व्यंग्यचित्र : (कार्टून). समकालीन व्यक्ती-घटना-प्रसंगात दडलेल्या विसंगत स्वरूपाच्या अर्थाचे म्हणजे सूचितार्थाचे हास्यजनक प्रकटीकरण करणारे चित्र. व्यंगचित्र हे पाहताक्षणीच हसविणारे व त्यासोबत उपरोधिक मार्मिक भाष्य जाणवून देणारे असते. कार्टूनचा इंग्रजीतील मूळ अर्थ संकल्पित चित्राचे सम आकारातील प्राथमिक चित्ररेखाटन होय पण १८४३ मध्ये या शब्दाला चित्रमय विडंबन असा एक वेगळाच अर्थ एका गमतीदार प्रसंगातून जोडला गेला. त्या सुमाराम इंग्लंडमध्ये बांधल्या जात असलेल्या पार्लमेंट हाउसच्या लांबरुंद भिंती भित्तिचित्रांनी सजवाव्यात व त्यासाठीची चित्रे चित्रकारांची स्पर्धा लावून त्यांमधून निवडावीत, असे तत्कालीन व्हिक्टोरिया राणीचा पती प्रिन्स ॲल्बर्ट याने ठरविले पण (स्पर्धेसाठी आलेली) कार्टून्स (त्यावेळचा अर्थ) हास्यास्पद वाटावीत एवढी सुमार निघाली. या प्रकाराची खिल्ली उडवण्यासाठी त्यावेळी नुकत्याच निघालेल्या पंच साप्ताहिकाने (१८४१) पंचची कार्टून्स म्हणून व्यंग्यचित्र-मालिका प्रसिद्ध केली. त्यामध्ये जॉन लीच (१८१७–६४) या चित्रकाराचे कार्टून नं.१ या शीर्षकाखाली एक चित्र होते. लांबरुंद भिंतीवर श्रीमंत, ऐषारामी राजे-उमरावांची अनेक व्यक्तिचित्रे लावली आहेत आणि समोर भुकेकंगाल, फाटक्या कपड्यांतील तळागाळातले लोक (अगदी सहकुटुंब, सहपरिवार) प्रेक्षक म्हणून आले आहेत असे दाखवून भपक्यावर अनावश्यक खर्च करणार्या. राजाची जनतेबद्दलची निष्ठुर बेफिकीरी सूचित केली होती.  तेव्हापासून ‘कार्टून’ला सध्याचा ‘व्यंगचित्र’ हा नवा अर्थ चिकटला. मराठीमध्ये प्रत्यक्ष वापरात मात्र ‘व्यंगचित्र’ असाच शब्द रूढ झाला आहे.

व्यंग्यचित्र सभोवतालच्या जीवनातील घडामोडींतील विसंगती नेमकी टिपून त्यावर भाष्य करते. समाजातील रूढ अपप्रवृत्ती, नेत्यांच्या बोलण्यातील आणि वागण्यातील विसंगती, अनेक प्रकारचे भ्रष्टाचार, परिस्थितीमुळे सामान्य माणसाची होणारी कोंडी यांचे मार्मिक दर्शन व्यंग्यचित्र घडवते आणि कधी थट्टामस्करी, तर कधी उपरोध-उपहास यांचा यथोचित उपयोग करून चित्ररसिकाचे प्रबोधन करते. योग्य काय, अयोग्य काय याचे त्याला भान आणून देते. त्याची खिलाडू वृत्ती आणि संवेदनक्षमता वाढवते. काही व्यंग्यचित्रे निखळ, निर्मळ हास्य निर्माण करतात तर काही हसवताहसवता अंतर्मुख बनवतात. काही उघड संदेश देणारी असतात.

व्यंग्यचित्र हसवणारे असेल किंवा नसेल पण सुप्त वा उघड आक्रमकता मात्र त्यात जरूर असतेच. आक्रमकता हे व्यंग्यचित्राचे अविभाज्य अंग आहेच, तसेच अनपेक्षित कलाटणी हेदेखील त्याचे आणखी एक वैशिष्ट्य होय.

