मेंफिस–२ :प्राचीन ईजिप्तच्या जुन्या राजवटीतील (कार. इ. स. पू. सु. ३१००–२२५८) राजधानीचे नगर. कैरोपासून १८ किमी. अंतरावर नाईल नदीच्या त्रिभुज प्रदेशाच्या टोकाशी ते वसले आहे. ईजिप्तचा पहिला राजा मीनीझ याने ते वसविले, असे मानतात. थीब्झ राजवटीच्या अंमलात मेंफीस महत्त्वाचे नगर होते व तेथे इराणी क्षत्रप ( इ. स. पू. सु. ५३५) राहात. रोमन अंमलातही अलेक्झांड्रियाच्या खालोखाल या शहराचे महत्त्व होते. शेजारच्या फु-स्तात या अरबांनी उभारलेल्या शहरामुळे मेंफिसचे महत्त्व कमी झाले. येथील नगरदेवता प्ताह हिचे देवालय, जुना राजवाडा, दुसऱ्या रॅमसीझ राजाचा भव्य पुतळा इ. अवशेष या नगराच्या परिसरात सापडले आहेत. मेंफिसजवळच नाईलच्या पलीकडे पिरॅमिड आहेत.

मिसार, म. व्यं.