डे ला रू, वॉरेन : (१८ जानेवारी १८१५ – १९ एप्रिल १८८९). इंग्लिश ज्योतिर्विद. त्यांनी खगोलीय छायाचित्रणात महत्त्वाची कामगिरी केली. त्यांचा जन्म गर्न्सी येथे झाला. त्यांचे शिक्षण लंडन व पॅरिस येथे झाले आणि नंतर त्यांनी वडिलांच्या मुद्रण व्यवसायात प्रवेश केला. १८५१ साली त्यांनी पाकिटे तयार करण्याचे पहिले यंत्र तयार केले. १८५० मध्ये त्यांनी एक १३ इंची परावर्ती दूरदर्शक स्वतः तयार केला व आकाशस्थ ज्योतींचे वेध घेण्यास सुरूवात केली. १८५१ मध्ये भरलेल्या एका प्रदर्शनात जी. पी. बाँड या ज्योतिर्विदांनी दागेअर पद्धतीने [⟶ छायाचित्रण] घेतलेले चंद्राचे छायाचित्रण त्यांच्या पाहण्यात आले. डे ला रू यांनी १८५२ मध्ये कलोडियन पद्धतीचा [⟶ छायाचित्रण] उपयोग करून चंद्राची अधिक चांगली छायाचित्रण मिळविली. त्यांनी चंद्राची त्रिमितिदर्शक छायाचित्रेही मिळविली व त्यामुळे चंद्राच्या पृष्ठभागाचे अनेक बारकावे लक्षात येण्यास मदत झाली.

त्यानंतर १८५४ पासून त्यांनी आपले लक्ष सौर भौतिकीकडे वळविले. सूर्याच्या पृष्ठभागाचे छायाचित्रणाच्या साहाय्याने नकाशे तयार करण्यासाठी त्यांनी सू्र्यछायालेखक (फोटोहीलिओग्राफ) हे वेधसाधन तयार केले व त्याच्या साहाय्याने १८५८–८२ या काळात सूर्याच्या पृष्ठभागासंबंधी संशोधन केले. त्यांनी स्पेनमध्ये जाऊन १६ जून १८६० च्या सूर्यग्रहणाची छायाचित्रे घेतली आणि त्यांवरून खग्रास सूर्यग्रहणाच्या वेळी आढळणारी तेज:शृंगे (दीप्तिमान वायूचे लोळ) ही चंद्रापासून निघालेली नसून सूर्यापासून निघालेली आहेत, हे सिद्ध झाले. चंद्राप्रमाणेच सूर्याचीही त्रिमितिदर्शक छायाचित्रे घेऊन १८६१ मध्ये त्यांनी सूर्यावरील डाग हे सूर्याच्या वातावरणातील न्यूनदाब क्षेत्रे आहेत, असे दाखविले. १८६५ मध्ये भरलेल्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात त्यांची सूर्याची व चंद्राची त्रिमितिदर्शक छायाचित्रे बरीच गाजली.

डे ला रू यांनी १८७३ मध्ये आपली वेधसाधने ग्रीनिच येथील वेधशाळेला दिली व स्वतः तेथे जाऊन वेध घेण्याचे कार्य पुढे चालू ठेवले. १८८७ मध्ये छायाचित्रणाच्या साहाय्याने आकाशाची पाहणी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवरून होणाऱ्या प्रयत्नांत भाग घेण्यासाठी त्यांनी एक १३ इंची प्रणमनी (फक्त भिंगे वापरलेल्या) दूरदर्शक तयार करून ग्रीनिच वेधशाळेत बसविला.

ज्योतिषशास्त्रीय संशोधनाखेरीज त्यांनी एच्. म्यूलर यांच्याबरोबर विद्युत् घटांसंबंधी प्रयोग करून सिलव्हर क्लोराइड विद्युत् घटाचा (ज्यात जस्त व चांदी यांची विद्युत् अग्रे आणि ध्रुवीकरण टाळण्यासाठी सिलव्हर क्लोराइड वापरलेले असते, अशा विद्युत् घटाचा) शोध लावला. त्यांनी वायूंतील विद्युत् विसर्जन व प्लॅटिनम तंतूचे विद्युत् दिवे यांसंबंधीही संशोधन केले होते.

ते रॉयल सोसायटीचे सदस्य (१८५०), रॉयल ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचे सचिव (१८५५–६३) व अध्यक्ष (१८६४–६६) आणि केमिकल सोसायटीचे अध्यक्ष (१८६७–६९, १८७९–८०) होते. त्यांना रॉयल सोसायटी रॉयल पदक (१८६४), रॉयल ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचे सुवर्ण पदक (१८६२), फ्रेंच ॲकॅडेमी ऑफ सायन्सेसचे लालांद पारितोषिक (१८६५) इ. बहुमान मिळाले. ते लंडन येथे मृत्यू पावले.

मराठे, स. चिं.