्याच्याशी जवळचा संबंध असलेले उपकरण तयार करण्याची खटपट केले होती. धवल प्रकाशापेक्षा सूर्याच्या एकवर्णी प्रकाशातील अध्ययनातून सूर्याच्या पृष्ठभागाची पुष्कळच अधिक तपशीलवार माहिती मिळू घकते.

हेल यांच्या प्रयुक्तीत (उपकरणात) एक ⇨ सूर्यानुगामी दर्पणयंत्र असून त्याने उच-अपस्करण वर्णपटलेखकाच्या लहान फटीवर सूर्याची लहान प्रतिमा तयार होते. या फटीच्या लगेच खाली असलेली व वर्णपटलेखकाच्या केंद्रप्रतलात असलेली फट पूर्ण (धवल) सूर्यप्रकाशातून तरंगलांब्यांचा एक अरुंद पट्ट अलग करते. मग जर सूर्याची प्रतिमा पहिल्या फटीतून जाऊ दिली आणि दुसऱ्या फटीमागील छायाचित्र पट्टी त्याच त्वरेने हलविली, तर सूर्याचे एकवर्णी छायाचित्र मिळते.दुसऱ्या फटीमागे छायाचित्र पट्टीऐवजी डोळा लावला आणि मग लहान परमप्रसरातून दोन्ही फटी एक तालात (ऐक्याने) कंपित होऊ दिल्या, तर सूर्यबिंबाच्या एका भागाची एकवर्णी प्रतिमा पहाता येऊ शकते. दृष्टिसातत्यामुळे ही प्रतिमा निश्‍चल दिसते.

जे. ए. अँडरसन यांनी यांत्रिक दृष्टीने याहून खूपच साधी व पहाण्याला अधिक सोयीस्कर रचना वा मांडणी सुचविली. अँडरसन यांच्या सुधारित उपकरणात फटी स्थिर (अचल) रहातात आणि एका सामाईक उदग्र (उभ्या) दंडावर प्रत्येक फटीसमोर एक असे दोन चौरस लोलक (प्रचिन) बसविलेले असून ते उच्च गतीने परिभ्रमण करतात. लोलकांतील प्रणमनाचे (वक्रीभवनाचे) एकत्रित परिणाम व परिभ्रमण यांच्यामुळे सूर्यबिंबाच्या काही भागाचे निश्‍चितपणे क्रमवीक्षण होते. जेव्हा लोलक जलदपणे फिरविले जातात तेव्हा लागोपाठच्या क्रमवीक्षणांचे डोळ्यांमार्फत मिश्रण होते आणि एकवर्णी प्रतिमा परत निश्‍चल झालेली दिसते.

सूर्याचे एकवर्णी प्रकाशात निरीक्षण करण्याचे दुसरे तंत्र ⇨ बेर्नार फेर्दीनां ल्यो यांनी १९३३ मध्ये वापरण्यास सुरुवात केली. एकाच तरंगलांबीचा प्रकाश देणाऱ्या त्यांनी बनविलेल्या ल्यो गाळणीमुळे किरीटलेखकाच्या मदतीने मिळणाऱ्या प्रतिमेवरून सूर्याच्या पृष्ठभागाविषयी अधिक माहिती मिळणे शक्य झाले. नंतर हे तंत्र विकसित करण्याचे प्रयत्न अनेकांनी केले. १९१४ मध्ये आर्. डब्ल्यू. वुड यांनी एक कल्पना सुचविली. तिच्या आधारे एकवर्णीकारक (मोनोक्रोमॅटर) ही प्रयुक्ती तयार करण्यात आली. ही एक -वर्णीकारक प्रयुक्ती प्रणमनक दूरदर्शकाच्या प्रकाशमार्गात ठेवण्यात आली. एकवर्णीकारक ही अतिशय जटिल प्रकाशकीय गाळणी (छानक) आहे. तिच्यात क्वार्ट्झ खनिजाच्या पट्ट्यांनी अलग केलेल्या ध्रुवक पडद्यांची (आडपडद्यांची) मालिका असते. ही गाळणी प्रकाशाच्या व्यतिकरणाच्या तत्त्वानुसार कार्य करते आणि तिचा अभिकल्प तरंगलांब्यांचा अतिशय अरुंद पट्ट जाऊ देण्याच्या दृष्टीने तयार केलेला असतो. या वस्तुस्थितीमुळे सौरवर्णपट दर्शकापेक्षा एकवर्णीकारक काहीशी अधिक चांगली स्पष्ट सौर प्रतिमा मिळवून देतो. तथापि, एकवर्णीकारकाचे कार्य तापनाच्या दृष्टीने अतिशय संवेदनशील आहे व ही एकवर्णीकारक वापरण्यातील एक अडचण वा दोष आहे. त्यामुळे त्याचे तापस्थायी नियमन ०.१० से. पेक्षा कमी प्रमाणात असणे गरजेचे असते.

सौरवर्णपट लेखकाद्वारे सूर्याच्या पृष्ठभागाची छायाचित्रे मिळविण्यात आली. या छायाचित्रांमुळे सूर्याच्या पृष्ठभागावरील कॅल्शियम, हायड्रोजन व लोह यांसारख्या मूलद्रव्यांची वाटणी उघड झाली. या उपकरणाच्या मदतीने करण्यात आलेल्या निरीक्षणांमुळे सूर्याच्या कार्याची माहिती होण्यास मदत झाली.

अंकीय अभिलेखनामुळे (नोंदणीमुळे) निरीक्षणाच्या कालावधी कमी झाला आणि निरीक्षणाच्या कार्यक्रमात लवचिकता येऊ शकली. अशा रीतीने अंकीय अभिलेखनाच्या सोयीमुळे सौरवर्णपट लेखकाचे कार्यमान वा क्षमता, अनेक कामे करण्याचा गुण आणि उपयोगांचा पल्ला यांमध्ये मोठी वाढ झाली. अशा अंकीय माहितीवर संगणकामार्फत संस्करण/प्रक्रिया केल्यास सूर्याचा वेग व चुंबकीय क्षेत्राची माहिती मिळू शकते. तसेच काही सेकंदामध्येच व्यापक सौर क्षेत्रांचे अभिलेखन वा आलेखन करणे शक्य होते.

एकाच वेळी अनेक वर्णपटीय भाग आलेखित करण्यासाठी एकाहून अधिक कॅमेरे असलेल्या सौरवर्णपट लेखकांचे आराखडे तयार करण्यात आले आहेत. जंबुपार, टोकाचे जंबुपार व क्ष-किरण या तरंगलांब्यांनाही ही उपकरणे वापरण्यात आली आहेत. सूर्याच्या किरिटाचे अवकाशयानातून निरीक्षण करण्यासाठी लघुरूपातील सौरवर्णपट लेखक यशस्वीपणे वापरण्यात आला आहे.

ठाकूर, अ. ना.