व्यंग्यचित्र हे चित्र व शब्द यांचे संयुक्त माध्यम आहे. बहुसंख्य व्यंग्यचित्रे आपला आशय चित्र व शब्द या दोन्हींच्या साहाय्याने व्यक्त करतात. सुरुवातीच्या काळात जेव्हा लेखकांनी दिलेल्या कल्पनांवर चित्रकार चित्रे काढीत, तेव्हा तर दोन-तीन व्यक्तींचा सात-आठ ओळींपर्यंतचा संवाद असलेली व्यंग्यचित्रे आढळून येत. पुढे चित्रकार स्वत:च्या कल्पनांनुसार चित्रे काढू लागले, तशी शब्दांची संख्या कमी होऊ लागली. विसाव्या शतकाच्या दुसऱ्या दशकापासून हे विशेषकरून घडून आले पण व्यंग्यचित्रांतनू शब्दांचे पूर्ण उच्चाटण करणे मात्र शक्य झालेले नाही.

व्यंग्यचित्र हे प्रथमत: दृश्य माध्यम आहे. त्यामध्ये चित्राने महत्त्वाची भूमिका बजावली पाहिजे, हे खरे आहे. म्हणून उत्तम व्यंग्यचित्रात रेषा, आकार (आणि कधीकधी रंग) व त्यांच्या साहाय्याने बनणारी रचना (काँपोझिशन) या दृश्य माध्यमातील घटकांच्या अंगभूत ताकदीचा कौशल्याने उपयोग केलेला असतो. तसेच चित्रातील व्यक्तींची चेहेरेपट्टी, अंगलट, चेहऱ्यावरील व शारीरिक हावभाव, पोषाख इ. गोष्टी चित्रविषयानुसार अचूक निवडण्यावर लक्ष दिलेले असते. उत्तम व्यंगचित्रात उत्तम विडंबनचित्र वा अर्कचित्र अंतर्भूत असतेच.

Yes, yes I follow, Sir, I will economise further in my department. काटकासरीचे धोरण : एक व्यग्यचित्र. - चित्रकार : आर्. के. लक्ष्मण.  'रॉन्‌डिव्हू' : हिटलरने रशियाबरोबर मैत्रीबरोबर मैत्रीचा करार केल्यानंतर त्या मैत्रीतील ढोंगीपणावर आघात करणारे टीकाचित्र, १९३९ - चित्रकार : डेव्हिड लो.  
वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेले पहिले राजकीय टीकाचित्र (१७५४) - चित्रकार : बेंजामिन फ्रँक्लिन. 'पंच'मधील जॉन लीच याच्या या चित्रानंतर (१८४३) 'कार्टून'शब्दाला नवा अर्थ चिकटला.

उत्तम व्यंग्यचित्रात शब्दालाही तेवढेच महत्त्व असते. अचूक शब्दरचना, संवादात उचित बोलीभाषा यांचा ते वापर करते.

सर्वसामान्यत: व्यंग्यचित्रामध्ये वास्तवाबरहुकूम प्रमाणबद्ध चित्रण क्वचितच केलेले असते. उलट विरूपीकरण हे व्यंग्यचित्रकाराच्या हातातील एक प्रभावी अस्त्र आहे. उत्तम व्यंग्यचित्रामध्ये किती प्रमाणात विरूपीकरण करावयाचे याचा  आशयानुरूप जाणीपूर्वक विचार केलेला असतो.

व्यंग्यचित्रांचे प्रकार : व्यंग्यचित्रांचे पुढीलप्रमाणे पाच प्रकार करता येतील :

(१) संपादकीय वा राजकीय टीकाचित्रे : दैनिके/साप्ताहिके यांमधून प्रसिद्ध होणारी ही व्यंग्यचित्रे म्हणजे व्यंग्यचित्रकाराची तत्कालीन घडामोडींवरची टीकाटिपणी. प्रत्यक्ष घडलेल्या घटनांचा या चित्रांमध्ये संदर्भ असल्यामुळे प्रत्यक्षातील व्यक्तींशी चित्रांमध्ये दाखवलेल्या व्यक्तींचे ओळखू येण्याएवढे साम्य असते. चालू घटनांबद्दलच्या वाचकांच्या प्रतिक्रियांना चालना देण्याचे काम ही व्यंग्यचित्रे करतात. अनेक वेळा या चित्रांमध्ये प्राणी, प्रतीके, इतिहासपुराणांतील दाखले, दृष्टान्त, लोकप्रिय आख्यायिका यांचा उपयोग केला जातो.

