नवतारा व अतिदीप्त नवतारा: (नोव्हा व सुपरनोव्हा). अंतर्गत स्फोटामुळे केव्हा केव्हा एखाद्या ताऱ्याच्या दीप्तीत अचानकपणे प्रचंड वाढ होते. त्यामुळे स्फोटापूर्वी दूरदर्शकाच्या साहाय्याशिवाय न दिसू शकणारा तारा एकदम दिसू लागतो. केव्हा केव्हा त्याचे तेज व्याध अथवा शुक्र यांच्या तोडीचे होते. स्फोटामुळे ताऱ्यातील द्रव्य बाहेर फेकले जाते. ताऱ्याचे तेज जलद वाढत जाऊन कमाल मर्यादा गाठते आणि मग हळूहळू कमी होत जाऊन काही आठवड्यांनी वा काही महिन्यांनी तेज स्फोटापूर्वीइतकेच किंवा त्याहून कमी होते. अशा ताऱ्यांना नवतारे (वा अतिदीप्त नवतारे) म्हणतात.

नवतारा व अतिदीप्त नवतारा यांमधील फरक: सर्वसामान्यतः या दोन प्रकारचे तारे सारखेच वाटले, तरी त्यांच्यामध्ये काही फरक आहेत. पहिला फरक म्हणजे नवताऱ्यांच्या मानाने अतिदीप्त नवतारे सु. १०,००० पट जास्त दीप्तिमान असतात व त्याच पटीने त्यांनी बाहेर फेकलेल्या ऊर्जेच्या मूल्यातही फरक असतो. दुसरी गोष्ट नवतारा अशा स्फोटाच्या वेळी आपल्या वस्तुमानाचा फारच थोडा भाग (सु. १/१०००) उत्सर्जित करतो. अतिदीप्त नवतारा आपल्या वस्तुमानाचा १/१० ते ९/१० भाग उत्सर्जित करतो. स्फोटानंतर नवतारा काही आठवड्यांपर्यंत दिसत राहतो, तर अतिदीप्त नवतारा काही महिन्यांपर्यंत दिसत राहतो. नवतारे त्यामानाने जास्त दिसतात. उदा., आपल्या आकाशगंगा दीर्घिकेत विसाव्या शतकात १९७७ सालापर्यंत ६ नवतारे उद्‌भवले. अतिदीप्त नवतारे त्यामानाने जास्त दुर्मिळ आहेत (प्रत्येक सर्वसामान्य दीर्घिकेत सु. शंभर वर्षांत एक-दोन). आकाशगंगेत गेल्या २,००० वर्षांत ७ अतिदीप्त नवताऱ्यांचे उद्रेल झाले असल्याच्या नोंदी आहेत.

नवतारे: ताऱ्यांच्या सारणीतून १२३ नवताऱ्यांची नोंद केलेली आढळते परंतु त्यांचा उद्‌भव आकस्मितपणे होत असल्यामुळे त्यांचा अभ्यास करणे कठीण होते. वरील १२३ पैकी फक्त २२ तारेच स्फोटपूर्वस्थितीत निश्चित माहीत होते व याहून थोडे अधिक पूर्वस्थितीला आल्यानंतरही अभ्यासिता आले.

नवताऱ्यांच्या अभ्यासात पुढील गोष्टींचा समावेश होतो : (१) नवताऱ्याच्या दीप्तीमध्ये कालानुसार होणाऱ्या बदलाचा अभ्यास (२) कमाल दीप्तीच्या वेळचे त्याचे दीप्तिमान निश्चित करणे आणि (३) त्याच्या वर्णपटाचा अभ्यास.

