दर्वीमुख: या पक्ष्याचे वैशिष्ट्य त्याची मोठी चमच्यासारखी चोच हे असल्यामुळे त्याला इंग्रजी भाषेत स्पूनबिल हे नाव दिलेले आहे. थ्रेस्किऑर्निथिडी या पक्षी कुलात याचा समावेश होतो. हा पक्षी जगात सगळीकडे आढळतो. पूर्व गोलार्धात याच्या पाच जाती असून पश्चिम गोलार्धात एकच आहे. भारतात आढळणाऱ्या जातीचे शास्त्रीय नाव प्लॅटेलिया ल्यूकोरोडिया  असे आहे. भारतात रखरखीत किंवा जास्त डोंगराळ प्रदेश वगळून तो सगळीकडे आढळतो. दलदली, नद्या व तलावांचे काठ, खाडीच्या काठचा चिखलट प्रदेश इ. जागी हा असतो.

पाळीव बदकापेक्षा हा मोठा असतो. शरीराचा रंग पांढरा मान लांब व तिच्या मागच्या भागाच्या पुढच्या बाजूवर पिवळसर तपकिरी पट्टा डोक्यावरून मानेवर लोंबणारा लांब तुरा प्रजोत्पादनाच्या काळात असतो चोच लांब, चपटी, टोकाशी चमच्याप्रमाणे पसरट व काळी डोळे लाल पाय लांब, काळे. नर आणि मादी दिसायला सारखीच असतात. यांचे थवे असतात.

दर्वीमुख (प्लॅटेलिया ल्यूकोरोडिया )

यांच्या खाण्यात वनस्पतिज पदार्थांचा बराच मोठा भाग असतो पण याशिवाय सर्व प्रकारचे पाणकिडे, त्यांचे डिंभ (अळ्या), बेडूक, मृदुकाय प्राणी आणि मासे ते खातात. हे आपले भक्ष्य दिवसा कधीच मिळवीत नाहीत भक्ष्य मिळविण्याची खरी वेळ म्हणजे सकाळ आणि  संध्याकाळ. साधारण उथळ पाण्यात हिंडून ते आपले भक्ष्य पकडतात. चोच अर्धवट उघडून ती तळाच्या चिखलात खुपसून एका बाजूकडून दुसऱ्या बाजूकडे सारखी फिरवीत ते हळूहळू पुढे जातात. चोचीत आलेले भक्ष्य ती चटकन मिटून ते गिळून टाकतात.

मंद सुरात रेकण्यासारखा आवाज हे काढतात, मान पुढच्या बाजूला लांब व ताठ करून आणि पाय मागे लोंबत ठेवून हे संथपणे उडत जातात.

प्रजोत्पादनाचा काळ जुलै ते नोव्हेंबर असतो पण त्यात पावसाळ्यामुळे बदल होणे शक्य असते. घरटे मोठे व काटक्याकुटक्यांचे बनविलेले असते. सामान्यतः ते पाण्यात असलेल्या किंवा पाण्याच्या काठी असणाऱ्या झाडावर बांधलेले असते. मादी चार अंडी घालते. ती मळकट पांढरी असून त्यांच्यावर गडद तांबूस तपकिरी ठिपके व डाग असतात.

कर्वे, ज. नी.