मेट्रो गोल्डविन मेयर : जागितक चित्रपट व्यवसायातील एक अग्रेसर अमेरिकन संस्था. ‘एम्. जी. एम्.’ या आद्याक्षरांनी सुप्रसिद्ध असलेल्या या संस्थेची १६ मे १९२४ रोजी सुरुवात झाली, ती तीन चित्रपटसंस्थांच्या विलिनीकरणाने. त्यांपैकी दोन संस्था चित्रपटनिर्मितीत आघाडीवर होत्या आणि तिसऱ्या संस्थेची अनेक चित्रपटगृहे होती. त्यामुळे प्रारंभापासूनच या संस्थेचे चित्रपट कलात्मक ठरले आणि ते जास्तीतजास्त चित्रपटगृहांतून प्रदर्शित होऊ लागले.

कलात्मक चित्रपटनिर्मितीची जबाबदारी सुरुवातीपासूनच लूइस बी. मेयर या जुन्या आणि जाणकार निर्मात्याकडे होती. त्याला अर्व्हिंग थालबर्गसारखा कल्पक व कर्तबगार सहकारी प्रथमपासूनच मिळाल्यामुळे संस्थेच्या ‘कलेसाठी कला’ या ब्रीदवाक्याप्रमाणे एकापेक्षा एक सरस चित्रपट निघू लागले त्यामुळे ‘एम्. जी. एम्.’ चे हॉलिवुडनजीकचे ‘कल्व्हर सिटी’ येथील प्रचंड चित्रपटनिर्मितिगृह विश्वविख्यात झाले. निर्माता हॉवर्ड डीट्स याने संस्थेसाठी गर्जना करणाऱ्या सिंहाचे बोधचिन्ह सुचविले होते.

पहिली चार-पाच वर्षे संस्थेने मूकपट निर्माण केले. पुढे बोलपटाचा जमाना सुरू झाला आणि १९२९ सालापासून संस्थेने बोलपट काढायला  सुरुवात  केली.  प्रतिवर्षी  सु.  ४० ते ५० चित्रपट तयार होत  असल्यामुळे संस्थेच्या पगारपत्रकावर  इतके नट व नट्या सतत असत की ‘अंतरिक्षातल्यापेक्षाही जास्त तारे व तारका एम्. जी. एम्. कडे आहेत’ असे म्हटले जाई. त्यांपैकी ⇨ ग्रेटा गार्बो, नॉर्मा शिअरर, क्लार्क गेबल, एलिझाबेथ टेलर, स्पेन्सर ट्रेसी, जॉर्ज कुकर, व्हिक्टर फ्लेमिंग, आर्थर फ्रिड हे त्यांपैकी काही प्रसिद्ध अभिनेते, अभिनेत्री व निर्माते होत. संस्थेने निर्माण केलेले कलात्मक व रंजक चित्रपट नियमितपणे जगभर प्रदर्शित व्हावे व ते लोकांना आरामशीरपणे पाहता यावेत, असा संस्थेचा पहिल्यापासूनच प्रयत्न होता. त्यासाठी १९३५ च्या सुमारास संस्थेने जगातील प्रमुख शहरांत स्वतःच्या मालकीची मेट्रो चित्रपटगृहे बांधण्याची एक महत्त्वाकांक्षी योजना आखली. ती योजना प्रत्यक्षात अंमलात आली आणि १६ देशांतील प्रमुख शहरांत मेट्रो चित्रपटगृहे उभी राहिली. कलकत्ता आणि मुंबई येथे १९३८ च्या सुमारास स्थापन झालेली मेट्रो थिएटर्स हा त्या योजनेचाच एक भाग होता.

पहिली जवळजवळ तीस वर्षे हा संस्थेच्या चित्रपटव्यवसायातील ऐन वैभवाचा काळ होता. त्या काळात डेव्हिड कॉपरफिल्ड (१९३४), म्युटिनी ऑन द बौंटी (१९३५), विझार्ड ऑफ ओझ (१९३९), गॉन विथ द विंड (१९३९), गुडबाय मि. चिप्स (१९३९), बेनहर (१९५९), डॉक्टर झिवागो (१९६६), ए. स्पेस ओडेसी (१९६८) व झॅब्ररिस्की पॉइंट (१९७०) यांसारखे अनेक उत्कृष्ट चित्रपट तयार झाले. संस्थेच्या अनेक चित्रपटांना व त्यांत काम करणाऱ्या कलाकार व तंत्रज्ञांना अमेरिकेच्या ‘ॲकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट अँड सायन्सेस’ तर्फे मानसन्मान प्राप्त झाले. मेट्रो गोल्डविन मेयर या नावाचा जनमानसावर त्या काळात एवढा पगडा होता, की संस्थेचे चित्रपट ६० देशांतील सु. ४०,००० चित्रपटगृहांतून सतत प्रदर्शित होत असत.

कालमानाप्रमाणे करमणूक क्षेत्रातही पुढे अनेक बदल झाले. दूरदर्शनची चढाओढ सुरू झाल्यामुळे संस्थेला केवळ चित्रपटनिर्मिती आणि प्रदर्शन यावर अवलंबून राहणे अशक्य झाले. त्यामुळे चित्रपट व्यवसायाबरोबर हॉटेल्स, ग्रामोफोन रेकॉर्डस अशा विविध क्षेत्रांत संस्थेने पदार्पण केले. दरम्यान संस्थेच्या व्यवस्थापनातही बदल होत गेले. केबल-दूरचित्रवाणी (टी. व्ही.) चा प्रणेता टेड टर्नर याने १९८५ च्या ऑगस्टमध्ये संस्थेच्या व्यवस्थापनाचे काम आपल्या अंगावर घेतले. कारण एम्. जी. एम्. या अक्षरांची जादू अजूनही कमी झाली नाही.

धारप, भा. वि.