ब्रॅडलि, जेम्स: (? मार्च १६९३-१३ जुलै १७६२). इंग्रज ज्योतिविंद. ताऱ्यांचे दीर्घकाळ चिकाटीने वेध घेऊन त्यांनी ताऱ्यांचे विपथन (पृथ्वीच्या कक्षीय गतीमुळे ताऱ्यांच्या स्थानांत होणारा भासमान असा अल्पसा बदल) व अक्षांदोलन (पृथ्वाच्या अक्षाची होणारी आंदोलनात्मक गती) यांचा शोध लावला. निरीक्षणात्मक ज्योतिषशास्त्राची सुरुवात यांच्या वेळेपासून झाली असे मानतात. त्यांचा जन्म शर्बर्न (इंग्लंड) येथे झाला. ऑक्सफर्ड विद्यापीठातून बी. ए. (१७१४) व एम्. ए. (१७१७) या पदव्या मिळविल्यानंतर काही काळ त्यांनी जेम्स पाउंड या आपल्या मामांच्या मार्गदर्शनाखाली ताऱ्यांचे वेध घेतले. एडमंड हॅली यांनी सांगितल्यावरून त्यांनी मंगळ व काही अभ्रिका [तेजोमेघ → अभ्रिका] यांचे अचूक वेध घेतले. यामुळे हॅली यांनी ब्रॅड्ली यांची रॉयल सोसायटीकडे शिफारस केली व तीनुसार १७१८ साली ब्रॅड्ली यांची या सोसायटीचे सदस्य म्हणून निवड झाली. १७१९-२१ या काळात त्यांनी ब्रिड्स्टॉव चर्चचे उपाध्याय म्हणून काम केले व फावल्या वेळात वेधही घेतले. १७२१ साली त्यांची ऑक्सफर्ड विद्यापीठात ज्योतिषशास्त्राचे सॅव्हिलियन प्राध्यापक म्हणून नेमणूत झाल्यावर त्यांनी चर्चचे काम सोडले. १७२९—६० या काळात त्यांनी ॲशमोलन वस्तुसंग्रहालय भौतिकीचे प्रपाठक म्हणूनही काम केले. १७४२ साली हॅली यांच्यानंतर त्यांची राजज्योतिषी म्हणून नेमणूक झाली व ते सु. २० वर्षे या पदावर होते.

ताऱ्यांचे अचूक ⇨ पराशय मोजण्याचा प्रयत्न करीत असताना त्यांना १७२८ साली विपथनाचा शोध लागला व तो त्यांनी १७२९ साली प्रसिद्ध केला. पृथ्वीचा कक्षेतील वेग व प्रकाशाचा वेग यांच्या संयुक्त परिणामामुळे कोणताही तारा पृथ्वीवरून पाहताना त्याच्या प्रत्यक्ष स्थानापासून पृथ्वीच्या गतीच्या दिशेत पुढे चळलेला दिसतो (सरकलेला भासतो). पृथ्वीचा कक्षीय वेग हा प्रकाशवेगाच्या तुलनेने नगण्य नसल्याने दूर असलेल्या ताऱ्यांच्या बाबतीत हा आविष्कार घडतो. या आभासाला विपथन म्हणतात. सहा महिन्यांच्या अंतराने एकाच ताऱ्याचे वेध घेतल्यास हा परिणाम जाणवतो. कालिय या तारकासमूहातील गॅमा ड्रॅकोनिस ताऱ्याच्या त्यांनी १७२५-२८ या काळात घेतलेल्या वेधांवरून तो आकाशात एक लहानसे लंबवर्तुळ काढतो, असे त्यांना दिसून आले. पुढे इतर ताऱ्यांच्या बाबतीतही असाच परिणाम दिसून आला. तासनतास वेध घेऊन व किचकट आकडेमोड करून चिकाटीने त्यांनी हा शोध लावला. या शोधामुळे ताऱ्यांचे स्थान निश्चित करताना विपथनामुळे उद्भवणारी दुरुस्ती करून घेणे आवश्यक असल्याचे कळून आले. त्याचप्रमाणे सूर्य पृथ्वीभोवती फिरत नसून पृथ्वी सूर्याभोवती फिरत असते, या कोपर्निकस यांच्या मताला पुष्टी देणार पहिला निरीक्षणात्मक प्रत्यक्ष पुरावा विपथनामुळे उपलब्ध झाला.

शनीच्या भोवतीची कडी रेषात्मक दिसत होती ती तिरकी झाली असल्याचे त्यांनी प्रथम निदर्शनास आणून दिले (१७३०). शुक्र, मंगळ, गुरू, शनी व शनीची कडी यांचे व्यास मोजण्याचे त्यांनी प्रयत्न केले होते. प्रकाशाचा वेग २,९५,००० किमी./से. एवढा असल्याचे त्यांनी पडताळून पाहिले होते.

