श्रीविजयराज्य : मलाया द्वीपसमूहातील एक प्राचीन राज्य (इ. स. सातवे ते तेरावे शतक). श्रीविजयविषयी मुख्यत्वे इत्सिंग व फाहियान या चिनी पवाशांचे वृत्तांत व तत्कालीन कोरीव लेख यांतून माहिती मिळते. सर्वाधिक कोरीव लेख इ. स. ६८३ ते ६८६ या दरम्यानचे आहेत. त्यांतील १३ एप्रिल ६८३ च्या शिलालेखात अखेरच्या ओळीत “श्री विजय जयसिद्धयात्रा सुभिष्क ………’’ असे म्हटले आहे. सुमात्रा बेटावरील ⇨पालेंबांग येथे या राज्याची अखेरपर्यंत राजधानी होती. श्रीविजयचा राज्यविस्तार उत्तरेला मलायाच्या सामुद्रधुनीपर्यंत आणि आग्नेयीस सूंदाच्या सामुद्रधुनीपर्यंत होता. या राज्याचा प्रमुख उद्देश भारतीय समुद्र व चिनी समुद्र यांमधील व्यापार हस्तगत करण्याचा होता. त्याकरिता त्यांनी प्रथम बंदरे काबीज केली. त्यांतील मलायू हे प्रथम घेतले. त्यामुळे द्वीपसमूहातील बेटांबरोबरच चीन व भारत यांच्याबरोबर श्रीविजयचे व्यापारी संबंध प्रस्थापित झाले. प्रथम हिंदू असणाऱ्या श्रीविजयने महायान बौद्ध धर्माला आश्रय दिला व त्याचा प्रसारही केला. भारताला जाणारे चिनी प्रवासी या राज्यात मुक्काम करीत. येथील राजांनी भारतात नागापट्टणम् (नेगापटम्) येथेही काही बौद्ध विहार बांधले.

लिगोर येथील शिलालेखात शैलेंद्रांचा उल्लेख असून त्यावरून श्रीविजय व शैलेंद्र ही दोन स्वतंत्र राज्ये अस्तित्वात असावीत. श्रीविजयचा अंमल जावा बेटावरही होता तथापि दक्षिण हिंदुस्थानातील चोल राजांच्या सागरी सत्तेपुढे त्यांना नमते घ्यावे लागले. चोल राजा राजेंद्र याने इ. स. १०२५ मध्ये पालेंबांग काबीज करून तेथील राजाकडून जबरदस्त खंडणी वसूल केली आणि त्याच्या इतर प्रदेशावरही आक्रमणे केली. परिणामत: श्रीविजयची सत्ता कमकुवत होऊन सुमात्रा बेट मलायू या मांडलिक राजाने बळकाविले. तसेच जावा बेटावरील मजपहित ह्या हिंदू सामाज्याने इंडोनेशियातील सत्ता हस्तगत केली. चंद्रभानू हा श्रीविजयचा अखेरचा राजा. श्रीलंकेवरील स्वाऱ्यांमध्ये त्याचा पराभव झाला व त्याच्या सत्तेची पीछेहाट झाली. तेराव्या शतकात जावा व थायलंड ही दोन नवी राज्ये उदयास आली. या दोहोंच्या आकमणांमुळे चौदाव्या शतकात श्रीविजयचे राज्य नष्ट झाले.

पहा : बृहद्‌भारत मलेशिया (इतिहास).

संदर्भ : गुप्ते, रमेश शंकर, बृहत्तर भारत, औरंगाबाद, १९६०.

देशपांडे, सु. र.