(२) हास्यचित्रे : (गॅग). ही प्रामुख्याने मासिके, वार्षिके इ. नियतकालिकांतून प्रसिद्ध होतात. सभोवतालच्या जीवनातील विसंगतीवर बोट ठेवून विनोद निर्माण करण्याचा या प्रकारच्या चित्रांचा हेतू असतो, त्यामुळे त्यांना सामान्यपणे हास्यचित्रे (गॅग) म्हणता येईल. या चित्रांमधील टीकेचा रोख प्रत्यक्षातील कुणा व्यक्तीवर नसतो वृत्तीवर असतो. त्यामुळे यामधील व्यक्तींचे प्रत्यक्षातील व्यक्तींशी ओळखू येण्याइतके साम्य नसते. ज्या चित्रामधील आशय हसवताहसवता अंतर्मुख बनवणारा व म्हणून अंतिमत: गंभीरच असतो, अशी व्यंग्यचित्रेही या प्रकारात मोडतात. मात्र त्यांना खऱ्या अर्थाने हास्यचित्रे म्हणता येणार नाही. चित्राच्या आस्वादकाला अधिक संवेदनाशील बनवण्यासठी व त्याच्यामध्ये खिलाडू वृत्ती बाणवण्यासाठी ही चित्रे हातभार लावतात.

(३) व्यंग्यरेखने : (इलस्ट्रेशन्स). नियतकालिकांतील लेखांसाठी किंवा पुस्तकातील मजकुरासाठी किंवा जाहिरातीसाठी काढलेली व्यंग्यचित्रे या प्रकारात मोडतात. पाहताक्षणीच आपला आशय वाचकांपर्यंत पोहोचवण्याच्या दृश्य माध्यमाच्या या अद्‌भुत गुणधर्मामुळे व्यंग्यरेखने सोबतच्या मजकुराला पूरक आणि उपयुक्त ठरतात. प्रतिभावंत व्यंगचित्रकार अनेकदा शब्दमाध्यमाच्या मर्यादेमुळे व्यक्त न करता आलेल्या आशयाचा पैलू चित्रातून मांडून रसिकाचा अनुभव अधिक संपन्न बनवू शकतो.

विनोदी साहित्य अधिक प्रत्ययकारी होण्यासाठी व्यंग्यरेखने जशी मदत करतात, तशीच ती व्यवस्थापनशास्त्र, समाजशास्त्र, गणित, खगोलशास्त्र यांसारखे गंभीर व रुक्ष विषय सुलभतेने समजावून देण्यासाठीही उपयुक्त ठरतात.

(४) विनोदी चित्रपट्टी (कॉमिक स्ट्रिप), व्यंग्यचित्रमालिका (पॅनेल्स) व व्यंग्यचित्रपुस्तिका : वरील तिन्ही प्रकारांत कालप्रवाहातील एखादा क्षण पकडून तो एका व्यंग्यचित्रात चित्रबद्ध केलेला असतो. विनोदी चित्रपट्टीमध्ये एकाहून अधिक व्यंग्यचित्रे कालानुक्रमाने एकामागून एक मांडून घटनेचा कालखंड त्यामधून सादर केला जातो.

चित्रपट्टीला जोडलेला ‘कॉमिक’ हा शब्द काहीसा दिशाभूल करणारा आहे. कारण आजवर निर्माण झालेल्या व सध्याही प्रसिद्ध होत असलेल्या चित्रपट्ट्या पाहिल्या, तर लक्षात येते की, प्रथमपासूनच त्यांच्या विषयांमध्ये विनोदाच्या बरोबरीनेच साहसकथा, हेरकथा, ऐतिहासिक वा पौराणिक कथा, विज्ञानकथा इ. विविध प्रकारांचा समावेश होत आलेला आहे.