काही अचल ताऱ्यांच्या क्रांतीमध्ये परांचन (पृथ्वीच्या भ्रमणाक्षाचे क्रांतिवृत्ताच्या कदंबबिंदूभोवती होणारे वलन) आणि विपथन यांच्यामुळे होणाऱ्या बदलांहून वेगळा वार्षिक बदल होत असल्याचे त्यांना आढळले. ० व १८० भोग असलेल्या ताऱ्यांच्या बाबतीत झालेला हा बदल ९० व २७० भोग असलेल्या ताऱ्यांच्या बाबतीत पडलेल्या बदलाहून वेगळा होता. हा बदल चंद्र पृथ्वीजवळ असल्याने त्याच्यामुळे होत असावा हे त्यांनी जाणले व त्यातूनच अक्षांदोलनाचा शोध लागला. चंद्रामुळे घडत असलेल्या या बदलाचा आवर्तन काळ हा राहू व केतू या पातबिंदूच्या भ्रमणकाळाइतका असला पाहिजे हे ओळखून त्यांनी सु. १९ वर्षे काळजीपूर्वक वेध घेतले आणि त्याची खातरजमा केल्यावरच त्यांनी हा शोध १७४८ साली जाहीर केला. पृथ्वीच्या विषुववृत्तीय फुगवट्यावरील चंद्राच्या गुरुत्वीय ओढीची दिशा बदलत राहिल्याने अक्षांदोलन होते, हे त्यांनी ओळखून काढले. या ओढीचा परिणाम होऊन पृथ्वीच्या अक्षाचा क्रांतिवृत्ताच्या पातळीशी असलेला ६६.५ चा कोन त्याच्या माध्य मूल्यापेक्षा सु. ९ सेकंद कमीजास्त होतो आणि अक्ष डोलत डोलत सु. २५,००० वर्षांमध्ये आपले चक्र पूर्ण करतो. चंद्राची कक्षा व क्रांतिवृत्त यांचे छेदन बिंदू म्हणजे राहू व केतू होत यांना सांधणारी रेषा सव्य (घड्याळाच्या काट्यांच्या) दिशेने १८.६ वर्षांमध्ये आपली प्रदक्षिणा पूर्ण करते. या कालावधीनंतर क्रांतीमध्ये घडणारे बदल पूर्वपदावर येतात. [→ अक्षांदोलन].

समुद्र प्रवासातील स्थान निश्चिती करण्यासाठी रेखांश काढण्याच्या टोबीआस मायर यांच्या पद्धतीत ब्रॅड्ली यांनी सुधारणा केल्या. ग्रिनीचचे अक्षवृत्त त्यांनी उत्तर ५१ २८’ ३८’’.५ एवढे काढले हे मूल्य सध्याच्या मूल्यापेक्षा केवळ १’’.३ ने जास्त आहे. सूर्यकुलातील पदार्थ व तारे यांचे वेध घेण्याचे कार्य त्यांनी आयुष्यभर अखंडपणे केले. अशा तऱ्हेने १७५०-६२ या काळात त्यांनी ६०,००० वेध घेतले. एफ्. डब्ल्यू. बेसेल यांनी १८१९ साली प्रसिद्ध केलेली सु. ३,००० ताऱ्यांची यादी मुख्यत्वे ब्रॅड्ली यांच्या वेधांवरच आधारलेली आहे. मंगळाच्या वेधावरून त्यांनी सूर्याचा पराशय अधिक अचूकपणे काढला. धूमकेतूंच्या कक्षांची अंगे काढण्याचे प्रयत्नही त्यांनी केले. गुरूच्या एका तेजस्वी उपग्रहाच्या ग्रहणकाळांतील फरकावरून त्यांनी न्यूयॉर्क व लिस्बन या ठिकाणांचे रेखांश काढले. वातावरणातून जातान प्रकाशाचे जे प्रणमन (एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जाताना प्रकाशाच्या दिशेत होणारा बदल) होते, त्यावर हवेचे तापमान व दाब यांचा परिणाम होतो हे लक्षात घेऊन त्यांनी ताऱ्यांची अचूक स्थाने काढण्यासाठी व्यावहारिक नियम तयार केले. ग्रिनीच येथील वेधशाळेतील उपकरणांमध्ये जरूर त्या सुधारणा करून त्यांची चाचणी त्यांनी घेतली तसेच नवीन उपकरणेही वेधशाळेत बसविली.

अचूक कालमापनाकडेही त्यांनी लक्ष दिले होते. लंबकाचे घड्याळ ध्रुव प्रदेशाकडून विषुववृत्ताकडे आणल्यास गुरुत्वाकर्षणात घट झाल्याने ते सावकाश चालते आणि मागे पडते हे त्यांनी पाहिले व त्यावरून ठराविक लांबीचा लंबक असणारे लंडनमधील घड्याळ निरनिराळ्या अक्षांशावर नेल्यास बरोबर वेळ दाखविण्याच्या दृष्टीने लंबकाची लांबी किती असावी, हे दर्शविणारे कोष्टक तयार करून ते त्यांनी रॉयल सोसायटीस सादर केले होते.

राजज्योतिषी झाल्यावर ऑक्सफर्ड विद्यापीठाने त्यांना सन्मानीय डी. डी. ही पदवी दिली होती (१७४२) तर अक्षांदोलनाच्या शोधाबद्दल रॉयल सोसायटीने त्यांना कॉप्ली पदक दिले होते (१७४८). रॉयल ॲकॅडेमी तसेच बर्लिन, बोलोन्या व सेंट पीटर्झबर्ग येथील ॲकॅडेमी यांचे सदस्य म्हणून त्यांची निवड झाली होती. त्यांच्या हस्तलिखितांचे दोन खंड १७९८ व १८०५ साली प्रसिद्ध झाले. चॅलफर्ड येथे ते मृत्यू पावले.

मराठे, स. चिं. नेने, य. रा.