पाऊल : उभे असताना जमिनीवर टेकणाऱ्या पायाच्या घोट्याखालच्या शरीरभागाला पाऊल म्हणतात. पायाच्या घोट्याच्या वरचा भाग आणि पाऊल यांच्यामध्ये सु. ९०कोन असतो [⟶ पाय].

रचना : पावलाचे तीन भाग आहेत : (अ) मागील म्हणजे टाचेकडील भाग, याला ‘गुल्फ’ म्हणतात (आ) मधला लांबट हाडे असलेला ‘प्रपाद’ आणि (इ) पुढचा बोटांचा किंवा ‘पादांगुली’.

गुल्फ हा भाग सात हाडे मिळून बनलेला असतो. पावलाचा पश्च अर्धा भाग त्यांनीच बनतो, त्यांची नावे अशी आहेत : (१) पार्ष्ण्यास्थी किंवा टाचेचे हाड, (२) गुल्फास्थी, (३) घनास्थी, (४) नौकाकार अस्थी, (५) अभिमध्य कीलाकार अस्थी, (६) मध्यस्थ कीलाकार अस्थी आणि (७) पार्श्व कीलाकार अस्थी. ही सर्व हाडे जवळजवळ घनाकार असतात. 

आ.१ पावलातील पृष्ठीय संधिबंध व प्रमुख हाडे (बोटांची हाडे दाखविलेली नाहीत संधिबंध सांध्यांवरील रेषांनी दर्शिविले आहेत) : (१) पार्ष्ण्यास्थी किंवा टाचेचे हाड, (२) गुल्फास्थी, (३) घनास्थी, (४) नौकाकार अस्थी, (५) अभिमध्य कीलाकीर अस्थी, (६) मध्यस्थ कीलाकार अस्थी, (७) पार्श्व कीलाकार अस्थी, (८) पहिली प्रपादास्थी, (९) दुसरी प्रपादास्थी, (१०) तिसरी प्रपादास्थी, (११) चौथी प्रपादास्थी, (१२) पाचवी प्रपादास्थी.

टाचेचे हाड सर्वांत मोठे असून ते शरीराचे वजन तोलण्यात प्रमुख भाग घेते. त्याच्या मागील पृष्ठभागावर पोटरीतील मोठ्या स्नायूंची कंडरा (अस्थीला वा उपास्थीला स्नायू घट्ट बांधणारे तंतुसमूह) जोडलेली असते. तिला ‘पार्ष्णिका कंडरा’ किंवा ‘आकिलीझ कंडरा’  (ट्रोजन युद्धातील आकिलीझ या ग्रीक योद्ध्याच्या नावावरून) म्हणतात. पार्ष्ण्यास्थीच्या पुढच्या अर्ध्या भागावर गुल्फास्थी टेकलेली असते. तिचा अग्र पृष्ठभाग घनास्थीशी संधी तयार करतो. गुल्फास्थी, पोटरीतील आतल्या बाजूची अंतर्जंघास्थी व बाहेरच्या बाजूची बाह्य जंघास्थी मिळून गुल्फसंधी किंवा घोट्याचा सांधा तयार होतो. पायाच्या प्रमुख सांध्यांत त्याचा समावेश होतो. शरीरवजनाचा अंतर्जंघास्थीतून खाली उतरणारा भार पावलाच्या वजन पेलणाऱ्या इतर हाडांकडे पोहोचविण्याचे कार्य गुल्फास्थी करते. घनास्थीचा मागचा पृष्ठभाग पार्ष्ण्यास्थीशी संधी बनविण्यात भाग घेतो. त्याच्या अग्र पृष्ठभागाशी चौथी व पाचवी प्रापादास्थी संधी करतात. मागे गुल्फास्थी आणि पुढे तीन कीलाकार अस्थी यांच्या दरम्यान नौकाकार अस्थी असते. तीन कीलाकार अस्थींच्या पुढे पहिली, दुसरी व तिसरी या प्रपादास्थी असतात. प्रत्येक प्रपादास्थीच्या पुढे बोटांची हाडे असतात. आंगठ्याची दोन व इतर प्रत्येक बोटातील तीन मिळून पाच बोटांत चौदा हाडे असतात. गुल्फाची सात, प्रपादाची पाच आणि पादांगुलीची चौदा अशी एकूण सव्वीस हाडे मिळून पावलाचा सांगाडा बनलेला असतो.

