भूप्रकाश : पृथ्वीवरून परावर्तित होणारा सूर्यप्रकाश. अमावस्येच्या आधी व नंतर दोनचार दिवस भूप्रकाशाचे प्रत्यंतर चंद्रबिंबावर पहाता येते. या काळात सूर्यप्रकाशाने प्रकाशित झालेला चंद्राचा काही भाग (कोर) पृथ्वीवरून कलेच्या स्वरूपात दिसतो. त्याच वेळी चंद्राचा अप्रकाशित भाग पूर्णपणे काळा होऊन अदृश्य न होता भूप्रकाशामुळे अंधुकपणे प्रकाशित होऊन चंद्राचे उरलेले बिंब दिसते. चंद्र ज्याप्रमाणे सूर्याच्या किरणांनी प्रकाशित होतो, त्याचप्रमाणे पृथ्वीही सूर्यकिरणांनी प्रकाशित होत असते व पृथ्वीवरून परावर्तित झालेला हा प्रकाश चंद्रबिंबावर पडून पृथ्वीवरून पाहताना ते अंधुकपणे प्रकाशित झालेले दिसते. चंद्रावरून पाहिल्यास पृथ्वीच्याही कला दिसतात. चंद्रावरून दिसणाऱ्या पृथ्वीच्या कला चंद्राच्या कलांच्या बरोबर विरूद्ध असतात. म्हणजे जेव्हा चंद्राच्या कला लहान असतात त्याच वेळी चंद्रावरून दिसणाऱ्या पृथ्वीच्या कला मोठ्या असतात. भूप्रकाश चंद्रप्रकाशाहून अधिक तेजस्वी आहे कारण चंद्रावरून पाहिल्यास पृथ्वीबिंब चंद्रबिंबाच्या १३ पटींनी मोठे दिसते व शिवाय पृथ्वीच्या पृष्ठभागाची प्रकाश परावर्तनक्षमता चंद्राहून अधिक आहे. अमावस्येच्या आगेमागे चंद्राची कोर लहान असताना चंद्राचा पृथ्वीवर येणारा प्रकाश मंद असतो, तर चंद्रावरून पाहिल्यास पौर्णिमा अवस्थेच्या जवळपास पृथ्वी असल्याने चंद्रावर जाणारा भूप्रकाश प्रखर असून अंधारातील चंद्रबिंबाचा भाग स्पष्ट दिसतो. याच्या उलट यापुढील काळात चंद्रबिंबावर पृथ्वीवरून परावर्तित होणारा प्रकाश मंद होत जातो व चंद्रबिंब अधिकाधिक प्रकाशित होत जात असल्यामुळे त्या प्रकाशाने डोळ्यांवर होणाऱ्या परिणामामुळे भूप्रकाशाने प्रकाशित होणारे चंद्रबिंब नजरेत भरत नाही. दुर्बिणीतून पाहिल्यास भूप्रकाशाने प्रकाशित झालेले उरलेले चंद्रबिंब या काळातही दिसू शकते.

मराठे, स. चिं.