राहुल सांकृत्यायनराहुल सांकृत्यायन : (९ एप्रिल १८९३−१४ एप्रिल १९६३. जागतिक कीर्तीचे भारतीय महापंडित व लेखक. त्यांचा जन्म उत्तर प्रदेशात कनैला (जि. आझमगढ) या गावी एका ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांचे मूळ नाव केदारनाथ व कुलनाम पांडे. माता पिता कुलवंती व गोवर्धन. बौद्ध धर्माची दिक्षा घेतल्यानंतर केदारनाथांनी राहूल हे नाव धारण केले व ‘सांकृत्य’ हे त्यांचे गोत्र असल्याने ते ‘राहूल सांकृत्यायन’ ह्या नावाने प्रख्यात झाले. वयाच्या पंधराव्या वर्षी उर्दू मिडल स्कूल परिक्षा उत्तीर्ण झाल्यावर ते घरातून पळून गेले. वयाच्या अकराव्या वर्षीच त्यांचा विवाह झाला होता पण हा अजाणतेपणी झालेला विवाह म्हणून त्यांनी त्याचे बंधन मानले नाही. अठराव्या वर्षी ते वाराणसीला गेले व तेथे त्यांनी संस्कृत आणि भारतीय तत्त्वज्ञानाचे अध्ययन केले. त्यांना केवळ विद्वत्ता नको होती, तर साधू व्हायचे होते. त्यांची विरक्त वृत्ती पाहून छप्रा गावच्या एका महंताने त्यांना वैष्णव धर्माची दीक्षा देऊन त्यांचे पंथीय नाव ‘रामोदार साधू’ असे ठेवले. काही काळ तेथील मठपती म्हणूनही त्यांनी काम पाहिले. नंतर ते छाप्रा गाव सोडून द. भारताच्या तीर्थयात्रेस गेले.

त्यांनी सबंध भारताचा प्रवास केला. त्यांच्या वृत्तीत स्वतःस झोकून देण्याची उत्कटता होती. एकदा मनाने घेतलेल्या गोष्टींकडे ते उत्कटपणे घाव घेत व तिचा संपूर्ण व सखोल वेध घेत. दक्षिण भारताची तीर्थयात्रा सोडून ते अयोध्येस आले व त्यांनी संस्कृत पाठशाळेत वेदान्ताचा सखोल अभ्यास केला. अयोध्येसच ते ⇨आर्यसमाजाकडे आकृष्ट झाले व त्यांनी दयानंदांच्या सत्यार्थ प्रकाशाचे सखोल अध्ययन केले. आर्यसमाजाच्या विचारांचा त्यांच्यावर खूपच प्रभाव पडला. अयोध्येहून ते आग्र्याजस गेले व तेथील आर्यसमाजाच्या विद्यालयात दाखल झाले. ख्रिस्ती व इस्लाम धर्मीय आपल्या धर्मप्रसारासाठी आटोकाट प्रयत्नच करतात व हिंदूंवर आघात करतात, म्हणून त्यांनी विरक्त, विद्वान व संघटनाकुशल अशा हिंदू तरूणांची मिशनरी वृत्तीने काम करणारी संघटना उभारण्याचा प्रयत्नर केला.

रशियात १९१७ मध्ये झालेल्या क्रांतीने ते प्रभावित झाले आणि क्रांतीकडे व साम्यवादाकडे आकृष्ट झाले. त्यांनी साम्यवादी तत्त्वज्ञान सखोलपणे अभ्यासिले. बाइसवी सदी (१९३३) हा त्यांचा ग्रंथ याचेच फलित. मार्क्सवादावर त्यांनी बरेच लेखन करून त्याचा प्रचारही केला. साम्यवाद ही क्यो ? (१९३४), सोविएत न्याय (१९३९), मानव समाज (१९४२), आजकी समस्याएँ (१९४४), आजकी राजनीति (१९४९) इ. त्यांचे राजनीतीवरील उल्लेखनीय ग्रंथ होत.

