किन्से, ऍल्फ्रेड चार्ल्स : (२३ जून १८९४ — २५ ऑगस्ट १९५६). एक अमेरिकन प्राणिशास्त्रज्ञ व मानवी लैंगिक वर्तनाचा सखोल अभ्यासक. त्याचा जन्म अमेरिकेत होबोकोन येथे झाला. ब्रन्झविक येथील बाऊडन महाविद्यालयातून तो मानसशास्त्राचा पदवीधर झाला व हार्व्हर्ड विद्यापीठातून त्याने प्राणिविज्ञानात डॉक्टरेट मिळविली (१९२०). १९२० पासून तो इंडियाना विद्यापीठात प्राणिविज्ञानाचा प्राध्यापक तसेच १९४७ पासून शेवटपर्यंत तो तेथेच ‘इन्स्टिट्यूट फॉर सेक्स रिसर्च’ ह्या संस्थेचा संचालक म्हणून काम पाहत होता. 

मानवी लैंगिक वर्तनाबाबतच्या त्यांच्या संशोधनामुळे ‘इन्स्टिट्यूट फॉर सेक्स रिसर्च’ ह्या संस्थेचा पाया घातला गेला. त्याचे सेक्स्युअल बिहेविअर इन द ह्यूमन मेल (१९४८) आणि सेस्क्युअल बिहेविअर इन द ह्यूमन फिमेल (१९५३) हे संशोधनपर ग्रंथ प्रकाशित झाले, या दोनही ग्रंथांचे लेखन त्याने घेतलेल्या १८,५०० स्त्रीपुरुषांच्या वैयक्तिक मुलाखतींवर आधारलेले आहे. ह्या ग्रंथांमुळे अमेरिकेत प्रचंड खळबळ उडाली. या संशोनाद्वारे किन्सेने असा निष्कर्ष काढला, की मानवी लैंगिक वर्तनामध्ये बरीच विविधता आढळून येते. किन्सेने आपल्या संशोधनात वैयक्तिक मुलाखती आणि सांख्यिकी या दोन पद्धतींचा काळजीपूर्वक वापर केलेला आहे. तथापि या दोन पद्धतींच्या प्रामाण्याबाबतही काही समस्या आहेत व त्यांनुसार त्याच्या अहवालावर बरीच टीकाही झालेली आहे. किन्सेच्या संशोधनपद्धतीत काही उणिवा असल्या, तरी मानवी लैंगिक वर्तनाबाबतच्या वस्तुनिष्ठ संशोधनास प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याचे श्रेय त्याच्याकडेच जाते.

संदर्भ : Geddes, D.P.Ed. An Analysis of the Kinsey Reports on Sexual Behaviour in the Human Male and Female, New York, 1954. 

कापडी, सुलभा