‘प्रसाद’-जयशंकर : (? १८८९–१५ नोव्हेंबर १९३७). प्रमुख छायावादी कवी, महत्त्वाचे नाटककार, कथाकार, कादंबरीकार आणि निबंधकार या सर्व दृष्टींनी आधुनिक हिंदी साहित्यात अतिशय मोलाची भर घालणारे एक श्रेष्ठ साहित्यिक. त्यांचा जन्म ‘सुँघनी साहु’ या नावाने प्रसिद्ध असलेल्या खानदानी व श्रीमंत कुटुंबात बनारस येथे झाला. त्यांच्या पूर्वजांचा व्यापार तंबाखू व तपकीरीचा असल्यामुळे त्यांना ‘सुँघनी साहु’ म्हणत. बालपणीच आई-वडीलनिवर्तल्यामुळे त्यांना आर्थिक व कौटुंबिक समस्यांना वयाच्या १० व्या वर्षापासूनच तोंड द्यावे लागले. त्यांचे शालेय शिक्षण बनारस येथे फक्त आठव्या इयत्तेपर्यंतच होऊ शकले. कुशाग्र बुद्धी व विलक्षण परिश्रम करण्याची क्षमता यांमुळे कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडतानाच त्यांनी गुरूंच्या मार्गदर्शनाखाली व स्वाध्यायाच्या बळावर संस्कृत, हिंदी, उर्दू, फार्सी, इंग्रजी या भाषांचा तसेच इतिहास, तत्त्वज्ञान, भारतीय संस्कृती, पुराणे यांचा सखोल अभ्यास केला. त्यांच्या सर्व लेखनात त्यांच्या या अध्ययनाची स्पष्ट छाप आढळते.

जयशंकर ‘प्रसाद’ वृत्तीने गंभीर पण रसिक होते. लहानपणापासूनच त्यांना काव्यवाचनाची व काव्यलेखनाची आवड होती.  त्यांनी आधुनिक विचारांचे गंभीरपणे मनन केले होते. भारतीय परंपरांचे ज्ञान तर

जयशंकर 'प्रसाद'त्यांच्या रक्तातच होते. परिणामतः त्यांच्या लेखनात दोन्ही संस्कृतींच्या संस्कारांचा परिपाक दिसून येतो. त्यांनी बालपणातच लिहायला सुरुवात केली. त्यावेळी त्यांना काव्यभाषा म्हणून ब्रज भाषाच उपलब्ध होती. साहजिकच ब्रज भाषेत त्यांनी आरंभीची आपली कविता लिहिली. १९१८ मध्ये प्रकाशित झालेला त्यांचा काव्यसंग्रह झरना त्यांच्या स्वतंत्र कवि-व्यक्तिमत्त्वाची साक्ष देतो. त्याआधीची त्यांची कविता ब्रज भाषेत तर लिहिली गेलीच पण त्यावेळी हिंदी साहित्याचे नेतृत्त्व करणाऱ्या ⇨ महावीरप्रसाद द्विवेदी (१८६४–१९३८) यांच्या युगाचाही त्यांच्यावर प्रभाव जाणवतो. आरंभीच्या त्यांच्या कवितेत बहिर्मुखता व संस्कृतप्रचुरता आढळते. पण झरनानंतर प्रसादांनी लिहिलेल्या काव्याचे एकूण रूप व सामर्थ्य पाहिले, तर त्यांच्या विकसनशील कवि-व्यक्तिमत्त्वासंबंधी आश्चर्य वाटते.

त्यांचे १९१८ पर्यंत अनेक काव्यसंग्रह प्रकाशित झाले होते : उर्वशी (१९०९), वनमिलन (१९०९), अयोध्या का उद्धार (१९१०), शोकोच्छ्‌वास (१९१०), बभ्रूवाहन (१९११), कानन कुसुम (१९१३), प्रेमपथिक (१९१३), करुणालय (१९१३), महाराजा का महत्त्व (१९१४) इत्यादी. परंतु त्यांच्या कवि-व्यक्तिमत्त्वाचे खरेखुरे दर्शन घडते ते त्यांच्या आँसू (१९२५), लहर (१९३३) आणि कामायनी (१९३५) या तीन काव्यांत.

