इतिहासलेखनपद्धति : प्राचीन काळापासून आधुनिक काळापर्यंत उपलब्ध पुराव्यांवरून त्या त्या काळातील मानवी प्रयत्‍न, सामाजिक जीवनातील घडामोडी व परिस्थिती यांविषयी स्थळ, काळ व व्यक्ती यांच्या निर्देशांसह जे लेखन केले जाते, त्यास इतिहासलेखन म्हणतात. इतिहासलेखनास प्रथम केव्हा सुरुवात झाली हे ज्ञात नाही तथापि ईजिप्त, ॲसिरिया, बॅबिलोनिया, चीन वगैरे देशांत इ. स. पू. १५०० पासून पुढे इतिहासविषयक काही लेखन केलेले आढळते. त्यांत राजांच्या कुळी, त्यांचे पराक्रम व तत्संबंधित माहिती ग्रथित केलेली आहे. बहुतेक लेखनावर तत्कालीन धर्माचे वर्चस्व आढळते आणि बहुसंख्या लेखन शिलालेख, मृत्पात्रे, भाजलेल्या मातीच्या विटा व पपायरसे (ईजिप्तमधील कागद), भूर्जपत्रे, ताडपत्रे, कातडी ह्यांवर लिहिलेले असून गद्यापेक्षा पद्याचा त्यात अधिक उपयोग केलेला आहे. मात्र शास्त्रशुद्ध इतिहासलेखनाऐवजी पुराणकथा व दंतकथांचाच त्यात अधिक भरणा आढळतो. त्यामुळे वरील इतिहासलेखनावरून तत्कालीन समाजाची, त्यांच्या चालीरीतींची व धार्मिक कल्पनांची माहिती मिळत असली, तरी तत्कालीन राजकीय घडामोडींची विश्वसनीय माहिती उपलब्ध होत नाही. म्हणून ज्याला खऱ्या अर्थाने इतिहासलेखन म्हणता येईल, असे लेखन प्रथम ग्रीसमध्ये व नंतर रोमन संस्कृतीच्या काळात सुरू झाले.

ग्रीक व रोमन काळातील इतिहासलेखन : प्राचीन ग्रीस व रोममधील अनेक कोरीव लेख म्हणजे दगडांवर कोरलेले तह, करारनामे किंवा राजांच्या आज्ञा असून काहींत राजांच्या खाजगी जीवनासंबंधीही माहिती दिलेली आहे. टॉलेमी राजांच्या व रोमन वर्चस्वाखालील ईजिप्तमधील पपायरसेवरही वरील पद्धतीचीच माहिती मुख्यत्वे सापडते. ह्याशिवाय तत्कालीन ग्रीक व रोमन नाण्यांवर राजांची नावे आढळतात.

‘‘ग्रीक हेच पहिले मानवी घटनांचे इतिवृत्त ठेवणारे लोक नसून त्यापूर्वीही अशा प्रकारची नोंद करण्यात आली आहेपरंतु ग्रीकांनी इतिहासाची चिकित्सा करून त्याच्या सत्यासत्यतेची मीमांसा केली, म्हणून इतिहासलेखनाची खरी सुरुवात त्यांच्यापासून झाली’’, असे जे. बी. बेरी ह्या ग्रीसच्या इतिहासावरील एका इतिहासतज्ञाचे मत आहे.

ग्रीसमधील सर्वांत प्राचीन लेखकांनी प्रथम महाकाव्ये लिहिली. उदा., होमरचे इलियड. त्यात पूर्वजांच्या कर्तृत्वाविषयी पाल्हाळिक व दंतकथात्मक पद्धतीने निरुपण केलेले दिसते. त्यानंतरच्या इ. स. पू. सातव्या व सहाव्या शतकांतील रचना पद्यात्मक व पौराणिक होती, परंतु त्यात राजांच्या वंशावळी, त्यांचे पराक्रम ह्यांचे रंजित वर्णन आढळते. ह्या पद्धतीमुळे ढोबळ कालमान मिळू लागला. यानंतर लोकांचे भूगोल, सागरी सफरी, वसाहती वगैरे विषयींचे कुतूहल जागृत झालेले दिसते, साहजिकच त्यांच्या प्रवासांतून मिळालेले अनुभव व त्यांनी पाहिलेले प्रदेश ह्यांची माहिती त्यात सामाविष्ट होऊ लागली आणि त्यामुळे तत्कालीन समाजातील धाडसी पुरुषांना बाहेरचे जग पाहण्याची इच्छा निर्माण झाली. थोडक्यात इ. स. पू. सहाव्या शतकात सुसंबद्ध इतिहासलेखनास सुरुवात झाली. त्याचे श्रेय पहिला इतिहासकार म्हणून ⇨ हीरॉडोटसला (इ. स. पू. सु. ४८४–४२४) द्यावे लागले कारण त्याने पुढील पिढीसाठी इतिहास लिहून, तोही गद्यात, त्यात तत्कालीन महत्त्वपूर्ण घटनांची व व्यक्तींची नोंद आणि सविस्तर चर्चा केली. त्याने दंतकथांचा उल्लेख करून तत्कालीन चालीरीतींद्वारे काही अनुमाने काढली. हीरॉडोटसनंतरचा दुसरा महत्त्वाचा इतिहासकार म्हणजे ⇨ थ्यूसिडिडीझ (इ. स. पू. सु. ४७१–३९९). त्याने पेलोपनीशियन युद्धाचा वृत्तांत देताना फक्त तत्संबंधित घटना व काळ ह्यांची विश्वसनीय माहिती देण्याचा यत्‍न केला. आपल्या पूर्वसूरींप्रमाणे त्याने चर्चेत आपणास गोवून घेतले नाही. यानंतरचा इतिहासकार म्हणजे ⇨ झेनोफन (इ. स. पू. सु. ४३०–३५५). तो तर इतिहासाच्या कथात्मक भागातच गुरफटलेला दिसतो. ह्या तीन इतिहासकारांच्या लेखनाचा पुढील इतिहासलेखनावर अनेक बाबतींत परिणाम झाला आणि पुढील इतिहासकारांनी त्यांचे अनुकरण केले.

मानवी संस्कृती अतिप्राचीन काळात ईजिप्तमध्ये विकसित झाली. पण तीवर मॅनेथो (इ. स. पू. सु. ३००) याने ग्रीकमध्ये तयार केलेली ईजिप्तच्या फेअरो राजांची अर्धवट यादी हेच काय ते इतिहासलेखन. बॅबिलोनिया, ॲसिरिया आदी प्राचीन देशांत एखादी मोठी इमारत बांधल्यावर ती बांधवणाऱ्या राजाची वंशावळ, त्या वंशाचे दिग्विजय वगैरे कोरून ठेवण्याची प्रथा होती. हे कोरीव लेख इतिहासाची साधनेच होत. बेरॉसस (इ. स. पू. तिसरे शतक) यांने बॅबिलोनियाचा त्रिखंडात्मक इतिहास ग्रीक भाषेत लिहिला. त्याचप्रमाणे बॅबिलोनिया-ॲसिरिया सरहद्दीच्या भांडणांची हजार वर्षांची हकिकत लिहिलेली होती, असे निर्देश सापडतात. गतकाळाचा आढावा घेण्याची वृत्ती प्राचीन इझ्राएलच्या ज्यूंमध्ये आढळते. सॉल, डेव्हिड, सॉलोमन या राजांनी इझ्राइल भरभराटीला आणला. साहजिकच बायबलच्या जुन्या करारात ज्यू लोकांचा संगतवार इतिहास सापडतो. त्यातील काही प्रकरणांत इझ्राएलची सिरियाच्या गुलामगिरीतून मुक्तता हा विषय आहे आणि स्वातंत्र्यवीरांच्या पराक्रमाने विजय मिळाला, अशी कारणमीमांसा केली आहे. त्यातील सर्वच लेखन विश्वासार्ह नाही पण बायबलचा पाश्चात्त्य इतिहासलेखनावर, विशेषतः ख्रिस्ती धर्माचा प्रसार होऊन लागल्यानंतरच्या काळात, फार मोठा प्रभाव पडला यात शंका नाही. फ्लेव्हिअस जोसीफस (३७ ?–१००) हा ज्यूंचा प्राचीन काळातील शेवटचा राष्ट्रीय इतिहासकार. त्याचे हिस्टरी ऑफ द ज्यूइश वॉर  आणि अ‍ँटिक्‍विटीज ऑफ द ज्यूज ही दोन इतिहासविषयक पुस्तके आहेत. त्यांतील लिखाण दर्जेदार नाही, पण त्यांत ज्यू व रोमन लोकांच्या संघर्षाची हकिकत संगतवार आहे.

पाश्चात्त्य इतिहासलेखनाला प्राचीन ग्रीसमध्ये प्रारंभ झाला. आयोनिया द्वीपसमूहातील शहरांचे वृत्तांत, प्रसिद्ध लोकांची भाषणे व कुलवृत्तांत लिहून देणारे धंदेवाईक लेखक आणि मायलीटसचा रहिवासी हेकाटीअस (इ. स. पू. ६ वे शतक) यांच्या लेखनांत ग्रीक इतिहासलेखनाचा उगम सापडतो. हेकाटीअसने वंशावळींमध्ये ग्रीकांच्या खात्रीलायक तेवढ्याच कथा दिल्या आहेत. ही सत्यान्वेषक दृष्टी इतिहासाला दंतकथा, पुराणे यांपासून वेगळे करण्यास पोषक ठरली. हीरॉडोटस याला इतिहासाचा जनक म्हणण्यात येते. निःपक्षपाती सत्यकथन या हेतूनेच त्याने ग्रीस-इराण युद्धांचा इतिहास लिहिला. पण इतिहासलेखनाचा शास्त्रीय पाया घातला थ्यूसिडिडीझ याने. त्याने पेलोपनीशियन युद्ध आणि अथेन्सच्या प्रभुत्वाचा इतिहास लिहिला. तो घटनांची निवड, आधारांचा तौलनिक अभ्यास व भविष्यकाळातील मार्गदर्शन या द्दष्टींनी अपूर्व आहे. झेनोफनने थ्यूसिडिडीझचीच इतिहासलेखनपद्धती पुढे चालविली. त्याचाच आदर्थ पुढे ठेवून फ्लेव्हिअस ॲरियन (इ. स. दुसरे शतक) याने अलेक्झांडरच्या दिग्विजयांचा इतिहास लिहिला. त्याचे इंडिका हे थोटे प्रकरण भारताच्या प्राचीन इतिहासाचे एक महत्त्वाचे साधन आहे. पोलिबियसने (इ. स. पू. २०५?–१२५) रोमन कालखंडावर लिहिले. इतिहासातील भूगोलाचे महत्त्व, साधनांची छाननी, कारणमीमांसेची आवश्यकता अशा अनेक दृष्टींनी त्याच्या चाळीस खंडीय इतिहासाचे महत्त्व आहे. सामान्यतः रोमन इतिहासकारांचा दर्जा ग्रीकांपेक्षा कमी, पण त्यातील ज्यूलियस सीझरच्या आठवणी उत्कृष्ट आहेत. सॅलस्टचा (इ. स. पू. सु. ८६–३४) रोमचा इतिहास मूळ स्वरूपात उपलब्ध नाही. सुरुवातीचे रोमन इतिहासलेखन ग्रीक भाषेमध्ये झाले. लॅटिन भाषेत लिहिणारा पहिला इतिहासलेखक केटो. ⇨ टायटल लिव्ही (इ. स. पू. सू. ५९–इ. स. १७) या रोमनच्या सर्वश्रेष्ठ इतिहासकाराने रोमन साम्राज्याच्या वैभवाचे आणि विस्ताराचे वर्णन केले, तर ⇨ टॅसिटस (इ. स. सु. ५५–११७) याने अनीतीमुळे रोमचा नाश होणार, अने भविष्य वर्तविले. ⇨ प्‍लूटार्कने (४६ ?–१२०) ग्रीकमध्ये चरित्रे लिहिली. तर स्विटोनिअसची (सु. ६९–१४०) सीझर-चरित्रे लॅटिन मध्ये आहेत. रोमचा हा शेवटचा महत्त्वाचा इतिहासकार. चौथ्या शतकातील ॲमिएनस मार्सेलायनसच्या (सु. ३३०–४००) इतिहासात रोमन साम्राज्याच्या विनाशाची छाया आहे. रोमन इतिहासकारांवर ग्रीकांचा प्रभाव आहे. भाकडकथा आणि धार्मिक पूर्वग्रहांचा पगडा असलेल्या मध्ययुगीन इतिहासांपेक्षा त्यांचे इतिहास जास्त दर्जेदार आहेत. युसीबिअस (सु. २६०–३४०) या चर्चच्या इतिहासकाराने बरीच हस्तलिखिते जमविली होती पण बाकीच्या प्राचीन इतिहासकारांनी प्रत्यक्ष अवलोकन व प्रवास यांखेरीज साधनसामग्री कशी जमविली असेल, हे ठरविणे कठीण आहे.


ख्रिस्ती व मध्ययुगीन परंपरा : ख्रिस्ती धर्माचा प्रसार होऊ लागल्यानंतरच्या काळात धर्मोपदेशकांनी आपापल्या मठांत जुनी, दुर्मिळ हस्तलिखिते स्वतःच्या हस्ताक्षरात नकलून काढायला सुरुवात केली. ग्रीक आणि रोमन काळातील विद्येचे अशा रीतीने जतन करण्याचे श्रेय त्यांना आहे. या नकलांप्रमाणेच भिक्षूंनी तत्कालीन घटनांच्या नोंदीही ठेवल्या. या नोंदींचे मध्ययुगात शकावल्यांत आणि पुढे त्यांचे इतिहासात रूपांतर झाले, मध्ययुगीन इतिहासलेखनात ख्रिस्ती धर्माचा विजय हे सर्व घटनांचे मुख्य सूत्र धरून विवरण केलेले आहे. प्रत्येक ऐतिहासिक घटना म्हणजे मनुष्याच्या कल्याणासाठी परमेश्वराने आखलेल्या योजनेतील एक प्रकरण, अशी इतिहासविषयक कल्पना या साऱ्या लेखनाच्या मुळाशी आहे. युसीबिअस आणि ओरोझिअस (पाचवे शतक) यांच्या इतिहासांत पाखंडी मतांचे खंडन आणि ख्रिस्ती धर्मतत्त्वांचे मंडन हेच धोरण आहे. संतांची चरित्रे आणि चमत्कार यांना मध्ययुगीन लेखनात महत्त्वाचे स्थान आहे. तथापि टूरचा ग्रेगरी ऊर्फ जॉर्जिअस फ्लोरेन्शिअस (सु. ५३८ ?–५९३) याने लिहिलेला फ्रँक लोकांचा इतिहास उपयुक्त आहे. तत्कालीन अनेक महत्त्वाच्या घटनांत त्याने स्वतः भाग घेतला होता. बीडचा (सु. ६७३–७३५) इंग्‍लंडचा धार्मिक इतिहास वैयक्तिक अनुभवांनर आधारलेला आहे. मध्ययुगीन इंग्‍लंडचे आणखी प्रसिद्ध इतिहासकार माम्झबरीचा विल्यम (१०९६ ?–११४३) आणि ऑर्डेरायीकस व्हायीटेलिस (१०७५ ?–११४३) हे होत. याच सुमारास यूरोप खंडात फ्रीसिंगचा बिशप ऑटो (१११४ ?–११५८) आणि सेंट ऑल्बन्झचा भिक्षू मॅथ्यू पॅरिस (१२००–१२५९) यांनीही इतिहास लिहिले. लवकरच इतिहासलेखनात लॅटिनऐवजी इतर भाषा वापरात येऊ लागल्या. अँग्‍लो-सॅक्सन क्रॉनिकल  हा या काळातील प्रसिद्ध ग्रंथ. इंग्रजीतील झां फ्रूवासारच्या (१३३७–१४१० ?) इतिवृत्तामध्ये आठव्या शतकातील सरंजामी कल्पना आढळतात. व्हीलार्द्वँ‌ (११५०–१२१८) याचा धर्मयुद्धांवरील ग्रंथ याच काळातील. मध्ययुगीन इतिहासावर धर्मकल्पनांचा जबरदस्त पगडा दिसतो. ख्रिस्ती परंपरेतील इतिहासलेखनाने केलेले एक मोठे कार्य म्हणजे, कॅथलिक, प्रॉटेस्टंट, जेझुइट आदी पंथांनी आपसांतील वादांसाठी पुरावा म्हणून कागदपत्रे जमवायला सुरुवात केली. बरोनिअसने (१५३८–१६०७) आपल्या लेखनात व्हॅटिकन दप्तराचा प्रथमच उपयोग केला. वेगवेगळ्या पंथांनी जमविलेली साधनसामग्री पुढील काळात धार्मिक व शासकीय इतिहास लिहावयाला उपयुक्त ठरली. लवकरच इतिहासग्रंथांची संख्या वाढू लागली आणि धर्माधिकाऱ्यांचा या क्षेत्रावरचा पगडा कमी होऊ लागला. जोव्हान्नी व्हिल्लानी (१२८०–१३४८) हा फ्लॉरेन्सचा इतिहासकार भिक्षू नव्हता. त्याच्या आणि तत्सम लेखकांच्या लिखाणांतून मध्ययुगीन इटलीचे आर्थिक व राजकीय जीवन समजते.

प्रबोधनकाळ ते एकोणिसावे शतक : प्रबोधनकाळात प्राचीन ग्रीक व रोमन संस्कृतींच्या अभ्यासाला आलेली गती, यूरोपातील नवीन राष्ट्रांचा उदय, नव्या भूप्रदेशांचा शोध, व्यापारपद्धतीत झालेले परिवर्तन इत्यादींचा इतिहासलेखनावर परिणाम झाला. ⇨ मॅकिआव्हेलीचा (१४६९–१५२७) फ्लॉरेन्सचा इतिहास आणि फ्रांचेस्को ग्वीत्‌चार्दीनीचा (१४८३–१५४०) इटलीचा इतिहास हे ‘राष्ट्र’ या कल्पनेभोवती गुंफले होते आणि त्यांचे अनुकरण यूरोपात अन्यत्र झाले. अमेरिकेच्या शोधामुळे स्पॅनिश आणि पोर्तुगीज इतिहासलेखनांनी यूरोपच्या पलीकडे लक्ष वळविले. अठराव्या शतकात इतिहासलेखनावरील ख्रिस्ती धर्मकल्पनेची पकड पूर्ण सैल झाली. अठराव्या शतकातील माँतेस्क्यू, व्हॉल्तेअरसारखे फ्रेंच एडवर्ड गिबन (१७३७–१७९४), विल्यम रॉबर्ट्सनसारखे (१७२१–१७९३) इंग्रज ऑडोल्फ श्मिटसारखे (१८१२–१८८७) जर्मन इतिहासकार इतिहास बुद्धीच्या निकषावर पारखू लागले. फ्रेंच इतिहासकारांनी सबंध मानवजातीचा इतिहास लिहिण्याच चंग बांधला. विकासावर पूर्ण विश्वास आणि विषयाची वेधक मांडणी ही या इतिहासकारांची वैशिष्ट्ये होती. त्यांच्या कृतींना लोकप्रियता लाभली. फ्रांस्वा शातोब्रीआं, वॉल्टर स्कॉट यांसारख्या चतुर कादंबरीकारांनी गतकालाची रम्य चित्रे रंगवून त्यात भर टाकली. पण या बुद्धिवादी वा स्वच्छंदतावादी इतिहासलेखनाविरुद्धही आवाज उठविणारे होते. इटालियन लेखक व्हीको (१६६८–१७४४) याने कोणतेही युग कमी वा जास्त महत्त्वाचे मानता येणार नाही, असे सांगून प्रत्येक कालखंडात भविष्यकालीन घटनांची बीजे असतात, हा सिद्धांत मांडला. तर योहान व्हिंकेलमान (१७१७–१७६८) याने ग्रीक कलेवरील ग्रंथात प्रगतीचा मक्ता अठराव्या शतकालाच दिलेला नाही, असे प्रतिपादिले आहे. मझरसारख्या (१७२०–१७९४) अनेक अभ्यासकांनी आपापल्या प्रदेशात इतिहाससंशोधन करून प्रगतीची मूल्ये सापेक्ष आहेत, असे दाखवून दिले. हेर्डर (१७४४–१८०३) या जर्मन लेखकाने मध्ययुगाचे महत्त्व वर्णिले. एडमंड बर्कचे (१७२९–१७९७) फ्रेंच राज्यक्रांतीवरील विचारसुद्धा प्रगतिवादविरोधी म्हणता येतील. अठराव्या शतकाच्या अखेरीस भाषाशास्त्राच्या अभ्यासाने इतिहासाच्या शास्त्रीय अभ्यासाला मोठीच चालना मिळाली. बार्टोल्ट नीबूर (१७७६–१८३१) या जर्मन लेखकाने मूळ साधनांचा चिकित्सक अभ्यास करून रोमचा इतिहास लिहिला. त्याचा नंतरच्या इतिहासकारांवर परिणाम झाला. परंतु त्याचा शिष्य ⇨ लीओपोल्ट फोन रांके (१७९५–१८८६) याने इतिहासलेखनाला शास्त्रीय स्वरूप दिले. त्याच्या स्वतःच्या लेखनात राष्ट्रवाद व प्रगतिवाद या दोहोंचा समन्वय आढळतो.