दीप्ति-काल आलेख: उद्रेकाच्या वेळी नवताऱ्याची ⇨ प्रत वेगवेगळ्या वेळी मोजून त्याची प्रत व काल यांचे आलेख काढतात. या आलेखांना दीप्ति-काल आलेख असे म्हणतात. या आलेखावरून नवताऱ्यांचे तीन वर्ग केलेले आहेत. (अ) द्रुत वर्ग : या वर्गातील नवतारे त्वरेने (थोड्या तासांत किंवा दिवसांत) कमाल दीप्तीपर्यंत जातात, अल्पकालपर्यंत कमाल दीप्तीत राहतात व नंतर थोड्या काळात (१-२ वर्षे वा त्याहून कमी) पूर्वस्थितीला जातात. (आ) मंद वर्ग : या वर्गातील नवतारे मंदगतीने (सु. एक महिना वा अधिक काळात) कमाल दीप्तिप्रत पोहोचतात व त्यांना पूर्वस्थितीला पोहोचण्यास कित्येक वर्षे लागतात. (इ) पर्ययी वर्ग : या वर्गातील नवताऱ्यांचे ठराविक काळानंतर पुनःपुन्हा उद्रेक झालेले आढळतात, दोन उद्रेकांमध्ये २० ते ८० वर्षे जातात. या प्रकारचे ६ नवतारे सापडले आहेत.

कमाल दीप्तिमान: नवतारा जास्तीत जास्त तेजस्वी दिसतो तेव्हाचे त्याचे दीप्तिमान हे त्याची निरपेक्ष प्रत निश्चित करून काढता येते परंतु पृथ्वीपासून नवतारे फार प्रचंड अंतरावर असतात व मध्यंतरी आंतरतारकीय द्रव्य असते त्यामुळे त्यांची निरपेक्ष प्रत काढणे अवघड होते. कमाल दीप्तिमान आणि दीप्ति-काल आलेखाचे स्वरूप यांमध्ये काहीतरी संबंध असला पाहिजे असे दिसते. कमाल दीप्तिमानाच्या वेळची नवताऱ्यांची सरासरी निरपेक्ष प्रत-७·६ असावी, असे अनेक नवताऱ्यांच्या निरीक्षणावरून निष्पन्न झाले आहे.

वर्णपट: नवताऱ्यांचे वर्णपट बरेच जटिल (गुंतागुंतीचे) असतात. सर्वच नवताऱ्यांच्या वर्णपटांचे अभ्यास करणे शक्य झालेले नाही. नवताऱ्यांच्या उद्रेकातील वेगवेगळ्या अवस्थांच्या वेळी त्यांचे वर्णपट घेतात. त्यांच्या अभ्यासावरून त्या वेळी नवताऱ्यात होत असणाऱ्या घडोमोडींबद्दल माहिती मिळू शकते.

गरुड (ॲक्विला) या तारकापुंजात १९१८ साली प्रगट झालेला नवतारा गेल्या ३०० वर्षांतला सर्वांत तेजस्वी (द्रुत वर्गातील) नवतारा होता. त्याच्या वर्णपटांचा विस्तृत प्रमाणावर अभ्यास झाला आहे. स्फोटापूर्वी त्याचा वर्णपट B वर्गातील ताऱ्याप्रमाणे [→ तारा] होता. कमाल दीप्तिमान झाले तेव्हा व त्याच्या अगोदर वर्णपट A वर्गासारखा झाला. या वर्णपटातील (हायड्रोजनाच्या) शोषणरेषा निळ्या रंगाच्या बाजूला ढळलेल्या दिसल्या. त्यावरून त्या ताऱ्याचे बाह्य वातावरण प्रसरण पावत असल्याचे स्पष्ट झाले. डॉप्लर तत्त्व [→ डॉप्लर परिणाम] वापरून या प्रसरणाचा वेग सु. १,५०० किमी./से. असल्याचे समजून आले, तर कमाल दीप्तीनंतर त्याचा वेग सु. २,४०० किमी./से. आढळला. प्रसरण वाढत गेले तसे वातावरण विरल होत गेले व हायड्रोजनाच्या शोषणरेषा पुसट होत जाऊन त्यांच्याऐवजी ऑक्सिजन व नायट्रोजन यांच्या अभ्रिकांमध्ये मिळणाऱ्या निषिद्धरेषा [→ वर्णपटविज्ञान] दिसू लागल्या. शिवाय हीलियम, कार्बन, नायट्रोजन, कॅल्शियम, लोह, टिटॅनियम, स्कँडियम, क्रोमियम, स्ट्राँशियम इ. भारी मूलद्रव्यांच्या शोषणरेषाही दिसू शकल्या. कमाल दीप्ती होऊन एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर जवळजवळ संपूर्ण अखंड वर्णपट दिसू लागला व फारच थोड्या शोषणरेषा अस्पष्ट अशा शिल्लक राहिल्या. आणखी एक वर्ष गेल्यावर याही शोषणरेषा दिसेनाशा झाल्या व ताऱ्याच्या गाभ्यापासून निर्माण होणारा फक्त अखंड वर्णपट शिल्लक राहिला. स्फोटानंतर ताऱ्याच्या गाभ्याचा अवपात [→ गुरुत्वीय अवपात] झाला असला पाहिजे, असा यावरून तर्क काढता आला.