छायावादी युगात (१९२७–३६) प्रवेश करताना प्रसादांच्या एकूण काव्यातच मूलगामी परिवर्तन झालेले दिसते. त्यांचे काव्य अधिक अंतर्मुख तर झालेच पण त्यातील उत्तरोत्तर प्रकट होत गेलेली विश्वकल्याणाची आकांक्षा व आदर्शोन्मुखी वृत्ती अधिकाधिक आंतरिक व काव्यमूल्यांना विशेषत्त्वाने जपणारी होऊ लागल्याचे दिसते. आँसू काव्यसंग्रहाची पहिली आवृत्ती एका प्रेमभंग झालेल्या विरही प्रेमिकाच्या वेदनाव्याकुल मनाची अभिव्यक्ती वाटते उर्दू शायरीचाप्रभावही त्यावर स्पष्ट दिसतो. दुसऱ्या आवृत्तीत त्यांनी काही छंदांची भर तर घातली आहेच पण एकूण काव्याला असा काही आध्यात्मिक स्पर्श दिलेला आहे, की आँसू काव्याच्या आलंबन विभावाबद्दलच प्रश्न निर्माण व्हावा. हिंदीमध्ये ह्या प्रश्नावर विवादही झाला. एकूण छायावादी काव्य जे सूक्ष्मतेकडे, गूढगुंजनाकडे आणि व्यंजनासमृद्धीकडे वळलेले आहे, त्याचा प्रभाव प्रसादांवर प्रकर्षाने दिसून येतो. प्रसाद हे भूतकाळाशी एकरूप होणारे लेखक. आँसूमध्ये ते वैयक्तिक भूतकाळाकडे वळलेले दिसतात. आँसू हे एक स्मृतिकाव्य आहे. प्रणयाच्या मीलन-विरहाचे आर्त स्वर त्यातून उमटतात. वेदनेची कळ, व्यथेचा करुण चित्कार, मनाची तडफड अश्रूंनी भिजलेल्या भाषेत मोठ्या प्रभावीपणे त्यात व्यक्त होते. साहजिकच आँसू हे काव्य हिंदीतच विलक्षण लोकप्रिय झाले असे नव्हे, तर अनेक भाषांतूनही त्याचा अनुवाद झाला.

लहरमध्ये प्रसादांची भावकविता प्रामुख्याने संगृहीत आहे. निसर्गाविषयीचे तीव्र आकर्षण, प्रणयाच्या विविध अनुभवांची उत्कट अभिव्यक्ती, मानवी जीवनाबद्दल करुणार्द्र चिंतन ह्या लहरमधील कवितेच्या प्रमुख प्रवृत्ती होत. प्रसादांची एकूण कविता अनुभवाचे चिंतनशील व मननशील रूप व्यक्त करणारी प्रगल्भ कविता आहे. आत्माभिव्यक्तीतील आवेगापेक्षा आत्मपरिष्कार व आत्मशोधन यांमुळे प्राप्त झालेला भारदस्तपणा त्यांच्या काव्यात आढळतो. एक प्रकारे हा कवी भावनांचे प्रचंड वादळ अनुभवून व ते पचवून त्याचे सारसत्त्व तेवढे निर्भीडपणे वाचकांपुढे ठेवतो असे वाटते. त्यांच्या काव्यावर समीक्षकांकडून करण्यात आलेला पलायनवादाचा आरोप म्हणूनच चुकीचा वाटतो.

 