वृत्तपत्राच्या एका किंवा अधिक पानांवर मिळून अशा निरनिराळ्या चित्रपट्ट्या छापल्या जातात. यांमधून एक किंवा अधिक व्यक्तिरेखा वेगवेगळ्या प्रसंगांतील त्यांच्या कृतींमधून किंवा संवादांमधून सादर केल्या जातात तर काहींमधून एकच सलग कथानक क्रमाक्रमाने रोज सांगितले जाते (उदा., मँड्रेस दी मॅजिशन, टारझन इ.). काहींमध्ये व्यक्ती त्याच असल्या, तरी प्रत्येक चित्रपट्टीत स्वतंत्र प्रसंग असतात (उदा., आर्ची, ब्रिंगिंग अप फादर इत्यादी).

व्यंग्यचित्रमालिकेमध्ये एकाच विषयाभोवतीचे विविध पैलू अनेक चित्रांतून सादर केलेले असतात. सर्वांची मिळून एक व्यंग्यचित्रमालिका बनलेली असली, तरी प्रत्येक व्यंग्यचित्र त्याच्यापुरते स्वतंत्र असते व त्याचा स्वतंत्रपणे आस्वाद घेता येतो.

व्यंग्यचित्रपुस्तिकेमध्ये अनेक चित्रपट्ट्या एकत्र करून त्यांची पुस्तिका बनवलेली असते. या चित्रपट्ट्या एकाच चित्रकाराच्या असतील किंवा वेगवेगळ्या चित्रकारांच्या असतील. काही व्यंग्यचित्रपुस्तिकांमध्ये एकच संपूर्ण कथा सांगितलेली असते. उदा., वॉल्ट डिझ्नीच्या अनेक व्यंग्यपटांवर आधारित पुस्तिका, तर काहींमध्ये चालू कथाप्रकारातील एखादा भाग असतो (उदा., टारझन, फँटम).

चित्रपट्टीप्रमाणेच पुस्तिकांमध्येही अनेक विषय आढळून येतात. उदा. रामायण, महाभारत, पंचतंत्र वगैरेंवर आधारित पुस्तिका आहेत, तशाच थ्री मस्केटियर्स, रॉबिन्सन क्रूसो एवढे नव्हे, तर क्राइम अँड पनिशमेंटसारख्या गंभीर कादंबऱ्यांवरील पुस्तिकाही आहेत.

(५) सचेतन व्यंग्यचित्रे : (ॲनिमेटेड कार्टून्स). चित्रपटतंत्राच्या शोधानंतर व्यंग्यचित्रांमधील व्यक्तिरेखांना हालत्या, चालत्या आणि बोलत्या स्थितींत रुपेरी पडद्यावर सादर करणे शक्य झाले. ⇨ वॉल्ट डिझ्नी (१९०१–६६) हा सचेतन व्यंग्यचित्रकलेचा आद्य जनक मानला जातो. त्याने निर्माण केलेल्या ‘मिकी माउस’, ‘डोनाल्ड डक’, ‘टॉम’ आणि ‘जेरी’ या व्यक्तिरेखा आजही जगभर लोकप्रिय आहेत. ‘मिकी माउस’ तर आता विश्वसंस्कृतीचे एक प्रतीक बनू पाहतो आहे.

पडद्यावर व्यंग्यचित्रातील व्यक्तीची हालचाल दाखवायची असल्यास त्या हालचालीची क्षणा-क्षणानंतरची स्थिती दाखवणारी शेकडो चित्रे प्रथम काढून तयार करावी लागतात व त्यावरून मग फिल्म तयार करावी लागते. आता संगणकाच्या मदतीमुळे हे काम हलके तर झालेच पण पूर्वी केवळ कल्पनेतीलच वाटल्या असत्या अशा गोष्टी तांत्रिक क्रांतीमुळे पडद्यावर प्रत्यक्ष साकार करणे शक्य झाले आहे.