नंतर ते बौद्ध धर्माकडे आकृष्ट झाले. त्यांनी पाली भाषा-साहित्याचे व बौद्ध धर्म-तत्त्वज्ञानाचे सखोल अध्ययन केले. लखनौ येथील बोधानंद भिक्षू यांच्याशी परिचय झाल्यावर त्यांनी त्यांच्यासमवेत अनेक बौद्ध तीर्थक्षेत्रांची यात्रा केली. त्यांना यात्रेत परदेशी भिक्षूही भेटले. भारताबाहेरही बौद्ध धर्माचा प्रसार बराच आहे, असे समजल्यावर त्यांनी त्या त्या देशांच्या भाषा व लिपी यांचा अभ्यास केला. उर्दू, हिंदी, संस्कृत−प्राकृत, पाली−अपभ्रंश, इंग्रजी, अरबी, फार्सी, फ्रेंच, तमिळ, कन्नड, चिनी, तिबेटी, जपानी, रशियन, इ. भाषांवर त्यांचे चांगले प्रभुत्व होते.

बौद्ध धर्माकडे ते अधिकाधिक आकृष्ट झाले आणि त्यांनी श्रीलंकेत जाऊन बौद्ध धर्माची दीक्षा घेतली (१९३०). साम्यवाद व बौद्ध धर्म−तत्त्वज्ञान या दोहोंच्या समन्वयाने त्यांचे विचार समतोल व अधिक तेजस्वी बनले. सनातन धर्माकडून आर्यसमाजाकडे, तेथून साम्यवादाकडे, तेथून बौद्ध धर्माकडे व शेवटी मानव धर्माकडे असा त्यांच्या वैचारिक प्रवास झाला.

मध्यंतरी १९२१ मध्ये त्यांनी गांधीजींच्या हाकेस प्रतिसाद देऊन स्वातंत्र्याच्या आंदोलनात उडी घेतली. १९२२ मध्ये सहा महिने आणि १९२३ ते २५ ह्या काळात दोन वर्षे त्यांनी तुरुंगवासही भोगला. तुरुंगात त्यांचा व्यासंग व लेखन सुरूच होते.

नंतर १९२७ मध्ये ते बौद्ध धर्माच्या अभ्यासासाठी संस्कृतचे अध्यापक म्हणून श्रीलंकेत गेले. नंतर ते अधिक सखोल अध्ययनासाठी नेपाळमार्गे तिबेटात ल्हासा येथे गेले. तिबेटमधून ते १९३० मध्ये पुन्हा श्रीलंकेत गेले. नंतर बौद्ध धर्मप्रचारासाठी ते १९३२ मध्ये लंडन येथे व तेथून यूरोपात गेले. यूरोपात ते सु. तीन महिने होते. १९३३ मध्ये ते पुन्हा युरोपातून श्रीलंकेत गेले व तेथून भारतात परतले व तेथून पुन्हा दुसऱ्यांदा जमू−काश्मीरमार्गे लडाख येथे गेले. या प्रवासात त्यांनी सुत्तपिटकातील प्रख्यात ग्रंथ मज्झिमनिकायचा हिंदीत अनुवाद केला (१९३३). नंतर त्यांनी पुढे धम्मपद (१९३३), विनयपिटक (१९३४), दीघनिकाय (१९३५) यांचे हिंदीत अनुवाद केले. तसेच आनंदकौशल्यायन व जगदीश काश्यप यांच्या सहकार्याने खुद्दकनिकायचे अकरा ग्रंथ देवनागरीत आणले. तसेच त्यांनी बुद्धचर्या (१९३०), महामानवबुद्ध (१९५६) हे बुध्दाचे चरित्र असलेले ग्रंथ हिंदीत लिहिले.

बिहारात १९३४ मध्ये मोठा भूकंप झाला. तेव्हा भूकंपग्रस्तांच्या सेवेसाठी ते बिहारमध्ये राहिले. नंतर ते पुन्हा सिक्कीममार्गे तिबेटात ल्हासा येथे गेले. तिबेटमध्ये जाण्याचा त्यांचा हेतू भारतात उपलब्ध नसलेल्या संस्कृत ग्रंथाचा शोध घेणे हा होता. हे ग्रंथ मूळ वा अनुवाद रूपात तिबेटमध्ये उपलब्ध असावेत, अशी त्यांची धारणा होती.