कमाल दीप्ती होऊन काही महिने लोटल्यावर ताऱ्याभोवती एक अंधुक धुक्यासारखे वर्तुळाकार आवरण प्रसरण पावत असलेले प्रत्यक्ष दिसू शकले. कमाल दीप्तीच्या वेळी हा तारा सूर्यापेक्षा ३,००,००० पट जास्त तेजस्वी असल्याचे गणितावरून काढता आले. इतर नवताऱ्यांच्या तुलनेने हा फारच तेजस्वी होता.

शौरी (हर्क्युलस) तारकापुंजात १९३४ साली प्रगट झालेल्या नवताऱ्याच्या वर्णपटाच्या अभ्यासावरूनही सामान्यपणे असेच निष्कर्ष निघाले परंतु याच्या प्रसरणाचा कमाल वेग सु. ४०० किमी./से. आला. त्याचप्रमाणे त्याचे पुनःपुन्हा स्फोट होत असल्याचे आढळले. इतकेच नव्हे, तर १९३५ च्या उन्हाळ्यात त्या ताऱ्याचे दोन तुकडे झाले असल्याचे आढळून आले. नंतर हे तुकडे एकमेकांपासून हळूहळू दूर जाऊ लागले.

यावरून असे म्हणता येईल की, प्रत्येक नवताऱ्याच्या बाबतीत थोडेबहुत वेगळे प्रकार दिसत असले, तरी स्थूलमानाने एकूण घटनेचे स्वरूप सामान्यपणे सारखेच असते. स्फोटापूर्वी नवतारा B वर्गाच्या ताऱ्यासारखा वर्णपट देतो. स्फोटानंतर हळूहळू त्याचा वर्णपट A वर्गासारखा होतो. कमाल दीप्तीच्या सुमारास त्याच्या वर्णपटात नव्या रुंद शोषणरेषा व उत्सर्जन पट्ट दिसू लागतात व त्यांचा वर्ग F होतो. रेषांचे निळ्या रंगाकडे झालेले स्थानांतर ताऱ्याच्या बाह्य आवरणाचे प्रसरण दिग्दर्शित करते. कालांतराने शोषणरेषा पुसट होऊन अभ्रिकांच्या बाबतीत मिळणारे पट्ट दिसू लागतात [→ अभ्रिका]. हे पट्ट हळूहळू अस्पष्ट होत जातात व शेवटी अखंड वर्णपट आणि व्होल्फराये ताऱ्यांच्या सारखे रुंद पट्ट शिल्लक राहतात. कित्येकदा जंबुपार (वर्णपटातील जांभळ्या रंगाच्या पलीकडील अदृश्य) विभागात हे पट्ट जास्त तीव्रतेचे असतात.


अतिदीप्त नवतारे: आपल्या उत्क्रांतीत फार पुढे गेलेला एखादा तारा केव्हा केव्हा आपोआप स्फोट पावतो व त्याचा अतिदीप्त नवतारा होतो. अशा वेळी त्याची निरपेक्ष दीप्ती सूर्याच्या एक अब्ज पटींपेक्षाही जास्त होऊ शकते व त्याची ही स्थिती काही महिने टिकू शकते. आकाशगंगेप्रमाणे इतर दीर्घिकांतही या ताऱ्यांचा उद्रेक होतो आणि केव्हा केव्हा त्या नवताऱ्यापासून निघणाऱ्या प्रकाशाचे मान दीर्घिकेतील बाकी सर्व ताऱ्यांच्या एकत्रित प्रकाशाएवढे असते. (जवळजवळ प्रकाशवेगाइतक्या) प्रचंड वेगाने त्याच्यातून द्रव्याचे उत्सर्जन होत असते. या प्रचंड स्फोटाच्या वेळी लोहापेक्षा जास्त अणुभार असलेली मूलद्रव्ये तयार होतात आणि ती व ताऱ्याच्या आतली मूलद्रव्ये स्फोटाबरोबर बाहेर फेकली जातात.