पावलातील ही सर्व हाडे तळपायाच्या आणि पृष्ठीय बाजूकडे एकमेकांस अनेक छोट्या संधिबंधांनी जोडलेली असतात (आ. १ व २). 

आ. २. पदतलीय संधि बंध (बोटांची हाडे दाखविली आहेत संधिबंध सांध्यांवरील रेषांनी दर्शविले आहेत).बोटांच्या पेऱ्यांमधील सांधे वगळल्यास इतरत्र बहुतेक सर्वच सांधे जवळजवळ अचल प्रकारचे असतात परंतु एकाच किंवा दोन-तीन मोठाल्या हाडांपेक्षा ही अस्थिरचना पावलास अधिक लवचकिता आणते. याशिवाय मागच्या बाजूस प्रपादास्थींची पुढील टोके यांच्या दरम्यानची अस्थिरचना अशीच असते की, तीमुळे दोन कमानी बनून लवचिकतेत अधिक भर पडते. यांपैकी उभ्या कमानीचा (मागून पुढे बाक असलेली) आतील भाग (अभिमध्य बाजू) बाहेरील (पार्श्व बाजू) भागापेक्षा अधिक उंच असतो. पावलाच्या जवळजवळ मध्यावर दुसरी आडवी कमान असते. वरील वर्णन हे रचना समजण्याच्या दृष्टीने सुलभ असले, तरी या दोन्ही कमानी मिळून कार्यसुलभ अशी एकच जटिल कमान प्रत्येक पावलात असते. या रचनेमुळे अभियांत्रिकी तत्त्वाप्रमाणे शरीराचे वजन कमानीच्या निरनिराळ्या भागांच्या उंचीच्या प्रमाणात विभागले जाते. म्हणूनच कमानीतील सर्वांत उंच भागी असलेल्या गुल्फास्थीवर सर्वांत जास्त भार पडतो. या कमानी अगदी दृढ नसून त्यांमध्ये अल्पशी लवचिकता असतेच. पावलाच्या विशिष्ट हालचालीकरिता थोडी तरी सांध्यातील हालचाल आवश्यक असते. गुल्फास्थी आणि पार्ष्ण्यास्थी यांमधील संधी-नौकाकार अस्थी यांमधील संधी बरेचसे चलनक्षम असतात. हे सांधे पावलाच्या अंतर्वलन व बहिर्वलन या हालचालींमध्ये प्रामुख्याने भाग घेतात. पावलाच्या अंतर्वक्रतेमुळे जो खड्डा झालेला असतो, तो पुष्कळसा स्नायूंच्या थरांनी भरला जातो. ही अंतर्वक्रता आणि कमानी टिकविण्यास हाडांचा आकार व रचना, जाड संधिबंध, स्नायू, पोटरीतील स्नायूंच्या पावलात गेलेल्या लांब कंडरा आणि जाड पदतलीय कंडराकला (कंडरेचा चपटा किंवा फितीसारखा विस्तार) या सर्वांची मदत होते. पावलाची प्रमुख हालचाल गुल्फसंधीच्या स्थानी होते. हा संधी बिजागरी प्रकारचा असून त्या ठिकाणी पृष्ठीय अंतर्नयन (पावलाचा पुढचा भाग वर उचलणे) व पदतलीय अंतर्नयन (पावलाचा पुढचा भाग खाली वाकवणे) या हालचाली होतात. बोटांच्या हालचालीत पृष्ठीय अंतर्नयन (बोटे वर उचलणे) आणि पदतलीय अंतर्नयन (बोटे तळ पायाकडे वाकवणे) या प्रमुख हालचाली असल्या, तरी अल्पप्रमाणात त्यांचे अभिवर्तन (मध्यरेषेजवळ येणे किंवा एकमेकांजवळ येणे) आणि अपवर्तन (मध्यरेषेपासून किंवा एकमेकांपासून दूर जाणे) होते.