कामायनीहे काव्य त्यांच्या कवि-व्यक्तिमत्त्वाच्या विकासाचा परमोत्कर्ष म्हणावे लागेल. छायावादी युगाच्या वैशिष्ट्यांचे सर्वांगीण प्रतिनिधित्व करणारे हे महाकाव्य. कथानकाचा आराखडा प्रलय झाल्यावर मनूने निर्माण केलेल्या नव्या सृष्टीचा, अतिशय प्राचीन पण यात व्यक्त झालेली वैचारिक द्वंद्वे, अनुभवांचे मंथन, सूचित झालेली मानवी जीवनाबद्दलची बांधिलकी यांचा विचार करता, हे महाकाव्य आधुनिक वाटावे अशी त्याची एकूण रचना आहे. प्रसादांच्या प्रगल्भ प्रतिभेने या प्राचीन कथेला असे काही विपुल संदर्भ प्रदान केले, की हिंदी समीक्षकांत कामायनीने खूप मोठे वैचारिक वादळ निर्माण केले. इतिहास, संस्कृती, मानसशास्त्र, समाजशास्त्र, पुराणकथा या सर्व दृष्टींनी वेगवेगळी भाष्ये हिंदी समीक्षकांनी या महाकाव्यासंबंधी केली आहेत. या काव्यातील आशयाची समृद्धता, संदर्भसूचनांची विपुलता, चरित्र-चित्रणाची कुशलता, भाषेची विलक्षण व्यंजनाक्षमता आणि नव्या व जुन्या विचारांच्या समीक्षकांवर प्रभाव टाकून त्यांना आवाहन करण्याचे सामर्थ्य यांचा विचार केला, तर हिंदी काव्यातील हा एक मोठा मानबिंदू आहे, असे निर्विवादपणे मान्य करावे लागते. रसात्मक प्रसंगचित्रण, विराट व्यक्तिमत्त्वांचे रेखाटन, काव्यात्म पातळीवर प्रारंभापासून व्यक्त झालेले जीवनदर्शन, प्रतीकात्मक शैली व प्रतिमाप्रचुर भाषा यांचे सौंदर्य यांचा एकत्र विचार करता या महाकाव्याचे मोठेपण सर्वच समीक्षकांनी मान्य केले आहे.


प्रसादांनी उत्कृष्ट नाटकेही लिहिली आहेत. त्यांची या क्षेत्रातील कामगिरी एवढी मोठी आहे, की १९१८–३६ या हिंदीतील नाटकांच्या युगाला ‘प्रसाद-युग’ असे नाव दिले गेले आहे. त्यांनी एकूण १४ नाटके लिहिली (ऐतिहासिक ८, पौराणिक ३, भावप्रधान सामाजिक २ आणि पद्य-नाटक १). प्रसादांना भारतीय संस्कृती व इतिहास यांत विशेष रुची होती. नाटके लिहिण्यापूर्वी त्यांनी तत्संबंधीच्या ऐतिहासिक समग्र वातावरणाचा पुरातत्त्ववेत्त्याच्या शास्त्रीय दृष्टीने विचार केलेला दिसतो. त्यांच्या ऐतिहासिक नाटकांना लिहिलेल्याविद्वत्तापूर्ण संशोधरपर प्रदीर्घ प्रस्तावनांवरून हे स्पष्ट होते. त्यांनी ऐतिहासिक नाटकांसाठी मानवी संस्कृतींच्या संघर्षाचा काल सामान्यतः घेतला आहे. सम्राटांच्या कर्तृत्वामागे असलेल्या वैयक्तिक व सामाजिक-धार्मिक-सांस्कृतिक स्वरूपाच्या घटनांतील नाट्य शोधण्याकडे त्यांचा कल अधिक दिसतो. म्हणूनच त्यांचे नाट्याप्रसंग मानवी जीवनाच्या शाश्वत भावनात्मकतेकडे उन्मुख झालेले आहेत. इतिहास व कल्पना यांचे कलात्मक मिश्रण त्यांच्या नाटकांतून झालेले आहे. त्यांची नाटके रंगभूमीसाठी लिहिलेली नाहीत. त्यांना प्रतीत झालेल्या नाट्याशयासाठी त्यांनी सर्व प्रकारचे स्वातंत्र्य घेतल्यामुळे त्यांची नाटके रंगभूमीवर आणणे कठीण होऊन बसलेले आहे. जीवनाकडे पहाण्याची तात्त्विक दृष्टी, माणसाच्या मनातील प्रेम आणि द्वेष यांचा वैयक्तिक व सामूहिक स्वरूपाचा संघर्ष, मनाच्या आतल्या गाभ्याचे प्रकटीकरण करणारे काव्यात्म संवाद यांमुळे त्यांची नाटके वाचनीय निश्चितच राहतील. स्थलकालाविषयी त्यांनी घेतलेले स्वातंत्र्य व दृश्यांच्या आकाराबद्दल दाखविलेली बेपर्वाई यांमुळे त्यांच्या एकूण नाटकांचा संकलित परिणाम क्षीण होतो. पात्रांची विपुल संख्याही हा परिणाम अधिकच क्षीण करते. त्यांची नाटके सुखान्त असली, तरी प्रारंभापासून शेवटपर्यंत दुःखाची सावली त्यांवर पडलेली दिसते. त्यांच्या नाटकांचा प्रभाव वैराग्यपूर्ण शांती निर्माण करतो. बौद्धांचा दुःखवाद व आर्यांचा आनंदवाद यांच्या समन्वयाचा तो परिणाम असणे शक्य आहे. त्यांची शोकाकुल जीवनानुभूती, सांस्कृतिक पुनरुत्थानाची आकांक्षा, महान पण सौम्य व्यक्तिरेखा, मधुर दृश्य आणि काव्याच्या स्पर्शाने जिवंत झालेली भाषा यांमुळे एकाग्र परिणामाच्या दृष्टीने रंगभूमीवर उणी वाटणारी त्यांची नाटके विदग्ध वाचक-रसिकांना मात्र मोहून टाकतात.

