लेपर्ड : मांसाहारी गणाच्या मार्जार कुलात (फेलिडीत) या प्राण्याचा समावेश होतो. तो वाघाच्या प्रजातीतील असून पॅंथेरा पार्डस हे त्याचे शास्त्रीय नाव आहे. भारतात तो पॅंथर या नावानेही ओळखला जातो आणि पूर्वी त्याची पार्ड किंवा पार्डस अशीही नावे होती. मूलतः लेपर्ड हे नाव चित्ता (तथाकथित शिकारी लेपर्ड) म्हणून संबोधिल्या जाणाऱ्या प्राण्याला देण्यात येई. पार्ड किंवा पार्डस आणि लायन (सिंह) यांच्या संकराने चित्ता निर्माण झाला असे पूर्वी मानीत आणि यावरूनच लेपर्ड हे नाव आले आहे. पार्ड हे नाव वापरातून गेल्यावर त्याची जागा लेपर्ड या नावाने घेतली. लेपर्ड व पॅंथर हा एकच प्राणी आहे. जातीजातींमध्ये आढळणाऱ्या मोठ्या बदलांमुळे नावांमधील गोंधळ निर्माण झाला होता. मराठीत हा प्राणी डाहाण्या वाघ, ढाण्या वाघ, बिबळ्या, बिबट्या इ. नावांनीही ओळखला जातो. [⟶बिबळ्या].

जमदाडे, ज. वि.