व्हरॉनिश : (व्हारोनेश). रशियाच्या पश्चिम भागातील एक शहर आणि याच नावाच्या ओब्लास्टचे (प्रांताचे) प्रशासकीय केंद्र. लोकसंख्या ९,०३,३३४ (१९९५ अंदाज). हे शहर व्हरॉनिश-डॉन या नद्यांच्या संगमाच्या वरच्या बाजूस १६ किमी., व्हरॉनिश नदीच्या उजव्या तीरावर वसलेले असून ते मॉस्कोपासून नैर्ऋत्येस ४६७ किमी. अंतरावर आहे.

दक्षिणेकडील स्टेपच्या प्रदेशातून होणाऱ्या, क्रिमियन व तार्तर लोकांच्या हल्ल्यांपासून बचाव करण्यासाठी अकराव्या शतकातील कझार नगराच्या जागी इ. स. १५८६ मध्ये, सरहद्दीवरील गढी म्हणून याची स्थापना करण्यात आली. रशियन सम्राट पीटर द ग्रेट याने येथे आपल्या आरमारासाठी जहाजबांधणी गोदी उभारली होती (१६९५). इ. स. १७०२, १७४८ व १७७३ मध्ये हे शहर आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. एकोणिसाव्या शतकाच्या मध्यात हे एक महत्त्वाचे सांस्कृतिक केंद्र होते. दुसऱ्या महायुद्धकाळात शहराची खूप हानी झाली.

अठराव्या शतकात व एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धात नजीकच्या स्टेप प्रदेशात पशुपालन व्यवसायाचा विकास करण्यात आला. त्यामुळे पशुधन, कातडी, लोकर यांच्या व्यापाराचे हे प्रमुख केंद्र बनले. याच्या परिसरात गुरे व घोडे यांची पैदास मोठ्या प्रमाणावर होते. शहराचा आसमंत काळ्या-सुपीक मृदेचा असून तिच्यात सखोल शेतीचा विकास करण्यात आला त्यामुळे एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात पशुधनाचे महत्त्व हळूहळू कमी झाले. रस्ते व लोहमार्ग यांच्या वाहतुकीचे केंद्र व नदीबंदर म्हणून हे शहर महत्त्वाचे असल्यामुळे त्याच्या औद्योगिक विकासालाही चालना मिळाली आहे. आधुनिक व्हारॉनिशमध्ये अभियांत्रिकी, रसायने, कृत्रिम रबर, बांधकामाचे साहित्य, ग्राहकोपयोगी वस्तू, पादत्राणे इ. उद्योगांचे केंद्रीकरण झालेले आहे.

शहरात एक विद्यापीठ, तसेच कृषी, वैद्यकीय, पशुवैद्यकीय, वनरक्षणविद्या व शिक्षक प्रशिक्षण या विषयांच्या शिक्षणसंस्था आहेत. निकॉल्स्क चर्च (अठराव्या शतकाचा पूर्वार्ध) व पट्यॉम्क्यिन राजवाडा (अठरावे शतक) या येथील इतिहासप्रसिद्ध वास्तू होत. रशियन कवी कल्तसॉफ याचे हे जन्मठिकाण आहे.

चौधरी, वसंत.