नंतर ते पूर्वेकडील बौद्ध धर्मीय देशांत−ब्रह्मदेश, थायलंड, जपान, कोरिया इ. गेले. १९३५ मध्ये ते जपानला पोहोचले. या यात्रेवरून परतल्यावर ते परत नेपाळमार्गे तिबेटात गेले. या तिबेट यात्रेत त्यांना अनेक अत्यंत महत्त्वाचे प्राचीन ग्रंथ मिळाले व ते त्यांनी भारतात आणले. त्यांनी तिबेटी ग्रंथ ‘कंजूर’ (मूळ बुद्धवचनांचे अनुवाद-ग्रंथ−संख्या १,१०८)−‘तंजूर’ (अनुवादित भाष्यग्रंथ−संख्या ३,४५८) सह, तसेच अनेक संस्कृत हस्तलिखितांच्या छायाप्रती वा नकला करून आणल्या. हा महत्त्वपूर्ण प्राचीन ग्रंथसंभार पाटणा येथील ‘बिहार रिसर्च सोसायटी’ व के. पी. जयस्वाल रिसर्च इन्स्टिट्यूट च्या ग्रंथालयांत जतन करून ठेवला आहे. त्यांनी तिबेटातील मठांतून भारतातून नष्ट झालेल्या प्राचीन संस्कृत ग्रंथांच्या आणलेल्या छायाप्रतींत वसुबंधुकृत अभिधर्मकोश-भाष्य, अभिधर्मदीप महासांधिकांचे प्रतिमोक्षसूत्र, अर्थविनिश्चयसूत्र टीकेसहीत दुर्वेकृत धर्मोत्तर प्रदीप, प्रमाणवार्तिक भाष्य (संपा. १९५३), योगाचारभूमि, विनयसूत्र व त्यावरील वृत्ती आणि टीका वगैरेंचा प्रामुख्याने निर्देश करावा लागेल.

इराणमार्गे ते १९३७ मध्ये रशियात गेले. ही त्यांची रशियाची दुसरी यात्रा होती. यावेळी लेनिनग्राड येथील ‘ओरिएंटल इन्स्टिट्यूट’ मध्ये ते प्राध्यापक म्हणून गेले. ह्या संस्थेच्या सचिव एलेना ह्या होत्या. एलेना (लोला) पुढे त्यांच्या पत्नी झाल्या. त्यांना पुन्हा एकदा तिबेटात जायचे होते. म्हणून ते लवकरच भारतात परतले व त्यांनी तिबेटचा प्रवास केला. नंतर त्यांनी भारताच्या गरीब जनतेची सेवा करण्यासाठी व ‘किसान मजदूर राज्य’ भारतात आणण्यासाठी राजकाणात सक्रीय भाग घेतला. परिणामी ते एकूण अडीच वर्षे तुरुंगात होते. तुरुंगात त्यांनी लेखन करून हिंदी साहित्यात मोलाची भर घातली. वोल्गा से गंगा (१९४४) हा तुरुंगात लिहिलेल्या त्यांच्या नितान्तसुंदर हिंदी कथांचा संग्रह असून, भारतीय व परदेशी अशा १५ भाषांत ह्या कथा अनुवादित झाल्या आहेत.

पुन्हा त्यांना रशियाचे निमंत्रण आले. त्यानुसार सु. दोन वर्षे रशियात राहून ते भारतात परतले. १९४९ मध्ये हैदराबाद येथे भरलेल्या अखिल भारतीय हिंदी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांना बहाल करून त्यांचा गौरव करण्यात आला, या वेळी त्यांच्या खाजगी सचिव नेपाळी महिला कमला त्यांच्या सोबत होत्या. पुढे त्या त्यांच्या पत्नीच झाल्या. एलेनापासून त्यांना इगोर राहुलोविच आणि कमलापासून जया, जेता ही संतती झाली.

मसूरी येथील वास्तव्यात त्यांनी मध्य एशियाका इतिहास (२ भाग−१९५२) तसेच ‘हिमालय परिचय’ योजनेच्या अंतर्गत अनेक महत्त्वपूर्ण ग्रंथ लिहिले. १९५४ मध्ये त्यांनी कार्ल मार्क्स, लेनिन, स्तालिन आणि माओ-त्से-तुंग यांची चरित्रे लिहिली. मेरी जीवनयात्रा (३ खंड−१९५१) हे त्यांचे आत्मचरित्र होय. १९५८ मध्ये ते विमानाने चीनला गेले. तेथे ते साडेचार महिने होते. भारतात परतल्यावर श्रीलंकेच्या निमंत्रणावरून ‘विद्यालंकार’ विद्यापीठात ते तत्त्वज्ञान विभागाचे प्रमुख म्हणून १९५९ मध्ये गेले. शेवटी १९६१ भव्ये प्रकृत्ती बरी नसल्याने ते भारतात परतले. त्यांना स्मृतीभ्रंश जडला व नंतर त्यातच दार्जिलिंग येथे त्यांचे निधन झाले.

