झेआमी (सेआमी), मोतोकिओ :(? १३६३ ― ? १४४३). प्राचीन जपानी ⇨नो नाट्य  रंगभूमीवरील प्रख्यात नट, नाटककार व नाट्यसमीक्षक. त्याचे वडील कान्आमी कियोत्सुगू हेदेखील एक प्रथितयश नाटककार होते. झेआमीने त्यांच्याच प्रेरणेने वयाच्या अकराव्या वर्षी रंगभूमीवर पदार्पण केले. टोकिओमधील इमाकुनामो या प्रार्थनामंदिरात त्याने नो नाट्याचा एक बहारदार प्रयोग केला. या प्रयोगाने खुश होऊन सेनाप्रमुख योशिमित्सु याने नो नाट्याला उदार आश्रय दिला (१३७४). पुढे वडिलांच्या निधनानंतर झेआमी त्या नाटकमंडळीचा प्रमुख बनला (१३८४) व स्वतः नाट्यप्रयोगांतून प्रमुख भूमिका करू लागला. अभिनय कौशल्याप्रमाणेच नाट्यलेखन कलेतही झेआमी निपुण होता. त्याने सु. दोनशे नाटके आणि काही नाट्यसमीक्षा ग्रंथही लिहिले. त्यांपैकी कादेन्‌शो (१४००), शिकादोशो (१४२०) व नोसाकुशो (१४२३) हे त्याचे नाट्यसमीक्षणपर ग्रंथ प्रसिद्ध आहेत. या ग्रंथांतील तपशिलांवरून पंधराव्या शतकातील नो नाट्याच्या स्वरूपाची आणि वैशिष्ट्यांची पूर्ण कल्पना येते. १४०८ मध्ये झेआमीने योशिमित्सुच्या निवासस्थानी तत्कालीन राजा गो-कोमात्सूच्या सन्मानार्थ नो नाट्याचा एक उत्कृष्ट प्रयोग केला होता. हा काळ म्हणजे झेआमीच्या अत्युच्च यशाचा काळ होता परंतु या प्रयोगानंतर काही दिवसांतच सेनाप्रमुख योशिमित्सूचे निधन झाले आणि झेआमीच्या नशिबाचे पारडे फिरले. कारण त्यानंतरच्या सेनाप्रमुखांची झेआमीवर अवकृपा झाली त्यामुळे त्याला रंगमंचावरून निवृत्त होऊन नाट्यलेखन व नाट्यसमीक्षण यांतच आपले उर्वरित जीवन व्यतीत करावे लागले. १४२२ मध्ये त्याने नाटकमंडळीची सूत्रे आपल्या मुलाकडे सुपूर्त केली व तो ईश्वरचिंतनात वेळ घालू लागला दुर्दैवाने त्याचा मुलगाही मृत्युमुखी पडला, त्यामुळे झेआमीला फार मोठा धक्का बसला. त्यातच त्याला १४३४ मध्ये साडो बेटावर हद्दपार करण्यात आले तथापि १४४१ मध्ये तो पुन्हा टोकिओत परत आला पण त्यानंतर दोन वर्षांनीच तो निधन पावला. प्राचीन नो नाट्याच्या जडणघडणीत झेआमीचा फार मोठा वाटा आहे.

जोशी, चंद्रहास