मुहंमद हुसैन ‘आझाद’मुहंमद हुसैन ‘आझाद’ : (? १८३०–२२ जून १९१०). उर्दू कवी, निबंधकार व समीक्षक. जन्म दिल्ली येथे. मूळ नाव मुहंमद हुसैन व टोपणनाव ‘आझाद’. वडिलांचे नाव मुहंमद बाकर. मुहंमद बाकर हे कवी जौक यांचे जवळचे मित्र व उर्दूचे आद्य पत्रकार होते. आझाद यांचे आरंभीचे शिक्षण जौक यांच्याच देखरेखीखाली झाले. जौक हे आझादांचे काव्यगुरूही होत. १८५७ च्या लढ्यात आझादांचे वडील बळी पडले. घरदार सर्व काही लुटले गेले. काही दिवस आझाद यांना दारिद्रयात वणवण फिरावे लागले. शेवटी १८६४ मध्ये ते लाहोरला पोहोचले व तेथे मासिक रु. १५ पगारावर शिक्षणखात्यात नोकरी करू लागले. तेथे त्यांनी फार्सी व उर्दू पाठ्यपुस्तके लिहून मोठा लौकिक मिळविला. काही काळ ते लाहोर महाविद्यालयात अरबीफार्सीचे प्राध्यापक होते. काही नियतकालिकांचे ते संपादकही होते. फार्सी व उर्दू भाषांचा त्यांचा प्रगाढ व्यासंग होता. काबूल तसेचइराणचा प्रवासही त्यांनी केला. १८८७ मध्ये त्यांना ‘शम्‌सुल-उलमा’ (ज्ञानभास्कर) हा बहुमानाचा किताब देऊन गौरविण्यात आले. लाहोर येथे अनेक थोर व्यक्तींच्या ते सहवासात येऊन त्यांची कवी, निबंधकार, समीक्षक व विद्वान म्हणून कीर्ती झाली. आयुष्याच्या अखेरी त्यांचे मानसिक संतुलन बिघडले होते व त्यातच लाहोर येथे त्यांचे निधन झाले.

अर्वाचीन उर्दू कवितेचे ते जनक मानले जातात. मौलाना हालींप्रमाणेच त्यांनीही प्रवृत्तिनिष्ठ काव्यावर भर दिला आहे. सुबहे-उम्मीद, ख्वाबे-अमन, गंजे-कनाअत इ. विषयनिष्ठ मस्‌नवियाँ (काथाकाव्ये) त्यांनी लिहिल्या. हालींच्या तुलनेत आझादांच्या काव्यात पसरटपणा जास्त आढळतो तथापि वैचारिकता व नैतिक उपदेशावर त्यांचा अधिक भर आहे. सर्वसामान्य विषयांवर त्यांनी आपली काव्यरचना केली. त्यातील साधेपणा व सुस्पष्टता विशेष लक्षणीय आहे. त्यांच्या अधिकांश कविता सामान्य आहेत. त्यांचे गद्य मात्र आकर्षक व काव्यात्म आहे.

त्यांची उल्लेखनीय ग्रंथरचना पुढीलप्रमाणे : कायदा और कवायदे उर्दू जामेउल कवायद हिंद (२ भागांत), आबे हयात, नैरंगे खयाल (रूपक–१८८०), सुखनदाने फारस, कंदे फारसी, नसीहत का करनफूल, दीवाने जौक (संपा.), नज्मे आजाद (१८९९), दरबारे अकबरी, सिपाकोनकम, जानवरिस्तान, अल्‌हयात इत्यादी.

आझादांनी आबे हयात हा गंथ लिहून उर्दू काव्याच्या इतिहासाला योग्य दिशा दाखवली. तो उर्दू काव्याचा आद्य इतिहासग्रंथ म्हणता येईल. त्यात प्रमुख कवींची चरित्रे, काव्यसमीक्षा व काव्यांचे नमुने दिलेले आहेत. उर्दू भाषेचा क्रमिक इतिहास आणि विविध कालखंडामधील तिच्या विकासाची कारणमीमांसाही त्यांनी त्यात केली आहे. सुंदर चित्ताकर्षक शैली हा त्याचा आणखी एक विशेष होय. उर्दू समीक्षेचा पाया घालण्याचे आणि मौलाना ⇨ हालींना यादगारे गालिबचे लिखाण करण्यास अप्रत्यक्ष रीत्या प्रवृत्त करण्याचे श्रेय या ग्रंथाकडे जाते. उर्दू काव्याबाबत अभिरूची निर्माण करण्यात या ग्रंथाचा जास्त वाटा फार मोठा आहे. दीवाने जौक ह्या त्यांच्या जौकवरील संपादित समीक्षाग्रंथात त्यांनी सैद्धांतिक आणि उपयोजित समीक्षेचा सुंदर समन्वय साधला आहे. उर्दू समीक्षेच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी आपल्या चिकित्सक व दर्जेदार समीक्षेने उर्दू समीक्षेची आणि गद्याची क्षितिजे खूपच व्यापक केली.

आजम, मुहंमद