‘लायन किंग’ हे या अद्ययावत तंत्रक्रांतीचेच फळ आहे. या विकसित तंत्रज्ञानामुळे क्षणार्धात लोकांचे लक्ष खेचून घेण्याच्या व्यंग्यपटाच्या अंगभूत ताकदीचा फायदा सुलभतेने घेणे शक्य झाले आहे. त्यामुळे सचेतन व्यंग्यपटांची संख्या व वेगवेगळ्या विषयांच्या प्रशिक्षणापासून ते जाहिरात यांसारख्या अनेकविध क्षेत्रांतील त्यांचा वापर प्रचंड प्रमाणात वाढला आहे.


ऐतिहासिक आढावा : पाश्चात्त्य देशांत प्रबोधन काळानंतर सर्वत्र व्यक्तिस्वातंत्र्य व उच्चारस्वातंत्र्य यांची जी जाणीव जागृत झाली, ती व्यंग्यचित्रकलेच्या उदयाला कारणीभूत ठरली. पंधराव्या शतकातील ⇨ ओनार्दो दा व्हींची (१४५२–१५१९) व ⇨ आल्ब्रेक्त ड्यूरर (१४७१–१५२८) यांनी केलेली विरूपित चेहेऱ्यांची रेखाटणे, सोळाव्या शतकातील थोरला पीटर ब्रगेल (सु. १५२५–६९) व त्याचा समकालीन डच चित्रकार हिएरोनीमस बॉस (सु. १४५०–१५१६) यांची चित्रे ह्या व्यंग्यचित्रकलेच्या मार्गावरील खुणाच असल्या, तरी या कलेला खरी गती मिळाली ती अठराव्या शतकातील इंग्लंडमधील विल्यम होगार्थ (१६९७–१७६४), जेम्स गिलरे (१७५७–१८१५) स्पेनमधील फ्रांथीस्को होसे दे गोया यांच्या कामगिरीमुळे [→ गोया]. एकोणिसाव्या शतकाच्या मध्यावर इंग्लंडमध्ये १८४१ साली हेन्री मेह्यूच्या पंच या साप्ताहिकाचा जन्म झाला व त्यानंतर व्यंग्यचित्रकलेची अखंड परंपरा निर्माण झाली. पंचच्या सुरुवातीच्या काळातील जॉन लीच, जॉन टेनिएल (१८२०–१९१४), चार्ल्स कीन (१८२३–९१), जॉर्ज द्यूमॉरीए (१८३४–९६) यांसारख्या श्रेष्ठ व्यंग्यचित्रकारांनी ही कला समृद्ध केली. फ्रान्समध्ये ऑनोरे दोम्ये (१८०८–७९) या चित्रकाराला त्याने काढलेल्या तत्कालीन राजा लूई फिलीपच्या व्यंग्यचित्राबद्दल १८३२ मध्ये पाच महिने तुरुंगवास भोगावा लागला.

दिनांक ९ मे १७५४ च्या पेनसिल्व्हेनिया गॅझेटमध्ये ⇨ बेंजामिन फ्रँक्लिनचे (१७०६–९०) जॉइन ऑर डाय या शीर्षकाने प्रसिद्ध झालेले व्यंग्यचित्र हे अमेरिकेतील पहिले राजकीय टीकाचित्र होय. त्यावेळच्या अमेरिकेतील आठ वसाहतींना राज्यकर्त्यांच्या विरुद्ध ‘एकत्रित या अथवा मरा’ असा आदेश त्यातून दिला आहे. सापाचे केलेले तुकडे सूर्यास्त व्हायच्या आत एकत्र केले, तर तो साप पुन्हा जिवंत होतो, असा एक लोकसमज त्याकाळी प्रसृत होता. त्यावर हे चित्र आधारलेले होते. एक महिन्याच्या आत अमेरिकेतील जवळजवळ प्रत्येक वृत्तपत्राने ते पुनर्मुद्रित केले. फ्रँक्लिनचा समकालीन पॉल रिव्हिअर (१७३५–१८१८) व नंतरच्या टिस्डेड, विल्यम, चार्ल्स, डेव्हिड जॉन्स्टन (१७९९–१८६५) इत्यादींनी प्रखर व घणाघाती राजकीय टीकाचित्रांची ही परंपरा पुढे चालवली. एकोणिसाव्या शतकातील टॉमस नॅस्टने (१८४०–१९०२) १८७१ मध्ये टॅमॅनीचा दादा (‘बॉस’) विल्यम ट्वीड आणि त्याची चांडाळचौकडी यांच्या प्रचंड भ्रष्टाचारावर हॉर्पर्स वीकलीमधून टीकाचित्रांची मोहीमच उघडली आणि तिच्या परिणामी अखेरीस ट्वीडला तुरुंगवास भोगावा लागला. नॅस्टचे समकालीन फ्रँक बेल्यू, जोसेफ केल्पर (१८३८–९४) यांनी, तसेच जज्, पक, लाइफ या तत्कालीन वृत्तपत्रांनी टीकाचित्रांची परंपरा जागृत ठेवली.