प्रसादांच्या दोन कादंबऱ्या कंकाल (१९२९) व तितली (१९३४) प्रसिद्ध आहेत. आदर्शवादी, कोमल प्रणयाची चित्रे रेखाटणारे प्रसाद कंकालमध्ये उग्र वास्तववादी झालेले दिसतात. तितली ही ग्रामीण जीवनावर आधारलेली कादंबरी असून तीत ते पुन्हा आदर्शवादी झालेले दिसतात. त्यांची इरावती ही ऐतिहासिक कादंबरी अपुरी राहिली. प्रसादांचे पाच कथासंग्रह हिंदी साहित्यात प्रतिष्ठा पावलेले आहेत. त्यांची ‘ग्राम’ ही कथा १९११ मध्ये इंदु नावाच्या त्यांच्याच मासिकात प्रकाशित झाली होती. त्यांचे महत्त्वाचे कथासंग्रह प्रतिध्वनि (१९२६), आकाशदीप (१९२९), आँधी (१९३१), इंद्रजाल (१९३६) हे होत. छायावादाची सर्व वैशिष्ट्ये त्यांच्या कथेत आढळतात. प्रेम, करुणा, त्याग, बलिदान यांचे चित्रण त्यांच्या कथांत आढळते. मानसिक द्वंद्वाचे वादळ मनात वागवीत सक्रीय झालेली त्यांची पात्रे वाचकाला झपाटून टाकतात. वास्तववादी प्रेमचंदांच्या कथांच्या काळात प्रसादांच्या कथा सामान्य लोकांना तितक्याशा प्रिय झाल्या नसल्या, तरी मानवी चिरंतन भावनांच्या सकस चित्रणाच्या दृष्टीने त्यांच्या कथा महत्त्वाच्या आहेत. निबंध आणि नाटकांना जोडलेल्या त्यांच्या प्रस्तावना त्यांच्या सखोल अध्ययनाची, चिंतनाची आणि संशोधनवृत्तीची साक्ष देतात.

छायावादी युगाचे एक श्रेष्ठ प्रतिनिधी, बहुमुखी प्रतिभेचे व सतत विकासशील राहिलेले प्रसाद प्रतिभेच्या सर्वोच्च विकासबिंदूवर असतानाच बनारस येथे क्षयाच्या विकाराने निवर्तले, हे हिंदीचे मोठे दुर्भाग्य होय. त्यांनी भावनेला चिंतनशील वळण देऊन अंतर्मुखी साहित्याचे दालन समृद्ध केले. भूत व वर्तमान यांची वैचारिक सांधेजोड करण्याचा प्रयत्न केला. भाषेला अधिक अर्थसघन, व्यंजक व समृद्ध केले. भावकवितेला सहज संगीतात्मकतेचा दिलेला स्पर्श त्यांच्या रचनेला वेगळी कलात्मक पातळी प्राप्त करून देतो. १९१८–३६ या काळात हिंदीतीलप्रेमचंद, निराला व प्रसाद ही जी तीन नावे प्रामुख्याने पुढे येतात, त्यांत प्रसादांची प्रतिभा अधिक बहुमुखी आहे.

संदर्भ : १. नगेंद्र, आधुनिक हिंदी नाटक, दिल्ली, १९७०.

२. प्रेमशंकर, प्रसाद का काव्य, अलाहाबाद, १९५०.

३. मदान, इंद्रनाथ, संपा. प्रसाद प्रतिभा, दिल्ली, १९७१.

४. वाजपेयी, नंददुलारे, जयशंकर प्रसाद, अलाहाबाद, १९६३.

५. शर्मा, जगन्नाथप्रसाद,  प्रसादके नाटकोंका शास्त्रीय अध्ययन, बनारस, १९४३.

बांदिवडेकर, चंद्रकांत