ब्रॅनर, हॅन्स किश्चन : (२३ जून १९०३ – २४ एप्रिल १९६६). डॅनिश कथा कादंबरीकार आणि नाटककार. ऑरड्रूप येथे जन्मला. मॅट्रिकपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर काही काळ अभिनेता आणि एका प्रकाशनसंस्थेचा व्यवस्थापक. १९३२ पासून त्याने लेखनास पूर्णतः वाहून घेतले. ‘द प्लेथिंग’ (१९२६, इं. शी.) ही त्याची पहिली कादंबरी. त्यानंतरच्या कादंबऱ्यांत द रायडिंग मास्टर (१९४९, इं. भा. १९५१) ही विशेष उल्लेखनीय असून तीत मूल्यहीन अशा जगात वावरणाऱ्या आधुनिक माणसाच्या मनःस्थितीचे सखोल विश्लेषण केले आहे. ‘इन अ लिट्ल व्हाइल वुई आर गॉन’ (१९३९, इं. शी.) आणि टू मिनिट्स ऑफ सायलेन्स (१९४४, इं. भा. १९६६) हे त्याचे कथासंग्रह द जज (१९५२, इं. भा. १९५५) आणि ‘प्ले अबाउट लव्ह अँड डेथ’ (१९६०, इं. शी.) ही त्याची नाटके. आधुनिक मानसशास्त्रीय सिद्धांताच्या आधारे व्यक्तिलेखन करणे, हा ब्रॅनरच्या साहित्य कृतींचा एक लक्षणीय विशेष होय. कोपनहेगन येथे तो निधन पावला.

यानसेन, बिलेस्कॉव्ह एफ्. जे. (इं) कुलकर्णी, अ. र. (म.)