अशा स्फोटातूनच उच्च ऊर्जेचे ⇨ विश्वकिरण, ⇨ पल्सार, कृष्ण विवरे [→ गुरुत्वीय अवपात], रेडिओ तरंग उत्सर्जित करणारे उद्‌गम, क्ष-किरण तारे इत्यादींचा उद्‌भव होत असतो, असा तर्क आहे. या सर्व गोष्टींमुळे अतिदीप्त नवताऱ्यांचा अभ्यास करणे फारच महत्त्वाचे ठरते.

आकाशगंगेमध्ये गेल्या २,००० वर्षांत झालेले अतिदीप्त नवताऱ्यांचे स्फोट कोष्टकात दिले आहेत.

बाह्य अतिदीप्त नवताऱ्यांचा अभ्यास: इ. स. १८७० सालानंतर आकाशगंगेबाहेरचे सु. ४०० अतिदीप्त नवतारे नोंदले गेले आहेत. अशा अतिदीप्त नवताऱ्यांचा शोध घेण्याचे कार्य १९३४ मध्ये एफ्. झ्विकी यांनी कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये सुरू केले. या पद्धतीत वेगवेगळ्या दीर्घिकांची एकामागून एक छायाचित्रे घेतली जातात व त्या छायाचित्रांवरून एखादा अतिदीप्त नवतारा उद्‌भवला आहे की काय याची छाननी केली जाते. असा तारा सापडल्यास त्याची माहिती इतर वेधशाळांना पुरविण्यात येते व मग त्याचा विशेष अभ्यास केला जातो. यामध्ये त्या ताऱ्याचे वेगवेगळ्या प्रकाशीय गाळण्या वापरून प्रकाशमापन करणे व त्याच्या वर्णपटांचा अभ्यास करणे यांचा अंतर्भाव होतो. यासाठी मौंट पॅलोमार येथील ५०८ सेंमी. व्यासाच्या दूरदर्शकाचीही मदत घेण्यात येते. आपल्या आकाशगंगेत अतिदीप्त नवतारा केव्हा दिसेल ते सांगता येत नसल्याने बाहेरच्या अशा ताऱ्यांचा अभ्यास करणे भाग पडते.

वर्गीकरण: आर्. मिंकोव्हस्की यांनी अतिदीप्त नवताऱ्यांच्या वर्णपटांवरून वर्ग १ व वर्ग २ असे त्यांचे दोन वर्ग केले आहेत.

वर्ग १ : यातील सर्व अतिदीप्त नवताऱ्यांचे वर्णपट एकसारखेच असतात. विवृत्ताकार दीर्घिकांमध्ये [→ दीर्घिका] फक्त या वर्गात मोडणारे अतिदीप्त नवतारेच उद्दीप्त होतात. अशा दीर्घिका फार मोठ्या वयाच्या असतात व त्यांमध्ये सूर्यापेक्षा जास्त वस्तुमानाच्या ताऱ्यांची संख्या अत्यल्प असते. यावरून असा तर्क करता येतो की, वर्ग १ मधील अतिदीप्त नवतारे हे सु. सूर्याइतके वस्तुमान असणाऱ्या ताऱ्यांच्या स्फोटापासून उत्पन्न होत असावेत. निळ्या प्रकाशीय गाळणीमघून निरीक्षण करता असे दिसते की, या वर्गातील ताऱ्यांचे दीप्तिमान कमाल होण्याला कित्येक दिवस लागतात. हे कमाल दीप्तिमान कित्येक दिवस टिकते व मग सु. ३० दिवस ते झपाट्याने कमी होत जाते. त्यानंतर घातीय प्रमाणाने त्यांची दीप्ती सावकाश कमी होत जाते. कमाल दीप्तिमानाच्या वेळी त्याच्या वर्णपटात सिलिकॉन आयनांची (विद्युत भारित अणूंची) ६,१५० Å (Å अँगस्ट्रॉम = १०-८ सेंमी.) तरंगलांबीची शोषणरेषा तीव्र स्वरूपात आढळते.