विसाव्या शतकात व्यंग्यचित्रकलेचा फार मोठ्या प्रमाणावर विस्तार व विकास घडून आला. पहिल्या अर्धशतकात झालेल्या दोन जागतिक महायुद्धांमुळे लोकांच्या जीवनदृष्टीत आमूलाग्र फरक घडून आला. त्याचे प्रतिबिंब व्यंग्यचित्रांवर पडणे अपरिहार्य होते. व्यंग्यचित्रांच्या विषयांची व्याप्ती अमऱ्या वाढली. अमेरिकेमध्ये तर महाविद्यालये आणि विद्यापीठे यांच्या नियतकालिकांतूनदेखील व्यंग्यचित्रांना मोठा बहर आला. १९२५ मध्ये न्यूयॉर्कर साप्ताहिकाचा उदय झाला आणि त्याने ग्लूयस विल्यम्स, पीटर अर्नो (१९०४–६८), ॲल्फ्रेड फ्रूह, ऑटो सॉग्लो (१९००–७५), जॉर्ज प्राइस, व्हर्जिल पार्च, ⇨ जेम्स थर्बर (१८९४–१९६१), सॉल स्टाइनबर्ग इ. अनेक व्यंग्यचित्रकारांना प्रकाशात आणले. तद्वतच इंग्लंडमधील पंचने रोनाल्ड सर्ल, ब्रॉकबँक, ‘फूगा’ सी. केनेथ बर्ड (१८८७–१९६५), थेलवेळ, एमेट, आंद्रे फ्रान्स्वा, पेने, सेंपे इ. असंख्य व्यंग्यचित्रकार वाचकांना मिळवून दिले. आजमितीला इंग्रजीमध्ये काम करणाऱ्या-राजकीय टीकाचित्रकारांची आणि हास्यचित्रकारांची संख्या एवढी प्रचंड आहे की, त्यामधून मोजकी नावे निवडणे अशक्यच आहे. तथापि काही विशेष उल्लेखनीय निवडक व्यंग्यचित्रकारांत रेनन तयुरी, हरब्लॉक (हर्बर्ट एल्. ब्लॉक), जॉन फिशेरी, पॅट्रिक ऑलफंट, ज्यूल्स फाइफर, मायकेल हीथ, ‘लॅरी’, महूद, डेव्हिड लँग्डन यांची गणना करता येईल.

विसाव्या शतकातील अत्यंत प्रभावशाली राजकीय टीकाचित्रकार म्हणून ⇨ डेव्हिड लो (१८९१–१९६३) याचा विशेष उल्लेख केला पाहिजे. जवळजवळ साठ वर्षांहून अधिक कालावधीत अखंडपणे टीकाचित्रे काढून त्याने यूरोपमधील प्रचंड उलथापालाथीच्या ह्या काळात शहाणपणाचे भान जागवण्याचा प्रयत्न केला. कुंचल्याच्या फटकाऱ्यांनी सिद्ध केलेल्या त्याच्या चित्रांत जोश असे, पण द्वेष क्वचितच असायचा.

