प्यॉटर क्रपॉटक्यिन

क्रपॉटक्यिन, प्यॉटर : (१२ डिसेंबर १८४२–८ फेब्रुवारी १९२१). रशियातील अराज्यवादी चळवळीचा पुरस्कर्ता, क्रांतिकारक आणि भूगोलवेत्ता. मॉस्को येथे उमराव घराण्यात जन्मला. त्याचे सुरुवातीचे शिक्षण उमरावांच्या विद्यालयात झाले. काही दिवस राजवाड्यात नोकरी केल्यानंतर त्याची सायबीरियाच्या गव्हर्नरच्या हाताखाली लष्करी अधिकारी म्हणून नेमणूक झाली. तेथे असताना १८६४ मध्ये त्याच्याकडे सायबीरियाची भौगोलिक पाहणी करण्याचे काम दिले. तेथील पाच वर्षांच्या वास्तव्यात त्याने सायबीरिया व पुढे १८७१–७३ मध्ये फिनलंड व मँचुरिया यांचे समन्वेषण केलेअमूर नदीच्या प्रवाहाच्या संशोधनाचेही कार्य केले, तसेच मध्य आशियासंबंधी तत्कालीन माहिती चुकीची असल्याचे सिद्ध केले. याशिवाय त्याने अनेक प्राण्यांच्या उद्‍बोधक सवयींचा, भूविज्ञानाचा आणि पूर्व आशियातील पर्वतांच्या संरचनेचा शास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास केला. १८६७ मध्ये त्याने लष्करी नोकरी सोडून मॉस्को विद्यापीठात कार्यवाहाची नोकरी पतकरली. त्याने फील्ड्ज, फॅक्टरीज अँड वर्कशॉप्स (१९०१) या ग्रंथात उद्योगधंद्यांचे विकेंद्रीकरण करून शेतीची इतर व्यवसायांशी सांगड घालणे किती आवश्यक आहे, हे दाखवून दिले.

स्वित्झर्लंड येथे १८७२ साली त्याची अराज्यवादी रशियन क्रांतिकारक बकून्यिनशी गाठ पडली. त्याच्या विचारांचा प्रभाव क्रपॉटक्यिनवर पडला. परंतु बकून्यिनचा दहशतवादी मार्ग त्याला पसंत नव्हता. म्हणून रशियात परतल्यानंतर त्याने अराज्यवादी चळवळ सुरू केली. यामुळे १८७४ मध्ये त्यास अटक करण्यात आली. तो तुरुंगातून १८७६ मध्ये पळून फ्रान्समध्ये गेला. तेथेही त्यास तीन वर्षे तुरुंगवास घडला. पण पुढे क्लेमांसोच्या मदतीने त्याची सुटका झाली. पुढे १९१४ पर्यंत तो इंग्लंडमध्येच राहिला. या प्रदीर्घ वास्तव्यात त्याने दोन वेळा अमेरिकेचा दौरा केला. १९१७ च्या रशियन क्रांतीनंतर तो रशियात आला. त्याने रशियन क्रांती व पहिले महायुद्ध यांचे स्वागत केले. त्याने अराज्यवाद, क्रांती, विकेंद्रीकरण, भूगोल वगैरेसंबंधीचे विचार विविध स्फुटलेख व पुस्तकांद्वारे मांडले. क्रपॉटक्यिनच्या अराज्यवादी तत्त्वज्ञानात समाजवाद अथवा साम्यवाद या विचारप्रणालीप्रमाणे खासगी मालमत्ता नष्ट करण्याची मागणी आहे. राज्यसत्तेचे विसर्जन करावे, हाही विचार त्यामध्ये आहे. त्याने रशियन भाषेशिवाय इंग्रजी आणि फ्रेंच भाषांतूनही लेखन केले आहे. द काँक्वेस्ट ऑफ ब्रेड (१८९२), मॉडर्न सायन्स अँड अनार्किझम (१९०३), मेम्वार्स ऑफ ए रेव्होल्युशनिस्ट (२ खंड, १८९९, १९०६), टेरर इन रशिया (१९०९) वगैरे त्याचे महत्त्वाचे ग्रंथ आहेत. तो मॉस्को येथे मरण पावला.

धारूरकर, य. ज.