चपटे मासे : मत्स्यवर्गाच्या प्ल्युरोनेक्टिफॉर्मिस या गणातील माशांना सामान्यतः चपटे मासे हे नाव दिले जाते. यांचे शरीर दोन्ही बाजूंनी अतिशय दबलेले असते आणि यांचे डोळे इतर माशांप्रमाणे डोक्याच्या दोन्ही बाजूंना एकेक याप्रमाणे नसून एकाच बाजूला (उजव्या अथवा डाव्या) असतात. हे मासे समुद्राच्या तळाशी नेहमी एका बाजूवर पडलेले असतात, त्यामुळे शरीराची फक्त वरची बाजू रंगीत असते आणि तळावर टेकलेली खालची बाजू पांढरी असते. त्यांच्या या सवयीमुळे त्यांच्या शरीराच्या आकारात विलक्षण बदल होतात. समुद्रतळाच्या बाजूला असणाऱ्या डोळ्याचा काही उपयोग नसल्यामुळे तो डोळा आपली मूळ जागा बदलून दुसऱ्या बाजूवर असणाऱ्या डोळ्याशेजारी येतो. काही मासे नेहमी शरीराची डावी बाजू समुद्रतळावर टेकून पडलेले असतात अशा माशांची उजवी बाजू वर असून दोन्ही डोळे डोक्यावर या बाजूला असतात (दक्षिणावर्त) पण काही मासे शरीराची उजवी बाजू नेहमी समुद्रतळावर टेकून पडलेले असतात, अशांची डावी बाजू वर असून त्यांचे दोन्ही डोळे या बाजूवर असतात (वामावर्त). यामुळे शरीराची एक बाजू ‘सनेत्र’ अथवा रंगीत आणि दुसरी ‘अंध’ अथवा पांढरी असते. 

प्ल्युरोनेक्टिफॉर्मिस गणात बोथिडी, प्ल्युरोनेक्टिडी, सेट्टोडिडी, सोलीइडी आणि सायनोग्लॉसिडी ही पाच कुले आहेत. या माशांच्या सु. ६०० जाती असून त्यांपैकी बहुतेक समुद्रात राहणाऱ्या आहेत, पण दक्षिण अमेरिका आणि मलेशिया द्वीपकल्पात आढळणाऱ्या काही गोड्या पाण्यातही राहणाऱ्या आहेत. चपटे मासे उत्तर ध्रुववृत्तापासून दक्षिण गोलार्धातील दक्षिण किनाऱ्यापर्यंत आढळतात. काही जाती १,८०० मी. खोलीपर्यंत राहणाऱ्या आहेत. ⇨ हॅलिबट, प्लेस, फ्लाऊंडर, टरबॉट, ब्रिल, सोल इ. चपटे मासे खाद्य मत्स्य म्हणून महत्त्वाचे आहेत.

प्ल्युरोनेक्टिफॉर्मिस हा गण ⇨ पर्च  माशांसारख्या एखाद्या माशापासून विकास पावला असावा असे शास्त्रज्ञांना वाटते. पर्चसारखी लक्षणे असलेले काही मासे विश्रांती घेण्याकरिता एका बाजूवर स्वस्थ पडतात आणि ज्या माशांत ही सवय बरीच वाढली किंवा पूर्णत्वाला पोहोचली त्यांच्यापासून चपटे मासे विकास पावले. प्ल्युरोनेक्टिफॉर्मिस गणातील सेट्‌टोडीस  हा वंश अत्यंत आद्य होय. या वंशाचे मासे भारत, आफ्रिका व चीन यांच्या समुद्रात आढळतात या माशात गृहीतक (अनुमानाने ठरविलेल्या) पूर्वजाची (पर्च माशाची) पुष्कळच लक्षणे टिकून राहिलेली दिसून येतात. सेट्‌टोडीस  अद्याप निश्चितपणे दक्षिणावर्त किंवा वामावर्त बनलेला नाही. दोन्ही प्रमाण सारख्या प्रमाणात आढळतात. त्याचप्रमाणे स्थानांतर करणारा डोळा पूर्णपणे रंगीत बाजूकडे न जाता डोक्याच्या माथ्यावरच असतो. सेट्‌टोडीस हे क्रियाशील आणि हिंस्त्र मासे असून ते मासे शेपटीचे फटकारे मारून पोहतात पण खरे चपटे मासे त्यांच्या शरीराच्या कडांवर असणाऱ्या झालरीसारख्या परांच्या (त्वचेच्या स्नायुमय घड्यांच्या) आंदोलनांनी संथपणे आडवे पोहत असतात. समुद्रतळाशी राहण्याचा आणि भक्ष्य मिळविण्याचा चपट्या माशांना जसजसा जास्त सराव होत जातो तसतसा त्यांच्या असममितीवर (कोणत्याही पातळीतून शरीराचे दोन सारखे भाग न पडण्यावर) जास्तच परिणाम होत जातो. हा परिणाम फक्त डोळ्यांवरच होतो असे नव्हे तर मुख, दात, युग्मित पक्ष (जोडीने असलेले पर) आणि गुदद्वाराचे स्थान यांच्यावरही होतो. 

