धन्वंतरि पुरस्कार : धन्वंतरी हे हिंदू वैद्यकशास्त्राचे पिता मानले जातात. त्यांची जयंती धनत्रयोदशीला साजरी केली जाते. १९७० साली आयुर्वेद मंडळातर्फे मुंबईत साजऱ्या झालेल्या जयंतीच्या वेळी विविध चिकित्सा पद्धतींतील (उदा., ॲलोपॅथी, आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानी, निसर्गोपचार वगैरे) तज्ञांनी एकत्र येऊन हा कार्यक्रम व्यापक प्रमाणावर साजरा करण्याची कल्पना पुढे आणली. तीनुसार १९७१ मध्ये धन्वंतरी जयंती समितीमार्फत बिर्ला क्रिडाकेंद्र, मुंबई येथे एक समारंभ साजरा झाला. याच समितीचे नंतर ‘धन्वंतरि फाउंडेशन’ असे नामकरण करण्यात आले. सर्व चिकित्सा पद्धतींतील तज्ञांचे भावनिक ऐक्य साधणे, हा या फाउंडेशनचा उद्देश आहे. परिणामी कोणत्याही चिकित्सा पद्धतीचा अवलंब करणाऱ्या वैद्याला या फाउंडेशनचा सभासद होता येते. या उद्देशामुळे विविध चिकित्सा पद्धतींतील सर्वांत चांगल्या गोष्टींचा समाजाला लाभ करून देता येईल. तसेच विविध पद्धतींविषयी असलेले पूर्वग्रह नाहीसे होऊन कोणत्याही पद्धतीतील चांगल्या उपचारांविषयी अधिक संशोधन होऊ शकेल.

इ. स. १९७२ मध्येही धन्वंतरी जयंती साजरी झाली. रस्तुमजाल वकील, पंडित शिवशर्मा, ए. व्ही. मोदी, लीलावती मुन्शी, महावरी अधिकारी. इ. मान्यवर व्यक्तींनी तीत भाग घेतला होता. वैद्यकीय व्यवसायाच्या अमूल्य सेवेबद्दल व विशेष कार्य वा संशोधन करून वैद्यकीय ज्ञानात भर घातल्याबद्दल दर वर्षी वैद्यकातील असामान्य तज्ञ व्यक्तीला ‘धन्वंतरि पुरस्कार’ देण्याचे १९७३ साली ठरविण्यात आले.

रुस्तुमजाल वकील (१९७३), के, कृ. दाते (१९७४) पंडित शिवशर्मा (१९७५) आणि शांतिलाल जे. मेहता (१९७६) यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. सामान्यतः धन्वंतरी जयंती समारंभाच्या वेळीच हा पुरस्कार देण्यात येतो. त्याच वेळी एखाद्या वैद्यकीय विषयावर विविध तज्ञांच्या चर्चा, चर्चासत्रे वा परिसंवाद घडवून आणतात. अशाच प्रकारे इतर वेळीही विविध पद्धतींतील तज्ञांना एकत्रित आणण्याचा फाउंडेशनचा प्रयत्न चालू आहे. त्यामुळे वैद्यकीय उपचार पद्धती समृद्ध बनू शकेल. शिवाय फाउंडेशनच्या कार्यकारी मंडळाला मानवाची सेवा व वैद्यकीय व्यवसायाची प्रगती ही दोन्ही उद्दिष्टे साधावयास मदत होईल. सामान्य माणसाला परवडतील अशा देशी उपचारांचे मूल्यमापन करू इच्छिणाऱ्या वैद्यांना अनुदान देण्याची आणि लायक वैद्यकीय तज्ञांच्या कुंटुंबियांसाठी एक सदिच्छा निधी उभारण्याचीही फाउंडेशनची योजना आहे.

ठाकूर, अ. ना.