वर्ग २ :  यातील अतिदीप्त नवतारे सामान्यतः दीर्घिकांच्या सर्पिल भुजांमध्ये उद्‌भवतात. या भुजांमध्ये सूर्यापेक्षा अनेक पट वस्तुमान असलेले अल्पवयीन तारे बहुसंख्येने असतात. त्यामुळे या वर्गाचे अतिदीप्त नवतारे सूर्यापेक्षा फार जास्त वस्तुमान असलेल्या ताऱ्यांच्या स्फोटामुळे उत्पन्न होत असावेत, असा अंदाज करता येतो. या ताऱ्यामधून उत्सर्जित झालेल्या द्रव्याच्या वर्णपटात हायड्रोजनाच्या रेषा तीव्र असतात. त्यावरून या अंदाजाला पुष्टी मिळते. निळ्या प्रकाशीय गाळणीतून निरीक्षण केल्यास असे दिसते की, अशा अतिदीप्त नवताऱ्यांची दीप्ती थोड्याच दिवसांत कमाल मर्यादा गाठते. कमाल दीप्ती अल्पकाल टिकते व मग सु. २५ दिवस त्यांची दीप्ती प्रथम झपाट्याने कमी होते. त्यानंतर ती हळूहळू कमी होत जाऊन विशिष्ट मूल्यावर सु. ५० ते १०० दिवस स्थिर रहाते. त्यानंतर पुन्हा झपाट्याने कमी होत जाते. कमाल दीप्तीच्या वेळी या ताऱ्यांच्या वर्णपटात हायड्रोजनाची ६,५६३ Å तरंगलांबीची रेषा जोरदार दिसते.

वर्ग २ मधील अतिदीप्त नवताऱ्याच्या प्रारंभीच्या वर्णपटातील ऊर्जा वितरण १२,०००° के. तापमान असलेल्या ⇨ कृष्ण पदार्थाच्या वर्णपटासारखेच दिसते. यावरून त्या ताऱ्याचे पृथ्वीपासूनचे अंतर माहीत असल्यास कमाल दीप्तीच्या वेळची ताऱ्याची त्रिज्या काढता येते. एका ताऱ्याच्या बाबतीत (एसएन १९७० जी) ही त्रिज्या ३ X १०१२ मी. इतकी (म्हणजे प्रजापतीच्या-युरेनसाच्या-कक्षेच्या त्रिज्येइतकी) प्रचंड आहे. यावरून ताऱ्याचे निरपेक्षदीप्तिमान काढता येते. वरील ताऱ्याच्या बाबतीत ते (सूर्याच्या पेक्षा १ अब्जपट) १०३५ वॉट आले. पहिले ३० दिवस पृष्ठभाग ५,००० किमी./से. इतक्या वेगाने प्रसरण पावत होता आणि ३० दिवस संपले तेव्हा त्याची त्रिज्या (सूर्यमालेच्या त्रिज्येपेक्षाही मोठी) २ X १०१३ मी. झाली. प्रसरणामुळे पृष्ठभागाचे तापमान सु. ६,०००° के. पर्यंत उतरले. यानंतर मग बाह्यभाग अती विरल झाल्यामुळे त्याच्या आतला भाग दिसू लागतो व त्यामुळे ताऱ्याची त्रिज्या कमी झाल्यासारखी वाटते. यामुळे त्याची दीप्ती कमी झाल्याचा भास होतो.

स्फोटामुळे अतिदीप्त नवताऱ्यात होणारे फरक

अतिदीप्त नवताऱ्यांचे अवशेष : अतिदीप्त नवताऱ्यांच्या स्फोटांचे शेकडो अवशेष आकाशात आढळतात. यांपैकी काही पल्सार या स्वरूपात आहेत [पल्सार हा प्रचंड वेगाने स्वतःच्या अक्षाभोवती फिरणारा न्यूट्रॉन तारा असतो → पल्सार]. कित्येकदा हा अवशेष प्रसरण पावणाऱ्या वायुमय अभ्रिकेच्या स्वरूपात असतो (खंड १ मधील चित्रपत्र क्र. ८० वरील ‘हंस नक्षत्रातील विरल अभ्रिका’ हे चित्र पहावे). तिसरा प्रकार म्हणजे रेडिओ तरंगांचा विस्तृत उद्‌गम व चौथा प्रकार म्हणजे असाच विस्तृत क्ष-किरण उद्‌गम. ‘क्रॅब अभ्रिका’ हा इ. स. १०५४ मध्ये दिसलेल्या अतिदीप्त नवताऱ्याचा अवशेष या सर्व प्रकारांचे संयुक्त स्वरूप आहे (खंड क्र. १ मधील चित्रपत्र क्र. ८० वरील ‘वृषभ तारकासमूहातील क्रॅब अभ्रिका’ हे चित्र पहावे).

