चौधुरी,प्रमथ: (७ ऑगस्ट १८६८—२ सप्टेंबर १९४६). आधुनिक बंगाली कवी आणि समीक्षक. ‘बीरबल’ या टोपण नावाने ते लिहीत. पाबना जिल्ह्यातील हरीपुर गावी जमीनदार घराण्यात जन्म. कलकत्ता विद्यापीठातून तत्त्वज्ञान विषय घेऊन बी.ए. झाल्यावर एम्‌.ए.ला इंग्रजी साहित्य हा विषय घेऊन ते पहिले आले. विलायतेत बॅरिस्टर होऊन स्वदेशी परतल्यावर काही काळ त्यांनी कलकत्ता हायकोर्टात काम केले. नंतर दक्षिणेश्वरच्या संपत्तीची व्यवस्था पाहणारे विश्वस्त या नात्याने बरेच दिवस काम केल्यावर कलकत्ता विद्यापीठाच्या विधी महाविद्यालयात त्यांनी अध्यापन केले. कलकत्ता येथे ते निधन पावले.

सबुजपत्र (१९१४) नावाचे बंगाली मासिक काढून व संपादित करून बंगाली साहित्यात अभिनव लेखनशैली व साहित्योपयोगी प्रचलित बोलीभाषा यांचा त्यांनी पुरस्कार केला. सबुजपत्राने बंगाली साहित्यात आणि सामाजिक विचारधारेत क्रांती घडवून आणली. सबुजपत्रापूर्वी प्रमथबाबू भारतीत लिहित असत. रवींद्रनाथांना नोबेल पारितोषिक मिळाले (१९१३) तेव्हांपासून साहित्यक्षेत्रात प्रमथबाबू खऱ्या अर्थाने अवतरले. तत्पूर्वी त्यांनी थोडेबहुत लिहिले असले, तरी त्यांचे खरे लेखनसामर्थ्य तितकेसे प्रत्ययाला आले नव्हते. रवींद्रनाथ सबुजपत्राच्या बाजूचे होते आणि ते त्या मासिकात लिहीत. बीरबलेर हाल खाता  (विनोदी निबंध – १९१७), चार-इयारी-कथा  (कथा — १९१६), सनेट-पंचाशत  (काव्य — १९१३), पदचारण  (काव्य — १९१९), नीललोहित  (कथा — १९३२), रायतेर कथा  (निबंध — १९२६), गल्प संग्रह (कथा — १९४१), नाना कथा (निबंध-१९१९), आहुती  (कथा — १९१९) हे त्यांचे ग्रंथ विशेष उल्लेखनीय होत.

काव्य, कथा आणि समालोचन अशा विविध साहित्यनिर्मितीत प्रमथबाबू सिद्धहस्त होते. त्यांच्या लेखनात गोडवा आणि धार या दोन्हींचा प्रत्यय येतो. त्यांची भाषा चमकदार होती.

संदर्भ : Mukhopadhyay, Arun Kumar, Pramatha Chaudhuri, Delhi, 1970.

 

सेन, सुकुमार (बं.) कमतनूरकर, सरोजिनी (म.)