टाईन नदीतील वाहतूक, न्यूकॅसल.

न्यूकॅसल अपॉन टाईन : उत्तर इंग्लंडच्या नॉर्थम्‌बरलंड परगण्यातील एक औद्योगिक शहर व बंदर. लोकसंख्या २,९७,००० (१९७४ अंदाज). हे लंडनच्या वायव्येस सु. ४३८ किमी., तर लीड्सच्या उत्तरेस सु. १३३ किमी. उत्तर समुद्राला मिळणाऱ्या टाईन नदीच्या उत्तर काठावर मुखापासून आत १३ किमी.वर वसले आहे. रस्ते, लोहमार्ग, जलमार्ग व हवाईमार्गाचे हे प्रमुख केंद्र असून, याच्या समोरच टाईन नदीच्या दक्षिण काठावरील गेट्सहेडशी पाच पुलांद्वारे वाहतूक चालते. लंडन – एडिंबरो लोहमार्ग येथील टाईन नदीच्या पुलावरून जातो. रोमन पूर्व काळापासून येथे वसती असून मुरूम व मंकचेस्टर या नावांनी हे ओळखले जात असे. १०८० मध्ये विल्यम द काँकररचा ज्येष्ठ मुलगा दुसरा रॉबर्ट याने येथे बांधलेल्या तटबंदी किल्ल्यावरूनच शहराला ‘न्यू कॅसल’ हे नाव पडले. स्कॉटलंडचा पहिला डेव्हिड तसेच पहिला चार्ल्‌स यांच्या आधिपत्याखाली काही काळ हे शहर होते. यादवी युद्धाच्या वेळी येथे राजसत्ता होती. दुसऱ्या महायुद्धात शहरावर वारंवार बाँब हल्ले झाले. तेराव्या शतकापासून येथून कोळसा निर्यातीस सुरुवात झाली असली, तरी सतराव्या शतकानंतरच इंग्लंडमधील एक प्रमुख  कोळसा निर्यातीचे केंद्र म्हणून यास प्रसिद्धी मिळाली. त्याआधी लोकर निर्यातीचे केंद्र म्हणून त्यास महत्त्व होते. १८८२ मध्ये याला शहराचा दर्जा मिळाला. जहाजबांधणी व दुरुस्ती या येथील प्रमुख उद्योगांशिवाय यंत्रसामग्री, काच, मीठ, साबण, लोखंडी वस्तू, कातडी वस्तू, निर्मितीउद्योग, रसायने हे उद्योगधंदेही महत्त्वाचे आहेत. येथून कोळसा, कोक, इंधन तेल, विद्युत्‌साहित्य, रसायने, यंत्रसामग्री, लोह आणि पोलादी वस्तू, खते यांची निर्यात तर लोह-पोलाद, खनिज तेल उत्पादने, कागद, लाकूड, गहू, खाद्यपदार्थ यांची आयात केली जाते.

शहराच्या उत्तरेस गॉझफोर्त व टेसमाँड, पूर्वेस वॉकर व हीटन, पश्चिमेस डेंटन व केंटन आणि नदीकाठावर स्कॉट्सवुड, एल्सविक व बायकर ही प्रमुख उपनगरे आहेत. हे एक महत्त्वाचे शैक्षणिक केंद्रही असून येथे न्यूकॅसल अपॉन टाईन विद्यापीठ (पूर्वीचे किंग्ज महाविद्यालय), रदरफर्ड तंत्रविद्या महाविद्यालय, प्रशिक्षण महाविद्यालय, द रॉयल फ्री ग्रामर विद्यालय, डेम ॲलन विद्यालय इ. शैक्षणिक संस्था आहेत. विज्ञान व उद्योग वस्तुसंग्रहालय (१६५८), हॅन्‌‌कॉक प्रकृतिविज्ञान वस्तुसंग्रहालय, पुरावशेष सोसायटी व वस्तुसंग्रहालयातील रोमन व इतर पुरावस्तू, लँग कलावीथी व वस्तुसंग्रहालय, हॉलॉन कलावीथी, बाराव्या शतकात नॉर्मनांनी बांधलेला किल्ला व त्याचे भव्य प्रवेशद्वार आणि सेंट अँड्रू (१२ वे शतक), सेंट निकोलस (१४ वे शतक), सेंट जॉन (१४ वे शतक) या चर्च वास्तू प्रेक्षणीय आहेत.

चौधरी, वसंत