अवशेषांच्या वैशिष्ट्यांची कारणे : आकृतीमध्ये स्फोटानंतर अतिदीप्त नवताऱ्यामध्ये होणारे फेरफार व त्यामुळे अवशेषातून वेगवेगळी प्रारणे (तरंगरूपी ऊर्जा) कशी निर्माण होतात ते दाखविले आहे. (अ) ही ताऱ्याची स्फोटपूर्व स्थिती आहे. (आ) ताऱ्याच्या गाभ्याचा निपात (१) व प्रसरण पावणारे आवरण. आवरणापासून निघणारे प्रारण नागमोडी रेषांनी दाखविले आहे. (इ) अवपातामुळे ताऱ्याच्या गाभ्याचा न्यूट्रॉन तारा बनतो (२), त्याचा व्यास सु. २० किमी. असतो व त्याचे अतितीव्र चुंबकीकरण झालेले असते. त्याच्यातून (जवळजवळ प्रकाशवेगाइतक्या) द्रुत गतीचे इलेक्ट्रॉन (३) उत्सर्जित होतात. ते ताऱ्यांच्या बाह्य आवरणातून बाहेर येताना क्ष-किरण, दृश्य प्रकाश व रेडिओ तरंगांचे उत्पादन करतात, यांना सिंक्रोट्रॉन पद्धतीचे प्रारण असे म्हणतात (४). त्याशिवाय फिरत्या न्यूट्रॉन ताऱ्यांतून रेडिओ तरंगांचे (५) उत्सर्जन होत असते. (इ) ही ताऱ्याची क्रियाशील अवस्था होय. ताऱ्याची उत्क्रांती पुढे होत जाते (ई). त्याबरोबर स्फोटजन्य ऊर्जेचे रूपांतर आघात तरंगात (६) होते. त्याच्यामागील अती उष्ण आयनद्रायूमध्ये (७) क्ष-किरण व जंबुपार किरण उत्पन्न होत असतात. त्याच बरोबर उर्वरित इलेक्ट्रॉनांमुळे सिंक्रोटॉन पद्धतीने रेडिओ तरंगही (८) उत्पन्न होत असतात. केंद्रस्थानातील पल्सार रेडिओ तरंगांचे स्पंद प्रक्षेपित करीत असतोच. हंस नक्षत्रामधील अवशेष या स्वरूपाचा असला पाहिजे. शेवटच्या टप्प्यात (उ) आघात तरंगांची सर्व ऊर्जा प्रारणाच्या स्वरूपात निघून गेलेली व फक्त रेडिओ तरंग उत्सर्जित करणारा पल्सार मागे उरतो. ही स्थिती पुढे लक्षावधी वर्षे राहू शकते.


उत्पत्तीची मीमांसा : नवताऱ्यांच्या व अतिदीप्त नवताऱ्यांच्या उत्पत्तीचे कोडे अद्याप पूर्णपणे उलगडलेले नाही. तरी यासंबंधी काही कल्पना मांडण्यात आलेल्या आहेत.

नवताऱ्यांच्या बाबतीत फक्त बाह्य आवरणातच काही कारणाने असमतोल उत्पन्न होतो व फक्त बाह्य भागच स्फोटाने उत्सर्जित होतो. कारण अशा स्फोटात फक्त ताऱ्याच्या एकूण वस्तुमानापैकी फक्त १/१०००० ते १/१००० इतकेच वस्तुमान कमी होते. अवशिष्ट तारा पूर्वीप्रमाणेच प्रकाश देत रहातो. पर्ययी नवताऱ्यावरून ही गोष्ट स्पष्ट होते.