एकोणिसाव्या शतकात राष्ट्रीय विचारसरणीच्या लेखनाला बहर आला. मीशील आणि लामार्तीन (फ्रान्स) फ्रीमन, फ्रॉइड, ⇨ ग्रीन आणि ⇨ मेकॉले (इंग्‍लंड)जॉर्ज बँक्रॉफ्ट (अमेरिका) ⇨ ड्रॉइझेन  आणि ⇨ ट्राइश्के (जर्मनी पालाट्स्की (बोहीमिया) या सर्व इतिहासकारांना या पंक्तीत बसविता येईल. जॉर्ज ग्रोटने (१७९४–१८७१) ग्रीसच्या इतिहासात अथेन्सच्या गणतंत्राला प्राधान्य दिले. फ्रेंच लेखकांवर फ्रेंच क्रांतीचा परिणाम झाला. या काळातील बहुतेक लेखनाला साधनांचा भक्कम आधार होता. फ्रान्समध्ये इकोल दे शार्तीस ही संस्था स्थापन झाली आणि गीझोने फ्रेंच कागदपत्रांच्या प्रकाशनाचे प्रचंड काम हाती घेतले. इंग्‍लंडमध्ये मध्ययुगीन गुंडाळ्यांचे प्रकाशन सुरू झाले. पेर्ट्‌स व बमर यांनी जर्मन व मूरातोरीने इटालियन कागदपत्रांबाबत असेच काम केले. स्पेन व पूर्व यूरोपीय देश येथेही त्याचे अनुकरण झाले. अमेरिकेच्या प्रत्येक घटक संघराज्याने अस्सल कागदपत्रे प्रकाशित केली, तर पीटर फोर्सने केंद्रीय संघराज्यासाठी हे काम केले. यूरोपातील बरेचसे देश याप्रमाणे आपापली कागदपत्रे, राजकीय इतिहास, वीरचरित्रे यांवर लक्ष केंद्रित करीत असता, ऑग्यूस्त काँत (१७९८–१८५७) यांने समाज आणि त्याचा विकास यांकडे इतिहासज्ञांचे लक्ष वेधले. त्याच्या तत्त्वज्ञानाचा इतिहासलेखनावर फार मोठा परिणाम झाला. इतिहास हेही एक सामाजिकशास्त्र असून त्यातील मूलभूत नियम शोधणे शक्य आहे, समाजविकास काही विशिष्ट प्रकारच्या संकल्पनांमुळे होतो, अशी त्याची विचारसरणी होती. ऐतिहासिक घटनांकडे बघण्याचे सामाजिक, आर्थिक, धार्मिक इ. विविध दृष्टिकोण आणि त्यांच्या बौद्धिक अधिष्ठानाचे विवरण या आधुनिक काळातील इतिहासमीमांसेच्या वैशिष्ट्यांचे मूळ काँतच्या तत्त्वज्ञानात सापडते. ⇨ एच्. टी. बकल (१८२१–१८६२) यांचा इंग्‍लंडमधील संस्कृतीचा इतिहास या कल्पनांनी प्रभावित झाला. इतिहासात बौद्धिक अधिष्ठान शोधणाऱ्यांत बुर्कहार्त हा इटलीतील प्रबोधनावर लिहिणारा जर्मन आणि यूरोपातील बुद्धिवादावर लिहिणारा इंग्रज ⇨ विल्यम लेकी (१८३८–१९०३) या इतिहासकारांचा अंतर्भाव केला पाहिजे. एकोणिसाव्या शतकातील इतिहासलेखनावर औद्योगिक क्रांती, लोकशाहीचा विकास, डार्विनचा उत्क्रांतिवाद या सर्वांचा परिणाम दिसून येतो. कार्ल मार्क्सच्या वर्गविग्रहाच्या तत्त्वज्ञानाने इतिहासकारांना समाजाच्या अर्थरचनेची नवी जाणीव करून दिली. मानव्यविद्यांतील प्रगतीचाही इतिहासलेखनावर परिणाम झाला आणि इतिहास विशिष्ट देश, कालखंड वा व्यक्तीपुरता मर्यादित न राहता सारी मानवी संस्कृती त्यात आली पाहिजे, हा विचार प्रबळ झाला. मास्परो (१८४६–१९१६) व रॉलिन्सन (१८१०–१८९५) या मध्यपूर्वेतील प्राचीन संस्कृतीच्या इतिहासकरांना लिपिविद्येतील शोधांनी नवी दालने उघडून दिली. ⇨ जेम्स ब्रेस्टेड यांने ईजिप्शियन संस्कृतीवर नवा प्रकाश-झोत टाकला. या प्राचीन संस्कृतींच्या अभ्यासात टेओडोर मोमझेन याने लिहिलेल्या रोमच्या इतिहासाने उच्चांक गाठला. मानव्यविद्यांतील विकासाचा फायदा ऐतिहासिक घटना, शासन, समाजेतिहास यांचा अभ्यास करणार्‍यांनाही झाला. विल्यम स्टब्झ आणि मेटलंड (इंग्‍लंड) ग्रेसबेक (जर्मनी) कव्हल्येव्हस्की (रशिया) फ्यूस्तेल द कूलांझ यांचे संस्थांविषयक अभ्यास त्याचीच उदाहरणे आहेत. मेअरने (१८५५–१९३०) प्राचीन संस्कृतींचा सर्वंकष, मूलगामी अभ्यास केला. पण एकोणिसाव्या शतकात इतिहासाचे क्षेत्र इतके विस्तृत होऊ लागले, की त्यामुळे अध्ययनाला काही मर्यादा घालणे आवश्यक झाले. तरीही कार्ल लाम्प्रेख्ट (१८५६–१९१५) याने तौलनिक पद्धतीने इतिहासशास्त्रात सारे काही येऊ शकेल, सामूहिक मनात ऐतिहासिक घटनांचे मूळ शोधावे, असे प्रतिपादिले. आव्हान आणि प्रत्युत्तर या सिद्धांतावर सर्व संस्कृतिविकास मांडणार्‍या ⇨ टॉयन्बी या आधुनिक इतिहासकारावर लाम्प्रेख्टच्या कल्पनांचा प्रभाव आढळतो. विसाव्या शतकात यूरोपअमेरिकेत इतिहासाच्या अभ्यासाला वाहून घेतलेल्या अनेक संस्था आणि नियतकालिके निघाली. अनेक देशांच्या शासनांनीही इतिहाससंशोधनाला आर्थिक साहाय्य देण्याला सुरुवात केली.


विसावे शतक : साधनसामग्रीचे वैपुल्य हे या शतकाचे वैशिष्ट्य आहे. एखाद्या इतिहासकाराने वैयक्तिक रीत्या सर्वसमावेशक सविस्तर इतिहास लिहिणे कठीण होत चालल्यामुळे गेल्या शतकात त्या त्या क्षेत्रातील तज्ञांनी पुढे येऊन सहकारी पद्धतीने इतिहास लिहावे, ही कल्पना बळावली. ⇨ लॉर्ड ॲक्टनच्या संपादकत्वाखाली सुरू झालेला केंब्रिज हिस्टरी अशा ग्रंथांचा प्रारंभ गेल्या शतकात झाला आणि अशा कल्पना या शतकात चांगल्याच फोफावल्या आहेत. प्रत्येक क्षेत्रातील अभ्यासही सूक्ष्मतर होत चालला आहे. इतिहासलेखन इतके विपुल होत आहे, की इतिहासलेखनाचा अभ्यास हा नवाच विषय निर्माण झाला आहे. या अभ्यासाला ही भरती येण्याचे एक प्रमुख कारण, शासकीय अभिलेखागारे आणि खाजगी कागदपत्रे मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होत आहेत हे होय. त्याच प्रमाणात संदर्भसाहित्य आणि त्याच्या सूची प्रसिद्ध होऊ लागल्या आहेत. राजकीय इतिहासाच्या बरोबरीने धार्मिक, औद्योगिक, वैज्ञानिक, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, राजनैतिक अशा इतिहासाच्या अनेक शाखोपशाखांचा विस्तार होत आहे. दोन महायुद्धांनी इतिहासलेखनाला प्रचारासाठी राबवून घेतले. युद्धविषयक कागदपत्रे खुली झाल्यावर युद्धाची कारणमीमांसा आणि वर्णने करणारे लेखन मोठ्या प्रमाणावर सुरू झाले राजनैतिक इतिहासाला मोठेच क्षेत्र मिळाले. राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, पुरातत्त्वविद्या, मानवशास्त्र, भू-राजनीती, नाणकशास्त्र, समाजशास्त्र, भूगोल अशा अनेक मानव्यविद्यांतील नवनव्या सिद्धांतांचा, शोधांचा आणि विचारप्रणालींचा इतिहासलेखनावर मोठ्या प्रमाणात परिणाम होत आहे. सर्वसाधारणतः मार्क्सवादी व इतर असे या लेखनाचे वर्गीकरण शक्य आहे. क्रोचे, ब्‍लोस, स्पेंग्‍लर, कॉलिंगवुड यांसारख्यांनी इतिहासलेखनाला तात्त्विक पार्श्वभूमी दिली आहे. इतके विविध प्रकारचे विषय अभ्यासिले जात आहेत, की त्यांचा नामनिर्देश करणेही कठीण आहे. कर्णोपकर्णी चालत आलेल्या आफ्रिकेतील देशांच्या इतिहासाला लिखित रूप देण्याचे प्रयत्‍न उल्लेखनीय आहेत आणि त्यांत जे. ए. हॉर्टन, सी. सी. रेन्डॉर्फ, ओतोम्बा पेन, सॅम्युएल जॉन्सन वगैरे आफ्रिकेतील तज्ञांचे प्रयत्‍न व कार्य महत्त्वाचे आणि उल्लेखनीय आहे.

अमेरिकेतील इतिहासलेखन : कॅप्टन जॉन स्मिथ याने १६२४ मध्ये व्हर्जिनिया व न्यू इंग्‍लंड या प्रदेशांचा समग्र इतिहास प्रसिद्ध केला तत्पूर्वीचे बहुतेक इतिहासलेखन ही केवळ प्रवासवर्णने होती. अमेरिकन स्वातंत्र्ययुद्धापूर्वी प्रसिद्ध झालेल्या इतिहासांत घटकराज्यांचे गव्हर्नर आणि त्यांच्या विधानसभा यांतील संघर्ष, वसाहतींचा विस्तार, रेड इंडियन समाजाशी झालेली युद्धे हे विषय प्रामुख्याने हाताळले गेले. सुरुवातीचे इतिहास हे मुख्यतः धर्मोपदेकशांनी लिहिले. सतराव्या शतकातील प्रमुख इतिहासलेखकांत विल्यम ब्रॅडफर्ड, एडवर्ड विंझ्लो, एडवर्ड जॉन्सन, विल्यम हबर्ड, रिचर्ड मॅथर इत्यादींचा समावेश होतो. व्हर्जिनिया, न्यू इंग्‍लंड, प्लिमथ या वसाहतींचे इतिहास त्यांनी लिहिले. पण अठराव्या शतकात इतर व्यावसायिकही या क्षेत्रात आले. या शतकातील नावाजलेले प्रमुख इतिहासकार म्हणजे कोल्डेन, विल्यम स्मिथ, टॉमस प्रिन्स आणि टॉमस हचिन्सन हे होत. मॅसॅचूसेट्स व रेड इंडियन यांच्या ताब्यातील प्रदेश यांचेही इतिहास त्यांनी लिहिले. अमेरिकेतील स्वातंत्र्ययुद्धामुळे (१७७८) इतिहासकारांनाही अमेरिकेची स्वतंत्र राष्ट्र म्हणून जाणीव झाली. मर्सी वॉरेन हिने अमेरिकन क्रांतीचा इतिहास लिहिला (१८०५). वीम्सने लिहिलेल्या जॉर्ज वॉशिंग्टन यासारख्यांच्या चरित्रांना व्यक्तिकेंद्रित इतिहास म्हणणेच उचित होईल.

एकोणिसाव्या शतकातील सर्वांत प्रसिद्ध अमेरिकन इतिहासकार जॉर्ज बँक्रॉफ्ट (१८००–१८९१) याच्या दहा खंडात्मक ग्रंथात अमेरिकेच्या स्वातंत्र्यापर्यंतच्या इतिहासाचा आढावा येतो. राष्ट्राभिमान आणि प्रसंगांचे नाट्यमय वर्णन यांनी तो भरलेला आहे. तत्पूर्वी ऐतिहासिक साधनसामग्री गोळा करण्याचे काम अनेक संस्था, संघराज्यांचे घटक यांनी जोरात सुरू केले होते. जेअरेड स्पार्क्स (१७८९–१८६६) याने अमेरिकन क्रांतीवर बरीच साधनसामग्री प्रसिद्ध केली. या काळातील प्रमुख इतिहासकार प्रगतिवादी होते. लेखनात त्यांनी आशयाइतकेच अभिव्यक्तीलाही महत्त्व दिले. विल्यम प्रेस्कटने (१७९६–१८५९) स्पेनच्या मध्य व दक्षिण अमेरिकेतील साम्राज्याचा इतिहास लिहिला, तर जॉन मॉट्लीने (१८१४–१८७७) त्या साम्राज्याची यूरोपातील हकिकत लिहिली. लवकरच अमेरिकन इतिहासकार सामाजिक इतिहासाकडे वळले. त्यात हेन्‍री ॲडम्स (१८३८–१९१८) हा प्रमुख होता. मक्‌मास्टरने सामाजिक इतिहासाचा पायाच घातला. ही प्रथा शेलंड, डिक्सन, फॉक्स विंझर आणि आर्थर श्लेझिंगर यांपर्यंत चालत आली आहे. एडवर्ड टर्नरने (१८८१–१९२९) अमेरिकन सरहद्दींचे महत्त्व प्रतिपादून इतिहासलेखनाला एक नवीच दृष्टी दिली. आधुनिक अमेरिकन इतिहासलेखन ज्ञानक्षेत्रांतील सर्वच शाखांत समृद्ध आहे. त्याचे एक वैशिष्ट्य म्हणजे कॅनडा आणि दक्षिण अमेरिकेतील देश यांचे इतिहास मुख्यतः अमेरिकन इतिहासकारांनीच लिहिले आहेत.

रशियन इतिहासलेखन : रशियाचे सतराव्या शतकापर्यंतचे इतिहास बायझंटिन आदर्श समोर ठेवून लिहिले आहेत. कीएव्ह येथे सापडलेला वृत्तांत बाराव्या शतकात लिहिला गेला आणि त्या वृत्तांतावरून त्याचप्रमाणे नॉव्हगोरॉड व इतर शहरांतून उपलब्ध झालेल्या हकिकती, सनदा आणि तहनामे यांवरून मध्ययुगीन रशियाबद्दल काहीशी महत्त्वाची माहिती मिळते. यांतील अधिक जुन्या हकिकती धर्मोपदेशकांनी लिहिल्या असल्यामुळे त्यांत साहजिकच दैवी घटनांचा आणि छोट्या जहागीरदारांचा सुकाळ आहे. सतराव्या-अठराव्या शतकांत रशियाचे आधुनिकीकरण सुरू झाले. विज्ञान अकादमीच्या स्थापनेबरोबर (१७२५) आलेल्या जी. एफ्. म्यूलर, ए. एल्. श्लट्सरसारख्या संशोधकांनी दुर्लक्षित ऐतिहासिक कागदपत्रांच्या उपयोगाला सुरुवात केली आणि एकोणिसाव्या शतकात तर करमझ्यीन पगॉड्यिन, सलव्ह्‌यॉव्ह यांसारख्या राष्ट्रवादी इतिहासकारांची विचारसरणी मागे पडून शास्त्रशुद्ध इतिहासाभ्यासाला जोर आला. रशियातील कायदेपद्धती, लोकजीवन, सामाजिक बदल हे अभ्यासाचे विशेष विषय बनले. ग्रडोव्ह्‌स्की, सेर्गिव्हिच, ऱ्हुशेव्हस्की, कोर्क्यूनॉव्ह यांचे इतिहासग्रंथ आणि विशेषतः क्ल्युचेव्हस्की (१८४१–१९११) ह्याचा पंचखंडात्मक ग्रंथ हे इतिहासलेखनाच्या दृष्टीने महत्त्वाचे होत. सर पॉल व्ह्येनग्राडॉव्ह याने मध्ययुगीन इंग्‍लिश ग्रामजीवनाच्या अध्ययनात महत्त्वाची भर घातली. आधुनिक काळात प्रेस्‍न्यॅकॉव्ह व एस्. एफ्. प्लटॉनॉव्ह (१८६०–१९३३) यांनी नवीन उपलब्ध झालेल्या विशेष अभ्यासाचा चांगला उपयोग केला आहे. पी. एन्. म्यिल्युकॉव्ह (१८५९–१९४३) याने झारच्या सत्तेवर कडक टीका केली. एम्. एन्. पक्रॉव्हस्की (१८६८–१९३२) हा रशियन इतिहासकारांतील पहिला मार्क्सवादी भाष्यकार होय. बऱ्याच इतिहासकारांनी रशियन समाज व संस्था ही बाकीच्या यूरोपीय समाजजीवनापासून का व किती दूर आहेत आणि त्यांचे परस्परसंबंध कसे आहेत, याचा अभ्यास केला आहे. रशियन राज्यक्रांतीनंतर बरेच इतिहासकार हद्दपार झाले आणि त्यांनी आशियाई दृष्टीकोनातून रशियाकडे पहावयाला सुरुवात केली. जॉर्ज व्हेर्नातस्की (१८८७– ) हा हद्दपार झालेला महत्त्वाचा इतिहासकार होय. त्याने रशियाचा प्राचीन काळापासून आधुनिक काळापर्यंतचा इतिहास चार खंडांत लिहिला. सेव्हिएट रशियात पक्रॉव्हस्कीच्या नेतृत्वाखाली  रशियन इतिहासाचे मार्क्सवादी दृष्टीकोनातून पुनर्लेखन होऊ लागले. परंतु त्यातही ‘इव्हान द टेरिबल’ आणि ‘पीटर द ग्रेट’ यांकडे अभिमानाने पाहिले जाते. राष्ट्रीय आणि मार्क्सवादी दोन्ही भूमिकांची या आधुनिक इतिहासात सरमिसळ आहे. पूर्वी युक्रेन, लिथुएनिया अशा प्रदेशांचे वेगवेगळे इतिहास लिहिले गेले. आता सोव्हिएट राज्यपद्धतीचे इतर देश, आर्थिक व सामाजिक संस्था यांचा इतिहास आणि वेगवेगळ्या संदर्भसाहित्याचे संकलन यांवर भर देण्यात येत आहे.


