बॅनर्जी, गुरुदास : (२६ जुलै १८४४ –२ डिसेंबर १९१८). भारतीय विधिज्ञ व शिक्षणतज्ञ. कलकत्त्याच्या नारकेलडंग या उपनगरात जन्म. वडिलांचे नाव रामचंद्र व आईचे नाव सोनामणी. शालेय शिक्षण जन्मगावीच पूर्ण करून गुरुदास कलकत्त्याच्या प्रेसिडेन्सी कॉलेजमधून एम्. ए. झाले (१८६५). सर्व शालेय व विद्यापीठीय परीक्षांत त्यांनी प्रथम क्रमांक मिळविला होता. एम्. ए. च्या परीक्षेत ते गणित ह्या विषयात पहिले आले व त्याबद्दल त्यांना विद्यापीठाचे सुवर्णपदक मिळाले होते. काही काल कलकत्त्यातच अध्यापकाचे काम करीत असता त्यांनी कायद्याचा अभ्यास केला व बी. एल्. ही पदवी संपादन केली. नंतर १८७७ मध्ये त्यांनी डॉक्टर ऑफ लॉज (एल्एल्.डी.) ही पदवी मिळविली. त्यानंतर त्यांची कायदा व गणित या विषयांचा अधिव्याख्याता म्हणून बेऱ्‍हमपूर महाविद्यालयात नेमणूक झाली. अध्यापनाबरोबरच कलकत्ता येथील उच्च न्यायालयात वकिली करण्याची सवलतही त्यांना देण्यात आली. १८७८ मध्ये टागोर व्याख्यानमानेतील ‘हिंदू लॉ ऑफ मॅरेज अँड स्त्रीधन’ या विषयावर त्यांनी दिलेली व्याख्याने आजही मौलिक ग्रंथ म्हणून मानली जातात.

उच्च न्यालयात गुरुदास ख्यातनाम वकील म्हणून गाजले. कलकत्त्याच्या उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून १६ जानेवारी १८८९ रोजी त्यांची नेमणूक झाली. विधी आयोगाचे सदस्यत्व (१८८९), कलकत्ता विद्यापीठाचे कुलगुरुपद (१८९०), केंद्रीय पाठ्यपुस्तक समितीचे अध्यक्षपद (१८९४) इ. महत्त्वाच्या पदावंर त्यांनी काम केले. १९०४ मध्ये त्यांना ‘सर’ हा किताब देण्यात आला. ए फ्यू थॉट्स ऑन एज्युकेशन, द एज्युकेशन प्रॉब्‍लेम इन इंडिया (इंग्रजी), तसेच शिक्षण, ज्ञान आणि कर्म (बंगाली) ही गुरुदासांची ग्रंथसंपदा होय.

गुरुदासांची त्या काळात तांत्रिक आणि कृषिविषयक शिक्षणाची गरज ओळखून विद्यापीठातून तंत्रविद्या व कृषी यांच्या स्वतंत्र शाखा असाव्यात, यासाठी प्रचार केला. मातृभाषा हेच शिक्षणाचे माध्यम असावे, असा आग्रह धरणारे ते बहुधा पहिलेच विचारवंत ठरतील. धर्म आणि नीतिशिक्षणाचा अंतर्भाव शिक्षणात असावा, पण त्यात विशिष्ट धर्माचा पुरस्कार न करता मानवतावादी दृष्टिकोन राखावा, असे त्यांचे मत होते.

मिसार, म. व्यं.