पाश्चात्त्य देशांतील आजचा प्रचंड लोकप्रिय व्यंगचित्रप्रकार म्हणजे ‘कॉमिक्स’. परिणामी, जगभर प्रसिद्ध होणाऱ्या कॉमिक्सची संख्या अमर्यादच आहे. लोकप्रियतेच्या मापदंडाने त्यांमध्ये कमीअधि करणे अशक्यच असले,  तरी त्यांपैकी ‘टीनटीन’, ‘आर्ची’, ‘डेनिस दी मिनेस’, ‘सुपरमॅन’, ‘स्पाइडरमॅन’, ‘पीनट’, ‘फँटम’ ही काही नावे विशेष लोकप्रिय आहेत.

पाश्चात्त्य देशांच्या मानाने मराठीतील व्यंग्यचित्रकलेची परंपरा अल्पकालीन आहे. ठाण्याहून निघणार्याँ ‘हिंदू पंच’ या साप्ताहिकात १८८३ च्या सुमारास प्रसिद्ध झालेले व्यंग्यचित्र हे कालक्रमाने पहिले असले, तरी सलग परंपरा सुरू झाली ती १९२५ साली किर्लोस्करमधून (त्यावेळचे किलोस्कर खबर) शं. वा. किर्लोस्करांनी नियमितपणे दर महा व्यंगचित्र काढायला सुरुवात केल्यापासून. वैयक्तिक उन्नती व समाजाची सर्वांगीण प्रगती यांसाठी काय केले पाहिजे, याबद्दल प्रबोधन करणारी सु. तीनशेहून अधिक व्यंग्यचित्रे (किंवा बोधचित्रे) शं. वा. किर्लोस्कर यांनी काढली. त्यानंतर तत्कालीन सामाजिक, राजकीय घडामोडींवरील टीकाचित्रेही त्यांनी सातत्याने अनेक वर्षे काढली. तसेच नव्या व्यंग्यचित्रकारांची चित्रे किर्लोस्करमध्ये छापून त्यांना उत्तेजन दिले. व्यंग्यचित्रांच्या प्रभावशक्तीची जाणीव असलेले दुसरे एक संपादक ना. भि. परुळेकर आपल्या ‘सकाळ’ या वृत्तपत्रातून अगदी सुरुवातीपासून आवर्जून प्रत्येक अंकात टीकाचित्र (व हास्यचित्र) देत असत.

राजकीय टीकाचित्रांची परंपरा पुढे दीनानाथ दलाल यांनी काही काळ चालवली. त्यातून पुढे बाळ ठाकरे यांनी स्फूर्ती घेऊन अनेक वर्षे टीकाचित्रे रेखाटून या व्यंग्यचित्र प्रकाराला मराठीत स्थैर्य व प्रतिष्ठा तर मिळवून दिलीच, पण ‘मार्मिक’ हे व्यंग्यचित्राला वाहिलेले साप्ताहिक काढून त्यामधून अनेक तरुण व्यंग्यचित्रकारांना उत्तेजन देऊन पुढे आणले. त्यांपैकी विकास सबनीस हे एक होत.


हरिश्चंद्र लचके यांचेही स्फूर्तिस्थान शं. वा. किर्लोस्करच होते पण त्यांनी हास्यचित्रे काढणे पसंत केले. आजमितीलाही म्हणजे साठहून अधिक वर्षे-ते हास्यचित्रे काढीत आहेत. किर्लोस्कर प्रमाणेच नंतरच्या काळात हंस, मोहिनी या अनंत अंतरकरांच्या मासिकांनी आणि वाडेगावकरांच्या उद्यम मासिकाने १९४०च्या आसपास हास्यचित्रकलेला चालना दिली. या मासिकांतून नागेश आर्डे, शि. द. फडणीस, प्रभाकर ठोकळ, हत्तंगडी, गवाणकर, वसंत सरवटे, श्याम जोशी आदी हास्यचित्रकार मराठी भाषेला मिळाले. पुढील दशकामध्ये मधुकर पाटकरांचे आवाज वार्षिक, बेहेरे यांचे जत्रा यांसारख्या नियतकालिकांनी व्यंग्यचित्र विस्तृत वाचकांपर्यंत पोहोचवले, तर श्री. पु. भागवत व राम पटवर्धन यांचे मौज, उमाकांत ठोमरे यांचे वीणा यांसारख्या वाङ्मयीन नियतकालिकांनी या प्रकाराला प्रतिष्ठा मिळवून दिली.