असामान्य पांडित्यामुळे त्यांना ‘महापंडित’, ‘महामानव’, तसेच बौद्ध ग्रंथाच्या सखोल अध्ययनामुळे ‘त्रिपिटकाचार्य’ अशी गौरवपूर्ण अभिधाने बहाल केली गेली. बौद्ध देशांतून तसेच रशिया आदी देशांतून त्यांना खूप मानसन्मान लाभले. भारतातही त्यांना सन्मान्य डॉक्टरेट आणि साहित्य अकादेमी पुरस्कार दिला गेला. भारत सरकारने ‘पद्मभूषण’ देऊन त्यांना गौरविले.

लहानपणापासूनच त्यांनी सातत्याने विपुल लेखन केले. हिंदीत मेरी लद्दाख यात्रा (१९२६), तिब्बतमे सवा वर्ष (१९३९), मेरी यूरोप यात्रा (१९३२), जापान (१९३५) इ. प्रवासवर्णने त्यांनी लिहिली. हिंदी कथा, कादंबरी क्षेत्रातही त्यांनी मोलाची भर घातली (कथा: सतमी के बच्चे –१९३५, बहुरंगी मधुपुरी –१९५३, कनैलाकी कथा–१९५५–५६ इत्यादी. कादंबऱ्या : जीनेके लिए−१९४०, जय योधेय−१९४४, विस्मृत यात्री−१९५४ इ.) त्यांच्या कथा-कादंबऱ्यांतून सांस्कृतिक आणि ऐतिहासिक जीवनाचे दर्शन घडते. केवळ प्राचीन परंपरेला न अनुसरता इतिहाससंशोधनाच्या वृत्तीने त्यांनी आपल्या पात्रांचे जीवनचरित्र, सामाजिक परिस्थिती इत्यादींचे चित्रण केले. संस्कृत-प्राकृतादी प्राचीन भाषांतील ग्रंथ त्यांनी हिंदीत भाषांतरित करून हिंदी भाषेला अधिक संपन्न केले. त्यांच्या ग्रंथाची एकूण संख्या १५० वर भरते. धर्म, तत्त्वज्ञान, राजनीती, इतिहास, पुरातत्त्व, समाजशास्त्र, प्राच्यविद्या, व्याकरण, संस्कृती, भाषा-साहित्य, कोश, विज्ञान, चरित्र, आत्मचरित्र, निबंध, कथा-कादंबरी, नाटक, प्रवासवर्णन, देशदर्शन इ. विषयांवर व प्रकारांत त्यांनी दर्जेदार लेखन केले. हिंदीशिवाय त्यांनी संस्कृत, अपभ्रंश व तिबेटितही ग्रंथ लिहिले व अनेक प्राचीन संस्कृत ग्रंथ उत्तम प्रकारे संपादून प्रकाशात आणले, त्यांच्या लेखनाचा आणि विद्वत्तेचा आवाका फार विशाल असल्याचे त्यांच्या प्रकाशित ग्रंथांच्या यादीवर सहज नजर टाकली, तरी लक्षात येते.

संदर्भ : 1. Chaturvedi, Banarasi Prasad, Mahapandit Rahul Sankritayan, Benares, 1940.

२. उपाध्याय, गुप्तेश्वरनाथ, राहुल सांकृत्यायन के गद्य साहित्यका शैलीगत अध्ययन, वाराणसी, १९७६.

३. खेलचंद (आनंद), महापंडित राहुल सांकृत्यायन के सृजनात्मक साहित्यका अध्ययन, नवी दिल्ली, १९७३.

४. मिश्र, प्रभाशंकर, राहुल सांकृत्यायन क कथासाहित्य का अध्ययन, दिल्ली, १९६७.

दुबे, चंदूलाल द्रविड, व्यं. वि. बापट, पु. वि.