लाल मुनिया (नर)

मुनिया : प्लोसीइडी कुलातील एस्ट्रिल्डिनी या उपकुलातला हा पक्षी आहे. महाराष्ट्रात काही ठिकाणी याला ‘चिवळ’ म्हणतात, तर गुजरातेत ‘अमदावत’ म्हणतात पण याचे मुनिया हे नाव सबंध भारतात रूढ झालेले आहे. मुनियाच्या ६–७ जाती भारतात आहेत पण त्यांपैकी ‘लाल मुनिया’ ही सगळीकडे आढळणारी असून तिचे शास्त्रीय नाव एस्ट्रिल्डा अमनदावा असे आहे.

लाल मुनिया हिमालयाच्या पायथ्याच्या टेकड्यांपासून (सु. ६१० मी. उंचीपासून) खाली कन्याकुमारीपर्यंत सगळीकडे आढळते. नीलगिरी पर्वतात तर ती १,८३० मी. उंचीवरही दिसून येते परंतु भारताच्या वायव्य भागातील रुक्ष आणि उजाड प्रदेशांत मात्र ती आढळत नाही.

मुनिया चिमणीपेक्षा लहान असते. प्रजोत्पादनाचा काळ वगळला तर इतर काळात नर जवळजवळ मादीसारखाच दिसतो. दोहोंचीही वरची बाजू तपकिरी असून तीवर पांढरे ठिपके विखुरलेले असतात खालची बाजू मळकट केशरी रंगाची कमर किरमिजी पंख तपकिरी हनुवटी व गळा पांढुरका डोक्याच्या दोन्ही बाजू, मान व छाती भुरकट तपकिरी चोच आखूड, तांबडी डोळे नारिंगी-लाल पाय तपकिरी. विणीच्या हंगामात नराचे शरीर किरमिजी रंगाचे आणि त्यावर पांढरे ठिपके पोट आणि शेपटीचा खालचा भाग काळा पंख तपकिरी असतात.

पाण्याच्या (तलाव, नद्या, तळी वगैरे) काठी असणारी लव्हाळ्यांचीं व बोरूंची बेटे, दाट, गवत किंवा झुडपे अशा ठिकाणी यांचे थवे असतात. धान्य आणि सर्व प्रकारच्या गवतांचे बी हे यांचे भक्ष्य होय. लाल मुनिया चलाख आणि आनंदी वृत्तीची असते. हिचे चिवचिवणे मंजूळ असते. यामुळे पुष्कळ लोक ही पिंजऱ्यात बाळगतात. या पक्ष्याची यूरोपात बऱ्याच मोठ्या प्रमाणावर निर्यात होते.

प्रजोत्पादनाचा काळ जूनपासून ऑक्टोबरपर्यंत (मुख्यतः पावसाळा) असतो. घरटे वाटोळे व गवताचे बनविलेले असते. आतून त्याला बारीक गवत आणि मऊ पिसांचे अस्तर असते. गवताच्या झुपक्यात, लव्हाळ्यांच्या बेटात किंवा दाट झुडपात जमिनीपासून सु. हातभर उंचीवर ते बांधलेले असते. मादी पांढऱ्या रंगाची ४–७ अंडी घालते. घरटे बांधणे, अंडी उबविणे व पिल्लांना भरविणे ही कामे नर व मादी दोघेही करतात.

कर्वे, ज. नी.