चिंकारा : यालाच काळसिपीदेखील म्हणतात. समखुरी (ज्यांच्या खुरांची संख्या सम असते अशा) सस्तन प्राण्यांच्या गो-कुलातील हा प्राणी आहे. याचे शास्त्रीय नाव गॅझेला गॅझेला  असे आहे. भारताच्या वायव्य आणि मध्य विभागांतील मैदानी प्रदेश व लहान टेकड्या आणि महाराष्ट्राचा उघडा प्रदेश यांत हा आढळतो. ओढे आणि घळी असलेल्या ओसाड जमिनी, विखुरलेली झुडपे आणि विरळ जंगले यांत हा सामान्यतः राहतो. वालुकामय प्रदेशातील वाळूच्या टेकड्यांत तो नेहमी आढळतो पंजाबातील मिठाच्या डोंगरांच्या रांगांत १,२०० मी.उंचीपर्यंत तो दिसून येतो. माणसांना पाहून हे बुजत असल्यामुळे हे पिकात सहसा शिरत नाहीत.

चिंकारा

चिंकारा सडपातळ, बांधेसूद आणि डौलदार प्राणी आहे. शरीराची वरची बाजू फिक्कट काळसर तांबूस असून खालच्या बाजूला लागून असलेला तिचा भाग व ढुंगण जास्त गडद असते. चेहऱ्यावर दोन्ही बाजूंना पांढरी रेषा असते. नाकाच्या वर एक काळसर चट्टा असतो. नराची शिंगे सरासरी २५–३० सेंमी. आणि मादीची १०–१३ सेंमी. लांब असतात. नराच्या शिंगांवर १५–२५ कंगोरेदार वलये असतात, पण मादीची शिंगे नितळ असतात. शिंगे नसलेल्या माद्याही बऱ्याच आढळतात. यांचे डोळे, नाक आणि कान तीक्ष्ण असतात.

चिंकाऱ्यांचे १० ते २० प्राण्यांचे लहान कळप असतात. ते अतिशय वेगाने पळतात. धोक्याचा इशारा मिळताच सबंध कळपच्या कळप धूम पळत सुटतो आणि सु. दोनशे किंवा तीनशे मी. पळत गेल्यावर थांबतो आणि मग मागे पाहून धोक्याच्या कारणाचा शोध घेऊ लागतो.

चिंकारे सकाळी झोपून राहतात आणि संध्याकाळी बाहेर पडतात. गवत, निरनिराळी फळे, पाने, धान्य इत्यादींवर ते उदरनिर्वाह करतात. ते पुष्कळ वेळ पाण्यावाचून राहू शकतात आणि वालुकामय प्रदेशात तर ते पाण्याशिवाय राहतात. आवश्यक असलेले पाणी त्यांना त्यांच्या अन्नपदार्थांतून मिळते. पण उन्हाळ्यात मात्र त्यांना पाण्याची गरज भासते आणि मिळेल तेव्हा ते पाणी पितात.

प्रजोत्पादनाचा काळ ठराविक नाही. मादीला एकावेळी एक किंवा दोन पिल्ले होतात.

पहा : कुरंग.

भट, नलिनी