अरबी इतिहासलेखन : अरबस्तानात उदयास आलेले इस्लाम धर्माच्या परंपरेतील लेखन साहजिकच अरबी भाषेत सुरू झाले. इस्लामपूर्व अरब इतिहास जमातींच्या दंतकथा व आख्यायिका या स्वरूपाचाच होता. मुहंमद पैगंबरापूर्वीचा अरबांचा इतिहास उपलब्ध नाही. पण कुराणाने इतिहासलेखनाला चालना दिली. पैगंबर आणि त्याचे शिष्य यांच्या आठवणी भाविकतेने जपल्या गेल्या. आपल्या वंशाचे श्रेष्ठत्व बिंबविण्यासाठी खलीफांनीही शासकीय नोंदी ठेविल्या, तरी इस्लामी परंपरेतील इतिहासलेखनाचा खरा प्रारंभ अब्बासी वंशाच्या कारकीर्दीपासून (७५०) सुरू झाला, असे मानतात. सुरुवातीचे इतिहासलेखन म्हणजे थोरांची चरित्रे, वीरगाथा, लढायांच्या हकिकती याच स्वरूपाचे होते. त्यांत इब्‍न इस्हाक याने पूर्वीच्या आख्यायिकांचा उपयोग करून सांगितलेले पैगंबराचे चरित्र महत्त्वाचे आहे. मदीनेचा अल्-वाकिदी (सु. ७४७–८२३) याने मुस्लिम पराक्रमांचा इतिहास वर्णिला. अल्-बुखारी (सु. नववे शतक) या इतिहासकारानेही इस्लामच्या रूढी व परंपरा यांचा सुसंगत वृत्तांत लिहिला आहे. अद्‌दीनावारी, अल्-याकूबी, इब्‍न कुताइबा हे त्याच्याच परंपरेतील इतर इतिहासकार होत. अल्-तबरी (दहावे शतक) याने मात्र सबंध मानवजातीचा कालानुक्रमाने इतिहास लिहिण्याचा पायंडा पाडला. कालानुक्रमाऐवजी राजे, वंश, विशिष्ट विषय यांभोवती घटनांची गुंफण करण्याचे श्रेय अल्-मसूदी (दहावे शतक) यास आहे. त्याच्या इतिहासाचे नांव मुरूज. इब्‍न अल्-फरीदी (९६२–१०१३), इब्‍न अरबशाह (१३९२–१४५०) यांसारखे ऐतिहासिक चरित्रकारही झाले. मुसलमान धर्मातील श्रेष्ठ पुरुषांचे चरित्रकोश रचण्याची प्रथा इब्‍न सौद याने सुरू केली. इब्‍न असाकिर (११०५–११७६) याने दमास्कसवाची वीरांची गाथा गायली. या परंपरेत अल्-खातिब, अल्-बघदादी, इब्‍न खल्लिकान असे अनेक कोशकार निर्माण झाले. सेल्जुकसारख्या वंशात आणि आलेप्पो, बगदाद, दमास्कस यांसारख्या इस्लामी संस्कृतीच्या केंद्रांत इतिहासलेखनाची परंपरा चालू राहून मुसलमानी इतिहासवाङ्‌मय समृद्ध झाले. आफ्रिकेच्या लिखित इतिहासातही कानो, तिंबक्तू, किल्वा, मोंबासा ह्यांसारख्या इस्लामी संस्कृतीच्या केंद्रांतील प्रसिद्ध मुसलमानांच्या चरित्रांचा भाग प्रमुख आहे. या तवारिखा स्थानिक बोलीत पण अरबी लिपीत लिहिल्या गेल्या. मध्यपूर्वेत इस्लामचा प्रसार वाढल्यावर तेराव्या शतकाच्या सुमारास इतिहासकारांनी अरबी सोडून फार्सी भाषा वापरावयाला सुरुवात केली. फार्सीतील रशीदुद्दीन आणि जुवय्‌नी यांच्या इतिहासांत मंगोल लोकांचा इस्लामवर पडलेला प्रभाव दिसून येतो. पंधराव्या शतकाच्या अखेरीस इस्लामी परंपरेतील इतिहास तुर्की भाषेतही लिहिले जाऊ लागले. त्यांवर फार्सिचा प्रभाव आहे. परंतु संख्यावैपुल्य असले, तरी शास्त्रशुद्ध इतिहासलेखनाला आवश्यक असा चिकित्सक दृष्टिकोन इस्लामी इतिहासकारांत कमी प्रमाणात आढळतो. यामुळेच धर्मयुद्धांसारख्या महत्त्वाच्या संघर्षाचा इतिहास वा आफ्रिकेतील एखाद्या जमातीचा इतिहास अरब इतिहासातून मिळत नाही. हे सर्व लेखन मुख्यतः राजकीय स्वरूपाचे आणि त्यातही अल्लाच्या इच्छेवाचून काही घडून येणे कठीण, या समजुतीने झाले आहे. याला अपवाद ⇨ इब्‍न खल्दून (१३३२–१४०६) याचा आहे. त्याने इतिहासलेखनात मानवाची प्रगती नैसर्गिक व इतर कारणांवर अबलंबून असते, तेव्हा त्यांची नोंद व्हावी व्यक्ती व समष्टी यांवर होणाऱ्या परिस्थितीच्या परिणामांची दखल घेतली जावी असे सांगितले. आधुनिक इस्लामी इतिहासकार साधनांचा साक्षेपी अभ्यास आणि चिकित्सक दृष्टिकोन यांवर आधारलेले लेखन करू लागले आहेत.

चिनी-जपानी इतिहासलेखन : जगात तीन महत्त्वाच्या ऐतिहासिक परंपरा आहेत. त्यांत चीनची एक आहे. उरलेल्या दोन म्हणजे अरबी व ग्रीक-रोमन किंवा पाश्चिमात्य, चीनमध्ये इतिहास हा वर्तमानकाळ व भविष्यकाळ यांचा मार्गदर्शक मानला जातो. चिनी संस्कृतीच्या प्रारंभकाळापासून पद्धतशीर इतिहासलेखन आणि घटनांचे कालानुसारी विवरण या बाबी महत्त्वाच्या समजल्या जात. चीनचा पहिला सर्वांगीण इतिहास शिर ची (शृ-जी). त्यात पूर्वीच्या सु. ७०० वर्षांचा वृत्तांत आलेला आहे. तत्पूर्वी प्राण्यांच्या हाडांवर (ओरॅकल बोन्स) ऐतिहासिक स्वरूपाचे लेखन कोरून ठेवण्याची प्रथा होती, असे दिसते. कन्फ्यूशसच्या काळात (इ. स. पू. ५५१–४७९) चीनवर राज्य करणारा चौ (जो) वंश आणि त्याचे मांडलिक यांनी वंशपरंपरागत इतिहासलेखक बाळगण्याची प्रथा रूढ केली. या काळातील प्रसिद्ध ग्रंथ छ्‌वुन-च्यव यात लीऊ राजवंशाचा कालानुसारी इतिहास आला आहे. लढाया, खून, दुष्काळ इ. घटना त्रोटकपणे वर्णिल्या आहेत. कन्फ्यूशसने त्यावर भाष्य केल्यामुळे नंतरच्या लेखकांनी तीच प्रथा उचलली. सू मा चीयेन (स्स-माच्यन इ. स. पू. १४५–८७) याने शिर ची या नावाचा पूर्वोक्त इतिहास लिहिला. त्याचे अनुकरण चीनवर राज्य करणाऱ्या हान, तांग (थांग), सुंग, मिंग इ. वंशांच्या इतिहासकारांनी केले. या तर्‍हेच्या लेखनात देशाचे राजकारण, राज्यकर्त्यांची आणि प्रसिद्ध व कुप्रसिद्ध स्त्रीपुरुषांची चरित्रे, कालपट, उमरावांचे हुद्दे, प्रसिद्ध घराण्यांचे अभिलेख, अर्थव्यवस्था, कलाविज्ञानावरील प्रबंध असे विभाग असत. यात शासकीय कागदपत्रांचा भरपूर उपयोग केलेला असला, तरी तार्किक संगतीचा किंवा कालसंगतीचा अभाव असे. हे सरकारी इतिहास मुख्यतः शासनाच्या उपयोगासाठी लिहिले गेले. साहजिकच लीऊ चीह ची (ल्यव-जृ-ज्यी ६६१–७२१), शेंग ची आ (षंग ज्या ११०७–११६२) यांसारख्या इतिहासकारांनी त्यावर टीका केली. आधुनिक पद्धतीचा इतिहास यूआन शू (षू ११३१–१२०५) या लेखकाच्या ग्रंथापासून सुरू होतो. त्याने सु मा ग्वांगच्या  (स्स-मा ग्वांग) ‘इतिहासदर्पण’ या इतिहासाची तर्कशुद्ध पुनर्रचना केल्यामुळे घटनांची संगती लावणे तसेच सर्वस्पर्शी विवरण करणे सुलभ झाले. यानंतर खाजगी रीत्या लिहिल्या गेलेल्या शेकडो इतिहासांवर त्याचा परिणाम झाला. सतराव्या-अठराव्या शतकांत प्राचीन ग्रंथ व सरकारी कागदपत्रे यांची चिकित्सा होऊन इतिहास मोठ्या प्रमाणात लिहिले जाऊ लागले. हू वे (१६३३–१७१४), येन जो-च्यू (१६३६–१७०४), त्सूई श्यू (१७४०–१८१६), शांग (जांग) श्यूए चीएंग (छंग १७३८–१८०१) इ. इतिहासकारांच्या लेखनांत त्याचे प्रत्यंतर मिळते. आधुनिक काळात ही पुराव्याची चिकित्सा वाढली आहे. मानव्यविद्यांतील प्रगतीचा उपयोग करून घेण्यात येत आहे अभिलेखांचे टीकात्मक संपादन होत आहेपण त्याचबरोबर गतकाळाकडे पाहण्याचा मार्क्सवादी दृष्टिकोन स्थिर झाला आहे.

आठव्या शतकातील कोजीकी  निहोंगी  ह्या पौराणिक काव्यांनी जपानी इतिहासाचा आरंभ होतो. निहोंगीच्या परंपरेत आणखी पाच इतिहास लिहिले गेले. त्यांत दहाव्या शतकापर्यंतच्या घटना आल्या आहेत. या सहा इतिहासांना मिळून ‘रिक्कोकुशी’ अशी संज्ञा आहे. चिनी भाषा व चिनी लिपीमधील या लेखनाला आधुनिक काळात जपानच्या प्राचीन इतिहासाची साधने असेच समजले जाते. अकराव्या शतकापासून इतिहासलेखन जपानी भाषेतच होऊ लागले. सोळाव्या शतकापर्यंतच्या लेखनात जपानचे तत्कालीन सम्राट आणि सम्राटापेक्षाही बलाढ्य बनत चाललेले उमराव शोगुन यांच्या परस्परसंबंधांचे दर्शन घडते. अठराव्या शतकात जपानमध्ये राष्ट्रीय भावना प्रबळ झाली. मित्सूइकुनी या राजपुत्राच्या प्रेरणेने १७१५ मध्ये डाइ-निहोन-शी नावाच्या राष्ट्रीय इतिहासाच्या आधारे लेखन सुरू झाले. त्याचे २४३ खंड १८५१ मध्ये छापून झाले. जपानचे दोन प्रसिद्ध इतिहासकार आराई हाकुसेकी (१६५७–१७२५) आणि राई सान्यो (१७८०–१८३३) हे होत. राई सान्योने शोगुनांच्या लष्करी वर्चस्वापासून जपानला वाचविण्यासाठी सम्राटाचे हात बळकट होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादिले आणि मेजी क्रांतीला त्यामुळे मदत झाली. यानंतरच्या इतिहास लेखनावर पाश्चात्त्य प्रभाव पडलेला दिसतो. त्याचप्रमाणे राजे आणि युद्धे यांच्या वर्णनांऐवजी संस्कृतीचा इतिहास लिहिला जावा, हा विचार प्रबळ झाला. तागुची युकिची याने लिहिलेला जपानच्या आधुनिकीकरणाचा इतिहास (६ खंड, १८७५–८२) या दृष्टीने महत्त्वाचा ठरतो. आधुनिक काळात टोकिओ व क्योटो विद्यापीठांत ऐतिहासिक साधनांचे संशोधन-प्रकाशन शास्त्रशुद्ध पद्धतीने केले जात आहे. जपानी इतिहासलेखनावरील चिनी प्रभाव संपला आहे. विशेषतः गेल्या महायुद्धात जपानच्या ताब्यात असलेल्या कोरिया, मांचूरिया, चीनचे काही भाग यांवरील जपानी संशोधन सर्वच अभ्यासूंना उपयुक्त ठरत आहे.


आग्‍नेय आशियाई इतिहासलेखन : थेरवादी बौद्धधर्माचा तेराव्या शतकात या भागात प्रसार झाल्यापासून अनेक प्रकारच्या वंशावळ्या, इतिवृत्ते इ. लिहिले जाऊ लागले. मॉन्स भाषेतील मंदिरांच्या इतिहासांना आणि राजचरित्रांना एक विशिष्ट नाव असे. ‘निदान आरंभ कथा’ हे या प्रकारच्या लेखनाचे उत्कृष्ट उदाहरण आहे. ब्रह्मदेशातील इतिवृत्तांना ‘याझविन’ असे म्हणत आणि यूकल याने १७२१ मध्ये २१ खंडांत लिहिलेल्या इतिवृत्तात ब्रह्मदेशाचा इतिहास सापडतो. १८२९, १८६७ आणि १८८५ मध्ये ब्रह्मी राजांच्या आज्ञेवरून त्यात आणखी भर घालून व्यासंगी भिक्षूंकरवी तो अद्यावत करण्यात आला. ब्रह्मदेशात ऐतिहासिक पोवाड्यांचीही प्रथा होती. त्यांना ‘इग्यिन’ असे म्हणत. आराकानचे दोन प्रसिद्ध इतिहासग्रंथडान्यावडी आयोडाव बॉन (१७८७) व डान्यावडी याझविन्हीती (१९१०) हे होत. सयाममधील या प्रकारची इतिवृत्ते १७६७ मध्ये ब्रह्मदेशाशी झालेल्या युद्धात नष्ट झाली. पण पोंग्सवदन  हा १३५०–१६०६ या कालखंडाचा इतिहास मात्र सुदैवाने उपलब्ध आहे. नागरकृतागम हे प्रपांक नावाच्या बौद्ध भिक्षूने १३६५ मध्ये लिहिलेले महाकाव्य आणि परराताने हे अनामिक गद्यलेखन (पंधरावे शतक) ही जावाच्या इतिहासाची महत्त्वाची साधने होत. १३५० मध्ये पसाइचा इतिहास लिहिला गेला, हे मलायातील सर्वांत जुने इतिहासलेखन. सोळाव्या शतकातील सेजारा, मेलायू, राजा चूलान याने लिहिलेला मीसा मेलायू हा पेराकचा (१७४२–७८) इतिहास, अठराव्या-एकोणिसाव्या शतकांतील हिकायलअब्दुला, तुद्दपूत-अल्-नफिस (लेखक राइचा राजा अली), सलासिलाह मेलायू दन यांतून मलायातील समाजाचे दर्शनही घडते. इंडोनेशियात इस्लामचा प्रसार झाल्यानंतर जे इतिहास लिहिले गेले, त्यांना ‘बबद’ असे म्हणत आणि बबद गिजन्ती, विशेषतः बबद तनह जवी  हे त्या स्वरूपाचे प्रसिद्ध लेखन. सेलेबीझसारख्या बेटातही वृत्तांतलेखनाची प्रथा होती व ते लिहिणाऱ्यांना ‘पलोंतरा’ ही संज्ञा होती. हे वृत्तांत सतराव्या शतकापासून आढळतात. त्यांत दैनंदिनीबरोबरच राजकीय पत्रव्यवहारही असे. तहनाम्यांते वेगळे पुस्तक असे. त्याला ‘उलूकानया’ म्हणत. व्हिएटनाम सु. हजार वर्षे चिनी अंमलाखाली होता. त्याचा प्रभाव तेथील इतिहासलेखनावर पडला. या इतिहासांना ‘शान् सू’ असे म्हणत. यांखेरीज शासकीय कागदपत्रे, वंशावळ्या, राजचरित्रे आणि चरित्रकोशही लिहिण्याची व जतन करण्याची प्रथा होती. हू येथे मोठे अभिलेखागार होते. ले तकसारख्यांनी व्हिएटनामचा खाजगी इतिहास लिहिला व ती पद्धत आजतागायत चालू आहे. श्रीलंकेच्या प्रांतांचे व जिल्ह्यांचे इतिहास चौदाव्या शतकापासून लिहावयास सुरूवात झाली. त्यांना ‘राजावलीय’ म्हणत आणि संपूर्ण श्रीलंकेच्या वृत्तांताला ‘महाराजावलीय’ ही संज्ञा होती. सोळाव्या शतकाच्या अखेरीस फिलिपीन्स स्पेनच्या ताब्यात गेल्यावर रोमन कॅथलिक धर्मोपदेशकांनी आपल्या विशिष्ट दृष्टीने त्याचा इतिहास लिहावयाला सुरुवात केली. सामान्यतः आग्‍नेय आशियातील एतद्देशीय इतिहासातील वंशावळ्या उपयुक्त असल्या, तरी बिनभरवशाची कालगणना, कथानिवेदनात्मक शैली आणि दंतकथांचा भरपूर उपयोग त्यांत आढळतो. त्याचप्रमाणे नीतीची शिकवण, राजाची स्तुती आणि दैववाद हेही विशेष त्यांत दिसतात. या लेखनावर भारतीय, इस्लामी आणि चिनी या तिन्ही परंपरांचा प्रभाव आढळून येतो. सयाम, ब्रह्मदेश, व्हिएटनाम येथे हे लेखन मुख्यतः राज्यकर्त्यांसाठी करण्यात आले. इंग्रजांनी ब्रह्मदेशाच्या, डचांनी इंडोनेशियाच्या, फ्रेंचांनी व्हिएटनामच्या व स्पॅनिश आणि अमेरिकन लेखकांनी फिलिपीन्सच्या इतिहासाच्या अंगोपांगांवर संशोधन व लेखन केले. या यूरोपीय लेखकांत पोर्तुगीजांचाही अंतर्भाव होतो. पाश्चिमात्यांनी, विशेषतः डचांनी, स्वतःच्या सोयीसाठीही बरेचसे इतिहासलेखन केलेपण त्याचा एकूण परिणाम या भागातील राष्ट्रांची अस्मिता जागृत होण्यात झाला. ‘बटाव्हियन सोसायटी फॉर द स्टडी ऑफ आर्ट्स अँड सायन्सेस’ (१७७८), ला एकोल फ्रांका द एक्स्रीम ओरिआ (१९०१) यांसारख्या संस्थांनी आग्‍नेय आशियाच्या इतिहासक्षेत्रात स्पृहणीय कामगिरी बजाविली आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर स्वतंत्र झालेल्या या देशांत इतर अनेक प्रश्नांमुळे इतिहासलेखन मात्र फारसे झालेले नाही.