आ. ३. तळपायातील रोहिण्या

पावलाचा रक्तपुरवठा पोटरीतून येणाऱ्या प्रमुख रोहिण्यांपासून होतो. त्याच्या पृष्ठभागापेक्षा तळपायामध्ये अधिक स्नायू इ. मऊ ऊतक (समान रचना व कार्य असलेल्या पेशींचे समूह ) असल्यामुळे त्या भागास भरपूर रक्तपुरवठा असतो. आतील घोट्याच्या खालून पश्च अंतर्जंघीय रोहिणी पावलाच्या तळभागात शिरते आणि तिच्या शाखा व उपशाखा रक्तपुरवठा करतात. गुल्फसंधीच्या पुढून अग्र अंतर्जंघीय रोहिणी पावलाच्या पृष्ठभागावर येते. तिलाच पाद अभिपृष्ठ रोहिणी म्हणतात आणि तिच्या शाखा व उपशाखा पावलाच्या पृष्ठभागास रक्तपुरवठा करतात. तळपायातील एका रोहिणी शाखेचे व पाद अभिपृष्ठ रोहिणीचे पावलात वाहिनीमीलन होते.  

पावलातून लसीका (रक्तद्रवाशी साम्य असलेला व ऊतकांकडून रक्तात जाणारा द्रव पदार्थ) वाहून नेणाऱ्या लसीका वाहिन्यांपैकी काही खोल व बऱ्याचशा पृष्ठस्थ असतात. त्यांपैकी पृष्ठस्थ वाहिन्या अधिक महत्त्वाच्या असतात. यांपैकी काही जानुपश्च (गुडघ्याच्या मागच्या) भागातील लसीका ग्रंथी गटाला (लसीका वाहिन्यांतील ग्रंथिसदृश गटाला) मिळतात परंतु बहुसंख्य पृष्ठस्थ वाहिन्या पृष्ठस्थ वंक्षण (जांघेतील ) लसीका ग्रंथींना मिळतात. 


आ. ४. पावलाच्या पृष्ठस्थ लसीका वाहिन्या

विकृती : पावलाच्या विकृती दोन प्रकारच्या असतात : (१) जन्मजात आणि (२) उपार्जित.  

जन्मजात विकृती : यांमध्ये ‘वक्रपाद’ ही विकृती नेहमी आढळते. तिचे पुढील काही प्रकार आहेत : ‘उन्नत वक्रपाद’ – फक्त पुढचे पाऊलच टेकलेले राहणे ‘पार्ष्णिका वक्रपाद’– पदतलीय अंतर्नयन न होता टाच टेकलेली राहणे ‘अंतर्नत वक्रपाद’-पावलाची आतली कडा वर उचललेली राहणे ‘बहिर्नत वक्रपाद’– पावलाची बाह्य कडा उचललेली राहणे (आ.५). जन्मजात वक्रपाद प्रकारामध्ये ‘उन्नत- अंतर्नत– वक्रपाद’ हा प्रकार अधिक आढळतो. तो बहुतकरून अज्ञानहेतूक (निश्चित कारण माहीत नसलेला ) असतो. विकलांग चिकित्सा (शरीराच्या सांगड्यातील व त्याच्याशी संबंधित असलेल्या भागांतील विकृतींवर इलाज करण्याच्या शस्त्रक्रिया विद्येतील) तज्ञाकडून इलाज करवून घेतल्यास पुष्कळ सुधारणा होण्याची शक्यता असते. मात्र वयाच्या दुसऱ्या वर्षानंतर केलेले इलाज बहुतेक निरुपयोगी ठरतात.

उपार्जित विकृती : यांमध्ये पावलाच्या कोणत्या तरी भागात वेदना होणे हे प्रमुख लक्षण असते. त्यांपैकी काही विकृतींचा उल्लेख येथे केला आहे. 

