चंद्रशेखर, सुब्रह्मण्यन् : (१९ ऑक्टो. १९१०— ). अमेरिकेत स्थायीक झालेले भारतीय खगोल भौतिकीविद. तारकीय उत्क्रांती, अतिदीप्त नवताऱ्याची उत्पत्ती व ताऱ्यांचे रासायनीक संघटन यांविषयी त्यांनी महत्त्वाचे कार्य केले आहे. त्यांचा जन्म लाहोरला झाला. मद्रासच्या प्रेसिडेन्सी महाविद्यालयातून ते १९३० साली बी.ए. झाले. त्यांचे पुढील शिक्षण इंग्लंडमध्ये झाले व १९३३ साली त्यांनी केंब्रिज विद्यापीठाची डॉक्टरेट
पदवी संपादन केली. १९३३—३५ या काळात ते ट्रिनिटी महाविद्यालयाचे फेलो होते. १९३६ साली ते अमेरिकेला गेले. त्यांनी आपले बहुतेक संशोधन यर्कीझ वेधशाळेत केले. तेथे १९४३ साली ते शिकागो विद्यापीठात प्राध्यापक व १९५२ साली ॲस्ट्रोफिजिकल जर्नलचे कार्यकारी संपादक झाले. त्यांना १९५३ साली अमेरिकेचे नागरिकत्व व १९५५ साली नॅशनल ॲकॅडेमी ऑफ सायन्सेसचे सभासदत्व मिळाले. यांशिवाय पुढील पदके देऊन त्यांचा बहुमान करण्यात आला : ब्रूस पदक (१९५२), रॉयल ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचे सुवर्णपदक (१९५३), रम्फर्ड पदक (१९५७), रॉयल पदक (१९६२), हेन्री ड्रेपर पदक (१९७१) इत्यादी.
तारकीय उत्क्रांती व ताऱ्यांची अंतर्गत संरचना यांचे अध्ययन करताना त्यांनी लघुतम ताऱ्यांसंबंधीचा सिद्धांत विकसित केला. ताऱ्यामधील सर्व हायड्रोजन वायू जळून गेल्यास ताऱ्यातील ऊर्जा निर्मितीचा प्रचंड वेग कमी होईल व तारा वाढत्या प्रमाणात संकोच पावेल, असे त्यांच्या लक्षात आले. अशा तऱ्हेने तारा संकोच पावल्यास वाढत्या प्रमाणात त्यातील प्रारण (तरंगरूपी ऊर्जा) बाहेर टाकण्याची क्षमता घटत जाईल. तसेच संकोच पावताना ताऱ्याचे वस्तुमान सापेक्षतः स्थिर राहील. म्हणजे त्याची घनता वाढत जाईल, असे त्यांनी गृहीत धरले. अणूची मध्यवर्ती संरचना मोडून पडण्याइतपत आंतरिक दाब वाढल्यावर ही संकोच पावण्याची प्रक्रिया थांबेल, असा त्यांचा तर्क आहे. अशा वेळी ताऱ्याचा गाभा विघटित द्रव्याचा बनलेला असेल व तारा लघुतम ताऱ्याच्या अवस्थेत असेल. यावरून त्यांनी असेही दाखवून दिले की, ज्या लघुतम ताऱ्याचे वस्तुमान जास्त असेल त्याची घनताही गुरुत्वाकर्षणामुळे जास्त असेल आणि या घनतेलाही काही मर्यादा असल्याने अशा ताऱ्यांचे वस्तुमान एका मर्यादेपलीकडे असू शकणार नाही. त्यांच्या मते ही मर्यादा सूर्याच्या वस्तुमानाच्या १·४४५२ इतकी आहे. म्हणजे या वस्तुमानापेक्षा मोठ्या ताऱ्यातील वस्तुमान घटेल व ते बहुधा प्रचंड स्फोटाने निघून जाईल व अतिदीप्त नवतारा निर्माण होईल असे त्यांचे मत आहे. या सिद्धांतामुळे तारकीय उत्क्रांतीच्या शेवटच्या अवस्थांचे स्पष्टीकरण मिळत असल्याने विश्वस्थितिशास्त्राच्या सिद्धांतांना तो साहाय्यकारी ठरला आहे. तारकीय संरचना समजण्यासाठीही हा सिद्धांत उपयुक्त आहे. तसेच अतिदीप्त नवतारे इतके कमी का दिसतात, याचेही या सिद्धांताने स्पष्टिकरण करता येते. कारण बहुसंख्य ताऱ्यांचे वस्तुमान सुब्रह्मण्यन् यांनी सुचविलेल्या वरील मर्यादेच्या आत असते.
ऋण भारित अशा हायड्रोजनाच्या आयनीभूत अणूंसंबंधी त्यांनी संशोधन केले असून त्याचा सूर्याच्या दीप्तिगोलाच्या अपारदर्शकतेची कारणमीमांसा करण्यासाठी उपयोग झाला आहे. ताऱ्यांचे रासायनिक संघटन, तारे व ग्रह यांच्या वातावरणातील उर्जेत होणारे प्रारणबदल, सौरपृष्ठावर होणारे संनयन (उष्ण द्रव्याची जागा थंड द्रव्याने घेण्यामुळे निर्माण होणारे प्रवाह), अगदी आधीच्या अवस्थेतील ताऱ्यांपासून येणाऱ्या प्रकाशाचे ध्रुवण (एकाच पातळीत होणारे कंपन) इ. विषयांचे अध्ययन व भौतिकीतील काही अवघड समस्यांचे गणितीय अनुसंधानही त्यांनी केले आहे. अगदी अलीकडे चुंबकीय क्षेत्र असताना व नसताना द्रायूत (प्रवाही पदार्थात) होणाऱ्या संनयन हालचालींविषयी त्यांनी अध्ययन केले आहे.
त्यांनी अनेक संशोधनपर लेख व पुढील पुस्तके लिहिली आहेत : ॲन इंट्रोडक्शन टू द स्टडी ऑफ स्टेलर स्ट्रक्चर (१९३९), प्रिन्सिपल्स ऑफ स्टेलर डायनॅमिक्स (१९४३), रेडिएटिव्ह ट्रान्सफर (१९५०), हायड्रोडायनॅमिक्स अँड हायड्रोमॅग्नेटिक स्टॅबिलिटी (१९६१) व एलिप्सॉयडल फिगर्स ऑफ इक्विलिब्रियम (१९६९).
मराठे, स. चिं.
“
आपल्या मित्रपरिवारात शेअर करा..