जागतिक इतिहासलेखनाचे सिंहावलोकन केल्यावर असे आढळते, की वंशावळी, दंतकथा, पुराणकथा, आख्यायिका, वीरगाथा, राजेसरदारांची चरित्रे, महत्त्वाच्या घटना नोंदलेल्या शकावल्या, शासनासाठी लिहिलेले वृत्तांत अशा विविध स्वरूपांत इतिहालेखनाला आरंभ झाला. हळूहळू साधनांचा चिकित्सक अभ्यास करून काय घडले हे ठरवायचे, मग का, केव्हा व कसे घडले याची तर्काने पण साधार मीमांसा करावयाची, अशा अवस्थेतून त्याची उत्क्रांती झाली. राजेराण्या, वीरपुरुष, युद्धे यांच्याऐवजी विशिष्ट कालखंड, प्रदेश, समाज, कल्पना हे इतिहासाचे विषय बनू लागले. साधनसंभार वाढला, तशी इतिहासलेखनाची व्याप्तीही वाढली. चिकित्सक दृष्टिकोनामुळे पूर्वीचे अनेक तथाकथित इतिहास आधुनिक काळात केवळ साधनांत जमा झाले. प्राचीन ग्रीकांनी इतिहासलेखनाला शास्त्रीय बैठक दिली, तर ख्रिस्ती आणि इस्लामी परंपरांत इतिहासलेखनाला गौण स्थान मिळाले. चीन-जपानमध्ये शासनोपयोगी इतिहासलेखन झाले. यूरोपीय प्रबोधन कालोत्तर इतिहासलेखनाला तात्त्विक पार्श्वभूमी मिळाली व मानव्यविद्यांचा त्यावर परिणाम झाला. प्रत्येक काळच्या इतिहासलेखनावर तत्कालीन कल्पनाविचारांचा प्रभाव आढळतो. साहजिकच समाजाचा विकास आणि सामाजिक शास्त्रांतील प्रगती यांनुसार इतिहासलेखनाचे हेतू आणि आदर्श बदलत गेले.

भारतीय इतिहासलेखन : अकराव्या शतकात भारतात येऊन गेलेल्या ⇨ अल्-बीरूनी  या चौकस विद्वान अरबी प्रवाशाने भारतीयांना इतिहासलेखनाची आस्था नव्हती, असे लिहिले आहे. आधुनिक अर्थाने शास्त्रोक्त इतिहासलेखन प्राचीन भारतात आढळत नाही. आद्य इतिहास हा रामायण, महाभारत, पुराणे यांत आढळतो. सामवेदातील वंशब्राह्मण, त्याचप्रमाणे बृहदारण्यक उपनिषदातील वंश, ऋग्वेदाच्या सांख्यायन आरण्यक  भागातील वंश, श्रौतसूत्रातील गोत्रप्रवरांच्या याद्या, ऋग्वेदात उल्लेखिलेल्या गाथा आणि नाराशसी  इत्यादींत भारतीय इतिहासलेखनाचा उगम शोधला जातो. छांदोग्योपनिषदा  इतिहास आणि पुराण या वेगळ्या ज्ञानशाखा गणल्या आहेत. तसेच इतिहास-पुराणाला त्याच उपनिषदात ‘पाचवा वेद’ असेही संबोधिले आहे. गृहासूत्रात  त्यांचे श्रवण केव्हा करावे ते सांगितले आहे. ऋग्वेदातील  दाशराज्ञ-युद्धाचे वर्णनही लक्षणीय आहे. पाली भाषेतील धार्मिक वाङ्‌मयात गौतम बुद्धाच्या आयुष्यातील महत्त्वाचे प्रसंग आढळतात. एफ्. इ. पार्गीटर, अ. द.‌ पुसाळकर आदी आधुनिक विद्वानांनीं अग्‍नि, वायु  यांसारख्या पुराणांच्या आधारे भारताच्या अतिप्राचीन इतिहासाची रूपरेखा आखली आहे. रामायण, महाभारत आदी आर्ष महाकाव्यांचाही अशा प्रकारे उपयोग करून घेता येतो. विशेषतः महाभारत म्हणजे मूलतः कुरुपांचाल प्रदेशाचा प्राचीन इतिहास आहे. परंतु यातील कोणत्याही लेखनाला शुद्ध इतिहासलेखन म्हणता येणार नाही. ही सर्व प्राचीन भारताच्या इतिहासाची साधनेच होत.

मध्ययुग : इतिहास या संज्ञेच्या जवळपास पोहोचणारा प्राचीन भारतातील ग्रंथ म्हणजे बाणभट्टाचे हर्षचरि (सातवे शतक). त्यातून हर्षवर्धनाच्या कारकीर्दीची माहिती मिळते. परंतु आधिदैविक दृष्टिकोन, भूगोल आणि कालक्रम यांकडे संपूर्ण दुर्लक्ष, आख्यायिकांवरील विश्वास अशा महत्त्वाच्या दोषांमुळे या काव्यग्रंथाचे ऐतिहासिक मूल्य कमी झाले आहे. आपल्या आश्रयदात्या राजांची स्तुतिस्तोत्रे ऐतिहासिक काव्यांच्या रूपाने गाण्याची परंपरा इस्लामी आक्रमणानंतरही चालू राहिली.


बिल्हणाचे विक्रमांकदेवचरित, हेमचंद्राचे कुमारपालचरित, संध्याकरनंदीचे रामचरित, मेरुतुंगाचा प्रबंधचिंतामणि  ही वरील परंपरेची ठळक उदाहरणे आहेत. विशेषतः गुजरातच्या चालुक्य राजांसंबंधी (९४०–१३०५) अशा प्रकारचे अनेक काव्यग्रंथ उपलब्ध आहेत. अलंकारांचा सोस, आश्रयदात्यांची स्तुती, काल्पनिक घटना, चंद्रसूर्यापर्यंत वंशावळ भिडविण्याचा संकेत इ. प्रकारांमुळे हे सर्व ग्रंथ इतिहास नसून प्रायः काव्ये आहेत. राजपूत आणि तत्सम राजांच्या पदरी असलेल्या भाटचारणांनी गायिलेल्या रासोतूनही ऐतिहासिक व सामाजिक परंपरागत कथा सापडतात. उदा., चंद बरदाईचे पृथ्वीराज रासो, परमानंदाचा नातू गोविंद याचा अनुपुराणाचा अनुबंध  व शाहू-राजकीर्तिप्रभामंजरी  या ऐतिहासिक काव्यग्रंथांचे स्वरूपही वरीलप्रमाणेच आहे.

हे ऐतिहासिक काव्यग्रंथ वजा केले, तर ज्याला आधुनिक अर्थानेही इतिहास म्हणता येईल, असा एकच ग्रंथ म्हणजे कल्हणाचा राजतरंगिणी (बारावे शतक). त्यात काश्मीरच्या राजवंशाचा इतिहास सांगितला आहे आणि साधनांकडे पाहण्याच्या चिकित्सक वृत्तीमुळे त्याचा दर्जा वरचा झाला आहे. कल्हणाने सुव्रत, शंकुक, क्षेमेन्द्र आदी पूर्वीच्या अकरा वृत्तांतलेखकांचा उल्लेख केला आहे पण त्यांचे ग्रंथ उपलब्ध नसल्याने इतिहासलेखनाच्या या प्राचीन काश्मीरी परंपरेबद्दल फक्त अंदाज बांधता येतील.

मुसलमानी अंमल आणि तवारिखा : इस्लामी आक्रमणापासून मुख्यतः फार्सी व अरबी या भाषांतील तवारिखांची परंपरा सुरू झाली. तिचा उगम पश्चिम आशियातील तत्सम लेखनात आहे. अन्साब  (मुबारकशाह), तबकात-इ-नासिरी  (मिहाज जुइइ-झानी), तारीख-इ-मुहम्मदी (मुहम्मद बिहामद खानी), तारीख-इ-मुबारक शाही (यह्य इब्‍न अहमद सरहिंदी), तारीख-इ-फीरूझ शाही (शम्स अल्-दीन सिराज अफीफ) यांसारख्या तवारिखांतून घोरी व गुलाम वंशांपासून ते सय्यद-लोदी घराण्यापर्यंतचा दिल्लीच्या सुलतानांचा इतिहास आलेला आहे. विशेषतः बरनीच्या तवारिखेत तत्कालीन शासन, अर्थव्यवस्था, प्रसिद्ध व्यक्ती यांचीही उपयुक्त माहिती मिळते. पण या सर्व तवारिखांचा प्रमुख दोष म्हणजे चिकित्सेचा संपूर्ण अभाव परंपरेने चालत आलेल्या कथा सजवायच्या, त्यांत विवरणापेक्षा वर्णनावर भर, क्वचित कारणमीमांसा असलीच, तर ती अल्लाची मेहेरनजर किंवा बदकिस्मत अशा स्वरूपाची, सुरुवात जगाच्या उत्पत्तीपासून केलेली आणि ठिकठिकाणी इस्लामी नीतितत्त्वांचे प्रतिपादन. किंबहुना कित्येक तवारिखांचा इतिहास सांगणे हा गौण हेतू दिसतो. हसन निजामीचे ताजुल मआसिर (घोरी वंश), इसामीचे फुतूहुस्सलातीन (बहमनी राज्य) ही तर काव्येच आहेत. सूफी पंथीयांचे लेखनही ऐतिहासिक दृष्टीने साधनभूतच आहे.

सुलतानांनंतर मोगल बादशाहांनी आपापल्या राजवटीचे इतिहास-रूप वृत्तांत लिहवून घेण्याची प्रथा पाडली. हे वृत्तांत अगदी विश्वासार्ह नसले, तरी तपशीलवार आहेत. ⇨ अबुल फज्लचा अकबरनामा हे या प्रकारचे सर्वोत्कृष्ट उदाहरण आहे. अशा प्रकारच्या अधिकृत हुकमी इतिहासात मआसिर-इ-जहांगीरी, इक्बाल-नामा-इ-जहांगीरी (मुअदमिदखान), अब्दुल हमीद लाहोरीचा बादशाहनामा, मुहम्मद कासीमचा आलमगीरनामा (औरंगजेबाचा इतिहास) यांचा समावेश होतो. अनधिकृत इतिहासात निजामुद्दीनचा तबकात-इ-अकबरी, अब्दुल कादिर बदाऊनीची मुन्तखबुत्तवारीख, औरंगजेबाचा सेवक मुस्तइद्दखान याचा मआसिर-इ-आलमगीरी  यांची गणना होईल. औरंगजेबाने इतिहासलेखनाला बंदी केली होती, अशी कल्पना आहे. त्याच्या कारकीर्दीवरील ⇨ खाफीखानाचा मुन्तखब-अल्लुबाब हा ग्रंथ औरंगजेबानंतर बऱ्याच काळाने लिहिला गेला. मुस्तइद्दखानाचा मआसिर-इ-आलमगीरी  हा त्यामानाने अगोदरचा आहे. बदाऊनी हा अकबराचा तिखट टीकाकार, तर निजामुद्दीन हा त्या मानाने बराच समतोल. बाबर, जहांगीर, हुमायूनची बहीण गुलबदन बेगम यांनी लिहिलेल्या प्रांजल आठवणी ऐतिहासिक व वाङ्‌मयीन दृष्टीने श्रेष्ठ आहेत पण ते इतिहास नव्हेत. मोगल काळात पुष्कळच इतिहासलेखन झाले. त्यांच्या सूची मार्शल स्टोरी, श्रीराम शर्मा इत्यादींनी प्रसिद्ध केल्या आहेत. ते प्रायः वर्णानात्मक चरित्रकथन आहे. पण त्याचे स्वरूप राजकीय असल्याने समाजदर्शन अनुषंगानेच घडते. क्वचित नीतिपर तात्पर्यही आढळते आणि शैली मात्र आलंकारिक आहे.

हे लेखन उत्तर भारतापुरते मर्यादित नाही. जेथे जेथे इस्लामी आक्रमण झाले व मुसलमानी राज्ये स्थापिली गेली, तेथे तेथे तवारिखा लिहिल्या गेल्या. अझीझुल्ला तबातबाई (बहमनी व निजामशाही राज्ये), रफीउद्दीन शीराझी (आदिलशाही), शेख झैनुद्दीन (मलबारातील मुसलमान व पोर्तुगीज), बुर्हान इब्‍न हसन (अर्काटचे नबाब), गुलाम हुसैन सलीम (बंगाल), मिर्झा नथान (मोगलकालीन आसाम), सिकंदर मंझ (गुजरात), हुसैन अली किर्मानी (हैदर व टिपू) यांसारख्या तवारिखकारांत पूर्वोल्लिखित दोष आढळतात. पण इस्लामी अंमलाखाली असलेल्या भारताच्या इतिहासासाठी त्यांचा अभ्यास अपरिहार्य आहे. दोन विशेष महत्त्वाच्या तवारिखा तारीख-इ-फिरिश्ता सियरूल-मुताखरीन  या होत. पहिलीत सोळाव्या शतकाच्या अखेरचा व सतराव्याच्या अगदी आरंभाचा सर्वच भारतीय इस्लामी राजवंशांचा इतिहास अंतर्भूत आहे तर दुसरीत अठराव्या शतकातील उत्तर भारताच्या मराठी-इंग्रजी-इस्लामी सत्तासंघर्षाचा इतिहास आला आहे. एलियट आणि डाउसन यांनी बऱ्याच तवारिखांचे संपादन करून त्यांचे इंग्रजी अनुवाद प्रथमच प्रसिद्ध केले (१८६७–१८७८ = ८ खंड).  त्याला जोडलेल्या प्रस्तावनेत ब्रिटिश राज्यकर्ते मुस्लिम राज्यकर्त्यांपेक्षा किती श्रेष्ठ आहेत, हे प्रतिपादिले आहे आणि मुसलमान इतिहासकारांच्या लेखनपद्धतीवर शेरे मारले आहेत. शापूरजी होडीवाल्याने दोन खंडांतील अनुवादाच्या तपशीलांतील पुष्कळ दोष दाखवून दिले आहेत. अमरूर अब्बास विझवी यांनी एलियट-डाउसनच्या धर्तीवर हिंदीमध्ये हेच काम अकबरापर्यंत करीत आणले आहे.

उर्दू इतिहासलेखन : फार्सीतील तवारिखांचा उर्दूतील इतिहास-लेखनावर प्रभाव पडणे साहजिकच होते, उदा., मीर शेरअली अफसोस याचा भारताचा इतिहास (१८०५), सियरूल मुताखेरीनचा बख्शिस अली फैझबादींनी केलेला संक्षेप (१८४०), सिकंदर बेगमेचा भोपाळचा इतिहास. अलीगढ विद्यापीठाचे संस्थापक सर सय्यद अहमद यांनी १८५७ च्या उठावाबद्दल यूरोपीय चिकित्सापद्धती वापरून लिहिले. त्यांच्यापासून प्रेरणा घेतलेले देवबंद व आझमगढ येथून होणारे इतिहासलेखन सकल-इस्लामच्या दृष्टिकोनातून होते. शिब्‍ली नोमानी यांनी औरंगजेबाचे समर्थन केले आहे, तर झकाउल्लाच्या भारताच्या इतिहासात (१० खंड) सर्वच इस्लामी राज्यकर्त्यांचा गुणगौरव आहे. पाश्चात्त्य विद्याविभूषित एस्. एम्. इक्रम यासारख्यांच्या भारतातील इस्लामी संस्कृतीच्या इतिहासावरही अलीगढ पंथाची छाप आहे. सिंधवरील इस्लामी राज्य व वाजिद अली शाह यांसंबंधी लिहिणारे अब्दुल हलीम शरीर यांची वृत्ती कादंबरीकाराची आहे. हिंदु-मुस्लिम ऐक्य प्रतिपादन करणाऱ्या राष्ट्रीय मुसलमान लेखकांत सुलेमान नदवी (भारत आणि अरब), मुहम्मद बंगलोरी (हैदर-टिपू), आबिद हुसेन (भारताचा स्वातंत्र्यसंग्राम) यांचा अतंर्भाव होतो. ब्रिटिश अंमलावर अब्दुल्ला युसुफ अली यांनी चिकित्सापूर्वक व गुलाम बारींनी मार्क्सवादी भूमिकेतून टीका केली आहे. आझमगढहून निघणाऱ्या मआरिफ नियतकालिकात इतिहासापेक्षा इस्लामी संस्कृतीवरच सर्व भर दिसतो. त्या संस्कृतीचे तवारिखी पद्धतीचे स्तोत्र हेच उर्दू इतिहासकारांचे प्रमुख उद्दिष्ट आहे. उस्मानिया विद्यापीठाने कित्येक फार्सी व इंग्रजी इतिहासग्रंथांचे उर्दू अनुवाद प्रकाशित केले आहेत. पण दक्षिणेतील मुसलमानी राज्यांत तयार झालेल्या दखनी उर्दू (दखनी हिंदी) ऐतिहासिक काव्यांकडे इतिहासाभ्यासूंचे अजून आवश्यक तितके लक्ष गेलेले दिसत नाही. अब्दुल हक, ग. ह. खरे व देवीसिंग चौहान यांनी अलीनामा तारीख-इ-इस्कंदरी  यांवर काम केले आहे. ते अपवादात्मकच समजले पाहिजे.


मराठी अंमल आणि बखरी : मुसलमानांच्या अनुकरणाने मराठ्यांनी एखाद्या ऐतिहासिक व्यक्तीची वा घटनेची हकिकत लिहून ठेवायला सुरुवात केलीत्याला बखर असे म्हणतात. बखर हा तवारिखेचाच मराठी अवतार आहे. उपलब्ध झालेल्या महिकावतीची बखर, शालिवाहनाची बखर यांसारख्या जुन्या बखरींतून हा प्रघात पंधराव्या शतकात सुरू झालेला दिसतो. कृष्णाजी अनंत सभासद या राजारामाबरोबर जिंजीला गेलेल्या अधिकाऱ्याने लिहिलेली बखर बरीचशी समकालीन म्हणून महत्त्वाची आहे पण शिवदिग्विजय, ९१-कलमी  वगैरे शिवचरित्रविषयक बखर-वाङ्‌मय उत्तरकालीनच आहे. मल्हार रामराव चिटणीस हे बखरकार म्हणून उल्लेखनीय आहेत. मराठी राज्याच्या विस्ताराबरोबर पेशवाईत बखरींना बहर आला आणि शाहूमहाराज, ब्रह्मेंद्रस्वामी, पुरुषोत्तम दाजी पटवर्धन, पानिपतची मोहीम, खर्ड्याची लढाई इ. अनेक व्यक्तींवर व प्रसंगांवर बखरी लिहिल्या गेल्या. तंजावरची भोसले वंशाची बखर शिलालिखित आहे. बहुतेक बखरींच्या मूळ प्रती उपलब्ध नाहीत. स्थलकालविपर्यास, नावांचे घोटाळे यांसारखे दोष त्यांत आढळतात. संपादकीय संस्कारांत ह्यांची दुरुस्तीही झाली. पण एकूण सर्व बखरींतील माहितीच्या विश्वसनीयतेबाबत राजवाडे म्हणतात, ‘‘एक अस्सल चिठोरे साऱ्या बखरींच्या बहुमतास हाणून पाडण्यास पुरेसे आहे.’’ याचे कारण बखरकारांचे शिक्षण बेताचे, आधार स्मरणशक्ती आणि पारंपरिक दंतकथांचा दृष्टिकोन आधिदैविक, आख्यायिका आणि प्रत्यक्ष अवलोकन यांची सरमिसळ, कालगणना अनिश्चित. कोणाच्या तरी आज्ञेवरून लिहिल्यामुळे त्या एकांगी होणेही साहजिक आहे. पेशवेकालीन बखरींत पौराणिक कथा व अद्‌भुत वर्णने कमी, पण थाट हरदासीच. तरीही या इतिहासलेखनात तत्कालीन समाजाचे प्रामाणिक प्रतिबिंब असल्यामुळे तवारिखांप्रमाणेच त्यांनाही काही ऐतिहासिक मूल्य आहे. मध्ययुगीन ख्रिस्ती इतिवृत्तांचा दर्जा याहून फारसा उच्च नाही. काही बखरी वाङ्‌मयगुणांनी समृद्ध असल्याने भाषेच्या अभ्यासूंना त्या मोलाच्या वाटतात. पानिपतच्या मोहिमेवरील भाऊसाहेबांची बखर  त्यामुळेच फार लोकप्रिय झाली आहे. 

