शार्को, झं मार्‌तॅं : (२९ नोव्हेंबर १८२५–१६ ऑगस्ट १८९३). फ्रेंच मानसोपचारतज्ज्ञ, तंत्रिका तंत्र वैज्ञानिक व थोर वैद्यक शिक्षक. ते आधुनिक तंत्रिका तंत्र विज्ञानाचे संस्थापक असून ⇨ उन्माद (हिस्टेरिया) व तंत्रिका तंतूंचा (मज्जातंतूंचा) पक्षाघात यांवरील संशोधनाबद्दल विशेष प्रसिद्ध आहेत.

शार्को यांचा जन्म पॅरिस येथे झाला. पॅरिस विद्यापीठातून एम्.डी.पदवी (१८५३) मिळविल्यानंतर तीन वर्षांनी ते सेंट्रल हॉस्पिटल ब्यूरोत वैद्य झाले. नंतर पॅरिस विद्यापीठात त्यांनी अध्यापनाचे काम केले (१८६०–९३). हे काम करत असतानाच त्यांनी त्या काळातील युरोपातील सर्वांत मोठा तंत्रिका तंत्र वैज्ञानिक खास रुग्णालयीन विभाग पॅरिस येथील सालपेत्र्ये रुग्णालयात सुरू केला (१८८२). ते १८७२ मध्ये विकृतिविज्ञानाचे व १८८२ मध्ये तंत्रिका तंत्र विज्ञानाचे प्राध्यापक झाले. त्यांच्या अध्यापनाच्या प्रभावी पद्धतीमुळे जगाच्या सर्व भागांतील विद्यार्थी शिक्षणासाठी तेथे प्रवेश घेत. प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ ⇨ सिग्मंड फ्रॉइड हे त्यांचे विद्यार्थी होते (१८८५). शार्को यांच्या उन्मादावरील संशोधनामुळे फ्रॉइड यांना मानसशास्त्राची आवड निर्माण झाली. ⇨ प्येअर मारी फेलीक्स झाने हे शार्को यांचे विद्यार्थी नंतर सालपेत्र्ये रुग्णालयाचे संचालक झाले. झाने यांच्या मते उन्माद हा मानसिक अवसन्नतेचाच एक प्रकार होय. [⟶ उन्माद] .

शार्को यांनी उन्मादाची मानसिक विकृती होण्यास मानसिक अवस्था कारणीभूत असते, असे संशोधनातून दाखविले. ही विकृती स्त्रियांत मोठ्या प्रमाणावर आढळते, असे त्यांचे मत होते. उन्माद होण्याची कारणे शोधण्यासाठी त्यांनी ⇨ संमोहनविद्येचा वापर केला. संमोहन अवस्थेत असलेला रुग्ण त्याच्या आयुष्यातील विस्मृतीत गेलेल्या घटना सांगतो व मानसोपचारतज्ज्ञास अधिक प्रतिसाद देतो. त्यांनी मानवी वर्तणूक व तंत्रिका तंत्राच्या कार्यातील दोष शोधण्याबाबत ते प्रसिद्ध होते. स्नायूंच्या ⇨ अपपुष्टीचे अध्ययन करताना त्यांनी कलायखंज या विकृतीचे वर्णन केले. या विकृतीमध्ये ⇨ मेरुरज्जूच्या पृष्ठीय स्तंभाचा आणि संवेदी तंत्रिका स्कंधाचा [⟶ तंत्रिका तंत्र] अपकर्ष होतो. या विकृतीमुळे आणि हिच्याशी निगडित इतर विकृतींमुळे अथवा इजांमुळे संधिबंध व संधिपृष्ठे [⟶ सांधे] यांच्या होणाऱ्या विघटनाचेही त्यांनी प्रथम वर्णन केले (यालाच शार्को रोग किंवा शार्को संधी असे म्हणतात). शार्को रोगामुळे मज्जातंतूचा पक्षाघात होतो, हे त्यांनी दाखविले. विशिष्ट तंत्रिका कार्ये करणारी माणसाच्या मेंदूमधील विशिष्ट स्थले निश्चित करण्याविषयीचे मूलभूत संशोधन त्यांनी केले. तसेच मेंदूला रक्तपुरवठा करणाऱ्या लहान रोहिण्यांचे होणारे विस्फारण त्यांनी शोधून काढले. या रक्तवाहिन्यांच्या भित्तींच्या विकारांमुळे त्यांच्यात रक्त भरले जाऊन त्यांचा कायमचा अप्राकृत विस्फार झालेला असतो. त्यांच्या या संशोधनामुळे मेंदूमध्ये होणाऱ्या रक्तस्रावातील या रोहिण्यांचे महत्त्व उघड झाले.

शार्को मानसिक रुग्णांचे निदान जाहीरपणे लोकांपुढे करीत असत. ते रुग्णाला व्यासपीठावर बोलावून घेत व त्याचा पूर्वेतिहास सांगत असत. विशिष्ट कंदिलाच्या साहाय्याने दाखविण्यात येणाऱ्या काचेच्या सरकत्या चकतीचा (स्लाइडचा) वापर करून ते रोगाविषयीचे निदान प्रभावीपणे लोकांसमोर विशद करीत. तंत्रिका तंत्र व मेंदू यांविषयी त्यांनी केलेल्या संशोधनामुळे काही तंत्रिका विकारांशी त्यांचे नाव कायमचे जोडले गेले आहे. उदा.,  उपदंशजन्य मेरुरज्जू विकारामुळे उद्‌भवणाऱ्या पक्षाघातास ‘एर्प-शार्को विकार’ म्हणतात [⟶ तंत्रिका तंत्र]. कधीकधी पित्ताश्मरी नेहमीच अडकून न बसता तो अधूनमधून सुटा तरंगतो. अशा वेळी पैत्तिक शूल, कावीळ व थंडी वाजून ताप येणे ही तीन लक्षणे पुन:पुन्हा उद्‌भवताना दिसतात. या लक्षणांना शार्को यांच्या गौरवार्थ ‘शार्को त्रिक्‌’ (लक्षणे) म्हणतात. [⟶ पित्ताश्मरी].

शार्को यांनी बरेच लेखन केले आहे. त्यांचा लेक्चर्स ऑन द डिसीजेस ऑफ द नर्व्हस सिस्टिम (मूळ ग्रंथ ५ खंडांचा १८७२–८३) हा ग्रंथ विशेष महत्त्वाचा आहे. च्यूसडे लेसन्स अँट द सालपेत्र्ये आणि ओल्ड एज (१८६७) या इंग्रजी शीर्षकार्थांचे ग्रंथही त्यांनी लिहिले होते.

पाटील, चंद्रकांत ठाकूर, अ. ना.