धात्री भेक : (मिडवाइफ टोड). उभयचर (जमिनीवर व पाण्यात राहणाऱ्या प्राण्यांच्या) वर्गाच्या ॲन्यूरा या उपवर्गातील हा प्राणी आहे. हा डिस्कोग्लाॅसिडी कुलातला असून मध्य यूरोपात आढळणाऱ्या याच्या सामान्य जातीचे शास्त्रीय नाव ॲलिटीस ऑब्स्टेट्रिकान्स असे आहे. याची आणखी एक जाती ॲलिटीस सिस्टर्नासिआय ही स्पेन व पोर्तुगालमध्ये आढळते. याचे वैशिष्ट्य म्हणजे प्रजोत्पत्तीच्या काळातील याचे विलक्षण वर्तन होय.

याची लांबी सु. ५–६ सेंमी. असते. अंग गुबगुबीत व रंग फिकट करडा असतो त्वचेवर चामखिळीसारख्या गुठळ्या असतात डोळे मोठे व बटबटीत असतात. विशेषेकरून हा पश्चिम यूरोपात राहणारा आहे.

अंड्याच्या माळा नेत असलेला नर धात्री-भेक

धात्री-भेक निशाचर आहे. त्याच्या हालचाली मंद असतात. त्याचे वास्तव्य जमिनीवर असते. त्याच्या पायाची बोटे पातळ त्वचेने जोडलेली नसतात. तो जीभ बाहेर काढून किडे पकडतो. मुंग्या, मुंगळे, भुंगेरे इ. कीटक त्याचे प्रमुख खाद्य होय. संध्याकाळ होताच नर आपले अस्तित्व शिळेसारखा विशिष्ट आवाज करून प्रगट करतो. विणीचा हंगाम सबंध वसंत ऋतू व उन्हाळ्यात असतो. मादी या ऋतूत दोन, तीन, क्वचित चार वेळा अंडी घालते. नर व मादीचे मीलन जमिनीवर होते. नर पुढच्या पायांनी मादीच्या कमरेची पकड घेतो व मागच्या पायांनी तिच्या अवस्कराला (आतडे, युग्मक वाहिनी व मूत्रवाहिन्या ज्यात उघडतात अशा शरीराच्या मागच्या टोकाकडील समाईक कोष्ठाला) स्पर्श करून तिला उत्तेजित करून अंडी बाहेर टाकण्यास भाग पाडतो. अंडी मोठी व पिवळी असतात. मादी अंड्यांच्या दोन माळा बाहेर टाकते. माळेतील अंडी एका चिकट पदार्थाने जोडलेली असतात. माळा बाहेर पडत असताना नर त्यांवर आपले रेत टाकतो. त्यामुळे अंड्यांचे निषेचन (फलन) होते. यानंतर नर अंड्यांच्या माळा आपल्या मागच्या पायांभोवती गुंडाळून घेऊन सुरक्षित जागी जाऊन बसतो. हवा अतिशय कोरडी असेल, तर तो रात्री थोडा वेळ पाण्यात जाऊन अंडी ओली करून येतो. तीन आठवड्यांनी जेव्हा अंडी फुटण्याची वेळ येते तेव्हा नर पाण्यात जातो. अंड्यांचे कठीण कवच चावून फोडून भैकेर बाहेर येतात. सर्व अंड्यांतून भैकेर बाहेर येईपर्यंत नर माळा टाकून देत नाही. भैकेर बरेच मोठे झाल्यावर त्यांचे भेकांत रूपांतर होते.

दातार, म. चिं.