मराठी सत्तेच्या विस्ताराबरोबर मोठ्या सरदारांनी ठेवलेल्या रोजकीर्दी, राजकीय व खाजगी पत्रव्यवहार, शकावल्या (उदा., जेधे शकावली), कैफियती (उदा., होळकरांची कैफियत), वाके (पटवर्धनी वाका), अफझलखानाचा वध, सिंहगडची स्वारी, सवाई माधवरावाचा मृत्यू अशा प्रसंगांवर शाहीरांनी रचलेले पोवाडेनाना फडणीस, गंगाधरशास्त्री पटवर्धन, बापू कान्हो यांसारख्यांनी लिहिलेली आत्मवृत्ते अव्वल इंग्रजीत वतने चालू राहावीत म्हणून सरदरांनी दिलेल्या कैफियती इ. बरेच ऐतिहासिक वाङ्‌मय मराठी अंमलात निर्माण झाले. पण हे सर्व साधनभूत आहे, विचारपूर्वक लिहिलेला इतिहास नव्हे.

आहोम राज्यकर्ते आणि बुरंजी : ब्रह्मदेशातील शान व आराकान प्रदेशांतील लोकांत वृत्तांतलेखनाची एक विशिष्ट परंपरा होती. याच प्रदेशातील  आहोम जातीच्या लोकांनी तेराव्या शतकात आसाम जिंकून घेतल्यावर ती प्रथा आपल्याबरोबर आणली. आहोम राजांनी आपापल्या कारकीर्दीचे जे इतिहास लिहून घेतले, त्यांना ‘बुरंजी’ म्हणतात. बुरंजी सुरुवातीस आहोम बोलीत लिहिल्या गेल्या. पण आहोम राजांनी हिंदुधर्म स्वीकारल्यावर त्या असमिया भाषेत लिहिल्या जाऊ लागल्या. असमियातील पहिली बुरंजी सु. १५३९ च्या सुमाराची आहे. विशिष्ट प्रकारच्या झाडांच्या सालीवर त्यांचे लेखन होई. लेखक आहोम सरकारचे अधिकारी असत. विधाने शासकीय कागद पत्रांवर आधारलेली, कालगणना बिनचूक, शैली सुबोध ही त्यांची प्रमुख लक्षणे होत. हे इतिहास शासकीय असले, तरी आहोमांच्या सु. ६०० वर्षांच्या राजकीय इतिहासाबरोबरच त्यात विश्वसनीय अशी सामाजिक व आर्थिक माहिती मिळते. सरकारी  अभिलेखागारात बुरंजींचे काळजीपूर्वक जतन होई. प्रत्येक राजा त्या अद्यावत रहाव्यात असा प्रयत्‍न करी. सु. दोनशे वर्षांपूर्वी आहोमांच्या एका मुख्य मंत्र्याने त्यांतल्या बऱ्याचशा संशयावरून जाळल्या. त्रिपुरासारखे प्रदेश, इतकेच नव्हे, तर दिल्लीच्या बादशाहीचाही इतिहास काही बुरंज्यांतून आढळतो. गोपालचंद्र बरुआ यांनी संपादिलेली आहोम बुरंजी, दुतीराम हजारिका व विश्वेश्वर वैद्याधिप यांनी संपादिलेली असमार पद्य-बुरंजी, श्रीनाथ दुआरा बडबरुआ यांची तुंगखुंजिया बुरंजी, ही या प्रकारच्या बुरंजींची काही ठळक उदाहरणे आहेत. असमिया गद्याची तर ही भूषणेच आहेत. सुसंगत प्रमाणभूत इतिहास या दृष्टीने भारतीय इतिहासलेखनात बुरंजींचे स्थान अनन्यसाधारण आहे. आधुनिक काळात प्रामुख्याने सूर्यकुमार भूयन या आसामच्या श्रेष्ठ व जेष्ठ इतिहासकाराने अनेक बुरंजींचे संपादन केले.

इंग्रजी अंमल व इंग्रज इतिहासकार : ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा भारतात प्रवेश झाल्यावर रॉबर्ट ऑर्म या कंपनीच्या अधिकृत इतिहासकाराने लिहिलेल्या त्रिखंडात्मकहिस्टरी ऑफ द मिलिटरी ट्रँझॅक्शन्स ऑफ द ब्रिटिश नेशन इन इंदोस्तान  या पुस्तकापासून भारताच्या इंग्रजी इतिहासलेखनास प्रारंभ झाला. भारताच्या ब्रिटिशपूर्व इतिहासाच्या सर्वांगीण संशोधनाला चालना कलकत्त्यास सर विल्यम जोन्स यांच्या अध्यक्षतेखाली १७८४ मध्ये स्थापन झालेल्या ‘एशियाटिक सोसायटी’ या संस्थेमुळे मिळाली. संस्थेच्या एशियाटिक रिसर्चेस  या नियतकालिकात भारतीय इतिहासलेखनाची बरीच सामग्री उपलब्ध होऊ लागली. पण भारताचा पहिला सर्वांगीण इतिहास जेम्स मिल (६ खंड–१८१८) याचा. त्याने इंग्‍लंडमधील सरकारी कागदपत्रांचा वापर केला. त्याने भारतात पाऊलही ठेवले नव्हते, तरी उपयुक्ततावादी दृष्टीकोनातून भारतीयांच्या संस्कृतीवर प्रखर टीका केली. कंपनीच्या सनदी नोकरांसाठी हा इतिहास क्रमिक पुस्तक म्हणून नेमला गेला. त्याच्या अनेक आवृत्त्या निघाल्या. हॉरिस हेमन विल्सन हा संस्कृतचा अभिमानीत्याने मिलच्या इतिहासात आणखी चार खंडांची भर टाकली व आपल्या टिप्पणांतून जागोजाग मतभेद व्यक्त केला (१८४४). एकोणिसाव्या शतकातील बहुसंख्य इंग्रज इतिहासकारांवर मिलचा विलक्षण प्रभाव होता. जॉन मॅल्कम, पीटर ओबर, एडवर्ड थॉर्नटन, जॉन कॅपर यांच्या साम्राज्यवादी पवित्र्यांचा उगम मिलमध्ये आहे. १८५७ च्या उठावावर अनेक इतिहासग्रंथ लिहिले गेले. त्यांतील कित्येक आठवणींच्या स्वरूपाचे, निव्वळ व्यक्तिपूजक म्हणून वगळलेतरी उरलेल्यांत एतद्देशीय शिपायांच्या अत्याचारांच्या वर्णनांचे व तदानुषंगिक भारतीयांवरील टीकेचे भरपूर खाद्य आहे. विशेषतः १८५७ नंतर साम्राज्यवाद्यांचे पीकच आले. मेकॉलेने आपल्या निबंधातून क्लाइव्हला गौरविले होते पण वॉरन हेस्टिंग्जवर टीका केली होती. ब्रिटिश साम्राज्य आणि त्याचा मोठेपणा हा केंद्रबिंदू धरून लिहिण्याच्या इंग्रज प्रवृत्तीवर ठळक प्रकाश पडतो, तो रूलर्स ऑफ इंडिया   या मालेमुळे. विल्यम हंटर हा अभ्यासू सनदी नोकरपण त्याने संपादिलेल्या या २८ चरित्रांच्या मालेत २२ चरित्रे इंग्रजांची आहेत. जॉन केसारख्या विपुल इतिहासलेखन करणार्‍याने अफगाणयुद्धसुद्धा एकतर्फी रंगविले. इंग्रजांच्या मोठेपणाच्या गुणगानात बरेच इतिहासग्रंथ लिहिणाऱ्या मॅलेसनने फ्रेंचांच्या गौरवाची भर टाकली. बेव्हरिज, सर जॉन सीली यांसारखे इतिहासकार तर उघडच वसाहतवादी होते. पण जॉर्ज फॉरेस्ट, सॅम्युअल हिल यांनी अस्सल कागदपत्रेही याच कामी उपयोगात आणली. जॉन मार्शमन, जॉर्ज पोप यांसारख्या मिशनरी आणि विल्यम मोरलंडसारख्या आर्थिक इतिहासकारांचा हेतूही ब्रिटिश राज्यामुळे भारताची भौतिक आणि नैतिक उन्नती झाली, हे दाखविण्याचा होता. ॲल्फ्रेड लायलसारख्याने त्यात सखोलपणा आणला पण व्हिलरसारख्या सामान्य इतिहासकाराला त्याची आवश्यकता भासली नाही. सामान्यतः ब्रिटिश सनदी नोकरांचे इतिहासलेखन महसुलासारखे शासकीय प्रश्न सोडवण्याच्या अनुरोधाने झाले. व्हिन्सेंट स्मिथने मात्र प्राचीन व मध्ययुगीन भारताचा सखोल अभ्यास केलापण त्याच्या इतिहासलेखनात भारतीय जनतेत घडून येत असलेल्या परिवर्तनाची चाहूलही लागत नाही. व्हर्नी लव्हेटने राष्ट्रीय चळवळीचा इतिहास लिहिला (१९१८) त्यातही राष्ट्रवाद ही पाश्चात्त्य कल्पना भारतीय बहुजनसमाजाला अज्ञात आहे, हा सिद्धांत मांडला. स्मिथच्या प्राचीन भारताच्या इतिहासाचा नायक अलेक्झांडर आहे. मिलचा आणि त्या परंपरेतील लेखकांचा विसाव्या शतकातील अवतार म्हणजे केंब्रिज हिस्टरी ऑफ इंडिया (६ खंड, १९२१–२८). त्यांत प्राचीन व ब्रिटिश अंमलातील लोकजीवनाकडे सामान्यतः दुलर्क्ष केले आहे.


साऱ्याच इंग्रज लेखकांचा पवित्रा पहिल्यापासून साम्राज्यवादी नव्हता. ⇨ माउंट स्ट्यूअर्ट एल्फिन्स्टनचा इतिहास, त्यातील तपशीलांचे दोष मान्य केले, तरी जास्त सहानुभूतीने लिहिला आहे (२ खंड, १८४१). ग्रँट डफ (मराठे), विल्क्स (म्हैसूर), रॉबर्ट सीवेल  (विजयानगर), ब्रिग्झ (हैदराबाद) अशा अनेकांनी साधने जमवून कुतूहलबुद्धीने लिहिलेले त्या त्या प्रदेशांचे व जनसमूहांचे इतिहास आजही पायाभूत मानले जातात. शिखांचा इतिहास लिहिणार्‍या कनिंगहॅमला सत्यलेखनासाठी नोकरी गमवावी लागली. हॅवलने भारतीय कलांचा अभ्यास केलाच, पण आर्य संस्कृतीचा अभिमान बाळगला (हिस्ट्री ऑफ आर्यन रूल इन इंडिया टिल द डेथ ऑफ अकबर). स्टॅन्ली लेनपूल हा मूळ फार्सीचा प्राध्यापक. त्याने मोगल राजवटीवर ललित शैलीत लिहून लोकप्रियता मिळविली. विल्यम फॉस्टर याने इंग्रज वखारींचे कागदपत्र अभ्यासपूर्ण दृष्टीने संपादून प्रकाशित केले.

पहिल्या महायुद्धानंतर इंग्रज इतिहासकारांच्या यूरोपीय श्रेष्ठत्वाच्या कल्पनांना धक्का बसला आणि भारतविषयक लेखन अधिक समंजसपणे करण्याची जरूरी वाटू लागली. एडवर्ड टॉमसन आणि जॉर्ज गॅरेट यांनी मिळून लिहिलेल्या इतिहासाचे शीर्षक राइज अँड फुलफिलमेंट ऑफ ब्रिटिश रूल इन इंडिया  असे असले, तरी त्यात भारतीय इतिहासविषयक नवी जाणीव आहे. हेन्‍री डॉडवेल, पी. ई. रॉबर्ट्स या इतिहासकारांचा पहिला पवित्रा साम्राज्यवादी होता, पण नंतरच्या लेखनात तो बदललेला स्पष्ट दिसतो. ब्रिटिश सत्तेच्या ऐन भरात विल्यम डिग्बी याने ब्रिटन भारताचे शोषण करीत आहे, असे प्रतिपादले होते (प्रॉस्परस ब्रिटिश इंडिया, १९०२). नंतर एडवर्ड टॉमसनने अदर साइड ऑफ द मेडल (१९२५) लिहून इंग्रजांची १८५७ मधील कृष्णकृत्ये रंगविली. चार्ल्स अँड्रूझ व जे. एफ्. फार्क्वर यांनी भारतातील धार्मिक आणि सामाजिक चळवळींचे इतिहास लिहिले. व्हॅलेन्टाइन चिरोल यांना भारतातील असंतोषाच्या विश्लेषणाची निकड भासली. ब्रिटिश अंमलातील भारताचा इतिहास केवळ शासकीय वा राजकीय असू शकत नाही. पाश्चात्त्य संस्कृतीने त्यात घडत असलेल्या स्थित्यंतराची दखल हवी, हे ओमॅलीच्या मॉडर्न इंडिया अँड द वेस्ट (१९३५) या संपादित ग्रंथात दिसते. याच तात्त्विक भूमिकेवरून टी. जी. पी. स्पिअर यांनी ऑक्सफर्ड इतिहासाचे नव्याने संपादन करून त्याचे अंतरंग बदलले आणि हिंदुस्थानचा एक वेगळा इतिहासही १९५८ मध्ये लिहिला.

भारतीयांचे इंग्रजीतील इतिहासलेखन : इंग्रजी शिक्षणाच्या प्रसाराबरोबर भारतीयांनी इंग्रजीतून इतिहास लिहावयाला प्रारंभ केला. त्यामागील महत्त्वाची प्रेरणा राष्ट्रवादाची होती. ज्या ब्रिटिश लेखकांची पुस्तके त्यांना अभ्यासावी लागत, त्यांतील तपशिलांच्या चुकांपेक्षाही त्यांची साम्राज्यवादी बैठक भारतीयांना डाचू लागली. त्यातूनच भारतीयांना इतिहासातील गौरवास्पद भाग शोधण्याची आच लागली. ब्रिटिश अंमलामुळे भारतीयांची प्रगती होत नसून परागती होत आहे, असेही वाटू लागले. सुरुवातीचे लेखन ही ब्रिटिश इतिहासकारांवर सौम्य टीका होती. रमेशचंद्र दत्तांचा प्राचीन भारताचा इतिहास  (३ खंड, १८८९-९०) हा भगवानलाल इंद्रजी, राजेंद्रलाल मित्र, भाऊ दाजी यांसारख्यांच्या संशोधनांवर आधारलेला होतायूरोपीयनांच्या अनेक पूर्वग्रहांचे आणि वृथारोपांचे त्यामुळे निराकरण झाले पण त्यांची समतोल वृत्ती प्राचीन भारताच्या नंतरच्या इतिहासकारांत सहसा आढळत नाही. राधाकुमुद मुखर्जींचा भारतीय नौकानयनाचा इतिहास, शास्त्रीय प्रगतीतही प्राचीन भारत मागे नव्हता, हे सिद्ध करण्यासाठी होता. फंडामेंटल युनिटी ऑफ इंडिया हे त्यांच्या एका ग्रंथाचे शीर्षकच बोलके आहे. काशी प्रसाद जयस्वालांनी प्राचीन भारतात लोकशाही होती, हे प्रतिपादिले (हिंदू पॉलिटी, १९१८). राखालदास बॅनर्जींनी शक-कुशाणांचे विजेते म्हणून गुप्तसम्राटांचा गौरव केला. (एज ऑफ द इंपिरिअल गुप्ताज, १९३३). अनंत सदाशिव अळतेकरांनी प्राचीन शासनसंस्था व ग्रामसंस्था यांचे चित्र रंगविले (स्टेट अँड गव्हर्न्मेंट इन एन्शंट इंडिया, १९५६). फणींद्रनाथ बसू आणि बिजतराज चतर्जी यांनी बृहत्तर भारताचा इतिहास अभिमानाने वर्णिला. कन्हैयालाल मुन्शींच्या इतिहासाचे नावच मुळी ग्‍लौरी दॅट वॉज गुर्जर देश, (४ खंड, १९५५) असे आहे. हाच प्रादेशिक अभिमान रामचंद्र दीक्षितरांच्या लेखनात आढळतो. प्राचीन युद्धकलेच्या इतिहासातही त्यांनी भारतीयांचे सैनिकी श्रेष्ठत्व प्रतिपादिले. के. ए. नीलकंठशास्त्रींच्या चोलांच्या इतिहासात समतोल संशोधकाची भूमिका आहेपण बृहत्तर भारतात तमिळ-आंध्रांनी सांस्कृतिक प्रभुत्व प्रस्थापिले, असा त्यांचा दावा आहे. डाक्का विद्यापीठाच्या बंगालच्या इतिहासात शशांकासारख्या राजाचे समर्थन आहे. प्राचीन भारताचे इतिहास बहुतेक प्रसंगी साधनांबाबत तरल कल्पनाशक्ती वापरून लिहिले होते. ब्रिटिश राज्यकर्त्यांवर टीकाही चालू झाली. रमेशचंद्र दत्तांनी ब्रिटिशांच्या महसूल धोरणाचे दुष्परिणाम सौम्यतेने सांगितले (इकॉनॉमिक हिस्टरी ऑफ इंडिया, २ खंड, १९०१–३). पण मेजर वामनदास बसूंना ब्रिटिश राज्यात त्यांच्या कृष्णकारस्थानांखेरीज काहीच आढळेना (राइज ऑफ ख्रिश्चन पॉवर इन इंडिया, स्टोरी ऑफ सातारा  इ.). सावकरांच्या पहिले स्वातंत्र्ययुद्ध (फर्स्ट वॉर ऑफ इंडिपेंडन्स, १९०९) या शीर्षकावरून त्यांची १८५७ बाबतची भूमिका स्पष्ट होते. स्वातंत्र्याच्या चळवळींचाही इतिहास लेखनावर परिणाम झाला. हिंदु-मुस्लिम ऐक्य ही त्या चळवळींची गरज आहे, असे वाटून ताराचंदांनी इस्लामचा भारतीय संस्कृतीवरचा प्रभाव (इन्‌‌फ्ल्युअन्स ऑफ इस्लाम ऑन इंडियन कल्चर) अजमाविला. मुसलमान इतिहासकारांना हिंदू प्रजा सुखी होती तिचा छळ झालाच असला, तर तो इस्लामला वाचविण्यासाठी मुस्लिम राज्यकर्त्यांच्या धोरणामागे आर्थिक प्रेरणा होत्याधार्मिक नव्हे, हे सिद्ध करण्याची आवश्यकता वाटली. हबीब व नाजिम (गझनीचा महंमद), झहीरुद्दीन फारूकी, (औरंगजेब), कुंवर अहमद अश्रफ (सुलतानकालीन लोकजीवन), इश्तियाक हुसैन कुरैशी (सुलतानांची राज्यव्यवस्था), हरूनखान शेरवानी (बहमनी राज्य), हुमायून कबीर (इंडियन हेरिटेज, १९५५), मुहिब्बुल हसन (टिपू) इ. लेखक थोड्याफार फरकाने या पंथातील होत. हिंदूंना ज्याप्रमाणे प्राचीन भारतातील पूर्व दिव्य शोधावेसे वाटले, त्याचप्रमाणे इस्लामी इतिहासकारांनी मोगल साम्राज्याचे गुणवर्णन केले. त्याला हिंदूंनी काहीशी साथ दिली. मोगलांचे धार्मिक धोरण मात्र श्रीराम शर्माने आर्यसमाजी भूमिकेतून विशद केले. भास्कर आनंद सालतूर व एन्. वेंकटरामय्या यांच्या विजयानगरावरील लेखनांतही प्रादेशिक अभिमान आढळतो, असे काहींचे मत आहे. मेजरू सेठ (आर्मेनियन) व जीवनजी मोदी (पारशी) यांनी आपापल्या जमातीचा इतिहास साभिमानी वृत्तीने लिहिला आहे.


