वेडा राघूवेडा राघू : हा चिमणीएवढा एक गोजिरवाणा पक्षी आहे, पण चिमणीच्या शेपटीपेक्षा याची शेपटी लांब असते. शरीर सडपातळ व सु. २३ सेंमी. लांब असते. याचे शास्त्रीय नाव मेरॉप्स ओरिएंटॅलिस आहे. याच्या शरीराचा रंग हिरवा असतो, डोके व मान यांवर सोनेरी तपकिरी आणि हनुवटी व गळा यांवर निळी छटा असते गळ्यावर आडवा काळा पट्टा असतो. चोच लांब, बारीक, काळी आणि थोडी बाकदार असते. तिच्या बुडापासून काळा पट्टा निघून डोळ्यांच्या मागे जातो. डोळे लाल-भडक आणि पाय शिशासारख्या काळसर रंगाचे असतात. शेपटी लांब असून तिच्या मध्यावरची दोन पिसे जास्त लांब, शेपटीच्या बाहेर आलेली आणि सळईसारखी असतात. नर आणि मादी दिसण्यात सारखीच असतात. यांची जोडपी किंवा लहान थवे असतात.

हिमालयाच्या सु. १,५२५ मी. उंचीपासून खाली सबंध भारतात ह पक्षी आढळतो. याशिवाय श्रीलंका, म्यानमार, थायलंड या देशांतही तो सापडतो. खुल्या मैदानी प्रदेशांत म्हणजे शेते, पडीक जमीन, बागा, जंगलातील उघडया जागा यांच्या जवळपास राहणारा हा पक्षी आहे. झाडांच्या पुढे आलेल्या उघडया फाद्यांवर हा पुष्कळदा बसलेला दिसतो परंतु याची बसण्याची आवडती जागा म्हणजे तारायंत्राच्या आणि दूरध्वनीच्या तारा होत. या तारांवर ते नेहमी ओळीने बसलेले दिसतात. या ठिकाणी बसून ते भक्ष्याची टेहळणी करीत असतात आणि उडत असलेली एखादी माशी किंवा किडा टिपतात. पंख असलेल्या किडयांवरच हा उदरनिर्वाह करतो. याचा आवाज साधारण मोठा पण मंजुळ असतो. तिन्हीसांजेच्या सुमारास दीडशे-दोनशे वेडे राघू गर्द पालवी असलेल्या एखाद्या झाडावर जमून खूप गोंगाट करतात आणि अंधार पडल्यावर तेथेच गुपचूप झोपी जातात. अस्वस्थता व उगाचच उडया मारण्याच्या प्रवृत्तीमुळे याला वेडा राघू हे नाव पडले असावे. निळ्या शेपटीचा वेडा राघू (मेरॉप्स फिलिपीनस) मात्र या वेडया राघूपेक्षा मोठा असतो.    

वेडया राघूंचा विणीचा हंगाम फेब्रुवारीपासून मेपर्यंत असतो. नर व मादी मिळून एखाद्या दरडीत किंवा टेकाडात सु. ०.७५ ते १ मी. लांब बोगदा आणि त्याच्या शेवटाला एक कोटर तयार करुन ⇨घरटे बनवितात. या कोटरात मादी ३ ते ५ तकतकीत पांढरी अंडी घालते. अंडी उबविणे व पिलांना खाऊ घालणे ही कामे नर व मादी आळीपाळीने करतात.                                    

कर्वे, ज. नी.