व्हाल्टर (वॉल्टर) फोन डर फोगेलवायड : (सुमारे ११७० – सु. १२२८). मध्ययुगातील एक श्रेष्ठ जर्मन भावकवी. त्याचे जन्मस्थळ, आईवडील इत्यादींबाबत निश्चित माहिती उपलब्ध नाही. एका ख्रिस्ती मठाच्या शाळेत त्याचे औपचारिक शिक्षण झाले, असे त्याच्या कवितेतील काही संदर्भांवरून दिसते. तरुण वयातच तो व्हिएन्ना येथील फ्रीडिख फोन बॅबेनबर्ग ह्याच्या दरबारी दाखल झाला. तेथेच ⇨ मिनस्येंगर राइनमार फोन हागनाऊ ह्याने त्याला ‘मिनसाँग’ ह्या प्रकारातील काव्यरचनेचे शिक्षण दिले. मिनस्येंगर हे एक विशिष्ट प्रकारची काव्यरचना करणारे राजकुळांतील वा उमराव-घराण्यांतील जर्मन कवी होत. त्यांच्या कवितेला ‘मिनसाँग’ असे म्हटले जाते. ह्या काव्याचे आशयविषयक काही संकेत होते. उदा. अप्राप्य स्त्री विषयीचा भक्तिभाव किंवा सेवाभाव तसेच शरीरनिरपेक्ष आत्मिक प्रेम इत्यादी. ‘मिनसाँग’चा मुख्य विषय प्रेम हा असला, तरी निसर्गवर्णने, तत्कालीन घटनांचे निर्देशही – उदा., धर्मयुद्धे – त्यांतून येतात. ही कविता मुख्यत: गाण्यासाठी होती. व्हाल्टरने ह्या काव्यरचनेच्या तंत्रावर प्रभुत्व मिळवले, तसेच काही संकेतांच्या कक्षेबाहेर जाऊनही त्याने रचना केल्या. प्रेमकवितेतील उच्चकुलीन स्त्रीचे संकेत दूर सारून त्याने सर्वसामान्य स्त्रियांनाही आपल्या कवितेतून स्थान दिले. ‘मिनसांग’ ही दरबारी प्रेमकविता होती मात्र तिच्या आधी लिहिल्या गेलेल्या जर्मन प्रेमकवितेतील साधेपणाला व्हाल्टरने एक नवे, विलोभनीय रूप दिले. याशिवाय नृत्यगीते, वसंतगीते, निसर्गगीते, रूपकात्मक गीते, धर्मयुद्ध गीते अशा विविध प्रकारची कविता त्याने रचली. हा ‘भटका कवी’ आपल्या कविता स्वत: गात असे. या भटकंतीमधूनच श्प्रूख या काव्यप्रकाराचे एक सुभाषितात्मक रूपही त्याने आत्मसात केले आणि त्याचा वापर करून तात्त्विक, चिंतनात्मक रचना केल्या. समकालीन घटनांमध्ये स्वारस्य असल्याने त्याने राजकीय स्वरूपाची कविताही लिहिली. त्याच्या तत्त्वनिष्ठ आदर्शवादी भूमिकेला निर्भिडपणाचीही जोड लाभली होती. म्हणूनच पोप तिसरा इनोसंट (सु. ११६०-१२१६) आणि पोप नववा ग्रेगरी (११७०-१२४१) हे त्याच्या टीकेचे लक्ष्य झाले. त्यामुळेच काही समीक्षक त्याला ⇨ मार्टिन ल्युथरचा पूर्वसूरी मानतात. मार्टिन ल्युथरने त्याच्या एका गीताचा उपयोगही करून घेतला होता. पुढे माइस्टरसिंगर ह्या जर्मन काव्यसंप्रदायातील बारा श्रेष्ठ कवींमध्ये व्हाल्टरची गणना करण्यात आली. (सु. पंधरावे शतक).

व्हाल्टरची एकंदर कविता सु. ५,००० ओळी इतकी भरते. व्हाल्टरच्या कवितांचे इंग्रजी भाषांतर–पोएम्स–हे १९५२ साली प्रसिद्ध झाले.

व्हाल्टर हा निरनिराळ्या राजकर्त्यांच्या दरबारी राहिला. वुर्ट्सबर्ग या आपल्या जहागिरीच्या गावी त्याचे निधन झाले.

संदर्भ : 1. Closs, August, The Genius of the German Lyric: An Historic Survey of its Formal and Metaphysical Values, London, 1938.

            2. Joos, Martin Whitesell, Frederick R. Eds., Middle High German Courtly Reader, Wisconsin, 1951.

            3. Zeydel, E.H. Morgan, B.Q. Trans., Poems, New York, 1852.

कुलकर्णी, अ. र.