तत्कालीन राजकीय परिस्थितीच्या गरजांचा विचार न करता केवळ सत्यान्वेषण बुद्धीने प्राचीन भारताचा इतिहास लिहिणाऱ्यांत रा. गो. भांडारकर व डॉ. फ्लीट यांचा क्रम वर लागतो. देवदत्त भांडारकर यांनीही तीच अलिप्तवृत्ती बाळगली (अशोक). हेमचंद्र रायचौधरींच्या पॉलिटिकल हिस्टरी ऑफ एन्शंट इंडियामध्ये क्वचित अहिंसाविरोधी सूर आहे, पण एरवी वस्तुनिष्ठ लेखनाचे ते उत्कृष्ट उदाहरण आहे. एच्. सी. रे यांनी डायनॅस्टिक हिस्टरी ऑफ नॉर्दर्न इंडिया, २ खंड, १९३१–३६ यात तीच वाट चोखाळली आहे. बिमलचरण लव हे प्राचीन भारतावरील आणखी एक साक्षेपी, सखोल लेखक होत. औरंगजेबाचा इतिहास  (५ खंड), मोगल साम्राज्याचा अस्त (४ खंड) आदी ग्रंथांचे लेखक जदुनाथ सरकार हे तर चिकित्सक संशोधन व उत्कृष्ट शैली यांबाबत ख्याती पावलेतथापि त्यांच्या ग्रंथांत पूर्वग्रह आहेत. पण त्यांच्या तालमीत तयार झालेल्या अनेकांनी साधनांचा सखोल अभ्यास करून, अभिनिवेशापासून मुक्त असे लेखन केले आहे. उदा., कालिकिंकर दत्त (अलीवर्दीखान, बंगालचा सुभेदार), हरिराम गुप्ता (शिखांचा इतिहास), कालिकारंदन कानूंगो (शेरशहा जाटांचा इतिहास), नरेंद्रकृष्ण सिंह (रणजितसिंगहैदर अली बंगालचा आर्थिक इतिहास – २ खंड). प्राचीन दक्षिण भारत व विजयनगर यांवर एस्. कृष्णस्वामी अयंगार, नीलकंठशास्त्री, डॉ. महालिंगम् व डॉ. सालतूर ह्यांनी लेखन केले. ब्रिटिश काळातील दक्षिण भारतावर सी. एस्. श्रीनिवासचारी यांनी उच्च प्रतीचे विपुल लेखन केले आहे. जातीय व राष्ट्रीय अभिनिवेशापासून मुक्त अशा ब्रिटिश अंमलावरील कागदपत्रांवर आधारित लिखाणात सर शफात अहमदखान (सतराव्या शतकातील इंग्रजांचा भारतात प्रवेश) व एस्. गोपाल (ब्रिटिश धोरण) यांचा समावेश होतो. कागदपत्रांच्या प्रकाशनात बॅनर्जी व गेन्स संपादित बडोद्याच्या गायकवाडांसंबंधीचे कागद व राष्ट्रीय अभिलेखागारातून प्रसिद्ध होत असलेले ‘फोर्ट विल्यम इंडिया हाऊस कॉरस्पाँडन्स’, ‘कॅलेंडर ऑफ पार्शियन कॉरस्पाँडन्स’ यांचा उल्लेख अवश्य आहे. परदेशीयांचे जे इतिहास भारतीयांनी लिहिले, ते साहजिकच दुय्यम ग्रंथांवर आधारलेले आहेत. पण मानवेंद्रनाथ रॉय यांचा रशियन राज्यक्रांतीचा इतिहास व चीनच्या क्रांतीचा पूर्वेतिहास स्वानुभवावर अधिष्ठित आहे. मार्क्सवादी दृष्टिकोनातून श्रीपाद अमृत डांगे यांनी प्राचीन भारतावर केलेल्या लेखनाला इतिहास म्हणणे अवघड आहे परंतु दामोदर धर्मानंद कोसंबी यांनी प्राचीन भारतावर केलेले इतिहासलेखन मार्क्सवादी असले, तरी सखोल व अर्थपूर्ण आहे.

राष्ट्रवादी प्रेरणेतून जन्मलेल्या इतिहासलेखनाने भारताची अस्मिता जागृत झाली व स्वातंत्र्यचळवळीला हातभार लागला. रमेशचंद्र मजुमदारांच्या संपादकत्वाखाली भारतीय विद्याभवन, मुंबई या संस्थेतर्फे प्रकाशित होत असलेले हिस्टरी अँड कल्चर ऑफ द इंडियन पीपल (११ खंड) हा केंब्रिज इतिहासाला वाजवी उत्तर आहे. त्यात आजपर्यंतच्या संशोधनाचे फलितही आहे. के. एम्. पणिक्कर यांनी विपुल लेखन केले आहे. त्यांच्या ­सर्व्हे ऑफ इंडियन हिस्टरी (१९५३) ह्या ग्रंथात हा केवळ राज्यकर्त्यांचाच इतिहास नाही, तर भारतीय जनतेच्या स्थित्यंतराचा इतिहास आहे, असे त्यांनी प्रतिपादिले आहे. इतिहासलेखनाची ही नवी जाणीव मात्र स्वातंत्र्यानंतर होत असलेल्या लेखनांत अजून आढळत नाही. प्राचीन भारतावरील बरेचसे लेखन अजूनही समतोल नाही. १८५७ च्या शताब्दिनिमित्त त्या उठावावर बरेच लेखन झालेत्यात रमेशचंद्र मजुमदारांनी, ‘‘हा उठाव हे शिपायांचे बंडच होते’’ असे प्रतिपादिले तर सुरेंद्रनाथ सेन यांनी समतोल आढावा घेतला. स्वातंत्र्योत्तर इतिहासलेखनातील दोन प्रवृत्तींची ही प्रतीके होत. स्वातंत्र्याच्या चळवळींची विविध अंगे व त्यातील नेत्यांचे इतिहास आज लिहिले जात आहेत. अनेक राज्यांनी ऐतिहासिक साधने प्रसिद्ध केली आहेत.

इंग्रजी व इतर यूरोपीय भाषांतील मराठ्यांचे इतिहास : मराठ्यांचा पहिला इंग्रजी इतिहास ईस्ट इंडिया कंपनीचा पुण्यातला पहिला रेसिडेंट चार्ल्स मॅलेट याने लिहिला होता, अशी माहिती मिळते पण तो उपलब्ध नाही. तत्पूर्वी १७९२ मध्ये प्राध्यापक कूर्ट स्प्रेंगेल याने जर्मनमध्ये मराठ्यांचा इतिहास प्रसिद्ध केला. पुण्याच्या ब्रिटिश वकिलातीतील साहाय्यक एडवर्ड स्कॉट बेअरिंग याने मराठ्यांचा संगतवार इतिहास लिहिला (१८१०). त्याला आधार ऑर्मसारखे लेखक आणि कागदपत्रे यांचा होता. पेशवाई जिंकल्यावर माउंट स्ट्यूअर्ट एल्फिन्स्टनने लिहिलेल्या अहवालातही मराठी सत्तेचा धावता, पण शक्य तितका यथार्थ आढावा आढळतो (१८१८-१९). खरी लोकप्रियता मिळाली साताऱ्याचा रेसिडेंट जेम्स ग्रँट डफ ह्यास. त्याने १८२६ मध्ये लिहिलेल्या इतिहासाला (२ खंड) आधार म्हणून काहीसे पेशवे दप्तर. छत्रपतींची तशीच इतरही काही कागदपत्रे उपलब्ध होती मराठ्यांचा पहिला तपशीलवार इतिहास म्हणून डफच्या लेखनाचे महत्त्व मोठे आहे. मराठ्यांच्या राजकारणातील इंग्रजांची बाजू समजावून घ्यायला अजूनही तो उपयुक्त आहे. त्याची या शतकातील आवृत्ती एस्. एम्. एडवर्ड्स यांनी संपादिली आहे. मराठी सत्तेच्या उदयाने न उलगडलेले मर्म न्यायमूर्ती रानडे यांनी राइज ऑफ द मराठा पॉवर (१८७९) मध्ये प्रथमच स्पष्ट केले. विशेषतः संतांच्या सामाजिक कार्याकडे त्यांच्यामुळे अभ्यासूंचे लक्ष वेधले गेले. यानंतर सी. ए. किंकेड व द. ब. पारसनीस यांनी मराठ्यांचा त्रिखंडात्मक इतिहास लिहिला (१९२०). त्यांत भाकडकथा, आख्यायिका आणि कागदपत्रे यांचा तौलनिक अभ्यास नसल्यामुळे तो आता टाकाऊ वाटतो. गो. स. सरदेसायांनी आपल्या रियासतींचा संक्षेप न्यू हिस्टरी ऑफ द मराठाज (३ खंड, १९४८) या शीर्षकाने केला. सतराव्या शतकापासून सातारा खालसा होईपर्यंतचा (१८४८) मराठ्यांचा हा इतिहास अस्सल कागदपत्रांवर आधारलेला असल्यामुळे त्यातला तपशील बराचसा सर्वमान्य आहे. सरदेसायांचे विश्लेषण वा लेखनपद्धती याबद्दल मात्र तसे म्हणता येत नाही.

इंग्रजीत जास्तीत जास्त लेखन शिवछत्रपतींवर झालेले आहे. त्यांत जदुनाथ सरकारांच्या शिवचरित्रास (शिवाजी अँड हिज टाइम्स) विशेष स्थान आहे. शिवाजी स्थायी स्वरूपाची सत्ता स्थापू शकला नाही, हे त्यांचे मत एकांगी वाटते. पण त्यांचा विविध भाषिक आधारांचा अभ्यास, चिकित्सक बुद्धी आणि उत्कृष्ट शैली यांबद्दल ते प्रसिद्ध आहेत. कॉस्मा द गार्दाचे पोर्तुगीज शिवचरित्र (१६८०) आणि कॅरेरी, फ्रान्स्वा मारतँ इ. समकालीनांचे फ्रेंचमधील लिखाण विवेचक प्रस्तावना जोडून फॉरिन बॉयोग्राफीज ऑफ शिवाजी मध्ये सुरेंन्द्रनाथ सेन यांनी अनुवादिले. डॉ. बाळकृष्णांनीही फ्रेंच व विशेषतः डच साधनांचा वापर करून चार खंडांत शिवचरित्र लिहिले. त्यात कितीतरी समकालीन पत्रव्यवहार उद्धृत केला आहे. पां. स. पिसुर्लेकरांनी पोर्तुगीज साधनांद्वारे मराठ्यांचा इतिहास लिहिला. मात्र यात केवळ शिवचरित्र ताकाखाव, रॉलिन्सन, किंकेड आदींची शिवचरित्रे संशोधनापेक्षा शैलीवर जास्त भर देणारी आहेत. शिवाजीखेरीज ताराबाई (ब्रिज किशोर), थोरले बाजीराव (वि. गो. दिघे), थोरले माधवराव (अतुलचंद्र बॅनर्जी), नाना फडणीस (य. न. देवघर), दुसरा बाजीराव (प्रतुलचंद्र गुप्ता) यांच्यावरही प्रबंध प्रसिद्ध झाले आहेत. मराठ्यांचे मुलकी व लष्करी शासन (सुरेंद्रनाथ सेन), न्यायव्यवस्था (वि. त्र्यं. गुणे), इंग्रजांशी राजनैतिक संबंध (शैलेंद्रनाथ सेन, शांतिप्रसाद वर्मा), फ्रेंचांशी संबंध (हाताळकर), पेशव्यांचा  उदय (एच्. एन्. सिन्हा), नागपूरकर भोसले (राममोहन सिंह), तंजावरचे मराठी राजे (श्रीनिवासन्), पेशवाईचा अस्त (रूस्तुमजी चोक्सी), पानिपतची मोहीम (त्र्यं. शं. शेजवलकर) असे राजकीय इतिहासावर बरेच इंग्रजी लेखन झाले आहे. बरेचसे परप्रांतीयांनी केलेले असल्यामुळे की काय, निपःक्षपाती व चिकित्सक स्वरूपाचे आहे. पण साहजिकच त्यांत अज्ञानमूलक किंवा मराठी मोडी कागदांचा नीट अर्थ न लावता आल्यामुळे ढोबळ स्वरूपाच्या चुका आढळतात. पण एकूण लेखनाचा दर्जा उच्च आहे. साधनग्रंथांत पुण्यातील ब्रिटिश वकिलातीचा निवडक पत्रव्यवहार (जदुनाथ सरकारच्या नेतृत्वाखाली) वेगवेगळ्या विद्वानांनी १४ खंडांत संपादिला आहे, तो बहुमोल आहे (पूना रेसिडेन्सी कॉरस्पॉन्डन्स).


इतर यूरोपीय भाषांतील भारतविषयक इतिहासलेखन : भारतविषयक सर्वांत प्राचीन लेखन ग्रीक व लॅटिनमध्ये झाले. टॉलेमी, स्ट्रेबो वगैरे भूगोलज्ञांनी भारताविषयी सविस्तर नोंद केली आहे. पेरिप्‍लस ऑफ द इरिथ्रिअन सी  ह्या पुस्तकात भारताविषयी माहिती मिळते. मात्र अलेक्झांडरच्या स्वारीपूर्वी भारताविषयी म्हणावे तसे इतिहासलेखन झाले नाही पण त्यानंतर ॲरियन, मीगॅस्थीनीझ, सिल्यूकस, डायोडोरस इ. ग्रीकांनी लिहिलेले वृत्तांत भारताच्या प्राचीन इतिहासावर प्रकाश टाकतात. गेल्या शतकात जॉन माक्रिंडल याने त्यांचे सर्व साहित्य उजेडात आणले. या लेखनाच्या ऐतिहासिक दृष्ट्या असणाऱ्या मर्यादा रमेशचंद्र मजुमदारांनी दाखवून दिल्या आहेत. फाहियान, यूआन च्वांग, इत्सिंग यांसारख्या चिनी बौद्ध भिक्षूंचे वृत्तांतही पूर्णतः इतिहास नव्हेत. तथापि बौद्ध धर्माच्या इतिहासाची साधने म्हणून त्यांस अनन्यसाधारण महत्त्व आहे. चिनी राजवंशांच्या इतिहासातही भारतविषयक उल्लेख आहेत. मध्ययुगात बरेच अरबी प्रवासी भारतात आले. त्यांतील अल्-बीरूनीचा तारीखुल-इ-हिंद  हा ग्रंथ अकराव्या शतकातील उत्तर भारतासाठी व इब्‍न बतूताचे प्रवासवर्णन चौदाव्या शतकातील दक्षिण भारतासाठी उपयुक्त आहेत. शेख झैनुद्दीनची मलबारविषयक तवारीख अरबी भाषेत आहे. पंधराव्या शतकापासून रशियन, इंग्रज, फ्रेंच, जर्मन, स्विस, इटालियन असे अनेक प्रवासी व धर्मोपदेशक भारतात येऊ लागले. पण या सर्वांची प्रवासवर्णने साधनभूत आहेत, इतिहास नव्हेत. मनूचीच्या प्रवासवर्णनात काही इतिहास असला, तरी भर इतर विषयांवर आहे. पोर्तुगीज सत्ता पश्चिम किनाऱ्यावर स्थिरावल्यावर त्यात बार्रुस, कूतो आणि बुकार्रू या अभिलेखपालांनी राजाज्ञेवरून आशियातील पोर्तुगीज सत्तेचे आणि कास्ताव्हेदा व कोरिझा यांनी भारतीय पोर्तुगीजांचे कागदपत्रांवर आधारलेले इतिहास लिहिले. पोर्तुगीज भ्रष्टाचारांची यथातथ्य वर्णने, चमत्कारांवर अंधश्रद्धा, परधर्मीयांविषयी असहिष्णुता, वार्षिक अहवालासारखी लेखनपद्धती यांमुळे यांचा दर्जा उच्च नाही. जहांगीराच्या दरबारातील जेझुइट मिशनऱ्यांचा वृत्तांत समकालीन आहे. आधुनिक काळात पांडुरंग सखाराम पिसुर्लेकरांनी भारताच्या इतिहासासंबंधी पोर्तुगीजमध्ये पुष्कळच चांगले लेखन केले आहे.

भारतात फ्रेंच, डच व डॅनिश वखारी स्थापन झाल्यावर त्यांचे इतिहास लिहिले जाऊ लागले व आधुनिक काळात त्यांवर संशोधनही सुरू झाले. त्यांतून तत्कालीन भारतीय राज्ये, समाज व मुख्यतः व्यापार यांची माहिती मिळते. (फ्रेंच-झाबे रेनॉल, लुई पोलिओ, कारस्तोने दे फॉस, वेबर, जूल सोता, पोल कापेलँ डच-फिलिफस बाल्दीअस, दानीएल हॉल्व्हर्त, पीटर व्हॅन दाम, एफ्. व्हॅलेंटीन, एच्. टार्पेस्त्रा, एम्. ए. पी. रूलॉत्सा, एफ्. डब्ल्यू. स्टॅपेल. आधुनिक काळ : डॅनिश-ऑगस्ट हेनिॲग्ज, थॅरप, जे. एच्. दीअन्तअर, के. लार्सन, ऑगरीश, स्वेस्ट्र्प आणि म्युनार ओल्सेन). डी. एम्. जी. कोक याने १९२० मध्ये भारताच्या स्वातंत्र्यचळवळीचा डचमध्ये लिहिला. त्याचा हेतू डच सरकारला इंडोनेशियातील तत्सम चळवळींबद्दल धोरण आखता यावे हा होता. डॅनिश लेखनामागील प्रेरणा व्यापारी संशोधन, तर फ्रेंच-डचांचा हेतू पूर्वजांचे गुणगान.

