वेलर, टॉमस हकल : (१५ जून १९१५–). अमेरिकन वैद्य व विषाणुशास्त्रज्ञ. ⇨जॉन फ्रॅंक्लिन एंडर्स व ⇨फ्रेड्रिक चॅपमन रॉबिन्स यांच्यासह वेलर यांना १९५४ सालचे वैद्यकाचे अथवा शरीरक्रिया विज्ञानाचे नोबेल पारितोषिक मिळाले. ⇨ऊतक संवर्धनाद्वारे बालपक्षाघाताच्या (पोलिओच्या) व्हायरसाचे यशस्वी रीतीने संवर्धन (वाढ) केल्याबद्दल त्यांना हे पारितोषिक देण्यात आले. यामुळे या व्हायरसाचे `परीक्षानलिकेत’ अध्ययन करणे शक्य झाले आणि या पद्धतीमुळे या रोगावरील लशी तयार करता आल्या.

वेलर यांचा जन्म ॲनार्बर (मिशिगन, अमेरिका) येथे झाला. त्यांचे वडील मिशिगन विद्यापीठात विकृतिविज्ञानाचे प्राध्यापक होते. या विद्यापीठातच अध्ययन करून टॉमस यांनी ए. बी. (१९३६) व एम्‌. एस्‌.(१९३७) या पदव्या संपादन केल्या आणि नंतर त्यांनी हार्व्हर्ड विद्यापीठाची एम्‌. डी. पदवी मिळविली (१९४०). हार्व्हर्ड येथे शिकत असतानाच त्यानं एंडर्स यांच्या मार्गदर्शनाखाली व्हायरसविषयक अध्ययन व संशोधन केले होते. नंतर वेलर हार्व्हर्ड मेडिकल स्कूलमध्ये फेलो होते (१९४०–४२). दुसऱ्या महायुद्धाच्या काळात (१९४२–४६) त्यांनी यू. एस. आर्मी मेडिकल कोअरमध्ये काम केले. तेव्हा ते प्वेर्त रीको येथील प्रयोगशाळेत परजीवीविज्ञान, सूक्ष्मजंतुशास्त्र व विषाणुशास्त्र या विषयांचे प्रमुख होते. १९४९–५५ दरम्यान ते बॉस्टन येथील चिल्ड्रेन्स मेडिकल सेंटरमधील एंडर्स यांच्या सांसर्गिक रोगविषयक प्रयोगशाळेचे साहाय्यक संचालक होते. १९५४ साली ते हार्व्हर्ड विद्यापीठात उष्ण कटिबंधीय सार्वजनिक आरोग्य विषयाचे `रिचर्ड पीअर्सन स्ट्रॉंग’ प्राध्यापक झाले आणि १९६६–८१ दरम्यान हार्व्हर्ड युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ पब्लिक हेल्थमधील सेंटर फॉर द प्रिव्हेन्शन ऑफ इन्फेक्शन डिसीजेस या केंद्राचे संचालक म्हणूनही त्यांनी काम केले.

बॉस्टन येथे असताना वेलर यांनी एंडर्स व रॉबिन्स यांच्याबरोबर काम केले. मानवी भ्रूणातील [→ भ्रूणविज्ञान] त्वचेच्या व स्नायूच्या ऊतकांपासून (समान रचना व कार्य असलेल्या कोशिकांच्या – पेशींच्या -समूहांपासून) प्रयोगशाळेत तयार केलेल्या निलंबनांमध्ये बालपक्षाघाताच्या व्हायरसांचे संवर्धन करण्यात त्यांना यश लाभले. वेलर यांनी अमेरिकन वैद्य फ्रॅंक्लिन नेव्हा यांच्याबरोबर प्रयोगशाळेत ⇨वारफोड्या (रुबेला) या सांसर्गिक रोगाच्या व्हायरसाचे संवर्धन केले आणि मानवी कोशिका संवर्धनांमधून कांजिण्यांचा व्हायरस अलग केला.

नोबेल पारितोषिकाखेरीज वेलर यांना अनेक मानसन्मानही मिळाले.

भालेराव, य. त्र्यं.