आजमितीला मराठीमध्ये पन्नासहून अधिक व्यंगचित्रकार निर्मिती करीत आहेत. मराठीमधून मासिके जवळजवळ अस्तंगत होत चालल्याने व्यंग्यचित्रकारांना दैनिके, साप्ताहिके आणि दिवाळी अंक हेच क्षेत्र आता उपलब्ध राहिले आहे. महानगरांमधील साखळी वृत्तपत्रांचीच केवळ नव्हेत, तर जिल्हा, तालुका पातळीवरील वृत्तपत्रांची दैनिके/साप्तहिकेसुद्धा आता दररोज/दर आठवड्याला व्यंग्यचित्रे आवर्जून देतात. त्यामुळे समकालीन सामाजिक, राजकीय आदी घडामोडींवर आधारलेल्या वृत्तपत्रीय व्यंग्यचित्रांची संख्या सध्या मराठीत अधिक दिसते. मानवी जीवनातील शाश्वत विसंगतींवर आधारलेली व म्हणून तुलनेने लवकर कालबाह्य न होणारी व्यंग्यचित्रे प्रामुख्याने वार्षिकांतून तसेच दिवाळी अंकांतून पाहायला मिळतात.

मराठीमधील वर उल्लेखिलेल्या नावांखेरीज आणखी काही व्यंग्यचित्रकारांची नावे लक्षणीय कामगिरीच्या संदर्भात घ्यायची झाल्यास श्रीकांत ठाकरे, राज ठाकरे, मंगेश तेंडुलकर, मनोहर सप्रे, ज्ञानेश सोनार, विजय पराडकर, यशवंत सरदेसाई, प्रभाकर वाईरकर, विवेक म्हेत्रे, अभिमन्यू कुलकर्णी, रंगा, प्रभाकर झळके, प्रशांत कुलकर्णी आदींचा उल्लेख करावा लागेल. मराठी ‘सिंडिकेट’ (व्यवसायसंघ) पद्धत अद्याप प्रस्थापित झाली नसल्याने विनोदी चित्रपट्ट्या आपल्याकडे अल्पसंख्य आहेत. प्रारंभी दै. सकाळमधून व नंतर दै. लोकसत्तामधून’  प्रसिद्ध होणारी ‘चिंटू’ (चारुहास पंडित/प्रभाकर वाडेकर) ही चित्रपट्टी आणि राम वाईरकर, प्रताप मुळीक यांच्या ऐतिहासिक-पौराणिक कथांवरील व्यंग्यपुस्तिका लक्षणीय आहेत. ⇨ आर. के. लक्ष्मण यांची मूळ इंग्रजीतून काढलेली व महाराष्ट्र टाइम्समध्ये प्रसिद्ध होणारी व्यंग्यचित्रे दर्जेदार व लोकप्रिय ठरली आहेत. त्यांच्या कॉमन मॅनचा पूर्णाकृती पुतळा पुण्याच्या सिम्बायोसिस संस्थेत बसविण्यात आला आहे. मात्र ही व्यंग्यचित्रे मर्यादित सिंडिकेटतर्फेच प्रसृत होतात. सचेतन व्यंग्यचित्रांबाबतही  ⇨ व्ही. शांताराम यांनी दिग्दर्शित केलेल्या जंबूकाका (१९३५) या भारतातील पहिल्या व्यंग्यपटाचा एकमेव उल्लेख करावा लागेल.

पहा : विडंबनचित्र.

संदर्भ : 1. Hoff, Syd, Editorial and Political Cartooning, 1976.             2. Low, David, Years of Wrath : Cartoon History 1932–45.             3. Williams, Ronald E. Ed. A Century of Punch Cartoons, 1955.             4. Wood, Art, Great Cartoonists and their Art, 1987.            ५. कुलकर्णी, प्रशांत, संपा., निवडक मराठी व्यंगचित्रे.             ६. धर्मापुरीकर, मधुकर सरवटे, वसंत, व्यंगचित्र : एक संवाद, २००१.

सरवटे, वसंत