वर्ग १ मधील अतिदीप्त नवताऱ्याचे मूळचे वस्तुमान सूर्याच्या वस्तुमानाच्या जवळपास असते. अशा वस्तुमानाच्या तांबड्या महाताऱ्याचे या प्रकारच्या अतिदीप्त नवताऱ्यात रूपांतर होत असावे. तो तारा युग्मताऱ्यांपैकी एक असावा असे दिसते. तांबडा महातारा आपले वायुरूप आवरण उत्सर्जित करून श्वेत लघुताऱ्यात रूपांतरित होतो परंतु तो तारा युग्मताऱ्यांपैकी एक असेल, तर मग त्याच्या जोडीच्या ताऱ्याकडून त्याच्याकडे द्रव्याचे संक्रमण सुरू होते. या क्रियेत त्या श्वेत लघुताऱ्याचे वस्तुमान सूर्याच्या १·४४ पट या क्रांतिकारक मूल्याला येऊन पोहोचले की, त्याच्या गाभ्याचा तीव्र स्वरूपाचा निपात होतो व त्यामुळे तो अतिदीप्त नवतारा बनून प्रचंड प्रमाणात ऊर्जेचे उत्सर्जन करतो.

ताऱ्याचे मूळचे वस्तुमान सूर्यापेक्षा बरेच जास्त (४ ते ९ पट) असेल, तर प्रथम काही दशकोटी वर्षे त्याच्या गाभ्यातील हायड्रोजनाचे हीलियमात रूपांतर होत राहते आणि ऊर्जा उत्पन्न होते. गाभ्यातील हायड्रोजन संपत आला म्हणजे गाभा आकुंचन पावू लागतो. त्याचबरोबर बाह्यभाग प्रसरण पावतो व तो तारा तांबडा महातारा बनतो. गाभ्याभोवतीच्या अरुंद स्तरात हायड्रोजनाचे हीलियमात रूपांतर होत रहाते व गुरुत्वाकर्षणामुळे गाभा आणखी आकुंचन पावतो. अकुंचनामुळे तापमान वाढते व ते पुरेसे वाढल्यावर हीलियमाचे कार्बनमध्ये रूपांतर होत जाऊन ऊर्जा निर्माण होते. गाभ्यातील हीलियम अशा तऱ्हेने संपत आला की, कार्बनाचेही रूपांतर होण्याची विक्रिया सुरू होते व तारा स्फोट होण्याच्या अवस्थेला येतो.

एका पर्यायात कार्बनाच्या रूपांतरामुळे ताऱ्यात असमतोल उत्पन्न होतो व त्याचा स्फोट होऊन तो वर्ग २ ची अतिदीप्त नवतारा बनतो. अशा वेळी मागे फक्त प्रसरण पावणारे विरल वायूच अवशेष रूपाने उरतात.

परंतु कार्बनाची विक्रिया सुरू होऊनही त्याचा स्फोट नाहीच झाला, तर दुसरा पर्याय संभवतो. कार्बनाच्या विक्रियेमुळे त्याहून भारी वस्तुमानाची मुलद्रव्ये तयार होऊ लागतात व गाभ्यात अत्यंत प्रचंड तापमान निर्माण होऊन त्यातून न्यूट्रिनो बाहेर पडू लागतात. हे न्यूट्रिनो बाहेर पडण्याचे प्रमाण वाढत जाते व त्यामुळे गाभ्यातील ऊर्जा कमी होत जाते. त्यामुळे गाभ्याचा एकदम संपूर्ण अवपात होतो. त्याबरोबर न्यूट्रॉनांचा प्रचंड लोंढा उत्पन्न होऊन त्याबरोबर गाभ्याच्या वरचे सर्व आवरण दूर फेकले जाते व अवशेष म्हणून मागे एक पल्सार किंवा कृष्ण विवर उरते.

पहा : गुरुत्वीय अवपात पल्सार.

संदर्भ : 1. Gorenstein, P. Tucker, W. Supernova Remnants, Scientific American, July 1971.

2. Kirshuer, R. P. Supernovas in Other Galaxies, Scientific American, December 1976.

3. Stephenson, F. R. Clark, D. H. Historical Supernovas, Scientific American, June 1976.

4. Struve, O. Zebergs, V. Astronomy of the 20th Century, New York, 1962.

पुरोहित, वा. ल. गोखले, मो. ना.