बहुतेक चपट्या माशांच्या अंगी रंग बदलण्याची असामान्य शक्ती असते. ज्या प्रकारच्या समुद्रतळावर हे मासे राहतात त्या तळाच्या रंगांशी पूर्णपणे जुळणारे असेच त्यांच्या शरीराचे रंग या बदलांमुळे उत्पन्न होतात यामुळे हे मासे मुळीच दिसून येत नाहीत. ही रंग बदलण्याची क्षमता माशाच्या दृष्टीच्या नियंत्रणाखाली असते कारण आंधळा चपटा मासा अशा तऱ्हेने रंग बदलू शकत नाही. डोळे बटबटीत असतात. प्रत्येक डोळा स्वतंत्रपणे वाटेल त्या दिशेला वळवून चोहोकडे पाहता येते. एका डोळ्याने पुढचे तर दुसऱ्याने मागचे ते पाहू शकतात. 

आ. १. प्लेस (प्ल्युरोनेक्टिस प्लॅटेसा)

चपट्या माशांची अंडी अगदी लहान आणि उत्प्लावी (तरंगणारी) असून समुद्रपृष्ठावर तरंगत असतात. सु. एक आठवड्याने ती फुटून पिल्ले बाहेर पडतात. ती पूर्णपणे सममित (दोन सारखे भाग पडणारी) असून इतर माशांप्रमाणेच त्यांना प्रत्येक बाजूला एक डोळा असतो. ती समुद्रपृष्ठाजवळ पोहतात आणि सूक्ष्मजीवांवर उपजीविका करतात. सु. एक महिना किंवा थोडा जास्त काळ गेल्यावर व पिल्लांची लांबी सु. १.२५ सेंमी. पेक्षा कमी असतानाच ती जनकाचा सर्वसाधारण आकार घेऊ लागतात. याच सुमारास ती बुडी घेऊन तळाशी जातात आणि तेथे एका बाजूवर पडून राहू लागतात खालच्या म्हणजे तळाला चिकटून असणाऱ्या बाजूवरील डोळा हळूहळू स्थानांतर करून डोक्यावरून वरच्या बाजूवरील डोळ्याशेजारी येतो दरम्यान पृष्ठपक्ष पुढच्या बाजूकडे वाढून डोक्यावर येतो. 

आ.२ सायनोग्लॉसस सेमिफॅसिएटस (मराठी नाव र्हेयप्ती).

सेट्टोडिडी कुलातील मासे अत्यंत आद्य आहेत याचा उल्लेख मागे केलेलाच आहे. बोथिडी कुलातील मासे वामावर्त होत कारण त्यांचे डोळे डाव्या बाजूवर असतात. या कुलात टर्‌बॉट माशांचा समावेश होतो. प्ल्युरोनेक्टिडी कुलातील माशांचे दोन्ही डोळे उजव्या बाजूवर असल्यामुळे ते दक्षिणावर्त होत. या कुलात हॅलिबट, प्लेस आणि इतर काही खाद्य मत्स्यांचा समावोश होतो. हॅलिबट माशांची लांबी ३ मी. पर्यंत आणि वजन ४७० किग्रॅ. पर्यंत असते. याचे दोन्ही जबडे सारख्याच आकाराचे व मजबूत असून तो खेकडे व मासे खातो. याच्या यकृतापासून औषधी तेल मिळते. प्लेस माशाच्या वरच्या बाजूवर तांबडे ठिपके असतात. हा ब्रिटनमधील एक महत्त्वाचा खाद्य मत्स्य आहे. सोलीइडी कुलातील सोल माशांचा वरचा जबडा पुढे आलेला व लोंबता असतो. शिवाय डोक्याच्या खालच्या बाजूवर एक स्पृशेसारखा (स्पर्शग्राही उपांगासारखा) प्रवर्ध (वाढ) असतो. यांचे डोळे उजव्या बाजूवर असतात. सायनोग्लॉसिडी कुलातील माशांना ‘टंग सोल्स’ म्हणतात. यांचे डोळे डाव्या बाजूवर असतात. हे उष्ण आणि उपोष्ण प्रदेशांच्या समुद्रांत राहणारे आहेत.

समुद्राच्या तळाशी राहणारे जास्त विशेषित प्रकार केवळ तेथे आढळणाऱ्या अपृष्ठवंशी (पाठीचा कणा नसलेल्या) प्राण्यांवर उदरनिर्वाह करतात. यांच्या ‘अंध’ बाजूकडील जबड्याची रंगीत बाजूकडील जबड्यापेक्षा जास्त वाढ झालेली असून तो त्यापेक्षा जास्त मजबूत असतो. अंध जबड्यातील दात देखील जास्त मजबूत असतात.

कर्वे, ज. नी. यार्दी, ह. व्यं.