आ. ५ वक्रपादाचे प्रकार : (१) उन्नत वक्रपाद, (२) पार्ष्णिका वक्रपाद, (३) अंतर्नत वक्रपाद, (४) बहिर्नत वक्रपाद.सपाट पाद : या विकृतीत जन्मतः पाऊल सपाट असते व अर्भक राहू लागल्यानंतरच पावलातील कमानी तयार होतात. कुमारावस्थेत कधीकधी पावलाच्या बहिर्वर्तनामुळे आतल्या बाजूची कमान नाहीशी होऊन पाऊल सपाट बनते. हळूहळू उत्पन्न होणारी ही विकृती बहुतकरून स्नायुविकृतिजन्य व वेदनामय असते. प्रौढांमध्ये सपाट पाद ही विकृती बहुतकरून अज्ञानहेतुक प्रकारची असते. वारंवार पडत गेलेल्या पावलावरील ताणामुळे बहुतकरून पावलांचा प्रमाणापेक्षा जादा उपयोग केल्यामुळे ही विकृती उद्भवत असावी. ज्या व्यवसायामध्ये पायावर सतत उभे राहावे लागते त्या व्यवसायातील कर्मचाऱ्यांमध्ये हळूहळू वृद्धिंगत होणारी पायदुखी व सपाट पाद ही विकृती अधिक आढळते उदा., उपाहारगृहातील किंवा केशकर्तनालयातील नोकर. उपार्जित सपाट पाद आघातजन्य ही असू शकतो. उदा., कमानीतील एखाद्या महत्त्वाच्या अस्थीचा भंग सपाट पादास कारणीभूत होऊ शकतो. अनेक वेळा सपाट पाद लक्षणविरहित असून त्यापासून दैनंदिन जीवनात कोणताही व्यत्यय येत नाही. म्हणून सततची पायदुखी आणि पावलाच्या छोट्या सांध्यांच्या हालचालीतील बिघाड ही लक्षणे उद्भवल्यासच सपाट पादावर इलाज करतात.

आ.६. पावलांचे ठसे : (१) प्राकृत पाऊल, (२) सपाट पाद, (३) नखर पाद.नखर पाद : या विकृतीत पावलाची उभी कमान अधिक तीव्र होते. प्राकृतावस्थेत (सर्वसामान्य अवस्थेत) तळपायाची बाहेरची बाजू जमिनीस नेहमी टेकते. या विकृतीत पावलाचा फक्त पुढचा भाग व टाच जमिनीस टेकतात. काही तंत्रिका (मज्जा) विकारांत (उदा., बालपक्षाघातात–पोलिओत) नखर पाद हे एक लक्षण असते परंतु पुष्कळ वेळा ही विकृती अज्ञानहेतुक स्वरूपाची असते. असह्य वेदना उद्भवल्यासच इलाज करतात. 

आ. ७. पादांगुष्ठ बहिर्नतीपादांगुष्ठ बहिर्नती : पायाचा आंगठा नेहमीची जागा सोडून पार्श्वबाजूस वळलेल्या अवस्थेत राहणाऱ्या विकृतीला ‘पादांगुष्ठ बहिर्नती ‘ म्हणतात. या विकृतीची सुरुवात बहुतकरून पुढील बाजूस अरूंद असलेल्या पादत्राणांच्या वापारामुळे होते. पायात नेहमी बूट घालणाऱ्या समाजातील स्त्रियांमध्ये ही विकृती अधिक आढळते. कधीकधी पहिल्या प्रपादास्थीची जन्मजात विकृती मूळ असू शकते. विकृतीची सुरुवात झाल्यानंतर ती सतत वाढतच जाते. क्वचित वेळा आंगठ्यावर शेजारची बोटे चढतात. ही विकृती वेदनामय असल्यासच शस्त्रक्रिया करतात.

पादांगुष्ठ दृढता : पहिली प्रपादास्थी व समीपस्थ अंगुलास्थी यांच्या मधील सांध्याची ही विकृती असून तीमध्ये हालचाल न होणारा ताठ आंगठा हे लक्षण असते. तिचे कुमारावस्थेतील व प्रौढावस्थेतील असे दोन प्रकार आढळतात. पहिल्यात स्नायुसंकोच, तर दुसऱ्यात अस्थिविकृती कारणीभूत असतात. त्यामुळे पहिल्या प्रकारात क्ष-किरण तपासणीत बदल आढळत नाहीत, तर दुसऱ्या प्रकारात या सांध्याची विकृती स्पष्ट दिसते. विकलांग चिकित्साकाकडून इलाज करून घेणे हितावह असते. 

संदर्भ : 1. Adams, J. C. Outline of Orthopaedics, Edinburgh, 1971.

   2. Hollinshead, W. H. Textbook of Anatomy, New Delhi, 1974.

   3. Rains, A. J. H. Ritchie, H.D., Ed. Bailey and Love’s Short Practice of Surgery, Londan, 1977.

उचगांवकर, पां. व्यं. भालेराव, य. त्र्यं.