वेदकालीन संस्कृतीच्या फ्रेंच व जर्मन अभ्यासाची परंपरा मोठी आहे. लेओनास शेझी, युजीन बर्नूफ, अमिय सेनार, सित्वॉ लेवी या फ्रेंच आणि मॅक्सम्यूलर, विंटरनिट्स, झिमर, श्लेगेल यांसारख्या जर्मनांनी प्राच्यविद्येत मोलाची भर घातली. क्रिस्तीआन लासेन हा नॉर्वेजियन, पण त्याचा प्राचीन भारताचा चार खंडांतील प्रचंड इतिहास (१८४८–६१) जर्मन भाषेमध्ये आहे शतकभराच्या नव्या संशोधनामुळे त्यातला तपशील आता निरुपयोगी झाला असला, तरी साधनांकडे पाहण्याची त्याची चिकित्सक दृष्टी आणि जागतिक इतिहासाची पार्श्वभूमी यामुळे तो अजूनही लक्षणीय आहे. लुई इ ला व्हाले पूसँ याचा प्राचीन भारताचा इतिहास (३ खंड, १९२४–३५) फ्रेंचमध्ये आहे आणि तो समतोल वस्तुनिष्ठ चिकित्सक लेखनाचा एक नमुना आहे. त्याचीच परंपरा पॉल, मसॉ म्युर्सेलसारख्यांनी चालू ठेवली आहे. रशियात अठराव्या शतकापासूनच भारताच्या इतिहासाच्या अभ्यासाला चालना मिळाली. सध्या सोव्हिएट रशियात भारतातील ग्रामसंस्था, अर्थव्यवस्था इ. अंगांचे मार्क्सवादी विश्लेषण चालू आहे.

फ्रान्सुआ बार्निक, फ्रान्सुआ क्युल्यू यांसारख्या सतराव्या शतकातील फ्रेंच प्रवाशांनी मोगल साम्राज्याचे इतिहास लिहिले पण ती वास्तविक प्रवासवर्णनेच होत. पिअ‍ेर यू जारिक याचा अकबर व जेझुइट हा समकालीन प्रवासवृत्तांतच आहे. अठराव्या शतकात व्हॉल्तेअरने काँत लालीचे सुंदर समर्थन केले. लार्दोने द्यूमा, मारुतँने, स्ताफ्तान, मादेक अशा फ्रेंच भारतातील ऐतिहासिक व्यक्तींची संशोधनपूर्ण चरित्रे उपलब्ध आहेत. त्यांत सर्वांत जास्त द्यूप्लेक्सची आहेत. ही बहुतेक गौरवपर आहेत पण आल्फ्रेद मार्तिनो याने आपल्या पाच खंडी इतिहासात (१९२०–३२) चिकित्सक संशोधन केले. फ्रेंच भारताचे हे श्रेष्ठ इतिहासकार होत. विशेषतः बुसीवरील त्यांचे लेखन संपूर्ण नवा दृष्टिकोन दाखविते. क्‍लरिसी बादे हिने प्राचीन भारतीय स्त्रीवर लिहिलेला प्रबंध (१८६७) लक्षणीय आहे.

मराठीतील इतिहासलेखन : एकोणिसाव्या शतकात पाश्चात्त्य विद्येने महाराष्ट्रात जे प्रबोधन अवतरले, त्याचा परिणाम होऊन पूर्व दिव्य शोधण्यासाठी इतिहाससंशोधन सुरू झाले. लोकहितवादींनी ‘ऐतिहासिक गोष्टी’ सांगितल्या टॉडचा राजस्थानचा इतिहास अनुवादिला पण खरी प्रेरणा मिळाली विष्णुशास्त्री चिपळूणकरांच्या निबंधमालेमुळे. डफच्या इतिहासाचे भाषांतर पूर्वीच झाले होते (बाबा साने व कॅ. डेव्हिड केपन, १८२९). त्यातील अनेक चुका नी. ज. कीर्तने यांनी १८६७ मध्ये दाखवून दिल्या होत्या, पण काही चुकीच्या टीकेबद्दल त्यांनी पुढे दिलगिरी प्रदर्शित केली. ज. बा. मोडक यांनी जगाच्या इतिहासाचे सामान्य निरूपण (१८७२), बा. प्र. मोडक यांनी दक्षिणेतील मुसलमानी राज्यांचा इतिहास (भाग १ व ३, १८९१) व चिं. वि. वैद्य यांनी मध्ययुगीन भारत अथवा हिंदु राज्यांचा उद्‍भव, उत्कर्ष आणि उच्छेद (१९२०–२६) ही पुस्तके प्रसिद्ध केली. १९७८ मध्ये ज. बा. मोडक व का. ना. साने यांनी काव्येतिहाससंग्रह मासिक काढून संस्कृत प्रकरणे, मराठी बखरी, पोवाडे, शकावल्या, करीने, मूळची कागदपत्रे अशा अनेक ऐतिहासिक साधनांचे व ग्रंथांचे प्रकाशन आणि संपादन केले. अकरा वर्षे चाललेल्या या नियतकालिकाने इतिहाससंशोधनात चैतन्य निर्माण करून साधनांचे संकलन, संपादन आणि प्रकाशन यांची परंपराच घालून दिली. या परंपरेतील सर्वश्रेष्ठ इतिहाससंशोधक वि. का. राजवाडे होत. त्यांनी देशाभिमानाने प्रेरित होऊन मराठ्यांच्या इतिहासाची साधने मेहनतीने गोळा केली आणि त्यांचे एकवीस खंड टीपाप्रस्तावनांसहित प्रसिद्ध केले. त्यांचे समकालीन वासुदेवशास्त्री खरे यांनी पटवर्धन दप्तरातून कागद निवडले आणि ऐतिहासिक लेखसंग्रह (१२ खंड) प्रसिद्ध केले. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या चिरंजीवांनी आणखी तीन खंडांची भर घातली (१९२५). खरेशास्त्र्यांच्या पानिपत ते दुसरा बाजीराव या कालखंडावरील अस्सल साधनांच्या प्रस्तावनांमध्ये ओघवती सरळ शैली, संगतवार हकिकत आणि साधार विवेचन आढळते. इचलकरंजी संस्थानचा इतिहास (१९१३), नाना फडणवीसांचे चरित्र (१८९२) ही त्यांची इतर पुस्तके. त्यांत राजवाड्यांची प्रतिभा नसली, तरी वास्तवाचा भक्कम आधार सापडतो. नाना फडणीसाचे मेणवलीचे दप्तर द. ब. पारसनीसांनी उजेडात आणले. या संशोधकाने त्यातला काही भाग मूळ पत्रांतील नापसंत वाटणारा अंश वगळून भारतवर्ष आणि इतिहाससंग्रह  या नियतकालिकांत प्रसिद्ध केला. त्यांनीच महादजी शिंदे यांचा पत्रव्यवहार ग्वाल्हेर दरबाराकडून खासगी रीत्या छापविला होता तोच पुढे प्रकाशित झाला (संपादक-जदुनाथ सरकार व रियासतकार सरदेसाई). ह्याशिवाय त्यांनी झाशीची राणी लक्ष्मीबाई, अयोध्येचे नबाब, ब्रह्मेंद्रस्वामी तसेच पुणे, पन्हाळा, महाबळेश्वर, सातारा वगैरे स्थळांवर स्वतंत्र पुस्तके लिहिली. १९१० मध्ये सरदार मेहेंदळे व इतिहासाचार्य राजवाडे यांनी स्थापिलेले भारत इतिहास संशोधक मडळ ही मराठी इतिहास संशोधन-संकलन-प्रकाशनातील एक अत्यंत महत्त्वाची घटना होय. मंडळाने हिंगणे, पेठे, चंद्रचूड, पुरंदरे अशा अनेक सरदारांची आणि शिवपूर्वकालीन व शिवकालीन देशमुखांची दप्तरे मिळविली. त्यांतले कागद निवडून आजपर्यंत फार्सी व मराठी कागदपत्रांचे सु. ८५ ग्रंथ प्रकाशित केले. मंडळाच्या पाक्षिक व वार्षिक सभा, त्रैमासिक आणि वार्षिक अहवाल, संमेलनवृत्ते यांतून मराठ्यांच्या इतिहासावरील सहस्रावधी प्रश्नांवर साधार चर्चा प्रसिद्ध झाली आहे. या शतकाच्या सुरुवातीसच पेशवे दप्तरावर काम सुरू झाले. वाड, पारसनीस, आणि मावजी यांनी पेशवे दप्तरातील कागद निवडून त्यांचे १३ खंड प्रसिद्ध केले. १९२९ मध्ये त्यातील निवडक पत्रव्यवहाराच्या संपादनाला गो. स. सरदेसायांनी सुरुवात केली आणि ४५ खंडांत तो विषयवारीने छापला. याप्रकारे सरदेसायांनी संशोधकांना बहुमोल सामग्री उपलब्ध करून दिली. त्यांच्या रियासतींनी इतिहास घरोघर पोहोचवला. साधनांच्या प्रकाशनात वि. ल. भावे, आ. भा. फाळके, सातारा इतिहासमंडळ, समर्थ वाग्देवता मंदिर, राजवाडे संशोधन मंडळ यांची कार्ये उल्लेखनीय आहेत. पानिपत-मोहिमेच्या द्विशताब्दिनिमित्त त्यावरील साधनांचे पुनरुज्‍जीवन झाले (१९६१–६२). आधुनिक काळात अनेक संस्थानांची दप्तरे आणि तत्सम बरीच साधने प्रकाशित झाली असली, तरी संपादनाचे काम काळजीपूर्वक न झाल्याने अभ्यासकाला त्यांचा उपयोग करण्यात बर्‍याच अडचणी येतात.


मराठ्यांचा समग्र इतिहास फक्त सरदेसायांनी लिहिला, पण संकीर्ण लेखन पुष्कळच उपलब्ध आहे. बडोदा, कोल्हापूर, धार, इंदूर, देवास, औंध इ. संस्थानांचे इतिहास प्रकाशित झाले आहेत. कुलवृत्तांत हा इतिहासलेखनाचा विशिष्ट प्रकार केवळ मराठीत रूढ आहे. मराठीत आतापर्यंत आठवले , गोखले, घोरपडे, पटवर्धन, गुण्ये अशा अनेक घराण्यांचे वंशावळींसह वृत्तांत प्रसिद्ध झाले आहेत. शिवाजीचे चरित्र अनेकांनी लिहिले आहे. त्यांतील साधनांचा साक्षेपी अभ्यास करून लिहिलेली चिं. वि. वैद्य व त्र्यं. शं. शेजवलकर यांची पुस्तके लक्षणीय आहेत. याखेरीज थोरले माधवराव, महादजी शिंदे, मल्हारराव होळकर, सखारामबापू बोकील, उमाजी नाईक इत्यादींची अनेक ऐतिहासिक चरित्रे लिहिली गेली आहेत. ह्यांशिवाय कान्होजी आंग्रे (रामदासी), कुलाबकर सरखेल आंग्रे (ढबू), ताराबाईंकालीन पत्रव्यवहार-(संपादक आप्पासाहेब पवार), करवीर रियासत-(स. मा. गर्गे) वगैरे काही ग्रंथ इतिहासलेखनातील संशोधनाची प्रगती दर्शवितात. एकट्या अहिल्याबाई होळकरवर चारपाच चरित्रे झाली. न. र. फाटक यांनी लिहिलेले यशवंतराव होळकरचे चरित्र याच मालिकेतले (१९६६). न. चिं. केळकरांनी इंग्रज व मराठे (१९१८) लिहून मराठी सत्तेच्या अपकर्षाची चिकित्सा केली. नानासाहेब शिंदे (प्रसिद्ध लढाया), कॅप्टन मोडक (प्रतापगडाची मोहीम ) यांनी युद्धशास्त्राचा अभ्यास केला. सामाजिक इतिहास म्हणजे संतवाङ्‍‌‌मयाचे विश्लेषण असे समीकरण होऊन बसले. शंकरराव देवांनी समर्थवाङ्‍‌‌मयाला वाहून घेतले आणि रामदास व रामदासी हे मासिक अनेक वर्षे चालवले . बा. कृ. भावे यांचा पेशवेकालीन महाराष्ट्र हा ग्रंथ प्रसिद्ध आहे. अलीकडे पुणे विद्यापीठाने न. चिं. केळकर व्याख्यानमालेच्या रूपाने मराठे-निजाम संबंध, पोर्तुगीज व मराठे, मराठी शासनपद्धती अशा उपेक्षित विषयांवर विद्वत्तापूर्ण ग्रंथांचा उपक्रम सुरू केला आहे. सातत्याने इतिहाससंशोधन व लेखन करणाऱ्यांत द. वि. आपटे, वि. स. वाकसकर, शं. ना. जोशी, शां. वि. आवळसकर आणि सध्या वा. सी. बेन्द्रे, ग. ह. खरे, वा. वि. मिराशी, य. न. केळकर, द. वा. पोतदार, सेतुमाधवराव पगडी हे प्रमुख होत. वेदकाल व प्राचीन भारत यांवर चिं. वि. वैद्य, वा. वि. मिराशी, अ. स. अळतेकर, अ. ज. करंदीकर, अ. द. पुसाळकर इत्यादींनी लिहिले आहे. मराठीतील इतिहासलेखनात प्रादेशिकतेच्या मर्यादा जाणवतात. कितीतरी लेखन संकुचित दृष्टिकोन, तात्त्विक व व्यापक बैठकीचा अभाव आणि तौलनिक अभ्यासाची उणीव यांमुळे संशोधनपर असूनही उच्च श्रेणीला पोहोचू शकलेले नाही. महाराष्ट्र राज्यस्थापनेमुळे त्यात बदल होण्याची मात्र सुचिन्हे दिसत आहेत. महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृति मंडळातर्फे महाराष्ट्राचा इतिहास पाच खंडांत प्रकाशित करण्याची योजना आहे.

इतर भारतीय भाषांतील इतिहासलेखन : बंगाली : सर्वांत विपुल व सर्वांगसमृद्ध लेखन बंगाली भाषेत आहे व त्याची वेगळी सूचीही प्रसिद्ध झाली आहे (१९५३). गंगारामविरचित महाराष्ट्र पुराण यासारखी काही काव्ये सोडली, तर गद्यातील आद्य ग्रंथ रामराम बसूंचे प्रतापादित्य चरित्र (१८०१) हा होय, त्याचे मराठीतही भाषांतर झाले आहे (१८१६). १८७५ पर्यंतच्या मृत्युंजय विद्यालंकार, ईश्वरचंद्र विद्यासागर, नीलमणी, बसाक आदी लेखकांनी प्रायः बंगालचे इतिहास लिहिले, त्यांवर ब्रिटिश छाया दिसते. राजकृष्ण मुखर्जींच्या स्वतंत्र, छोटेखानी इतिहासाच्या मात्र ३४ आवृत्त्या निघाला. राष्ट्रवादी दृष्टिकोनाचे प्रणेते बंकिमचंद्र चतर्जी यांच्या बंगदर्शनात अनेक ऐतिहासिक निबंध प्रसिद्ध झाले. राष्ट्रवादाचा परिपाक म्हणजे रजनीकांत गुप्तांचा १८५७ चा (१८७६) व बंगालचा इतिहास (१८७९) आणि अक्षयकुमार मैत्रांचे सिराजउद्दौलाचे चरित्र (१८९७). मैत्रांनी ऐतिहासिक चित्रे  हे नियतकालिकही चालू केले. ‘बंगीय साहित्य परिषद’ (१८९४) व ‘वरेन्द्र अनुसंधान समिती’ (१९१०) या संस्थांनी गौडराजमाला, गौडलेखमाला  असे साधनग्रंथ प्रकाशित केले. राखालदास बॅनर्जी, गोपालचंद्र मुखर्जी, वरदकांत मैत्रा, पंचकादी बंदोपाध्याय, शिवचंद्र शील हे या काळातील काही प्रमुख लेखक. सखाराम गणेश देऊसकरांनी इतिहासप्रसिद्ध मराठ्यांचा परिचय करून दिला. शिवनाथ शास्त्रींनी १९०३ मध्ये रामतनू लाहिरीवर लिहून प्रबोधनावरील पुस्तकांना चालना दिली. विजय घोषमपर्यंतच्या इतिहासकारांवर राष्ट्रवादी छाप आहे. त्या काळात कलकत्त्याची अंधारकोठडी, प्लासीचे युद्ध यांसारख्या विषयांपासून मोहें-जो-दडो संस्कृती, प्राचीन भारत अशा अनेक विषयांचा समाचार घेतला गेला. इतिहासलेखनाच्या प्रकाशनांत विश्वविद्या ग्रंथमालेचे कार्य महत्त्वाचे आहे. बंगालचे अलीकडील सर्वांगीण इतिहास रमेशचंद्र मजुमदार आणि निहाररंजन रॉय यांनी लिहिले आहेत. १९५० पासून इतिहास  हे केवळ ऐतिहासिक नियतकालिकही चालू आहे.

हिंदी : सतराव्या शतकात मुहणोत नैणसी याच्या राजपुतांवरील ग्रंथात परमारादी वंशांचा इतिहास आहे. अठराव्या शतकात सूदनाने सुजानचरित (सुरजमल जाट), लालकवीने छत्रप्रकाश (छत्रसाल), सूर्यमल्लाने वंशभास्कर (बुंदी-कोटा-राजवंश) असे ऐतिहासिक ग्रंथ व काव्ये रचली. एकोणिसाव्या शतकात शिवप्रसादांच्या इतिहास-तिमिरनाशके (१८६४–७३) या क्रमिक पुस्तकाबरोबरच शामळदासाचा वीर विनोद  हा महान इतिहासग्रंथ निर्माण झाला. मुन्‌‌शी, देवीप्रसाद, गौरीशंकर ओझा, जगदीशसिंह गहलोत, दशरथ शर्मा इ. हे विसाव्या शतकातील राजस्थानचे सुप्रसिद्ध इतिहासकार होत. विश्वेश्वरनाथ रेऊंनी प्राचीन व मध्ययुगीन राजवंश (१९२०–२५), राज भोज (१९३२), मारवाड राज्याचा इतिहास (२ खंड, १९३८–४०) हे ग्रंथ ऐतिहासिक साधनांचा उपयोग करून लिहिले. पण त्यांत चिकित्सा वा एक विशिष्ट पद्धत नाही. मध्य प्रदेश (हिरालाल), गोरखपूर (राजबली पांडे), माळवा-रतलाम (रघुवीर सिंह) यांचे प्रादेशिक इतिहासही लिहिले गेले. पण त्यांत दर्जेदारपणाचा अभाव व आर्यसमाजी विचारसरणीची काहीशी छाप आहे. कृष्णदास रॉय (भारतीय चित्र व शिल्प), हरिदत्त वेदालंकार (कुटुंबसंस्था), मोतीचंद्र (पोषाख व वाहतुकीचे मार्ग), सतीशचंद्र काला (सिंधू संस्कृती), सत्यकेतू विद्यालंकार (मौर्यवंश), गौरीशंकर चतर्जी (हर्ष) हे ग्रंथ यास अपवादरूप होत. बृहत्तर भारताचे इतिहास प्रचारकी आहेत. जयचंद्र विद्यालंकारांचा दृष्टिकोन राष्ट्रीय आहे. इंग्रजी आधारावरून शीख-मराठ्यांचे इतिहास लिहिले गेले. आगरवालांचा पाणिनीकालीन व उपाध्यायांचा कालिदासकालीन भारत हे प्रथम इंग्रजीत प्रसिद्ध झाले.

