मार्च : ग्रेगरियन कालगणनेप्रमाणे मार्च हा वर्षातील तिसरा महिना असतो. मार्स म्हणजे मंगळ ही युद्ध देवता व कृषिदेवता मानलेली असून या देवतेवरून या महिन्याला मार्च असे नाव पडले. ख्रि. पू. १५३ पर्यंत मार्च हाच वर्षाचा पहिला महिना समजला जाई व २५ मार्च हा वर्षारंभ समजत. इंग्लंडमध्ये तर इ. स. १७५२ पर्यंत मार्च हा वर्षारंभ महिना असे. हा महिना ३१ दिवसांचा असतो. मार्च ३१ हा दिनांक पुष्कळ व्यवहारात वर्ष अखेरचा दिवस समजलेला आहे. १५ मार्च ज्यूलियस सीझरचा अंत, १७ मार्च सेंट पॅट्रीक या संताचा दिन, २१ मार्च हा विषुवदिन आणि २२ मार्च हा भारतीय सौर पंचांगाचा वर्षारंभ असे महत्त्वाचे दिवस या महिन्यात आहेत. ईस्टर व ज्यूंचा पुरिम हा सण कधी कधी या महिन्यात येतो. हिंदू पंचांगातील फाल्गुन-चैत्रात हा महिना येतो.

ठाकूर, अ. ना.