दत्त संप्रदाय : दत्तात्रेयास उपास्यदैवत मानणाऱ्यांचा धर्मपंथ. पंधराव्या शतकात ⇨नरसिंह सरस्वती  नावाच्या महाराष्ट्रीय विभूतीमुळे दत्तोपासनेचा संप्रदाय बनला. पुराणे व अर्वाचीन पाच उपनिषदांतून दत्तास वर्णाश्रमधर्माची प्रतिष्ठा राखणारा, गुरुतत्त्वाचा आदर्श आणि योगाचा उपदेशक म्हटले आहे. दत्तात्रेय हा अवधूत जोगी आहे म्हणून ⇨नाथ संप्रदायातही त्याची उपासना होते. नाथ संप्रदायास त्यावरूनच ‘अवधूत’ पंथ असे म्हटले जाते. नाथ संप्रदायात दत्त व ⇨ गोरखनाथ  यांच्या संबंधाबाबतच्या अद्‌भुत कथा रूढ आहेत. महानुभाव पंथाचे आदिकारण दत्त होय, असे ⇨ चक्रधरांनी म्हटले आहे. त्यांचा दत्तात्रेय त्रिमुखी नसून तो एकमुखी, चतुर्भुज आहे. तो परब्रह्माचा अवतार आहे. सूत्रपाठ, लीळाचरित्र इ. महानुभव ग्रंथांतूनही दत्तमाहात्म्य वर्णिले आहे. ⇨वारकरी  संप्रदायातील संतांनी तसेच आनंद संप्रदायी लोकांनी दत्तात्रेयाविषयी आदर व्यक्त केला आहे. दत्तात्रेयाने प्रवर्तिलेल्या चैतन्य संप्रदायाच्या एका शाखेत एकोणिसाव्या शतकात भैरव अवधूत नावाचे एक सत्पुरुष झाले. त्यांनी आपल्या ज्ञानसागरनामक ग्रंथात दत्तोपासनेचा प्रचार केला आहे.

दत्तोपासना पूर्वीपासून होत असली, तरी तिला संप्रदायाचे स्वरूप नरसिंह सरस्वतींच्या प्रभावामुळेच आले. श्रीपाद श्रीवल्लभ हे दत्तात्रेयाचे पहिले अवतार होत. तर नरसिंह सरस्वती हे दुसरे अवतार मानले जातात. जनार्दन स्वामी, एकनाथ, दासोपंत, मुक्तेश्वर, निरंजन रघुनाथ, माणिक प्रभू, अक्कलकोटकर स्वामी, वासुदेवानंद सरस्वती इ. महापुरुषांनी संप्रदायाची परंपरा चालू ठेवली. आजही अनेक दत्तोपासक महाराष्ट्रात आढळतात.

दत्तात्रेय हा महायोगी असल्याने योगमार्गास पंथात प्राधान्य मिळाले. महाराष्ट्रातील बहुतेक योगमार्गी दत्तोपासकच होते. या संप्रदायात शैव आणि वैष्णव तसेच हिंदू व मुसलमान यांच्यात समन्वय साधला आहे. माणिक प्रभूसारख्यांनी समन्वयवादी विचार मांडले असले, तरी या संप्रदायातील अवतारी पुरुषांनी वर्णाश्रमधर्मावरच जोर दिला आहे. दत्तमाहात्म्य  व दत्तप्रबोध  ह्या ग्रंथांत ह्या संप्रदायाचे तत्त्वज्ञान आले आहे. गुरुचरित्रात संप्रदायाचा आचारधर्म सांगितला आहे. अवधूतगीता, गुरुगीताजीवन्मुक्तगीता  ह्या ग्रंथांतून संप्रदायाच्या सिद्धांतांचे विवरण आढळते. पूजोपचारांसाठी मूर्तीऐवजी पादुका प्रशस्त मानल्या आहेत. औदुंबर, नरसोबाची वाडी व गाणगापूर ह्या क्षेत्री दत्तात्रेयाच्या पादुकांची स्थापना केलेली आहे. पांचाळेश्वर, नरसोबाची वाडी, माहूर, गाणगापूर, लाड कारंजे, कुरुगड्डी, गिरनार ही या संप्रदायाची प्रमुख क्षेत्रे होत. पंथाचा प्रसार महाराष्ट्राइतका अन्यत्र आढळत नाही. नरसिंह सरस्वतींचा निवास गाणगापूरला झाल्यामुळे कर्नाटकात दत्त संप्रदायाचा विपुल प्रसार झाला. मराठी गुरुचरित्र  लिहिणारा गृहस्थ हा कानडी होता. आंध्रामधल्या दत्त संप्रदायाची माहिती वेंकटराव यांनी आपल्या लेखात दिली आहे. या संप्रदायात मान्यता पावलेले अनेक ग्रंथ तेलगू भाषेत लिहिले गेले आहेत. सौराष्ट्रात गिरनार येथे दत्तोपासनेची प्रेरणा घेतलेला बाबा किनराम अघोरी या नावाचा एक सत्पुरुष अठराव्या शतकाच्या आरंभी होऊन गेला. गिरनार येथे मला दत्तात्रेयाचा साक्षात्कार झाला, असे त्याने आपल्या विवेकसार  नावाच्या ग्रंथात लिहिले आहे.

संदर्भ: 1. Joshi, H. S. Origin and Development of Dattatreya Worship in India , Baroda, 1965.

          2. Wadiyar, Chamaryendra, Dattatreya, The Way and the Goel, London, 1957.

          ३. ढेरे, रा. चिं. दत्त संप्रदायाचा इतिहास, पुणे, १९६४.

भिडे, वि. वि.