गुजराती :‌ गुजरात विद्यापीठ (राष्ट्रीय) व गुजरात व्हर्‌नॅक्युलर सोसायटी यांनी इतिहासलेखनाला चालना दिली. गिरिजाशंकर वल्लभजी आचार्य आणि नर्मदाशंकर वल्लभजी द्विवेदी यांनी गुजरातच्या इतिहासाची साधने प्रकाशित केली. अहमदाबाद, नवसारी, नडियाद, पावागढ असे स्थानिक वृत्तांत इतिहासरूपात लिहिले गेले आहेत. १८५७, झांशीचा राणी, सिराजउद्दौला, अलाउद्दीन खल्‌जी असेही विषय हाताळले गेले आहेत. गुजरातचे प्राचीन व अर्वाचीन इतिहास मणिभाई द्विवेदी, हिरालाल पारेख इत्यादींनी लिहिले आहेत. वि. क. वैद्य व वा. मं. दुभाषी यांचे आर्य संस्कृती-वरील लेखन ऐकांतिक आहे. उ. के. त्रिवेदी व म. प्र. देसाई यांचे आधुनिक भारताचे आर्थिक इतिहास व करीम अहमद मास्टरांचा गुजरातेतील मुसलमानांचा इतिहास प्रसिद्ध आहे. दुर्गाशंकर शास्त्री, भो. ज. संदेसरा, भ. भा. मेहता, र. भी. जोते हे इतिहासविषयक लेखन करणार्‍यांत प्रमुख होत.


पंजाबी : प्राचीन पंथ प्रकाश (रतनसिंग भंगू) हा शीख गुरूंचा एकोणिसाव्या शतकातला पद्यबद्ध इतिहास. संतोखसिंग कवीने तो अठराव्या शतकाच्या अखेरीपर्यंत आणला होता. त्याचे संपादन भाई वीरसिंग यांनी केले आहे (१४ खंड, १९२६–३७). गणेशदास विरचित फतहनामा गुरू खालसाजी का  हाही एक जुना इतिहास (संपा. सीताराम कोहली, १९५२) आहे. भाई सुखासिंगांनी गोविंदसिंगाचे चरित्र (१८५४), तर ग्यानसिंगांनी तवारीखी पद्धतीने शीख राज्याचा पूर्ण इतिहास लिहिला ( १८८०). बाबा प्रेमसिंग होती आणि करमसिंग हे विसाव्या शतकाच्या सुरुवातीचे महत्त्वाचे इतिहासकार होत. गंडासिंगांनी विपुल इतिहासलेखन केले आहे. सीताराम कोहलींनी रणजितसिंगाचे साधार व सुंदर चरित्र लिहिले आहे. महत्त्वाच्या गुरुद्वारांचे त्याचप्रमाणे नाभा, फरीदकोट, पतियाळा अशा संस्थानांचे ऐतिहासिक वृत्तांतही लिहिले गेले आहेत. साधनांच्या प्रसिद्धीत खालसा ट्रॅक्स सोसायटीचे कार्य महत्त्वाचे आहे. फुलवारी नियतकालिकातून बरेच इतिहासलेखन प्रसिद्ध झाले. फौजासिंग बाबांनी गुरू गोविंदसिंगाच्या समकालीन प्रवासवृत्तांचे संपादन केले आहे. प्रतापसिंग आणि समशेरसिंग अशोक हे इतर उल्लेखनीय इतिहासकार आहेत.

कन्नड : म्हैसूरचे राजे सतराव्या शतकात स्वतंत्र झाल्यावर त्यांच्या आश्रयाने ऐतिहासिक काव्यग्रंथांना चालना मिळाली. नंजुंड कवीची कुमार रामकथे (कंपलीच्या राजाचे चरित्र, १५२५), गोविंद वैद्याचे कंठीरव-नरसराज-विजयम्(सतरावे शतक) व दोड्ड देवराजाचे चरित्र ही उल्लेखनीय आहेत. चिक्कदेवराय (१६७२–१७०४) राजाचा मंत्री तिरुमलार्यकृत दोन इतिहास ही मुख्यतः काव्ये आहेत. पट्ट्याचा मैसुर अरसुगळ पूर्वाभ्युदये (१८१३) हा ग्रंथ विल्क्सने म्हैसूरच्या इतिहासासाठी आधारभूत मानला. लिंगण्णाचा केळदिनृपविजयम् मात्र काहीसा प्रमाणभूत ग्रंथ असून त्यात तत्कालीन सत्तांची, विशेषतः मराठ्यांविषयी काही माहिती मिळते. आधुनिक काळात पां. मि. देसाई (कर्नाटकातील वीर स्त्रिया, कलचुरी वंश), शं. बा. जोशी (प्राचीन कर्नाटक, कन्नड संस्कृती), एम्. एस्. पुट्टण (कोलार, तुमकुर, इक्केरी वगैरे स्थानिक वृत्तांत) हे महत्त्वाचे लेखक होत. सं. ह. देशपांड्यांनी कर्नाटकचे साम्राज्य तीन खंडांत वर्णिले आहे. विजयानगरचे साम्राज्य, दक्षिण कर्नाटकचा इतिहास हे लोकप्रिय विषय आहेत. आर्. नरसिंह, र. श्री. मुगळी, चिदानंद मूर्ती इ. कन्नड इतिहासकार उल्लेखनीय आहेत.

मलयाळम : केरलोत्पत्ति  आणि केरलचरितम् या सतराव्या शतकातील दंतकथांपासून इतिहासलेखनाला प्रारंभ झाला. त्याच शतकातील पदुपाटुसे(युद्धगीते) या काव्यात डच-पोर्तुगीजांनी मलबारात केलेल्या लढायांचे वर्णन आहे. व्हायकन पाकी मुथाती यांचा त्रावणकोरचा इतिहास (१८६८) हे आधुनिक काळातले पहिले लेखन आहे. व्ही. आर्. परमेश्वरन् पिल्लै यांनी केरळातील शिलालेखांचा समग्र वृत्तांत प्रसिद्ध केला आहे. पद्मनाभ मेननचा केरळचा इतिहास, पी. रामन मेनन यांनी लिहिलेले रामवर्मा या कोचीनच्या कर्तबगार राजाचे चरित्र आणि शंकू अय्यराचा केरळातील बौद्धधर्माचा इतिहास हे ग्रंथ संशोधनपूर्ण आहेत. जी. दामोदर मेननचा केरळचा इतिहास मार्क्सवादी मोडणीचा आहे. मलबारातील पोर्तुगीज अत्याचारांवरील ओ. के. नंबियार यांच्या इंग्रजी ग्रंथांचे अनुवादही झाले आहेत. ज्यू, ख्रिश्चन, गौड सारस्वत इ. लोकांचे इतिहासही अलीकडे प्रसिद्ध झाले आहेत. पी. ए. सय्यद मुहंमदांच्या नेतृत्वाखाली केरळचा संपूर्ण व साधार इतिहास सरकारी अनुदानाने लिहिण्याची योजना कार्यान्वित झाली आहे.

तेलुगु : वंशावळ्या व कृष्णदेवरायचरित (कुमार धूर्जटी), रामराजीयमु यांसराख्या मध्ययुगातील ऐतिहासिक काव्यग्रंथापासून इतिहासलेखनाला आरंभ झाला. कृष्णदेवरायने आमुक्तमाल्यादामध्ये आपल्या मोहिमांचे वर्णन केले. नंद तिम्मरसूने अच्युत देवरायाच्या कारकीर्दीतील लष्करी घडामोडींचे वर्णन केले. विजयानगरच्या विनाशानंतरचे पाळेगार आपल्या पदरी कवींना चरित्रे लिहून घेण्यासाठी ठेवत. पाळेगारांच्या कैफियतीही उपलब्ध आहेत. रंगरायचरितात बुसीच्या स्वारीचे वर्णन आहे. आधुनिक काळात विज्ञानचंद्रिका मंडळीच्या स्थापनेने (१९०६) इतिहाससंशोधनाला उत्तेजन मिळाले. संस्थापक कोमारराजू वेंकट लक्ष्मणराव (शिवचरित्र, हिंदुभारत, हैंदव चक्रवर्तुलु), निलुकुरी वीरभद्रराव (आंध्रचरित्र, कातीयांध्रलु चरित्र) व सी. नारायणराव (आंध्रदेशमु, अशोक) यांनी संशोधनाचा पाया घातला. आंध्र विज्ञानसर्वस्वमु  या ज्ञानकोशाचा एक खंड इतिहासाला वाहिलेला आहे. मालममल्ली सोमेसेश्वर शर्मा, रल्लबंदि सुब्बराव, एम्. रामराव, कोटा वेंकटाचलम्, कोट्टभावैय्य चौधरी, के. ईश्वरदत्त, दिग्वल्ली वेंकट शिवराम हे संशोधनपूर्ण लेखन करणारे महत्त्वाचे लेखक होत. हे मुख्यतः प्राचीन भारतातील काही विषय व सातवाहनादी वंश तसेच विजयानगर, नागार्जुनकोंडा, अमरावती असे आंध्राशी संबद्ध विषयच प्रामुख्याने हाताळतात. काश्मीर, १८५७ चा उठाव, ब्रिटिश अंमल यांवरही तुरळक लेखन झालेले आढळते.

तमिळ : शिलप्पदिकारम्  आणि मणिमेखलै  या आर्ष काव्यांतून संगम काळाचा पारंपारिक इतिहास आढळतो. पण त्यांचे अनामिक लेखक चौथ्या-पाचव्या शतकांतले असावेत. नंदिक्कलबाकम् हे पल्लवंशीय तिसर्‍या नंदिवर्म्याच्या कारकीर्दीतील ऐतिहासिक काव्य. चोल सम्राटांवरही अशी काव्ये उपलब्ध आहेत. श्रीरंगम्, मदुरा, कालहस्ती येथील मंदिरांच्या इतिहासांत आढळणाऱ्या राजकीय घटना व कालगणना यांचा पुष्कळ गोंधळ आहे. कॉलिन मॅकेंझी या चौकस सर्वक्षकाच्या आग्रहावरून गेल्या शतकात कौमुदेश राजक्कळ्  सविस्तर चरिते हा ग्रंथ रचला गेला. आनंदरंग पिल्लै या द्यूप्लेक्सच्या दुभाष्याची बारा खंडांतील इंग्रजी दैनंदिनी इंग्रज फ्रेंच स्पर्धेवरील महत्त्वाचा साधनग्रंथ आहे, पण तो इतिहास नव्हे.

असमिया, ओडिया, सिंधी : ब्रिटिश अंमलात काशीनाथ तमुलीफुन (१८४०) आणि रामबहादुर गुणाभिराम बरुआ (१८८४) यांनी आसामचे इतिहास लिहिले. प्राचीन कामरूपातील कायस्थांचा प्रचंड इतिहास हरि नारायण दत्त-बरुआ यांनी व प्रागैतिहासिक आसामवर नियोग यांनी लिहिले आहे. आहोमांच्या गतवैभवावर लिहिण्याची सूर्यकुमार भूयन यांची परंपरा  हेमचंद्र गोस्वामी व वेणुधर शर्मांनी चालवली आहे.

हरेकृष्ण मेहताबलिखित ओरिसाचा इतिहास, सोमनाथसिंगच्या पदच्युतीचा इतिहास, सुरेंद्र साई या ब्रिटिशांविरुद्ध उभे ठाकणाऱ्याचे चरित्र असे ओडियातील इतिहासलेखन मर्यादित आहे. त्रिपाठींच्या दारु देवता या जगन्नाथपुरीवरील ग्रंथात ओडिया संस्कृतीचा इतिहास आला आहे. पुरीच्या मंदिरातील मदलापंजी अभिलेखांचे संपादन झाले आहे.

चचनामामध्ये (सिंधवरील इस्लामी आक्रमणविषयक फार्सी तवारीख) अरबपूर्व सिंधमधील हिंदू राजांचे इतिहास लिहिलेले होते असे उल्लेख आहेत पण ते उपलब्ध नाहीत. मुसलमानी अंमलातील सिंधचे इतिहास फार्सीत आहेत. महाराज द्वारकाप्रसादांनी सिंधचा प्राचीन इतिहास लिहिला आहे. सिंधची संस्कृती व इतिहास यांवर लिहिणाऱ्यांत मेहरमल मेहरचंद, एच्. एम्. गुरुबक्षाणी व चेतन मारीवाला हे प्रमुख होत.

जवळजवळ प्रत्येक भारतीय भाषेत स्वातंत्र्यसंग्रामातील आठवणी, नेत्यांची चरित्रे व विशिष्ट घटनांचे (उदा., सशस्त्र चळवळ, १९४२ ची चळवळ) वृत्तांत लिहिले गेले आहेत. पुरेसे संशोधन वा वस्तुनिष्ठ विचारसरणी नसल्यामुळे बहुतेकांना शुद्ध इतिहास म्हणणे योग्य ठरणार नाही.


भारतीय भाषांतील परदेशांचे इतिहास : बडोद्याच्या सयाजीराव महाराजांनी विद्याप्रसारासाठी जी अनेक कार्ये केली, त्यांत वेगवेगळ्या देशांचे इतिहास लिहून घेण्यासाठी चालविलेली राष्ट्रकथामाला ही एक होय. त्यात अथेन्स, रोम, कार्थेज अशा शहरांचे व तुर्कस्तान, फ्रान्स अशा देशांचे इतिहास प्रसिद्ध झाले. पुरेशा उत्तेजनाअभावी ही माला बंद पडली. स्वातंत्र्यसंग्रामात इतर देशांतील मुक्तिसंग्रामांच्या इतिहासाने स्फूर्ती मिळावी या हेतूने आयर्लंडचा इतिहासफ्रेंच राज्यक्रांती (न. चिं. केळकर), जपानची मर्दुमकी (शं. श्री. देव), आधुनिक जर्मनी (ना. कृ. आगाशे) इ. पुस्तके लिहिली गेली. रूसो-जपानी युद्ध, पहिले महायुद्ध व सोव्हिएट क्रांती यांमुळे जपान, चीन, रशिया, इटली यांच्याकडे लक्ष वेधले गेले. इतर देशांच्या एकीकरणाचे व आधुनिकीकरणाचे कुतूहल असल्याने ईजिप्त, तुर्कस्तान, अमेरिकेची संयुक्त संस्थाने हे इतिहास विषय झाले. ना. ग. गोरे व शि. ल. करंदीकर यांचे अमेरिकन संयुक्त संस्थानांचे इतिहास उल्लेखनीय आहेत.

रशियन राज्यक्रांतीने जवळजवळ प्रत्येक भारतीय भाषेत कुतूहल जागृत केले. त्यामुळे इतिहास किंवा माहितीपर पुस्तिका जन्मल्या. ब्रिटिश अंमलाच्या ऐन भरात अनुकरणप्रियतेने ग्रीस, रोमचे साम्राज्य, ब्रिटन यांचे इतिहास लिहिले गेले. मराठीखेरीज इतर भाषांत इटली, जर्मनी, ईजिप्त, ॲबिसिनिया, तुर्कस्तानचा केमालपाशा, आयर्लंड, हंगेरी, अमेरिकेचे स्वातंत्र्ययुद्ध, जपान यांवरील पुस्तिका वा इतिहास लिहिण्यात आले. मुसलमान लेखकांनी स्पेनमधील मूर संस्कृती आणि इराण, अफगाणिस्तान, अरबस्तान यांसारख्या इस्लामी संस्कृतीच्या देशांविषयी लिहिले. उर्दूमध्ये तर भारताच्या इतिहासापेक्षा खलीफांवरच जास्त लिहिले आहे. बंगाली व गुजराती मुसलमानांनी त्याचे अनुकरण केले. आर्यसमाजी व हिंदू संघटनेच्या विचारसरणीचा प्रभाव म्हणून की काय, हिंदीत नेपाळवर जास्त पुस्तके आहेत. आशियातील जागृतीवर सत्यकेतू विद्यालंकार (हिंदी), दोरैस्वामी अयंगार (कन्नड), रत्नस्वामी (मलयाळम्) यांनी लिहिले आहे. रामधारी सिंहांचे हिंदीतील प्राचीन तिबेटवरील पुस्तक अपवादरूप दिसते. दक्षिण आफ्रिका, फिजी बेटे, मॉरिशस यांवरील पुस्तके तेथे वसलेल्या भारतीयांच्या प्रश्नांपुरतीच मर्यादित आहेत. अलीकडे फिलिपीन्स, इंडोनेशिया, विशेषतः चीनमधील साम्यवादी क्रांती यांकडे भारतीयांचे लक्ष वेधले आहे. मात्र भारतीय भाषांतील परदेशांवरचे लिखाण हे खऱ्या अर्थाने इतिहास नसून केवळ परिचयपर आहे व बहुधा इंग्रजीतील दुय्यम पुस्तकांचा उपयोग करून केलेले दिसते. गदाधर सिंहांच्या चीन मे तेरह मासेसारखी पुस्तके विरळच.

सारांश : भारतीय इतिहासलेखनाचा इतिहास वंशावळ्या आणि ऐतिहासिक काव्यग्रंथांपासून सुरू होतो. इस्लामने तवारिखांची आणि आहोम राज्यकर्त्यांनी बुरंजींची परंपरा आणली. बखरी हा फार्सी तवारिखांचाच मराठी अवतार. हिंदी (उदा., बुंदेले की बखर) व कन्नड (रामरायण बखैरे) या भाषांतही बखरी लिहिल्या गेल्या. पण सामान्यतः मराठीखेरीज इतर भाषांतून संस्कृतमधील ऐतिहासिक काव्यग्रंथांचीच परंपरा चालू राहिली. पाश्चात्त्य विद्येच्या परिचयाने आधुनिक अर्थाचे इतिहासलेखन व संशोधन सुरू झाले. पण त्याला विशिष्ट दर्जा इंग्रजीतच प्राप्त झाला. पारतंत्र्याची प्रतिक्रिया होऊन भारतीय भाषांत साम्राज्यवादी इंग्रज लेखकांना उत्तर म्हणून अभिमानाने किंवा सत्यान्वेषणाखेरीज अन्य हेतूने प्रेरित असे लेखनच जास्त झाले. चिकित्सक, वस्तुनिष्ठ लेखन तुलनेने फार कमी आहे. मराठीत ऐतिहासिक साधनांच्या प्रसिद्धीला जास्त प्राधान्य मिळाले. बंगालीइतके समृद्ध लेखन इतर भारतीय भाषांतून आढळत नाही. भारतीय भाषांतील इतिहासलेखनांत प्रादेशिकतेच्या मर्यादा जाणवतात. तसेच राजकीय इतिहासावर लक्ष केंद्रित असल्याने सामाजिक, आर्थिक अंगांकडे दुर्लक्ष होते. भाषिक राज्यांची स्थापना आणि विद्यापीठांचे मातृभाषा-माध्यम यांमुळे मिळणार्‍या उत्तेजनाने यात बदल होण्याची शक्यता आहे.

पहा : इतिहास इतिहासाचे तत्त्वज्ञान इतिहाससाधने बखर वाङ्मय.

संदर्भ :1. Barnes, H. E. History of Historical Writing, New York, 1925.

            2. Bury, J. B. Ancient Greek Historians, New York, 1905.

            3. Gooche, G. P. History and Historians in 19th Century, London, 1935.

            4. Guilday, Peter, Church Historians, New York, 1926.

            5. Institute of Historical Studies, Historians and Historiography in Modern India, New Delhi, 1969.

            6. Pathak, V. S. Ancient Historians of India: A Study in Historical Biographies, Bombay, 1966.

            7. Poole, R. L. Chronicles and Annals, Oxford, 1926.

            8. Rosenthal, Franz, A History of Muslim Historiography, Leiden, 1952.

            9. Shotwell, J. T. The Story of Ancient History, New York, 1961,

          10. Sen, S. P. Ed. Historians and Historiography in Modern India, Calcutta, 1973.

          11. Thompson, J. W. A History of Historical Writing, 2 Vols., New York, 1962.

कुलकर्णी, ना. ह.