हौन्सफील्ड (हॉन्सफील्ड), सर गॉडफ्री न्यूबोल्ड : (२८ ऑगस्ट १९१९–१२ ऑगस्ट २००४). इंग्रज विद्युत् अभियंते. सर गॉडफ्री न्यूबोल्ड हौन्सफील्ड (हॉन्सफील्ड)संगणकीकृत अक्षीय छेददर्शन [CAT (सीएटी) कॉम्प्युटराइज्ड ॲक्सिअल टोमोग्राफी] किंवा संगणकीकृत छेददर्शन(CT सीटी) हे वैद्यकीय निदान तंत्रज्ञान विकसित केल्याबद्दल त्यांना १९७९ सालचे मानवी वैद्यक अथवा शरीरक्रियाविज्ञान या विषयाचे नोबेल पारितोषिक ॲलन कॉरमॅक यांच्या-समवेत विभागून मिळाले. या तंत्रज्ञानात क्ष-किरणांच्या साहाय्याने रुग्णाच्या शरीराचे वर्तुळाकार क्रम-वीक्षण करून संगणकाच्या मदतीने शरीरातील अवयवांच्या काटछेदीय कापांच्या उच्च विभेदनक्षमता सर गॉडफ्री न्यूबोल्ड हौन्सफील्डअसलेल्या प्रतिमा मिळविता येतात. [→ वैद्यकीय प्रतिमादर्शन].

हौन्सफील्ड यांचा जन्म न्यूअर्क (नॉटिंगॅमशर, इंग्लंड) येथे झाला. त्यांनी आपले प्राथमिक शिक्षण न्यूअर्क येथील मॅग्नस ग्रामर स्कूल येथे पूर्ण केले. त्यांनी दुसऱ्या महायुद्धाच्या काळात रॉयल एअर फोर्समध्ये स्वयंसेवक म्हणून भाग घेतला. तेथे ते इलेक्ट्रॉनिकी आणि रडार तंत्रज्ञान शिकले. पहिली विभागीय चाचणी उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांना साउथ केंझिंग्टन येथील रॉयल कॉलेज ऑफ सायन्स येथे रडार तंत्रज्ञ निर्देशक म्हणून प्रवेश मिळाला. तेथे ते रेडिओ संदेशवहनाची सिटी अँड गिल्ड्स ही परीक्षा देखील विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण झाले. त्यांनी लंडन येथील फॅराडे हाउस इलेक्ट्रिकल एंजिनिअरिंग कॉलेजमधून पदविका प्राप्त केली. १९५१ मध्ये ते इलेक्ट्रिकल अँड म्यूझीकल इन्स्ट्रूमेंट (ईएमआय), लिमिटेड येथे संशोधक म्हणून रुजू झाले. त्यांनी ग्रेट ब्रिटनमधील ईएमआयडीईसी ११०० या पहिल्या केवळ ट्रँझिस्टर असलेल्या संगणकाचा अभिकल्प तयार करणाऱ्या गटाचे नेतृत्व केले (१९५८-५९).

हौन्सफील्ड हे संरचना प्रत्याभिज्ञाच्या समस्यांसंबंधी संशोधन करीत असताना त्यांनी सीएटी या तंत्रज्ञानाची मूळ कल्पना विकसित केली. त्यांनी संगणकाची क्षमता वाढविल्यामुळे क्ष-किरण संकेताचे अर्थ स्पष्ट होऊ लागले आणि मानवी मस्तिष्कासारख्या जटिल अवयवाची प्रतिमा निर्माण होऊ लागली. त्यांनी अक्षीय छेददर्शनाचा वैद्यकीय निदानात उपयोग व्हावा यासाठी पाठपुरावा केला. त्यासाठी त्यांनी प्रथमत: मस्तिष्काचे आणि नंतर संपूर्ण शरीराचे क्रमवीक्षण करू शकणाऱ्या आदिरूप क्रमवीक्षकांची निर्मिती केली. क्रमवीक्षकाकडून ज्या वेगाने संकेत मिळतात त्याच वेगाने त्यांवर प्रक्रिया करू शकणारे संगणकही लवकरच विकसित झाले. १९७२ मध्ये सीएटी क्रमवीक्षणाची पहिली निदानीय चाचणी यशस्वी रीत्या घेण्यात आली.

हौन्सफील्ड यांना विशेष संशोधनकार्याबद्दल अनेक मानसन्मान मिळाले. १९८१ मध्ये त्यांना ‘सर’ या किताबाने गौरविण्यात आले.

हौन्सफील्ड यांचे किंग्स्टन (इंग्लंड) येथे निधन झाले.

वाघ, नितिन भरत