ल्यो, बेर्नार फेर्दीनां : (२७ फेब्रुवारी १८९७-२ एप्रिल १९५२). फ्रेंच ज्योतिर्विद. यांनी ग्रहण नसताना सूर्याच्या किरिटाचे वेध घेऊ शकणारे सौर किरीटलेखक हे उपकरण शोधून काढले. तसेच त्यांनी चंद्र व ग्रह यांच्या प्रकाशाचे ध्रुवण [एकाच पातळीत कंप पावण्याचा आविष्कार ⟶ ध्रुवणमिति] मोजून त्यांच्या पृष्ठभागा विषयी अधिक माहिती मिळविली.

ल्यो यांचा जन्म पॅरिस येथे झाला. १९१८ मध्ये पदवीधर झाल्यावर ते पॅरिस येथील एकोल तंत्र निकेतनात ए. पेराँ यांचे साहाय्यक म्हणून काम करू लागले. तेथे त्यांनी लष्करी नौका व विमाने यांना मार्गदर्शक रेडिओ तंत्र विकसित केले. पेराँ यांच्यामुळे १९२० साली त्यांचा मदाँ वेधशाळेशी संबंध आला. १९४३ साली ते या वेधशाळेचे प्रमुख झाले व शेवटपर्यंत ते या पदावर होते.

ग्रहाच्या पृष्ठभागावरून परावर्तित होणाऱ्याव प्रकाशाची ⇨ ध्रुवणमिती हा त्यांच्या डॉक्टरेटच्या प्रबंधाचा व पुढील संशोधनाचा मुख्य विषय होता. यासाठी त्यांनी अधिक संवेदनशील ध्रुवणमापकही बनविला. दृष्टिरेषा ग्रहाच्या पृष्ठभागाशी निरनिराळे कोन करीत असताना त्यावरून परावर्तित होणाऱ्या प्रकाशाच्या ध्रुवणांतील बदलांची त्यांनी या ध्रुवणमापकाच्या मदतीने नोंद केली. प्रयोगशाळेत भिन्न पदार्थांवर तसेच प्रयोग करून मिळालेल्या माहितीच्या आधारे त्यांनी ग्रहांचे पृष्ठभाग कसे असू शकतील याविषयी अंदाज बांधले. अशा प्रकारे त्यांनी चंद्राचा व शुक्राचा पृष्ठभाग, मंगळावरील कालव्यांसारखे दिशणारे भाग व त्याच्या दक्षिण ध्रुवावरील टोपीसारखा भाग आणि बुधाचे वातवरण यांविषयी काही अनुमाने केली होती.

सूर्याचे खग्रास ग्रहण क्वचितच होते आणि त्या वेळी त्याच्या वर्णगोलाबाहेरच्या किरिटाचे निरीक्षण ७ मिनिटांपर्यंतच करता येई. १९३० साली ल्यो यांनी अगदी साधे तत्त्व वापरून एक किरीटलेखक शोधून काढला. यामुळे ग्रहण नसतानाही दिवसा कोणत्याही वेळी सूर्याच्या किरिटाचे निरीक्षण करता येऊ लागले. त्यांनी याच्या साहाय्याने पिरेनीज पर्वतावरील सु. ३,००० मी. उंचीवरील पिक ड्यू मिडी शिखरावरून सूर्याच्या किरिटाचे वेध घेतले व १९४१ साली सूर्यबिंबापासून फक्त १२° कोनीय अंतरावरील मघा ताऱ्याचे चित्रण केले. शिवाय १९३३ साली एकाच तरंगलांबीचा प्रकाश देणारी गाळणी (ल्यो गाळणी) त्यांनी बनविली होती. तिच्यामुळे किरीटलेखकाच्या मदतीने मिळणाऱ्या प्रतिमेवरून अधिक माहिती मिळणे शक्य झाले. यामुळे सूर्याच्या वर्णगोलातील आविष्कार, सौर डागाशेजारील धातुबाष्पाचे फवारे, अल्पकालीन स्फोट वगैरेंचे चित्रण करता आले. १९३९ साली त्यांनीच प्रथम सूर्याच्या तेजःशृंगाच्या स्थानांतरणाचे चलच्चित्रण केले. १९२३ साली प्रकाशविद्युत् ध्रुवणमापक या उपकरणाचा आराखडा तयार केला. १९५० साली इलेक्ट्रॉन गुणक हे उपकरण बनविले व त्याच्या मदतीने उंच ठिकाणी व जाता व किरिटीलेखकाविना किरिटाचे निरीक्षण करता येऊ लागले. [⟶ सूर्य].

पॅरिसच्या सायन्स ॲकॅडेमीचे सदस्यत्व व रॉयल अस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचे सुवर्णपदक (१९३९), पॅसिफिक ज्योतिषशास्त्रीय संघटनेचे ब्रुस सुवर्णपदक (१९४६) वगैरे सन्मान त्यांना मिळाले होते. २५ फेब्रुवारी १९५२ चे खग्रास सूर्यग्रहण खार्टूम (ईजिप्त) येथे पाहिल्यावर तेथून परत येताना आगगाडीतच त्यांना  हृदयविकाराने मृत्यू आला. 

ठाकूर, अ. ना.